पंढरीची वारी

खंडू धनगर पंढरपूर जवळील एका छोट्याशा खेड्यात राहायचा.त्याच्याकडे जवळजवळ दोन-तीनशे मेंढ्यांचा कळप होता. रखमा,त्याची बायको आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका करायचे.खंडू धनगर विठ्ठलाचा परमभक्त होता. तोच काय त्याचा बा,आजा,पणजा सगळे पायवारी करायचे. खंडू धनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशी दिवशी मुलगी झाली. तिचं नाव खंडूने बाणाई असे ठेवले. हळूहळू बानाई मोठी होत होती.
पावसाळ्याचे दिवस होते,खंडू धनगर एक दिवशी बानाईला घेऊन मेंढरं चारायला गेला. अचानक वीज कडाडून पावसाला सुरूवात झाली.रखमा, जवळच झाडाखाली ठोकलेल्या पालात होती. तितक्यात जोरात वीज कडाडली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली. आत असलेली रखमा त्या विजेच्या तडाख्याने जागीच मरण पावली.
खंडूवर दुःखाचा डोंगर कोसळला.जड अंतःकरणाने बानाईला घेऊन खंडू दुसऱ्या गावाला गेला. आषाढी वारी जवळ आली होती. बानाई तीन वर्षांची झाली,यावर्षी बानाईला घेऊन वारीला जायचे असे खंडूने ठरवले. थोडेफार कपडे, वस्तू घेऊन तो बानाईसह आळंदीत दाखल झाला. एवढे दिवस फक्त मेंढरंच पाहिलेली बानाई थोडी गोंधळली. आजपर्यंत तिने फक्त मेंढरांची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदाच तिने माणसांची गर्दी पाहिली. खंडूने पायी चालायला सुरुवात केली.एका खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावर बानाई असा तो वारीत चालू लागला.पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला.जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गाडीजवळ खंडू गेला. त्या गाडीजवळ पुण्यातीलच एक डॉक्टर दांपत्य डॉ.देशमुख आणि त्यांची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायचे. बानाईला पाहताच डॉ.देशमुख मॅडम तिच्याजवळ गेल्या. तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले. तिने बोबड्या बोलात बानाई असे नाव सांगितले.त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या. आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. त्याच दरम्यान डॉ.देशमुखांनी खंडूला तपासले आणि काही औषध दिली.डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले .खंडूला थोडा वेळ कळेना डॉक्टरांनी माझे आभार का मानले. त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले सहा वर्षांपूर्वी आमची एकुलती एक मुलगी आम्हाला सोडून गेली. तीन वर्षाची असतानाच एका अपघातात ती मरण पावली. तेव्हापासून तिची आई हसणंच विसरून गेली होती.आम्ही वारीत गेली बारा वर्षे मोफत वैद्यकीय सेवा देतो.दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करतो,वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो.समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला. पण आमची विठ्ठल भक्ती कुठे तरी कमी पडली आणि आमची लाडकी राधा आम्हाला सोडून गेली. आज बानाईला बघून कदाचित तिला आमच्या राधाची आठवण आली असावी. म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. खंडूनेही बनाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांना फार वाईट वाटले देवाच्या मनात काय आहे खरंच कधीच कोणाला कळत नाही. एका आईचं लेकरू नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देव आहे का ?
मजल दर मजल करत डॉक्टर दांपत्य,खंडू आणि बानाई सासवडपर्यंत आले. खंडूच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी शिजत होते.सासवडमध्ये पोहचताच खंडू म्हणाला डॉक्टर बानाईला सांभाळा, मी आलोच. एक तास झाला, दोन तास झाले, अखेर सासवड सोडायची वेळ आली तरीही खंडू काही परतला नाही. डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. अखंड वारी डॉक्टर खंडू च्या शोधात होते पण खंडू काही सापडला नाही.सगळी गावे पार करत बानाईला घेऊन डॉक्टर दांपत्य पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरातही त्यांनी खंडूची खूप ठिकाणी चौकशी केली, त्याचा खूप शोध घेतला पण खंडूचा काही शोध लागला नाही.खंडूने खूप विचार करून बानाईला डॉक्टरांच्या स्वाधीन केले होते. त्याला वाटले मेंढरांत वाढण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल. तिला चांगलं घरदार, शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल.खंडू धनगर वारीतच लांबून लांबून चालत होता. डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली. शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला. माझी काळजी मिटली पांडुरंगा, ही माझी शेवटची वारी यापुढे मी वारीला येणार नाही,माझा पाय वारीचा वारसा माझी लेक चालवलं,असे म्हणून तो माघारी फिरला.
थोड्याच वेळात डॉक्टर दांपत्य बानाईला घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले.दोघांनीही हात जोडले आणि बानाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली. डोळे उघडताच डॉक्टरांना विठ्ठलाच्या मूर्तीत खंडू धनगराचा भास झाला. डॉक्टर सगळं काही कळून चुकले. विठ्ठला खरंच तुझी लीला अगाध आहे. डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले. विठ्ठला तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. पण तुझी भक्ती कधीही वाया जात नाही, याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला.माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्याच्या भेटीला गेलेल्या माणसाला भरभरून देतो तो.तिचे शब्द खरे ठरले. विठ्ठला माझ्या झोळीत मावणार नाही एवढं सुख दिलंस तू. आमची भक्ती फळाला आली..
आणि बानाईची बीना देशमुख झाली.
-सुरेखकन्या.
ॲड. अश्विनी सचिन जगताप.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.