पाळणा गाई अंगाई (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
©️®️ अनन्या अभिजीत
ममता टीव्ही बघत होती एका गाण्याच्या कार्यक्रमात एक होता विदूषक ह्या चित्रपटातलं अंगाई गीत सादर होत होतं. मी गाताना गीत तुला लडीवाळा… हे गाणं लहानपणी तीचे वडील तिच्यासाठी गायचे…
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखांच्या बांधून पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी
कधी डोळ्यांना काजळ तुज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट निजताना
ते ऐकुन का मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
गाणं ऐकताना ममताला लहानपण आठवलं, जुन्या आठवणींत रमली होती पण दुसरा अंतरा संपता संपता मात्र तिला काळजात खोलवर काहीतरी काहीतरी तुटतंय असं वाटलं. गेल्या काही दिवसांत तीला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं, ते काय ते तीच्या लेकीचा म्युझीकल रिमोट ऑपरेटेड स्कॅडल (पाळणा) कडे बघून लक्षात आलं. ती आठवू लागली…
ममताची दिड महिन्याची लेक मायरा खूप रडत होती. तीने लेकिला एकिकडे दूध पाजायला छातीला लावलं आणि दुसरीकडे मोबाईलवर बोलता बोलता लॅपटॉप वर काम करत होती. एकतर ती प्रेग्नेंट असताना सातव्या महिन्यात लॉकडाऊन लागला होता. ममता एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होती. तीची डीलीव्हरी झाल्यावर दहा दिवसांनीच लॉकडाऊन मध्ये कंपन्यांना काही टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ऑफिसं सुरू करायची परवानगी मीळाली होती, त्यामुळे कंपनीने ममताला डीलीव्हरीनंतर एक महिन्याने पार्ट टाईम घरूनच काम कर किंवा नोकरी सोड असं सांगितलं. ममताच्या नवऱ्याला म्हणजे यशला लॉकडाऊन मुळे नोकरीवरून कमी करण्यात आलं होतं. त्यात मायराची जबाबदारी, घराचा हाप्ता मग ममताला पार्ट टाईम घरून काम स्विकारावंच लागलं होतं. शिवाय कंपनीने सकाळी अकरा वाजता काम चालू. करायला सांगितलं होतं. मग काय पार्ट टाईमचा थोडा थोडा वेळ वाढून फुल टाईम काम झालं होतं.
यश जमेल तसं ममताला घरकामात मदत करत होता. मायराला पण जमेल तसं संभाळायचा. नोकरी आणि घरच्या कामात ममताचा इतका वेळ जायचा कि मायराला धड वेळ देता यायचा नाही. एकतर ऑफिसचं काम करताना फोनवरचं बोलण किंवा लॅपटॉपच्या बटणांची टकटक ऐकतच मायराला झोपावं लागत असे. नाहीतर जेव्हा ममता घरात बीझी असेल तेव्हा त्या रिमोट ऑपरेटेड म्युझिकल स्क्रँडल (पाळणा) वर झोपावं लागे. त्यातून ममताच्या ऑफिसमधले पुरुष सहकारी किंवा वरिष्ठ तीला संभाळून घेत किंवा मदत करत. पण एक वयस्कर महिला वरिष्ठ सौ. विजया नायर मात्र ममताला कुठलंही सहकार्य स्वतः करत नव्हती आणि ममताला जेव्हढा त्रास देता येइल तेव्हढा द्यायची. अगदी तीने वेळेवर लॉगइन करण्यापासून ते जास्तीत जास्त कामं ममताकडून कशी करून घेता येईल इथपर्यंत. शिवाय मुद्दाम तिच्यावर राग काढणे, कामातल्या बारीक बारीक चुका काढणे. शिवाय तीने ममताला मायरा दोन महिन्यांची झाल्यावर ऑफिस जॉईन करायला सांगितले. ममताने तीला समजवायचा असफल प्रयत्न करून बघितला पण विजया ऐकायला तयारच नव्हती नाही जमत तर नोकरी सोड बोलली. शेवटी नाईलाजाने ममताला काळजावर दगड ठेऊन ऑफिस जॉईन करावं लागलं.
इथे घरी मायरासाठी ममताच्या सासुबाईंना बोलावलं, त्या ही शिक्षिका होत्या, त्या ही ऑनलाईन लेक्चर घेऊन मायराला संभाळायच्या. त्यात यश त्यांना मदत करे. ममताला तर खूपच त्रास व्हायचा, इथे घरी मायरा रडली कि तीथे ममताला पान्हा फुटायचा, खूप छातीत दुखायचं. बिचारीला बाथरूममध्ये जाऊन दूध काढून टाकायला लागायचं. शिवाय आपलं लेकरू भुकेने तळमळत असताना हे असं दूध बेसिन मध्ये वाहून जाताना बघून ममताला जिव्हारी लागायचं. कित्येकवेळा ममताला दूधाच्या गाठी व्हायच्या. कारण विजया तीला जागेवरून उठूच द्यायची नाही. त्यातून घरी सासूबाई कडक शिस्तीच्या असल्यामुळे ममताला सकाळी सर्व घरचं आवरून आणि सगळं जेवण बनवून जावं लागे. त्यातून ट्रेनचा प्रवासही सामान्य लोकांना बंद होता. ममताला बसने जावं लागत होतं. त्यात भरीस भर म्हणून विजयाबाईने नविन रुल काढला जो दहा मिनटापेक्षा जास्त लेट ऑफिसला येईल त्याचा हाफ डे लावणार. एवढं सगळं करून ऑफिसमध्ये काम आणि विजयाचा त्रास सहन करून ममता घरी आल्यावर तीला सासुबाईंमुळे चारीठाव स्वयंपाक करावा लागायचा. एवढं सगळं ज्या चिमुकलीसाठी करत होती त्या मायराला तीला धड घेताही यायचं नाही. जेवण आणि नंतरचं सगळं आवरून, दुसऱ्या दिवशीची जेवणाची तयारी करून झोपायला जाईपर्यंत ममताला रात्री खूपच उशीर व्हायचा रात्री मायरा उठली कि ममता तीला दूध देऊन पोट भरलं कि तीला म्युझीकल पाळण्यात ठेवायची जमेल तसं खेळवायची पण ती इतकी दमलेली असायची कि तीला जास्त काही करता यायचं नाही मायरासाठी आणि पुन्हा सकाळी परत तेच रुटीन मागच्या पानावरून पुढच्या पानावर.
भरीसभर म्हणजे सासूबाई यशला टोमणे मारायच्या बायकोच्या जीवावर बसून खातोस, बायकोने तुला घरगडी बनवलंय असंच काहीबाई शिवाय नोकरी गेल्यामुळे यशची चिडचिड वाढली होती. कुठेही नोकरी लागत नव्हती. त्यांच्या लग्नाला दहा वर्ष होऊन गेली होती ती दोघंच रहात असल्यामुळे इतकी वर्ष त्याच्या भोवती रुंजी घालणाऱ्या त्याच्या ममूला त्याच्याशी धड बोलायलाही वेळ मिळायचा नाही. या सगळ्यामुळेच त्याचाही सगळा राग ममतावर निघायचा. एक-दोनदा तर यशने त्याला आत्महत्या करावीशी वाटतेय असंही ममताला बोलून दाखवलं होतं.
एकतर सी-सेक्शन डीलीव्हरी, डीलीव्हरीनंतर लगेचच घरी कोणी करणारं नव्हतं शिवाय लॉकडाऊनमध्ये घरकामाला बाई मिळत नाही म्हणून लगेचच तीला घरकामाला सुरुवात करावी लागली होती. त्यातून पहिलंच आईपण बाळाचं सगळं कसं करायचं हे माहिती नव्हतं. पण यासाठी मदतीला तीच्या सख्या शेजारणी यायच्या. तीला लागणारे मेथीचे लाडू कर्वे काकूंनी बनवून दिले. साने वहिनी तर तीला रोज सकाळी नाश्ता पाठवायच्या अगदी पौष्टिक कधी हलीमची पेज, कधी तांदूळ मेथीची खीर, बाजरीचं सुप /कळण असंच. श्रद्धा ताईने तीला लागणारं बाहेरचं सामान आणून द्यायची जबाबदारी घेतली होती. नर्मदा काकूंनी काही दिवस बाळाला मालीश करून दिली आणि ममतालाही शिकवलं बाळाला मालीश करायला आणि आंघोळ घालायला. तरीही बाळाचे कपडे आणि घरातलं जेवण तीलाच करावं लागे. कचरा काढायचं आणि फरशी पुसायचं काम यश करायचा. पण काही दिवसांनी ममता आणि यशला ऑकवर्ड वाटायला लागलं कारण सगळेजण आपुलकीने करत होते पण सगळेच मिडलक्लास असल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचंच बजेट बोंबललेलं. शिवाय त्यांना पैसे देणं म्हणजे त्यांच्या आपुलकिचा अपमान केल्यासारखं झालं असतं. शेवटी मायराच्या बारशाचं निमित्त साधून सगळ्यांना बोलवलं आणि संवाद साधला. साने वहिनींनी लागणारं सहित्य घ्यायचं कबूल केलं पण नाश्ता मात्र त्याच देणार होत्या. श्रद्धा ताई तीचं काम करणारच होती. नर्मदा काकू, कर्वे काकू आणि इतर जणींनी जेव्हा गरज असेल तेव्हा हक्काने सांगा असं म्हणून ऐकलं होतं. सगळ्याच जणी मधून मधून फेरी मारायच्या ममताकडे. खरंच वाळवंटात एखादी हवेची झुळूक यावी तश्या या सख्या होत्या ममताच्या.
डिलिव्हरी नंतर लगेच पाण्यात काम केल्यामुळे, आणि आराम न केल्यामुळे, ममता ची शारीरिक झीज शिवाय डीलीव्हरीनंतर हळवं झालेलं मन, यशची नोकरी गेल्याचं टेन्शन, ऑफिसमधल्या विजयाचा त्रास, सासुबाईंचं वागणं, यशची तिच्यावर होणारी चिडचिड, मायराला व्यवस्थित संभाळू शकत नाही ही बोच, शिवाय नऊ महिने तीचे लाड करणारे नातेवाईकही उगाच सल्ले देणे, लगेच ऑफिसचं काम चालू केलं म्हणून बोल लावणे, मायरासाठीचं दूध ऑफिच्या बेसिनमध्ये वाहून टाकणे या सगळ्यामुळे ममताची मानसिक स्थितीही खूपच नाजूक झाली होती. ती विचार करायची कि मायराला जन्माला घालून आपण चूक तर केली नाही ना? डींक (Dual income no kid) राहिलो असतो तर मायराला इतका त्रास झाला नसता. इतके वर्ष बाळाची आबाळ होऊ नये म्हणून त्याला जन्माला घातलं नव्हतं सफिशिअंट पैसे साठवून मगच बाळाला वेलकम केलं होतं. पण ह्या कोरोनाने सगळं गणितंच बिघडवलं होतं.
सगळा विचार करत असतानाच श्रद्धा तीथे काही सामान घेऊन आली. ममताच्या डोळ्यांतले अश्रू बघून तिने तीला काय झालं ते विचारलं. यशनेही दरवाजा उघडायला आला तेव्हा ममताला रडताना बघितलं होतं. श्रध्दा गेल्यावर बोलु तीच्याशी असंही ठरवलं होतं. आज ममताला सुट्टी असल्यामुळे सासुबाई त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या, म्हणून तर ममताला थोडी उसंत मिळाली होती.
ममताने आज श्रद्धा समोर सगळंच बोलून मन मोकळं केलं होतं. आता ममतालाही हलकं वाटत होतं. नेमकं सगळंच यशनेही ऐकलं होतं. त्यालाही आता स्वतःच्या वागण्याचा राग येत होता. शेवटी तो बाहेर आला आणि ममताची माफी मागीतली. श्रध्दाने ममताला समजवलं कि आईपण खूपच मौल्यवान आहे. तीने स्वतःला बाळ नाही, दोनदा मिस्कॅरेज झाल्यावर होणाऱ्या वेदना सांगितल्या. शेवटी यशनेच श्रध्दाला विचारलं कि तुच मायराला संभाळशील का? खूप नाही पण तुला रिजनेबल पैसे देऊ. ममताने विचारलं आईंच काय? तर त्याने लगेचच त्याच्या वडीलांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली, त्याचे वडील खूपच मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांनी दोन-तीन दिवसांत बायकोला बोलवून घेतो असं सांगितलं. दोन दिवसांनी ममताच्या सासऱ्यांनी सासुबाईंना करमत नाही म्हणून बोलावून घेतलं. मुलांची अडचण मुलं बघतील तु ये परत गावाला असं म्हणून त्यांनी मुलांची अडचण कमी करायला हातभार लावला होता. शिवाय यशने ममताला नोकरी सोडायला सांगितले. ममताला हातात दुसरी नोकरी नसताना ही नोकरी सोडणं योग्य वाटत नव्हतं. यशची नोकरी चालू असती तर मग गोष्ट वेगळी होती. पण आता ममताचा घरचा त्रास बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे तीला आता विजयाचा त्रास सुसह्य झाला होता. कारण आता घरी साधा स्वयंपाक केला तरी चालणार होता शिवाय ममता ऑफिसमध्ये असताना मायराला श्रद्धा संभाळणार होती. त्यामुळे यशला वेळ मिळेल तसा तो स्वतःचा नविन बिझनेस चालू करण्यासाठी माहिती जमा करू शकत होता. हळूहळू सगळं मार्गी लागत होतं. शिवाय यशने ममताला डॉक्टरांकडे नेलं, तीच्यावर आवश्यक ते उपचार, चालू केले. आणि आता मायरासाठी ममता स्वतः तीची आवडती अंगाई गाऊ शकणार होती तीच मी गाताना गीत तुज लडीवाळा… पण आनंदाने…
अनन्या अभिजीत
संधी बद्दल धन्यवाद
==========================================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/