पहिलं प्रेम

सुकन्या आणि सुशांतला शाळेसाठी डबा भरून देऊन, रागिणीने त्यांना ड्रायव्हरबरोबर शाळेत पाठवून दिले आणि ती आपलं आवरू लागली.
‘‘सुदेश, सुदेश..’’ ती हाका मारत होती.
‘‘हॅलो डार्लिंग.. बोल काय सेवा करू?’’
नेहमीचंच म्हणून ती ड्रेसची चेन लावण्यासाठी त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली.
‘‘तुझी तुला चेन लावता येत नाही तर कशासाठी तू असे ड्रेस घालतेस? आणि मी नसलो तर..?’’ त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रागिणीने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि ती त्याच्याकडे तोंड करून उभी राहिली.
‘‘असलं काही बोलायचं नाही हा…’’
‘‘अगं नसलो तर म्हणजे तसं नाही ग, समजा मी बाहेरगावी गेलो किंवा काय?’’
‘‘ते बघू नंतरचं नंतर…’’
‘‘बरं मी कशी दिसते?’’
‘‘हाय हाय मरजावा.. अगं तू रोजच सुंदरच दिसतेस त्यातून आज तर काय? अगदी तेज आलंय बघ चेहर्यावर.. हे बघ ज्यांनी ज्यांनी तुला शाळेत पाहून तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल त्यांची विकेट पडेल हा आज…’’
‘‘काहीही बोलू नकोस हा.’’ रागिणी लाडीकपणे म्हणाली.
‘‘बरं चल चलतो मी.’’
‘‘अरे मला सोडूनच पुढे जा ना.’’
‘‘नको ग मला लेट झालाय. किशोर येईल तुला न्यायला अत्ता येईलच तो.. बरं बाय..’’ म्हणत सुदेश बाहेर पडू लागला.
‘‘सुदेश, थांब ना, सोड ना मला.’’ रागिणीने परत त्याला गळ घातली.
सुदेशला रागिणीचं मन मोडवेना.
‘‘तू म्हणजे ना हट्टी आहेस नुसती. स्वत:चंच खरं करतेस. चल बरं.’’ सुदेशने आणि रागिणी निघाली. रागिणी खरंच खूप सुंदर दिसत होती. रागिणी आणि सुदेशचं लग्न होऊन पंधरा वर्षं झाली होती. रागिणीही माहेरची श्रीमंत होतीच, पण सासरही खानदानी श्रीमंत मिळालं होतं. दोन्ही घरची उत्तम परिस्थिती आणि आता सुदेशला त्याच्या हुशारीमुळे मिळालेला उत्तम जॉब त्यामुळे तिची पाची बोटं तुपात होती म्हणायला हरकत नाही. रागिणीकडे रूप आणि संसार उत्तम करण्याची कला होती. त्यामुळे तिची दोन्ही मुलं अतिशय हुशार होती. अगदी दृष्ट लागण्यासारखं चौकोनी कुटुंब.
आज रागिणीच्या शाळेचं गेटटुगेदर होतं. जवळपास 22-23 वर्षांनी सगळे भेटणार होते. कोण कुठे होतं कुणाला काहीच माहीत नव्हतं. अचानक परवा एका मैत्रिणीचा फोन आला आणि रागिणीला कळलं की तिच्या शाळेच्या बॅचचं गेटटुगेदर होणार आहे आणि तेसुद्धा लवकरच. ती काही वर्षं परदेशात असल्याने इकडच्या कुणाशीच तिचा काहीच संपर्क नव्हता. रागिणीला अगदी खूप आनंद झाला. सर्व मित्र-मैत्रिणी भेटणार. रागिणीच्या मनात मोर अगदी थुईथुई नाचत होते. ती कितीतरी मुलं-मुली आठवायचा प्रयत्न करत होती. पण तिला फक्त चार-पाच जणं अगदी पूर्णपणे आठवत होती एक परवा फोन आलेली नताशा, आणखीन एक दोघं आणि आणि….
‘‘काय बाईसाहेब? कसला विचार करताय?’’ सुदेश एकदम म्हणाल्यावर रागिणी दचकलीच.
‘‘आठवतेय रे कोण कोण होतं आमच्या वर्गात. यादी टाकलीय त्यात नावं ओळखीची वाटतायत, पण.. पण चेहरे कुणाचेच आठवत नाहीयेत.’’
‘‘हम्म.’’
‘‘मग नकोच ना जाऊस. कशाला उगाच जातेस.’’
‘‘असं कसं? जायला तर हवंच!’’
‘‘बरं बरं संध्याकाळी मात्र तुझी तू ये हा. किशोरला आवरलं की फोन कर. माझी महत्त्वाची मिटींग आहे माझ्यावर अवलंबून राहू नकोस. समजलं ना? नाहीतर मला फोन करत राहशील.’’ सुदेशने रागिणीला ठणकावून सांगितलं आणि तिचं उतरायचं ठिकाण जवळ आलं असल्याचं सांगितलं.
रागिणीने पर्स उघडून हलकेच परत पावडरचा पफ तोंडावरून फिरवला. लिपस्टिक जरा डार्क केली. सुदेश गालातल्या गालात हसत होता. परत एकदा त्याला विचारलं.
‘‘कशी दिसतेय मी?’’ त्याने गाडीतल्या आरशाकडे बोट दाखवलं.
‘‘तू सांग ना.’’
‘‘अगं मगाशीच सांगितलं ना! अगदी बेफाम दिसतेयस. बघ चार-पाच जणांना तरी वाईट वाटणारे.’’
‘‘ए गप रे..’’ म्हणून ती परत लटकंच रागावली.
सुदेशने तिला त्या रिसॉर्टच्या दाराशी सोडलं. दारात आयोजक म्हणून नताशा उभीच होती. रागिणीला बघताच ती थोडी पुढे झाली. रागिणीला तिने मिठीच मारली, मग नताशा तिला पूर्ण न्याहाळू लागली, ‘‘आयला कसला बदल झालाय तुझ्यात? डीपी बघितला होता म्हणून तुला ओळखलं..’’ वगैरे वाक्य नताशाने फेकली. माहेरी जरी श्रीमंती असली तरी तेव्हाच्या राहणीमानाप्रमाणे एकदम साधी राहणारी रागिणी आणि आता परदेशातून जाऊन आल्यावर बदललेली रागिणी जमीन आस्मानाचा फरक होता. त्यात श्रीमंतीचं तेज पुरेपूर होतं.
मग एक एक करत सर्वजण जमा झाले. रागिणीला आता सगळ्यांचे चेहरे बघून सर्व जण आठवत होते. गप्पा-गोष्टी, तू काय करतोस मी काय करते सर्व सुरू होतं. नुसता दंगा सुरू होता, पण रागिणीचं लक्ष म्हणावं तसं लागत नव्हतं, तो कुठे आला नाही अजून? आयोजकांमध्ये त्याचं नाव आहे मग नक्की येणार आहे की नाही? त्याच्यासाठीच तर आपण आलो इथे? असा विचार मनात येत असतानाच एकदम दारातून त्याचं आगमन झालं. अगदी साधंसुधं राहणीमान तरीही रुबाबदार! आधीसारखंच. आता मात्र तो चांगल्या पदावर नोकरी करत होता. खूप हुशारी असल्याने नोकरी सांभाळून एक बिझनेसही त्याने चालू केला होता. एकंदर खाऊनपिऊन सुखी होता.
तो आला आणि रागिणीला हायसं वाटलं. आता तरी आपल्याकडं बघेल, बघून खूश होईल असं तिला वाटलं, पण त्यानं बघून न बघितल्यासारखं केलं. ती चिडलीच जरा. तरी त्याने ओळखलं नसेल असं वाटून गप्प बसली.
कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. आधी ओळख परेड, नंतर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम. कार्यक्रमाला रंगत चढत होती. रागिणी अधूनमधून त्याच्याकडे बघत होती. तो मात्र पूर्णत: तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. अजूनही याची ही मिजास? माझ्यसारख्या मुलीला म्हणजे आता महिलेकडे हा दुर्लक्ष करतो? तिचा तीळपापड होत होता.
जेवणाच्या वेळेस तिने त्याला गाठलंच.
‘‘श्रीरंग, ओळखलंस का मला?’’ तिने शक्य तितक्या सौम्य स्वरात विचारलं.
‘‘तुला कोण ओळखणार नाही?’’ त्याने अगदी शांतपणे म्हटलं.
‘‘अरे मग असा ओळख नसल्यासारखा का वागतोयस?’’
‘‘असं काही नाही..’’ तो म्हणाला, पण एकंदर त्याला आपल्याशी संभाषण वाढवायची इच्छा नाही हे रागिणीला कळलं. आता तिचं कार्यक्रमात लक्ष लागत नव्हतं. शाळेत असताना तिचं श्रीरंगवर प्रेम होतं, पण श्रीरंगने कधीच तिच्यात इंटरेस्ट दाखवला नाही असं तिला वाटत होतं. आणि आता? आता निदान तो आपल्याशी बोलेल, आपल्याला छान दिसतेस म्हणेल अशी तिला आशा होती तीही फोल ठरली. तशी तिच्या संसारात ती खूप सुखी होती, पण तरीही… पहिलं प्रेम! निदान त्याने दोन शब्द बोलावेत ही आशा, पण तीही फोल ठरली. ती कशीबशी चार वाजेपर्यंत थांबली आणि चार वाजता मला काम आहे आणि मी जाते असं सांगून निघाली. जाताना वाटेत श्रीरंग भेटला,
‘‘निघालीस इतक्यात?’’ त्याने विचारलं.
‘‘थांबून काय करू?’’ असं म्हणून ती झटकन वळली. श्रीरंग तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात होता. त्याच्या मनात विचार येत होते, ‘‘किती छान दिसते ही? पण मला शाळेत असतानाचीच रागिणी आठवते आणि आवडतेसुद्धा.. पण गरिबीला भावना नसतात. नोकरी लागल्यावर हिच्या वडिलांकडे हिच्यासाठी मागणी घालायला गेलो असताना त्यांनी किती अपमान केला हे रागिणीला माहीत नाही… असो… आता पुन्हा त्या मार्गात पडणे नको असा विचार करून श्रीरंग पुन्हा गेटटुगेदरच्या हॉलकडे वळला. तेवढ्यात त्याच्या बायकोचा फोन आला,
‘‘रागिणी भेटली का? तुम्ही काही बोललात का तिच्याशी?’’
श्रीरंगने हसून सांगून सांगितलं. माझी राणी असताना रागिणीशी कशाला बोलू? त्याने फोन ठेवला आणि हसर्या चेहर्याने गेटटुगेदरच्या हॉलकडे रवाना झाला. इकडे बाहेर पडता पडताच सुदेशचा रागिणीला फोन आला होता, ‘‘मी घरी चाललोय, तुला पिक अप करायचंय का?’’ त्याबरोबर रागिणीची कळी खुलली होती.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.