ओळख

©️®️ सायली
सुलेखाची आज जरा जास्तच चिडचिड झाली होती. तिचा मूड पाहून ‘समीर’ तिचा नवरा आज लवकरच ऑफिसला गेला. तो लवकर गेलेला पाहून तिला आणखीनच राग आला. “एवढं शिकून, सवरुन काही उपयोग नाही आमचा. नुसतं रांधा वाढा, नि उष्टी काढा यामध्ये आयुष्य चालले आहे सारं.”
” ती तणतणू लागलेली पाहताच तिच्या सासूबाई देवघरातून बोलल्या, “अगं मला होत असतं, तर मी सगळ केलं असतं घरचं. वय झालं आता माझं. हात -पाय धड हलतही नाहीत.”
तशी ती वैतागून म्हणाली, “केलं असतच तुम्ही.. पण काय आहे ना, तुमचा गोतावळाच इतका मोठा आहे की ,रोज कोणी ना कोणी येत असतच. दुपारी जरा पाठ टेकावी म्हटलं तर हमखास बेल वाजते. मग स्वयंपाक झाला असला तरी मला उभं राहावं लागतं कट्ट्यासमोर. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक झाल्याशिवाय सुटका नाही.” हे ऐकून सासुबाई गप्प बसल्या. कारण सुलेखा बोलली ते खरचं होत. गावाकडून रोज कोणी ना कोणी घरी यायचं. ते संध्याकाळची गाडी येईपर्यंत बसून राहायचं. मग त्याचं खाणे- पिणे हे ओघाने आलेच.
इतक्यात बेल वाजली. तिने नखुशीनेच दार उघडले. तशा नेहमीच्या भाजीवाल्या मावशी आत येत म्हणाल्या, “ताई गाडी यायला लई वेळ हाय. ऊन बी तापलया बघा. प्यायला पाणी आणता जरा?” आवाज ऐकून सासुबाई देवघरातून बाहेर आल्या. सुलेखाने येताना पाण्यासोबतच सराबताचे तीन ग्लास भरून आणले. एक भाजीवाल्या मावशींना दिला, एक सासूबाईंच्या हातावर ठेवला आणि एक स्वतःला.
तशा सासूबाई गालातल्या गालात हसू लागल्या. ते पाहून, ती आपला राग विसरून गेली.
भाजीवाल्या मावशींसोबत बोलता बोलता शिक्षणाचा विषय निघाला. त्यांना लिहायला वाचायला येत नाही, फक्त पैशांचा हिशोब येतो, तो ही सरावाने. हे ऐकून सुलेखाला आश्चर्या वाटले. त्यावर भाजीवाल्या मावशी म्हणाल्या, “गावाकडं अशा कितीतरी बायका आहेत ताई, ज्यांना लिहिता -वाचता येत नाही. पण त्या शहरात कामाला येतात. ते ही घरची समदी कामं करून. आम्हीही शिकलो असतो तर लई बेस झालं असतं बघा.”
तिला स्वतःच बोलणं आठवलं, मगाशी उगीचच चीडचीड केली आपण. या बायका शिकल्या सवरल्या नाहीत, तरी कुठली ही तक्रार न करता आपले काम चोख पार पाडतात आणि आपण विनाकारण त्रागा करतो.
इतक्यात सासुबाई कुरबुर करू लागलेल्या पाहताच, जेवणाची वेळ झाल्याने तिने तीन ताटं वाढून आणली. या दोघींसोबत भाजीवाल्याही मावशी समाधानाने जेवल्या आणि गाडी आली म्हणून निघूनही गेल्या.
भांडी आवरता आवरता तिला मावशींचे वाक्य आठवले. “आम्हीही शिकलो असतो तर लई बेस झालं असतं बघा.”
सारं आवरून झाल्यावर ती सासूबाईंच्या पुढ्यात बसली. थोडा विचार करून म्हणाली, “आई या भाजीवाल्या मावशी आहेत ना, त्यांच्या सारख्याच आणखी कितीतरी बायका असतील, न शिकलेल्या. तर..त्यांना आपण अक्षर ओळख करून दिली तर? मला खूप आवडेल आई त्यांना शिकवायला.”
तशा सासुबाई म्हणाल्या, “हा विचार नक्कीच चांगला आहे. पण त्या बायकांना पटायला हवा. इतकी वर्षे सवय झाली असल्याने त्यांना शिकण्याविषयी फारशी उत्सुकता काही वाटत नाही. आतापर्यंत काही अडले नाही ना! मग पुढे ही अडणार नाही. अशी त्यांची धारणा असते. अनुभवातूनच शिकतात त्या सारे. त्यामुळे त्यांचे फारसे कुठे नडत नाही. हे ही तितकेच खरे.”
“पण प्रयत्न करायला काय हरकत आहे आई?” सुलेखा उत्साहाने म्हणाली. सासुबाई तिचा उत्साह पाहून पुढे म्हणाल्या, “नक्कीच. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. अगदी उद्याच विचारुन पहा त्यांना.” तशी सुलेखा आनंदाने कामाला लागली.
रात्री समीर घरी आल्यानंतर तिने उत्साहाने त्याच्या कानावर ही बातमी घातली. “चिडचिड करण्यापेक्षा हे काम केव्हाही चांगलेच” असे म्हणत त्यानेही तिला या कामासाठी हसत-हसत परवानगी दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुलेखाने एक फळा ,खडू असे शिकवणीचे सारे साहित्य आणले. खूप वेळ वाट पाहूनही नेहमीच्या भाजीवाल्या मावशी काही सुलेखाला दिसल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा तिची चिडचिड सुरू झाली.
मग बऱ्याच वेळाने त्या मावशींना येताना पाहून सुरेखाची कळी खुलली. “हा पत्ता जरा वाचून दाखवा ताई” दारात येताच त्यांनी घाईघाईने एक कागद तिच्या हातात ठेवला. तिने मावशींना भराभरा पत्ता वाचून दाखवला आणि ते ठिकाणही समजावून सांगितले. ही आयती मिळालेली संधी ती कशी सोडेल? मग सुलेखा हातातला कागद पुढे करत म्हणाली, “मावशी यातले एक -एक अक्षर शिकणार का? तुमची गाडी येईपर्यंत शिकवेन मी तुम्हाला रोज.”
तशा मावशी म्हणाल्या,”आता या वयात शिकून काय करायचे ताई? हाय ते बेस हाय की.”
“असे कसे मावशी? लिहिता वाचता येणं ही काळाची गरज आहे आज. अजिबात अवघड नाही हा हे!” तिच्या हट्टापुढे मावशींचे काही चालले नाही. मावशी ऐकतच नाहीत म्हटल्यावर तिने शेवटी जबरदस्ती करत त्यांना अक्षरे शिकण्यासाठी तयार केलेच.
आता नाईलाजाने का होईना, रोज गाडी येईपर्यंत मावशी सुलेखाकडून एक -एक अक्षर समजून घेऊन शिकू लागल्या. तिच्या मदतीने पाटीवर गिरवू लागल्या. तिचे शिकवणे इतके छान होते, की, नंतर त्यांना या अक्षरांची गंमत वाटू लागली आणि गोडीही निर्माण झाली.
” उद्या शिकवणीला माझ्या जाऊबाईंना घेऊन येतो,” असे म्हणून मावशी दोन- तीन दिवस गायब झाल्या, त्या पुन्हा इकडे फिरकल्याच नाहीत. तशी सुलेखा नाराज झाली. मात्र पाचव्या दिवशी मावशी आणखी चार -पाच बायकांना घेऊन आल्या. तसा सुलेखाला खूप आनंद झाला, तिचा उत्साह आणखी वाढला. आता सुलेखाला वेळ नसल्याने गावाकडचे पाहुणे येणे ही कमी झाले. त्यामुळे तिला या कामासाठी अधिक वेळ मिळू लागला.
बघता बघता, गावाकडच्या दहा- पंधरा बायका जमल्या. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून त्या सुलेखाकडे शिकवणीसाठी येऊ लागल्या. आता सुलेखा त्यांना रोज शिकवू लागली. हळूहळू साऱ्याजणींची छान “अक्षर ओळख” झाली. प्रयत्नांती एक -एक शब्द म्हणता -म्हणता छान वाक्य वाचायला, लिहायला येऊ लागली त्यांना. तशा साऱ्याजणी खुश झाल्या. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून सुलेखाही खूप खुश झाली. या वयातही ‘शिक्षण ‘ घेता येते, हे उमगल्याने एक वेगळाच ‘आत्मविश्वास ‘ अनुभवत होत्या या साऱ्याजणी. काही दिवसांनी या साऱ्या कामकरी बायकांनी सुलेखाला त्यांच्या गावाकडे बोलवून साडी -चोळी देऊन तिचा ‘सन्मान ‘ केला. “रोजच्या व्यापातून आपण काहीतरी वेगळे करू शकतो” असा आत्मविश्वास सुलेखामध्ये निर्माण झाला. शिवाय तिची एक वेगळी ‘ओळख ‘ निर्माण झाली. आपल्या शिक्षणाचा उपयोग थोडाफार का होईना पण ‘समाजासाठी ‘ होतो याचा आनंद सुलेखाला झाला.
ज्यांना परिस्थितीमुळे, अडीअडचणीमुळे शिक्षण घेणे शक्य नसते अशा समाजातील अनेक स्त्रिया, काही लहान मुले तसेच कष्टकरी कामगार आजही सुलेखाकडे अक्षर ओळख करून घेण्यास येतात. सुलेखा त्यांना मनापासून शिकवते ते ही कुठलाही मोबदला न घेता.
==================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/