Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘पदरी पडलं आणि पवित्र झालं ‘….मुरलेल्या संसाराचं गुपित….

काय व काकू माझा दादला सुभान्या काही कामाचा नाही…सारखी दारू ढोसायला लागती…काळ नाही कि वेळ नाही…किती खपायचे मी या संसारासाठी…दारूला पैसे दिले नाही कि गुरासारखं मारायचं…कसा बरं एकटीनं ओढायचा गाडा संसाराचा…? ” शिवगंगा अगदी गहिवरून आपल्या मालकीणबाई मंगलकाकूंना सांगत असते…शिवगंगा साधारण सात-आठ घरची धुणी-भांडी करण्याचे काम करत असे…पदरी मुलबाळ नव्हतं म्हणून लोकांच्या लेकरांवर माया करी…लहान लेकरांचा फार लळा सासू-सासऱ्यांत राहायची पण सासुचाही खूप सासुरवास भोगला नवरा दारुडा मिळाला तरी एकटी घराला हात-भार लावायची…नवऱ्याचा मार खायची पण कधीच नवऱ्याला सोडलं नाही की त्याला सोडून निघून गेली नाही…अशी कर्मकहाणी शिवगंगा मंगलकाकूंना सांगायची…

मंगलकाकू मग काही ना काही मदत तिला नेहमी करत असे…शिवगंगाही मग मंगलकाकूंना नेहमी जास्तीची कामं करू लागत असे…जस की धान्य जात्यावर भरडणं, पाखडून त्याची डाळ करणं अशी बरीचशी कामं शिवगंगा विनामोबदला करत असे…मंगलकाकूही मग  जमेल तसं घरी बोलवून खाऊ-पिऊ घालत…घरात विशेष काही असलं की साडी-चोळी देऊन शिवगंगाचा मान ठेवत… म्हणून शिवगंगा जणू घरातला एक सदस्यच झाली होती…

मंगलकाकूंच्या मुलाचं लग्न झालं…शिवगंगा अगदी घरातलं कार्य आहे असं घरात वागली…हळद दळण्यापासून ते सत्यनारायण पुजेपर्यंत अगदी घरात सरमिसळून गेली…मंगलताईंचा मुलगा अभिजीतही  शिवगंगाबरोबर चांगला वागत असे मग शिवगंगाही त्याला ” दादू…दादू..” म्हणत असे…

मंगलताईंच्या मुलाचे लग्न झाले असल्याने मंगलताई नवीन सुनेच्या नादात असत…अभिजितची बायको एक पदवीधर होती ‘मोहिनी’ तिचं नाव…मोहिनी अगदी नावाप्रमाणेच होती कुणालाही सहज मोहून घेणारी…तिचं मोहकता वागण्यात आणि बोलण्यात होती…म्हणून शिवगंगालाही नवीन सुनेचा लळा लागला…मुलगी नसल्याचं शल्य शिवगंगाला सारखं जिव्हारी लागत असे…मोहिनीकडे पाहून जणू आपलीच मुलगी आहे असं शिवगंगाला वाटायचं…

शिवगंगाला मस्करी करायची खूप सवय होती म्हणून जाता-येता नव्या सुनेशी टिंगल करत…मोहिनीही वाईट वाटून न घेता स्वतः मस्करी करत…मोहिनीचे स्वयंपाकात थोडे दिव्यचं असल्याने बारीक-सारीक गोष्टी शिवगंगाकडूनही समजून घेत घरात दोन सासूबाई मोहिनीला मिळाल्या…दोघींचं मार्गदर्शन घेऊन मोहिनी आपला संसार मांडत होती…सासूबाईंची करडी नजर स्वयंपाकघरात असल्याने मोहिनीकडून हलगर्जीपणा झाल्यास पटकन मंगलताई रागावत…मोहिनीला चटकन रडू कोसळत…शिवगंगाही अगदी आईच्या मायेनं मोहिनीला समजावून सांगत…

नवीन संसारात भांडण झालं नाही की संसार सुरूच झाला नाही असं आपण म्हणतो…तसंच एक दिवस मोहिनी अभिजीतवर चिडचिड करू लागली…बेडमध्ये पाय आपटत आपटत फिरू लागली अभिजीतला या गोष्टीची चीड होती म्हणून जोरात ओरडून मोहिनीला म्हणतो…

अभिजीत – मोहिनी…काय हा पोरकटपणा…हे तुझं माहेर नाहीय…पाय आपटणे चांगलं नसत…पाय आपटण्यापेक्षा काय झालंय ते सांग…

मोहिनी – [ आपल्या नवऱ्याचं वागणं पहिल्यांदाच पाहत असल्याने मोहिनी थोडीशी घाबरली ] आह्हहो….एवढे का चिडताय….

अभिजीत – [थोडा शांत झाला ] अगं पण काय झालंय सांग ना…?

मोहिनी – त्या शिवगंगा काकू…मला आज कशा म्हणतात…सुनबाईंना कामाचा वेग खूप कमी आहे….गोगलगाईसारखं काम करते असं म्हणाल्या…

अभिजीत – बरं झालं हे मला सांगतेस तू….शिवगंगामावशींना तू काही बोलली नाहीस ना…?

मोहिनी – नाही नाही मी त्यांना काहीच म्हंटले नाही…असंच हसण्यावारी नेलं…

अभिजीत – बरं झालं हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून…त्यांना मी माझ्या लहानपणीपासून पाहत आलोय…आईला सगळ्या कामात मदत करते…तेही कुठलाही मोबदला घेत नाही…फक्त भांडी घासण्याचा पगार घेते आणि जाते…बाकी इकडच्या घरातल्या गोष्टी तिकडच्या घरात असं काहीच करत नाही…म्हणजे बायकांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘ लावा-लाव्या करत नाही ‘ मला अगदी लहान मुलासारखा जीव लावलाय त्यांनी….बरं एक सांग…

मोहिनी – हा विचार तर खरं…!

अभिजीत – तुला माझ्याकडून काही त्रास आहे का…

मोहिनी – नाही….पण…

अभिजीत – पण…काय…बोलत जा ग…

मोहिनी – तुम्ही केवढं चिडतात…मला नाही आवडत चिडलेलं…मग मी कसं मोकळेपणाने बोलणार…

अभिजीत – एक सांगू तुझ्याबद्दल…

मोहिनी – हा का नाही सांगा ना…!

अभिजीत – तू शिकलेली आहेस…तुझ्या कामाबद्दल जर कुणी चूक काढली ना की तुला राग येतो हो ना…?

मोहिनी – हो…येतोच राग मला…काय करणार…?

अभिजीत – अगं…राग का बरं येतो तुला…शिवगंगा मावशी तुला बोलल्या तेही हसत हसत तेही तुला एवढं लागलं..

मोहिनी – हो..आला राग मला…मला नव्हतं  ठाऊक की त्यांचं नातं या घराशी,घरातल्या माणसांशी एवढं घट्ट आहे ते आता समजलं…मला तर त्या फक्त एक मोलकरीणच वाटत होत्या…आता मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा म्हणून मलाही त्यांच्याशी बोलताना कधी संकोच वाटला नाही….उलट आईंशी बोलताना भीती वाटते मला….

अभिजीत – मोठ्यांबद्दल भीती असावी पण एक आदरयुक्त भीती असावी…घाबरून तू बोलणारच नाही अशी नकोय भीती…

मोहिनी – अहो…पण मी काही उलटं उत्तर दिलं नाही हा त्यांना….

अभिजीत – ते तू कधीच करायचं नाहीय…वयाचा मान राखलास तरच…त्या तुझा मान राखतील…! मी उद्या तुला असंच ओरडलो तर…तू मला सोडूनच जाशील ना…

मोहिनी – नाही असं कसं होईल…मी नाही सोडून जाणार तुम्हाला…

अभिजीत – ते तू आत्ता म्हणतेस …तुझा राग पाहता असं होईल का ?

मोहिनी – असं का म्हणता तुम्ही…मी इतकी का रागीट आहे…?

अभिजीत – शिवगंगा मावशीचं आपल्या नवऱ्याशी रोज भांडण होतं…रोज दारू पिऊन येतो तिचा नवरा तरीही त्याचा मार मुकाटपणे खाते ती तक्रार म्हणून करत नाही कधी…ती फक्त तुझ्या काम करण्याच्या स्पिडबद्दल तुला बोलली तरी तुला राग आला…कौतुक वाटत मला तुझं की तू तिथे त्यांना उलटून बोलली नाहीस ते…त्या कामवाल्या मावशी जरी असल्या तरीही त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे…तू शिकलेली आहेस म्हणून तुला त्या जे काही सांगतील ते ऐकावच लागेल तिथे तुझं शिक्षण आणि तुझा अटीट्युड आड येता कामा नये…तुला अटीट्युड आहे म्हणून तुला चटकन राग आला…अटीट्युड बाजूला ठेवलास की संसारही चांगला मुरतो…मग बघ कसा सोन्याचा संसार होतो ते…

मोहिनी अभिजीतच्या कुशीत पडल्या पडल्या ऐकत असते…आणि तशीच झोपी जाते…सकाळी लवकर उठून अभिजीतच्या टिफिनची तयारी करून ठेवते…अभिजीत ऑफिसला गेल्यावर जेवण वैगेरे उरकून भांडी गोळा करून ठेवते त्यानंतर काही तासातच शिवगंगा मावशी येतात….त्या जेव्हा घरात येतात तेव्हा मोहिनीला त्यांच्याकडे पाहून धक्काच बसतो कारण…कपाळावर मोठी आणि जाड बँडेज पट्टी लावलेली दिसते…त्याचबरोबर अंगही सुजलेलं दिसतं…मंगलताईंना शिवगंगाची हि अवस्था पाहून तर रडूच कोसळत…शिवगंगाला पाणी देऊन मोहिनी शांत करते…मग ती काय झालं ते सांगू लागते….

मंगलताई – काय ग हे शिवगंगा….काय झालं नेमकं…?

शिवगंगा – काकू….अहो…ते म्हणायचं ना पदरी पडलं ते पवित्र झालं…असं म्हणायचं नि गप्प बसायचं…आव काकू काही नाही झालं…काल घरी जायला मला अर्धा तास उशीर झाला मग माझा दादला उचकला कि माझ्यावर म्हटला…कुणाबरोबर तोंड काळ करायला गेलती…मी काही बोलले नाही कारण नेहमीप्रमाणं ढोसून आला होता ना तो…मी बोलले न्हय म्हणून माझं डोस्क भिंतीवर आपटलं लई रक्त वाहायला लागलं…शेजारच्या बाईन दवाखान्यात नेलं म्हणून वाचले मी…

मोहिनी – मावशी आज आला नसता तरी चाललं असत जखम बरी होईपर्यंत विश्रांती घ्यायची होती तुम्ही…थांबा मी तुमच्यासाठी हळद घातलेलं दूध घेऊन येते…

मंगलताई – शिवगंगा अगं…पुढचे काही दिवस कामावर आली नाहीस तरी चालेल …

शिवगंगा – नाही ओ काकू…उलट घरी बसले तर मला आणखी डोकेदुखी होईल…आगीतून उठून फुपाट्यात पडलं मी त्यापेक्षा मी इथं येऊन काम करल…चालन ना काकू तुम्हाला…

मंगलताई – तू काही ऐकायची नाहीस…

असे म्हणून मंगलताई दिवाणखान्यात जाऊन बसतात तोपर्यंत शिवगंगा आपली काम आवरून…दुसऱ्या घरची काम करायला जाते…दिवसभराची दिनचर्या झाल्यावर संध्याकाळी अभिजीत आल्यावर सगळे जण जेवण उरकून घेतात रात्री आपल्या बेडमध्ये आल्यावर मोहिनी घडला सगळा प्रकार जसाच्या तसा अभिजीतला सांगते…अभिजीत यावर म्हणतो…

अभिजीत – पाहिलंस…मी म्हटलो होतो ना कामवालीकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं…नवरा किती त्रास देतोय तरी गोड मानून घेतेय सगळं…मी असं नाही म्हणत तुलाही तीच ऐकावं लागेल…मी फक्त मुरलेल्या संसाराचं गुपित सांगतोय….तू सांग बरं काय गुपित असत…!

मोहिनी – पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं…यालाच तर मुरलेल्या संसाराचं गुपित दडलंय…पण एवढा त्रास सहन करणंही चुकीचं आहे असं मला वाटत…कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो…

अभिजीत – तेही बरोबर आहे…त्यांना सासूबाईंचाही खूप जाच सहन करावा लागलाय….पदरात मुलं-बाळ नाही म्हणून सासूबाई जाच करायच्या तिला…त्याचमुळे त्यांच्या मेंदूवरतीही परिणाम झालाय त्यामुळे डोळ्याला जी रक्तपुरवठा करणारी नस असते ना तिला नीट पुरवठा होत नाही…त्यामुळे दृष्टीही कमजोर आहे त्यांची…आपणही त्या काही बोलल्या जरी तरी उलट बोलू नये…एवढं लक्षात ठेव…

मोहिनी – हो…मी लक्षात ठेवेल इथून पुढं…

असे म्हणून मोहिनी निवांत झोपी जाते….अभिजीत तिच्या निरागस आणि सारखं सारखं प्रश्न विचारणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहतो….नंतर कधी झोप लागते ते त्यालाही कळत नाही…

जस अभिजीतने आपल्या बायकोला यशस्वी संसाराचं गमक सांगितलं अगदी तसंच आपणही आयुष्यात समजून घ्यायला पाहिजे…कुठल्या घरात वाद नसतात…? घरोघरी मातीच्या चुली असतात…हि म्हण काही चुकीची नाही…आता आपण पाहतो छोट्याशा गोष्टीने वाद होतात नंतर ते संवादामधून निरसन झालं नाही कि मग नाती दुभंगतात…म्हणूनच ‘पदरी पडलं ते पवित्र झालं हेच मुरलेल्या संसारच गुपित आहे…’

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.