Skip to content Skip to sidebar Skip to footer

नुपूर..

निनादने पेंटींगवर शेवटचा हात फिरवला आणि दोन क्षण त्याकडे टक लावून पाहीले.

मनाप्रमाणे चित्र उमटल्याची खात्री पटताच त्याच्या चेहऱ्यावर तेच ठेवणीतले स्मित पसरले.

नेहमी प्रमाणे पेंटीगच्या कोपऱ्यात आपल्या विशेष अंदाजातली स्वाक्षरी नोंदवायला विसरला नाही.एक सुंदर पैंजण आणि त्याखाली त्याची कलात्मक स्वाक्षरी निनाद वर्दे.

आज आर्टगॅलरीचा तिसरा दिवस होता.त्याच्या पेंटिंग्जचे भव्य प्रदर्शन भरवले होते.

अनेक नामांकीत मंडळी प्रदर्शन पाहून गेली होती.काही रसिक लोकांनी पेटींग्ज खरेदीही केली होती.पण तो मात्र असमाधानीच होता.

त्याचा शोध कधी संपणार होता?

काय हवे होते निनादला?

कसला शोध चालू होता??

गेली वीस वर्ष सातत्याने तो पाठपूरावा करत होता पण त्याला हवे ते साध्यच होत नव्हते.

आजही असाच मन खंतावून आरामखूर्चीत बसला होता.

निनाद वर्दे.साधारण 40/45 वय.पिंगट घारे पाणीदार डोळे,लांबसडक निमुळती बोटे अगदी कलाकाराला शोभावीत अशी,पावणे सहा फूट उंची,रूंद भरीव खांदे,गौरवर्ण,तरतरीत नाक आणि हुशारीचे तेज झळकणारे भव्य कपाळ.बघताच छाप पडावे असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व.अभ्यासात हुशार म्हणून बारावी नंतर अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळला.पण अंगातली उपजत कला गप्प बसू देईना.

मग सुरवातीला अभ्यास संभाळून फावल्या वेळात पेंटिंग्ज करू लागला.प्रत्येक मध्यमवर्गीय कुटूंबाप्रमाणेच त्याच्याही आई वडीलांची तिच टिपीकल मिडलक्लास विचारसरणी.बाबा बँकेत तर आई शाळेत शिक्षिका.निनाद त्यांचा एकुलता एक मुलगा.त्याच्या इंजिनियरींगची फिस भरता भरताच त्यांचे बजेट संपुन जाई.त्यामुळे मुलाने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून लवकरात लवकर आपल्या पायावर उभे रहावे,कमवायला लागावे ही त्यांची किमान अपेक्षा होती आणि त्यात काही वावगेही नव्हते.गरीबी हालापेष्टा काय असतात हे जवळुन पाहिलेले आई बाप निदान आपल्या मुलाच्या वाट्याला तरी तसले भोग येवू नयेत म्हणुन सेव्हींग्ज करकरून त्याच्या शिक्षणासाठी पैसा साठवत होते त्यामुळे निनादच्या पेटिंगच्या कलेला आईवडिलांकडून म्हणावे असे प्रोत्साहन मिळत नसे.पेटींग ड्रॉईंग हे छंद म्हणुन ठिक आहे कौतूक सांगण्यापुरते पण त्यावर कुणाचे घर चाललेला एक तरी व्यक्ती दाखव आम्हाला…” असे म्हणुन त्यांच्याकडून त्याच्या कलेची हेटाळणीच होत असे.मग मन रमवायला तो असेच फावल्या वेळात पेंटिंग्ज करत असे.

आज जरा जबरदस्तीनेच तो आपले पेंटिंग अर्धवट सोडून आई बाबां बरोबर ह्या लग्नात आलेला होता.

त्याच्या आईच्या कुठल्यातरी मावस चूलत बहिणीच्या मुलाच्या मूलाचे लग्न होते.पण जायला तर हवेच.

“नाती अशी धरून ठेवतो आपण म्हणुन तर लोक बोलवतात नाऽऽ.!!”

“अशा प्रसंगी चार लोकांत मिसळले तरच नाती कळतात नाहीतर तुम्हा आजकालच्या मुलांना नातीच माहित नसतात.”

“चल ताईने फार आग्रहाने तूलाही घेऊन यायला सांगितलेय.आता तिचे वय झालेय.तूला पाहून बरे वाटेल तिला..चलऽऽ…” 

अशी इमोशनल टेप ऐकत निनाद अगदी निरीच्छेनेच आईच्या हट्टापाई लग्नमंडपात दाखल झाला.

हॉलमधे शिरताच आई-बाबा आपापल्या आेळखीच्या कंपूत गप्पांत मग्न झाले.निनादच्या मात्र कोणीच परीचयाचे नव्हते.तसाच उदासपणे नजर इकडे तिकडे फिरवत तो एकटाच हॉलच्या वरच्या दालनात पोहोचला.तिकडे बहूतेक पाहुण्यांच्या उतरण्याच्या खोल्या असाव्यात आणि त्याला लागूनच्या प्रशस्त हॉलमधे बूफेची सोय करण्याची तयारी चाललेली दिसत होती.

ते महत्त्वाचे नव्हतेच.निनाद अचंबीत झाला ते त्या भिंतींवरील सुंदर सुंदर पेंटिंग्जकडे पाहून.एक एक पेंटींग तो भान हरपून पाहू लागला.

त्यात चितारलेल्या सुंदर ललना,त्यांच्या अंगावरील तलम वस्त्र जणू काही खरोखर ल्यायल्यागत जीवंत वाटत होती आणि दागिने तर विचारूच नका..अहाहाऽऽऽ!किती ते बारकाईने कलाकुसर करून चितारलेले!!

“साक्षात अशी आभूषणे परिधान केलेली स्त्री किती सुंदर दिसेल नाही!!!”

निनादच्या मनात नकळत विचार येवून गेला.

तो प्रत्येक चित्राचे बारकाईने निरीक्षण करत पूढे पूढे सरकत होता आणि अचानक त्याचा धक्का लागला.तो मागे वळून पाही पर्यंत एक तरूणी तिकडून पळत जाताना पाठमोरी त्याला दिसली.तो ती गेली त्या दिॆशेने बघत असतानाच पाय कशावर तरी पडला आणि तो जोरात कळवळला.पायाला काय टोचले पहायला तो खाली वाकला तर एक सुंदर नाजूक पैंजण पायाशी पडलेले होते.

आत्ता त्याच्या डोक्यात उजेड पडला.मघाशी धक्का लागलेल्या त्याच मुलीचे तर हे पैंजण नसेल ना??

त्याने ते हातात घेतले तशी त्याची नाजूक किणकिण त्याच्या मनाला मोहवून गेली.

जितके सुंदर हे पैंजण आहे तितकीच ती ही असेल का? निनादच्या मनात आता त्या तरूणीचा विचार घर करू लागला.ती ज्या दिशेने गेली तोही तिच्या शोधात त्याच दिशेने गेला.

ती ज्या खोलीच्या दिशेने गेली तिकडे निनादही दबकत दबकत पोहोचला.

एका खाेलीजवळ त्याचे पाय थबकले.आतून पैंजणाची बारीक किणकिण त्याला जाणवली.दार उघडून बघावे का? पण नको.एका मुलीच्या खोलीत असे शिरणे शिष्टाचाराला धरून नाही.इथेच वाट पाहू.कोणी बाहेर आले तर विचारू.निनाद विचार करत कानोसा घेतच होता की दार जोरात त्याच्या अंगावर ढकलले गेले आणि त्या धक्क्याने तो थोडासा हेलकांडुन पडला.

आपल्यामुळे कोणी तरी पडलेय ह्या कल्पनेने तिने त्याला हाताला धरून सावरले.त्याचा भांबावलेला चेहरा बघुन ती ही वरमून म्हणाली, “सॉरीऽऽ हं चुकून धक्का लागला.कोण हवेय आपल्याला?कुणाला शोधताय इकडे?”

त्यावर काय बोलावे हेच सुचेना त्याला.तिच्या त्या मोहक चेहऱ्यात तो इतका हरवला की ज्या पैंजणाच्या शोधात तो तिथे आला होता ती समोरून गेली तरी त्याला विचारायचे भान राहीले नाही.

“न…..नाऽऽ…नाहीऽऽ..कुणाला नाही…!!”

म्हणेपर्यंत तीच मघाशची किणकिण करत ती समोरून गेलीही……

आता निनाद पूर्ण वेळ लग्न कार्यालयात तिलाच शोधत राहीला.ती जिथे जिथे दिसेल तिथुन तो तिला न्याहाळत राहीला.

लग्न विधी पार पडले.जेवणे उरकली.निघायची वेळ झाली पण आता निनादचाच पाय निघत नव्हता लग्न मंडपातून.

ती कोण,कुठली,तिचे नाव काय?काही काही माहित नसलेला निनाद त्या अनामिकेच्या प्रेमात पडला.त्या पैजणाची नाजूक किणकिण त्याला स्वस्थ बसू देईना.नाईलाजाने कार्यालय सोडले आणि आई-बाबांसह तो घरी परतला.

ती अख्खी रात्र निनादने त्या पैजणाला न्याहाळत जागून काढली.मन तळमळत होते पण तिचा शोध कसा घ्यावा हे त्याला सुचत नव्हते.

त्याने आडून आडून आईलाही चौकशी केली पण फारशी माहिती हाती लागली नाही.

असेच दिवस वर्ष सरत होती.

मधल्या वर्षात निनाद इंजिनियरींग पूर्ण करून एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉबलाही लागला.

मुलाला नौकरी लागल्या बरोबर आईने छोकरी संशोधनाला सुरवात केली पण निनादच्या मनात त्या नूपुरांनी अाजही इतके घर केले होते की त्याला इतर कुणाशी लग्नच करायचे नव्हते आणि केले तर फक्त “तिच्याशीच” असा मनोमन प्रण केला होता त्याने.पण मनातली ही व्यथा आई वडिलांना कशी समजणार होती आणि सांगितल्यावरही त्यालाच मुर्खात काढले असते.जिचे नाव गाव काही माहीत नाही अशा कल्पनेतील मुलीसाठी लग्नाला नाही म्हणणे म्हणजे सर्वसामान्यांच्या जगात मुर्खपणाच ठरला असता नाही काऽऽ?

त्यामुळे कुणाला काही न सांगता लग्नच न करण्याच्या निर्णयावर तो ठाम राहीला.

आई वडील सांगून सांगून थकले पण त्याने आपला इरादा बदलला नाही.अखेरीस त्याच्या हट्टापूढे नतमस्तक होत आई बापांनीही नाद सोडला.

एव्हाना निनाद पस्तीशीत पोहोचला होता.

जवळपास दहा बारा वर्ष मल्टीनॅशनल कंपनीत नौकरी करून बऱ्यापैकी माया जमवली होती त्याने.त्यात एकटा जीव सदाशीव.आई वडीलही थकलेले.त्यांनी रीटायरमेंट पर्यंत छान बंगला बांधुन ठेवला होता.पूढे निनादचा संसार वाढेल ह्या उद्देशाने जरा मोठेच घर बांधले होते पण निनादच्या संसाराच्या आशा मात्र त्यांच्या हयातीतच धूळीस मिळताना ते बघत होते.

म्हणजे थोडक्यात आता घरात वयस्कर आई बाबा आणि निनाद इतकेच लोक सहा खोल्यांच्या बंगल्यात रहात होते.आई वडीलांना त्यांची पेंन्शन होती.निनादचाही पगार भरपूर. त्यामुळे आता परिस्थिती सूखवस्तु होती आणि घरात सगळी सुबत्ता नांदत होती.त्यामुळे एक दिवस निनादने तो धाडसी निर्णय घेतला.

आई वडिलांना ऐकुन धक्का बसला पण ह्या वयात तरूण मूलाला विरोध करायचे बळही त्यांच्यात नव्हते म्हणुन शांत राहून त्यांनी मूक संम्मती दिली.

निनादने आपला जॉब सोडून पुर्ण वेळ पेंटिगला द्यायचा निर्णय घेतला.

सहा खोल्यांपैकी पाठीमागच्या दोन खोल्यातील मधली भिंत पाडून आवश्यक त्या गरजांची पुर्तता करून तिकडे त्याच्या पेंटिग करता खास सोय करून घेतली.

त्याचे कॅनव्हास,विविध ब्रश,कलर्स पेटिंग साठीचा स्टँड इ.सर्व सोयींनी ती खोली भरून गेली.

दरवेळी कुठलेही पेंटिंग करताना समोर ते नूपुर ठेवून तो चित्र चितारत असे.

आणि सरते शेवटी ती वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक स्वाक्षरी.तेच नूपुर आणि खाली नाव आणि फोन नंबर.

लग्नाच्या हॉलमधील सूंदर ललनांचे पेंटिंग्ज बघत असतानाच त्या नूपुरांशी भेट झाली म्हणून त्याच्या चित्रांचा प्रमुख विषयही स्त्री हाच असे.

चित्र कसेही असुदे अगदी पायघोळ घागरा जरी असेल तरी त्यातल्या एका पायात तसेच पैंजण रेखाटायला तो विसरायचा नाही.

त्याच्या सुबक पेंटिंग्जनी आधी त्याची खोली मग घर भरून गेले.ज्या आई वडीलांनी कधीच त्याच्या ह्या कलेकडे फारसे लक्ष दिले नव्हते तेही त्याची पेंटिंग्ज पाहून मंत्रमुग्ध होत.मनात कुठेतरी ही टोचणीही येई की त्याच्या ह्या कलेला आपण हवे तसे प्रोत्साहन आणि पाठिंबा वेळीच दिला असता तर आज हा ह्या कलेच्या क्षेत्रात कुठल्या कुठे पोहोचला असता,किती नावा रूपाला आला असता…!!

पण त्याची भरपाई ते त्याच्या चित्रांची मनसोक्त तारिफ करून करू लागले.

अगोदर निनादने आपल्याच जवळच्या कॉलनीतील वाचनालयाच्या हॉलमधे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले.त्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला.त्यातुनच आणखी त्या क्षेत्राशी निगडीत कलासक्त लोकांशी परिचय असे करत करत आज त्याची असंख्य पेंटिंग्ज वेगवेगळ्या हॉटेल्स,कॉर्पोरेट ऑफिसेस,हॉस्पीटल्स,

मॉल्स,कॉलेज आर्ट गॅलरीज किंवा खाजगी क्षेत्रातील विविध व्यवसायिकांनी खरेदी केली होती.निनादच्या चित्रांमधे एक जीवंतपणा होता.पाहताच कोणीही त्या पेंटिंग्जच्या प्रेमात पडत असत.

सगळीकडून त्याच्या चित्रांचे होणारे कौतूक आईवडीलांना सूखावून टाकी पण निनाद मात्र अगदी स्थिर एखाद्या शांत डोहागत..ज्याच्या अंतरंगात काय खळबळ माजलीय ते जगाला थांग लागत नाही अगदी तसाच.

आनंद ना दू:ख अशा संत अवस्थेला पोहोचलेला होता.

कारण काळजात अजूनही तेच पैजण किणकिण करत असे.निदान एखादे तरी चित्र तिच्या नजरेत पडेल आणि त्याखाली असलेले ते पैंजण पाहून कदाचित कोणीतरी एक दिवस मला शोधत येईल ह्याच सूप्त इच्छेपोटी तो ती वेगळी स्वाक्षरी करत असे.पण वयाची चाळीशी उलटूनही आजवर एकही तसा चौकशी करणारा फोन आला नव्हता.

हळुहळू मनानेही हार मानायला सुरवात केली होती.सगळी उमेदीची वर्ष निघून गेली आणि आता कोण येणार?आली तरी ती कुठे एकटी असणार…ती तिच्या संसारात मग्न असेल.?मग ही आशा तरी का बाळगायची?

मनाेमन निनाद अशाप्रकारे स्वत:चीच समजूत काढायचा.आताही आरामखूर्चीत बसुन ह्याच सगळ्या विचारांची पुनरावृत्ती करत असतानाच फोन खणखणला.आर्ट गॅलरी कडून फोन होता.गेल्या तीन दिवसात बरेच फोन येऊन गेले होते.हा ही त्यापैकीच एक.नक्कीच कुठले तरी पेंटिंग आवडले असणार.त्याबाबतीत विचारणा करायलाच फोन असणार.

त्याने नेहमीच्या व्यवसायिक अविर्भावातच ‘हॅलो’केले.

पलिकडून आर्ट गॅलरीचा माणूस जे बोलला ते ऐकुन निनाद सरसावून बसला.

नुकत्याच एक बाई त्याच्या पेंटिंग्जना पाहून त्या खरेदी करू इच्छित आहेत पण तत्पूर्वी त्यांना तुमच्याशी खाजगीत वार्तालाप करायची  इच्छा आहे.जर तुमची परवानगी असेल तर तुमचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देऊ का त्यांना?”

निनादला काय उत्तर द्यावे समजेना.पेटिंग्जच्या खाली अधोरेखित नंबर फक्त प्रोफेशनल कामासाठी होता.त्यातले व्हॉईस मेसेज त्याला ऐकुन कळेल अशी सोय त्याने अगोदरच करून ठेवलेली होती.त्यामुळे त्या लोकांशी त्याचे डायरेक्ट बोलणे गरज पडली तरच होई.त्यामुळे ह्या व्यक्तीला खाजगीत काय बर बोलायचे असेल ही उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना.

तो धावतच फोनच्या व्हॉइसमेलबॉक्सकडे धावला.त्या दिवसातले सगळे मेसेजेस ऐकले त्यात शेवटच्या व्हॉइसमेलने तो जागेवरच उडाला.

धावतच पून्हा आर्ट गॅलरीचा नंबर फिरवला.पलिकडच्या माणसाकडे त्या व्यक्तीने आपला पर्सनल नंबर सोडला होता.त्याने तो नंबर घेऊन अधिरतेने फोन केला.

रींग जात होती तसतसे त्याच्या ह्रदयाची धडधड वाढत जात होती.बऱ्याच उशीराने फोन उचलला गेला.”हॅलोऽऽऽ!”

त्या नाजूक आवाजाने त्याच्या काळजात तिच किणकिण वाजली.

त्यानेही घसा खाकरत चाचरतच हॅलो केले.

पलिकडून काय बोलणे झाले माहीत नाही पण निनादने बरऽऽ..होऽऽ..होऽ..लगेच..लगेच पोहोचतो म्हणत कागदावर कुठलातरी पत्ता नोट करून घेतला.

त्याला काही सूचत नव्हते.मनाची आणि घशाची कोरड शमवण्या करता त्याने पाण्याचा अख्खा जारच तोंडाला लावला.

नकळत हाताला कंप सुटल्याचे त्याला जाणवत होते.वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन स्वत:ला एकवार आरशात निरखतच त्याने विस्कटलेले केस नीट केले.खुरटलेल्या दाढीला ट्रिमरने सेट करून मस्त आफ्टर शेव्ह मस्क कोलोन लावला.

डेनिम ब्लू जिन्स आणि त्याचा आवडता व्हाईट शर्ट घालून तयार होऊन तो घाईने निघाला.

निघताना ते नूपुरही पँटच्या खिशात टाकायला विसरला नाही.आज त्याचे मन त्याला सांगत होते की बहूतेक त्याची प्रतिक्षा आज संपणार….!!!

ट्रॅफिकमधे फोर व्हिलर अडकेल हा विचार करून त्याने बूलेटवर जाणेच पसंत केले.बूलेटनी वाऱ्याच्या वेगाने जिपीएस वर अॅड्रेस टाकून तो भन्नाटपणे गाडी चालवू लागला.तासभरातच तो  सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला.त्याची गाडी एका गगनचूंबी इमारतीपाशी थांबली.

दिलेल्या पत्त्यानूसार पंचविसाव्या मजल्यावर 2504 फ्लॅटवर त्याला पोहोचायचे होते.फोनवर विचारणा झालेले फक्त पायांचा आणि त्यातल्या फक्त एकाच पायात काढलेल्या त्याच नूपुराच्या पेंटिगला घेऊन तो लिफ्टमधे शिरला.अजूनही हातपायात सुटलेला कंप थांबला नव्हता.पूढे काय होणार हे त्यालाही ठाऊक नव्हते.पण आज तिचे दर्शन होणार ह्या नुसत्या कल्पनेनेच तो मोहरला होता.

विचार करता करताच पंचविसाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली.तो हलकेच दार उघडून बाहेर आला.लिफ्टच्या चकचकीत स्टिल दरवाजात पून्हा एकदा आपला चेहरा केस ठिकठाक करत शक्य तेवढे सहजभाव चेहऱ्यावर ठेवून त्याने डोअरबेल वाजवली.दोन मिनटां नंतर एका स्त्रीने (बहूदा ती त्या घरची मेड असावी) दार उघडले.

तो एका प्रशस्त दिवाणखाण्यात पोहोचला.

स्वत:ला ठिकठाक करत तो समोरच्या सोफ्यावर बसला आणि सहज हॉलभर नजर फिरताच तो चक्रावला.त्याच्या असंख्य पेटींग्जने त्या हॉलची भिंत भरून गेली होती.बर इतके दिवसात काय वर्षात कधीही ह्या व्यक्तीचा पेंटिंग्ज खरेदीसाठी फोन नाही मग ही पेंटिंग्ज कशी आली इकडे.?

त्यातल्या एका पेंटिंगने त्याचे लक्ष वेधले.आता चकित व्हायची पाळी त्याची होती.त्या सर्व पेंटिग मधे एक पेंटिंग ते होते जे त्याने खूप आधी कॉलेज वगैरेत शिकत असताना विरंगूळा म्हणून रेखाटले होते.त्या पेंटिंगखाली फक्त त्याची स्वाक्षरी होती.त्या नूपुराचे चित्र नव्हते त्यावर.

आणि ते त्याने कधीही कुठल्याच आर्ट गॅलरीतही ठवले नव्हते मग हे इतके जूने पेंटिंग इकडे कसे आले ह्या विचारांनी त्याला पोखरायला सुरवात केली.क्षणोक्षण त्याची त्या फोनमधील व्यक्तीला भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचत होती.तो अस्वस्थपणे हातापायाची हालचाल करत होता.मधेच लक्षात येताच स्वत:ला कंट्रोल करत होता.इतक्यात मगाच्याच स्त्रीने एका मगमधे गरम कॉफी एका ट्रे मधे आणुन त्याच्यापूढे ठेवली.

हॉलमधे एकटाच बसून तो कॉफीचे सिप घेत अस्वस्थपणे आतल्या दरवाजाकडे नजर लावून बसला.

इतक्यात ती मगाचीच मेड पून्हा आली आणि “मॅडमने आपको अंदर बुलाया है।” असा निरोप दिला.हे त्याला जरा विचित्रच वाटले.एका अनोळखी व्यक्तीला कोणी आपल्या शयनकक्षात कशाला बोलावेल?

त्यामुळे त्याला जरा संकोच वाटत होता पण आज ह्या कहाणीचा सोक्षमोक्ष लावायचाच हा निश्चय करून तो आतल्या खोलीत गेला.

ड्रेसिंगटेबलच्या खूर्चीत बसून ती आपल्या दाट काळ्याभोर केसांवर ब्रश फिरवत होती.त्याला ड्रेसिंग टेबलच्या आरशात तिचा चेहरा दिसला आणि ह्रदयात तिच पंचवीस वर्षापूर्वीची ‘ह्रदयात वाजे समथिंग’ वाली किणकिण जाणवली.ती ‘तिच’ होती.वयोपरत्वे थोड्याफार बदलां व्यतिरिक्त तिच्यात काही फार बदल दिसत नव्हते.ती आताही तेव्हा इतकीच गोड नाजूक दिसत होती.तो तिला न्याहाळतोय हे तिनेही समोरच्या आरशातून ताडले तसे ती म्हणाली,”काय बघतोएस इतके निरखून?खूणा पटल्या की काही बाकीय अजून..!!”

तिच्या शेवटच्या वाक्यावर ती स्वत:च खळखळून हसली.पण निनाद मात्र वरमला.त्याची चोरी पकडली गेली होती हे जाणून तर त्याला मेल्याहून मेल्यागत झाले.

अजुनही ती त्याच्या दिशेला वळून बोलत नव्हती.त्याला ती जरा उद्धट आणि माजोर्डीच वाटली.आपली निवड चुकली की काय हे ही मनात येवून गेले.जिच्या एका भेटीसाठी आपण आपले अख्खे आयुष्य पणाला लावले ती आपल्या पेटिंग्जची कदर करतेय पण जित्या जागत्या त्या व्यक्तीची जो ह्या पेंटिंग्जना घडवतो त्याची कदर करत नाही ही….!!

मनातून आपण इकडे उगाच आलो असेही भाव उमटून गेले पण आता ह्या सगळ्या विचारांचा काहीच उपयोग नव्हता.तो ऑलरेडी नको ती चूक करून बसला होता.आता पूढे काय काय होतेय ते बघायचे असे ठरवून तो तिच्या मागे असलेल्या एका छोटेखानी स्टूलवर बसला.

आता कुठे तिने चेअर फिरवली आणि ती त्याच्याकडे तोंड करून त्याच्या संमूख बसली.

त्याला काय बोलावे हेच समजत नव्हते.घरातून निघतानाची अधिरता संपून ती जागा अाता अस्वस्थतेने घेतली होती.मगाशी आलेल्या विचारांमूळे त्याची घुसमट वाढली होती.

मनातुन वाढलेली बेचैनी त्याच्या चेहऱ्यावरही उतरली असावी कारण ती लगेच म्हणाली,”मिस्टर निनाद,काय झालेय,.तुम्हाला बरे नाही वाटत का?Any problem?Are you uncomfortable??

“No..No..am perfectly fine.Nothing to be worried about..!”

बरं काय कारण होते.?माझ्याशी एवढे काय बोलायचेय तुम्हाला खाजगीत?

जरा लवकर बोललात तर बरे होईल कारण मला दूसरी कामे आहेत महत्त्वाची.मी ती सोडून आलोय भेटायला.”

तिच्या एकंदर अॅटिट्युड देणाऱ्या वागणूकीला बघून निनादनेही अगदी प्रोफेशनल शैलीत उत्तर दिले.

“हो..मला कल्पना आहे तुमचा वेळ किती अमूल्य आहे पण महत्त्वाचे तसेच कारण होते म्हणून बोलावलेय मी तुम्हाला.”

तुमचा फार वेळ घेणार नाही.फक्त माझ्या मनात काही शंका आहेत त्याची शहानिशा करायला म्हणुन मी तुम्हाला इकडे बोलावले.”

तिने थोडीशी सुरवात केली परंतु अजूनही मूद्दा कळत नव्हता.

ती थोड्यावेळ शांत झाली आणि मग पून्हा बोलू लागली,”मि.निनाद तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता,विचारू?”

“हो विचारा की..त्यासाठीच तर आलोय मीऽऽ.”

निनाद जराशा खोचकपणेच हे वाक्य बोललाय हे कळुनही तिने तिकडे दुर्लक्ष करत त्याला म्हणाली,”तुम्ही तुमच्या प्रत्येक पेंटिंगमधे हे नूपुर काढतात त्यामागे काही खास कारण आहे का? आणि प्रत्येक पेटिंगमधे वैविध्य असते तरीही त्यातल्या कुठल्यातरी स्त्री पात्राला तुम्ही ह्या एकाच डिझाईनचे नूपुर का चितारता?चित्रांमधे इतकी विविधता मग त्या नूपुरांमधे तोच तो पणा का?”

तिचे हे निरीक्षण अगदी योग्य होते.आजवर त्याच्या पेंटिंग्जची इतकी वाहवा झाली त्याला कित्येक पुरस्कारही मिळाले परंतु हा प्रश्न आजवर कोणीही विचारला नव्हता.तिच्या चाणाक्षपणाचे कौतूक वाटले त्याला आणि त्याला हवाहवासा प्रश्न विचारणारी ‘ती’ आज त्याच्या पुढ्यात असुनही का कुणास ठाऊक आता तो रिता झाला होता.तिच्या वागण्यातील उर्मटपणा किंवा श्रीमंतीचा माज त्याच्या मनातून तिला उतरवून गेला होता त्यामूळे त्याची त्या भेटीतली आतूरता कुठेतरी संपुष्टात आली होती… 

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विचारलेल्या त्या हव्याहव्याशा प्रश्नानेही म्हणुनच तो मोहरला नाही.पण उत्तर तर द्यावेच लागणार होते.

जरावेळ शांततेत गेला.मग त्याने बोलायला सुरवात केली.

“मला माहीत नाही तुम्ही कोण,तुमचे नाव काय पण तरीही मी तुम्हाला ओळखतो….. …..”

“मी नूपुर..आय मीन माझे नाव नूपुर..तुम्ही मला नूपुर म्हणू शकता..”

निनादच्या वाक्याला अर्ध्यातच तोडत तिने आपला परिचय दिला.

“ओकेऽऽ!! तर मिस नूपुरऽऽ…तुम्ही कदाचित मला ओळखत असाल किंवा नसाल पण मी तुम्हाला फार पूर्वीपासुन ओळखतो.त्यालाही आता पंचवीस तीस वर्ष उलटली असतील.तेव्हा मी कॉलेज शिकत होतो आणि माझ्या आईच्या एका नात्यातल्या लग्नात जबरदस्तीनेच आलो होतो.वेळ रमवायला मी त्या कार्यालयाच्या वरच्या दालनात गेलो आणि तिकडची पेंटिंग्ज पहाता पहाता कोणाशी तरी टक्कर झाली.त्या व्यक्तिला मी पाहिले नाही पण तिच्या पायातले नूपुर मात्र मला तिथे सापडले.ते परत करायला जेव्हा मी त्या व्यक्तिचा शोध घेत एका खोलीशी आलो तेव्हा तिकडे पून्हा एका व्यक्तिशी टक्कर झाली ती व्यक्ति तुम्ही होतात.मी भान हरपून फक्त पहात राहिलो आणि तुम्ही त्या नुपूरांची किणकिण करत तिकडून निघुन गेलात.नंतर पूर्णवेळ माझे डोळे फक्त तुमचाच पाठलाग करत होते.

त्या दिवसा पासुन नकळत मी तुमच्या म्हणजे ते नूपुर ज्या व्यक्तीचे आहेत तिच्या प्रेमात पडलो.आता हा माझा गैरसमजही असू शकतो की त्या नूपुरांची मालकीण मी तुम्हाला समजलो असेन.कदाचित ते नूपुर कुण्या वेगळ्या स्त्रीचे असतील आणि तुम्ही वेगळ्या असताल पण अशा मनाच्या अवस्थेमूळे मी माझ्या प्रत्येक चित्रात बाकी सगळे बदल करतो परंतू नूपुराची डिझाईन तिच असते ज्याने माझ्या संपूर्ण आयुष्याची जागा व्यापून टाकलीय…न जाणो कधीतरी ती माझे पेटिंग बघेल आणि माझ्याशी संपर्क करेल ह्या वेड्या आशेने मी ते नूपुर माझ्या प्रत्येक पेंटिंग आणि माझ्या स्वाक्षरीत समाविष्ठ करतो.आता ती माझी सिग्नेचर स्टाईल झालीय असे तुम्ही म्हणू शकता…”

सगळे सांगून निनाद शांत झाला.

मग तिने विचारले,”ते नूपुर तुमच्याकडे आताही आहे का हो?”

“होऽऽऽ…मग..जपून ठेवलेय मी ते..”

“मी बघू शकते please? “

जराशा संभ्रमात दाखवावे की नाही विचार करत शेवटी त्याने ते मागच्या खिशातून बाहेर काढले.

“हे बघाऽऽ….हे नेहमी माझ्या सोबतच असते.”

तिने ते निरखून पाहिले तसे तिचे डोळे पाणावले.महत प्रयासाने आपल्या आश्रुंना आडवत तिने ते त्याला परत केले.”आलेच मी”

म्हणत तिने पून्हा चेअर ड्रेसिंग टेबलकडे सरकवली आणि त्याच्या ड्रॉवरमधुन एक लाल मखमली पाऊच काढला.पून्हा त्याच्या जवळ येत तिने ते पाऊच त्याच्या हाती देत सांगितले,”हे प्लिज उघडा.”

निनादने भांबावल्या नजरेनेच त्या मखमली पाऊचचे बंद सोडले आणि त्यातली वस्तू हातात घेतली तसा तो आश्चर्य चकीत झाला.

त्याच्याजवळ असलेल्या नूपुराची दुसरी जोडी त्या पाऊच मधे होती.

आश्चर्य आणि खूप सारे प्रश्न असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते.आणि आता त्यात रागही सामील झाला होता.कारण त्याला तीच्या बद्दल काहीच माहीत नव्हते परंतु तिला तर तो नावासहीत माहीत असुनही तिने त्याच्याशी एकदाही संपर्क का नाही साधला?हे त्या रागाचे कारण होते.

पण तरीही स्वत:च्या भावनांवर संयम ठेवत तो म्हणाला,”ओहऽऽ, अच्छा..म्हणजे ह्या नूपुराची मालकीण तुम्ही आहात तर..!!!”

“चला बरे झाले.आज ह्या नूपुरांचा शोध प्रवास संपला.माझ्याकडचे बेवारस नूपुर आता योग्य जागी स्थानापन्न होतील.सॉरी मी मगाशी जे बोललो ते विसरून जा. ह्यापूढे मी माझ्या पेंटिंग्जमधे ह्या नूपुरांचे पेंटिंग काढणे बंद करेन.कारण मला त्या नूपुराच्या मालकाचा शोध घेण्याच्या ध्यासापायी मी तो वेडेपणा केला.त्याची फलश्रुतीही प्राप्त झाली आता ते तुमच्या स्वाधीन करून मी मोकळा होईन..

त्याने दोन्ही नूपुर त्याच पाऊचमधे टाकून ते पुन्हा तिच्या हाती द्यायला हात पूढे केला.तेव्हा तिचा चेहरा रडवेला झाला होता.त्यालाही ते जाणवले पण ती काहीच बोलत नाही म्हणजे हे त्याचेच एकतर्फी प्रेम होते असेही असु शकते किंवा मग आता तीचे लग्न झालेले असेल म्हणुन ती बोलत नसेल .काहीही असो आपण मुर्खपणा केलाय हे खरे.निघता निघता पून्हा त्याच्या मनात त्या पेंटिंगचा विचार आला तसा तो पून्हा मागे फिरला.

बाय द वेऽऽ..तुमच्या हॉलच्या भिंतीवर माझे एक अतिशय पर्सनल पेंटिंग जे मी कधीतरी कॉलेजात असताना विरंगूळा म्हणून काढले होते ज्याला कधी कुठल्या प्रदर्शनातही ठवले नव्हते ते तुमच्या संग्रही कुठून आले.?”

ती काही न बोलता फक्त म्हणाली जरा वेळ आहे तुमच्याकडे?”

“नाहीऽऽ मगाशी तुम्ही म्हणालात की खूप महत्त्वाची कामे सोडून आलात म्हणुन विचारतेय.जर वेळ असेल तरच बोलते.”

त्यालाही उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती की ते चित्र हिच्या संग्रही कधी कसे आले? त्यामुळे ते जाणून घ्यायला तरी त्याला थांबणे क्रमप्राप्तच होते.

“हो आहे वेळ..बोला तूम्ही..”

त्याने परवानगी देताच नूपुरने हसतच बोलायला सुरवात केली.

तुम्ही आय मिन…तू….तू म्हणलेले चालेल नाऽऽऽ….खूप अवघडल्या सारखे होतेय तूम्ही वगैरे…”

निनादने मानेनेच होकार दिला तसे ती पूढे बोलू लागली.

“तर मी काय सांगत होते….तू ज्या लग्नाला आला होतास ना,त्या नवऱ्या मूलीची मी सख्खी बहिण…लग्नामधे बरेच गिफ्टस आले होते ताईला.ती घरी आल्यावर आम्ही मिळुनच सॉर्टींग करत असताना माझी ह्या पेंटिंगवर नजर पडली आणि मी ते तिच्या परवानगीने माझ्याजवळ ठेऊन घेतले.तु ज्या तन्मयतेने तिथल्या भिंतीवरची पेंटिंग्ज बघत होतास ते पाहून मला का कुणास ठाऊक असे वाटले की न जाणो हे पेंटिंग तुच केलेले असणार.

त्या दिवशी तू भर मंडपात चाेरून मला बघत होतास हे ही जाणवले पण तेव्हा मला तुझ्या त्या बघण्या मागचा हेतू कळला नव्हता.सगळीच तरूण मूले मुलींना जसे न्याहाळतात तसाच तुही टाईमपास करतोएस असा माझा समज झाला म्हणून ती बाब मी तिकडेच विसरूनही गेले पण नंतर हे पेंटिंग पाहून मला तुझ्यातला छूपा कलाकार दिसला.मी ही कथ्थक शिकायचे तेव्हा,थोडीफार कलेची जाण मलाही होतीच म्हणून मी ते पेटिंग मागून घेतले.अशी कथा आहे हे पेंटिंग माझ्या संग्रही असण्यामागची…”

 “पण मग माझ्या बाकीच्या प्रोफेशनल पेंटिंग्जवर मी माझा नंबरही लिहीत असे तो पाहून कॉन्टॅक्ट करावा असे का नाही वाटले कधी आणि आत्ता इतक्या वर्षांनी भेटावेस का वाटले??”

“मी गेल्या वीस वर्षांपासुन हेच माझे प्रोफेशन बनवलेय आता.अनेक लोक पेंटिंग्ज खरेदीसाठी कॉल करायचे.त्यात तुझ्याशी बोलल्याचे मला तरी आठवत नाही.मग एवढी सारी पेंटिंग्ज तू कुठून कलेक्ट केलीस? “

निनादची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.अजुनही काही गोष्टी ती वगळून सांगतेय हे त्याला आतून जाणवत होते.

“अरेऽऽ…ही काय इतकी अवघड गोष्ट आहे का?”

” मी प्रदर्शनातुन हवी ती पेंटिंग्ज सलेक्ट करून मग माझा माणूस ते परचेस करायचा.”

“Its as simple as that….!!”

“हम्मऽऽऽ….खरय तुझे..”

“बरं चल..निघतो आता..तूला जे बोलायचे होते ते बहूदा सांगुन झालेय.तेव्हा मी निघतो..Bye… !”

“थांब ना अजून थोड्यावेळ..एक कप कॉफी हो जाये.??”

त्याला थांबवण्याचा कुठलाच बहाणा सापडत नव्हता आणि मनातली एक गोष्ट अजुनही तिची बोलायची राहून गेली होती.तिला वाटले होते की तो स्वत:हून तिला विचारेल पण तो रूक्षपणे पैजण परत करून निघून चालला होता.परत कधीच न भेटण्या करता..काय करावे…कसे थांबवावे म्हणून कॉफीचा बहाणा…

हेमा तिची मेड मगाशीच कॉफी थर्मासमधे भरून निघुन गेली होती.म्हणजे नूपुरनेच तिला कॉफी जास्त बनवून ठेवून जायला सांगितले होते.

निनादशी मनातले खूप काही बोलायला प्रायव्हसी हवी म्हणून मूद्दाम सगळे जुळवून आणले होते परंतु म्हणावा तसा निनादकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही आणि स्वत:हून बोलण्याइतकी निर्लज्ज नूपुरही नव्हती.तरी वेडी आशा.शेवटचा एक प्रयत्न त्याला बोलता करण्याचा.म्हणून कॉफीची गळ. 

निनादलाही काय वाटले काय माहित..तिच्या पैजणांनी मला माझे लक्ष्य दिले.तिच्या शोधात का असेना पण आज मी कलेच्या क्षेत्रात इतके नाव कमावले.आता काही गोष्टी आपल्या प्राक्तनातच नसतात मग त्याचा दोष इतरांना का द्यायचा??

मनातल्या मनात स्वत:ची समजूत घालत निमूटपणे त्याने कॉफी संपवली.दोघेही मौनच.ती शांतता असह्य करत होती दोघांनाही.कॉफी संपली की हा निघणार …कायमचा..कधीही न दिसण्यासाठी..!! 

त्या कल्पनेनेच गलबलून आले नूपुरला. पण महतप्रयासाने आपल्या भावनांवर संयम ठेवून तिने त्याला हसुनच निराेप दिला..तो निघतो म्हणुनही ती बेडरूम मधुन बाहेर आली नाही.त्याला जाताना बघून तिच्या आश्रुंनी कदाचित असहकार पुकारला असता आणि डोळ्यांतुन बाहेर ओघळले असते तर..?म्हणून तिने बाहेर जाणेही टाळले.

“बर..चल निघतो आता…! “

म्हणतच निनाद घराबाहेर पडला.जाताजाताही तिने आपल्या उद्दामपणाची झलक दाखवलीच हे त्याला खूप खटकले.औपचारिकता म्हणून तरी बाहेरपर्यंत सोडायला यायला काय हरकत होती…??पण नाही….

असो देर सही अक्कल तर शिकवली तिने आपल्याला..

‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ ह्या म्हणीची योग्य प्रचिती मिळाली.

कदाचित तिचे खरे रूप कळावे म्हणुन तर देवाने ही भेट घडवून आणली नसेल ना!!!

मग बरेच झाले…जो होता है अच्छे के लिए होता है। 

मनात सगळे विचार करतच तो पार्कींग्ज लॉट मधे पोहोचला.गाडीची चावी…….???

तिरमिरीत निघताना चावी सोफ्याच्या साईड टेबलवरच विसरल्याचे लक्षात येताच तो परत वळला..

काहिशा नाराजीतच त्याने लिफ्टने पून्हा 25 वा मजला गाठला.

निनाद दरवाजाशी पोहोचला.पून्हा डोअरबेल वाजवली.

नूपुरही चकीत झाली आता ह्यावेळी कोण आले?डोळ्यातले पाणी पुसत तिने दार उघडले.तो घाईने आत आला.साईडटेबल वरची चावी उचलली आणि निघणार तोच त्याची नजर तिच्यावर पडली.तिचे ते रडवेले डोळे पाहून तो क्षणभर थबकला पण फक्त क्षणिक…

पून्हा निघणार इतक्यात तिच्यासाठी आणलेल्या त्या पेंटिंगवर त्याची नजर पडली जे तो सोफ्यावरच विसरला होता.

त्याने ते उचलले आणि तिच्या हाती देत म्हणाला,”सॉरीऽऽ..हे घे.तुझ्यासाठी भेट म्हणून आणले होते.

तूला माझी फक्त पेंटिंग्जच काळजात घर करतात हे मला कळलेय. बघ उघडून कदाचित आवडेल तूला….

माझा खूप मोठा गैरसमज झाला होता तुझ्या बाबत. बरं झालं तु तो दूर केला लवकर नाहीतर मी मूर्खासारखा मरेपर्यंत एका मृगजळापाठी धावत राहीलो असतो.आणखी एका गोष्टीसाठी तूला धन्यवाद द्यायचे राहूनच गेले..

Thank you Nupuur.. तुझ्या पैजणामूळे मी तुझ्यात नकळत गुंतलो आणि तूझा शोध घेण्यासाठी माझ्या पेंटींग्जचा आधार घेतला.आज मी जो काही आहे फक्त तुझ्यामुळेच आहे.प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षरित्या तू माझ्यावर खूप उपकार केलेस.त्यासाठी तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.माझी फार इच्छा होती की जेव्हा कधी तू भेटशील हे पैंजण त्याच्या योग्य जागी मी माझ्या हाताने बांधेन पण बहुतेक माझी ती लायकी नसावी.माणसाने आपल्या लायकीत रहावे हेच खरे.मी उगीचच नसत्या आशा उराशी बाळगत वेड्यासारखा धावत आलो.पण मधल्या काळात कितीतरी गोष्टी बदलल्यात तसे लोकं पण बदलू शकतात हे मी सपशेल विसरलो…सगळ जग आपल्यासारखेच निरागस निर्मळ नसते हे आज तुझ्यामूळे शिकलो.त्यासाठीही आभार..

आता खरच निघतो…बाऽऽय…!”

निनाद निघताना त्याचा पाय कशात तरी अडकला आणि तो पून्हा तसाच अडखळून पडला जसा तीस वर्षापूवी तिच्या धक्क्याने पडला होता.त्या धक्क्यातुन सावरत नाही तोच आज पून्हा दूसऱ्या धक्याने कोलमडून पडला होता.नूपुरने त्याला पडताना पाहून प्रतिक्षिप्त क्रियेतच आपला हात आधारासाठी तसाच पूढे सरसावला जसा तीस वर्षांपूर्वी मदतीसाठी दिला होता.पण त्याला आधार देता देता ती ही खूर्चीतून खाली पडली.

तिला प्रचंड वेदना होत होती.त्याने स्वत:ला सावरत तिला उठवायला गेला आणि त्याच्या  काळजात चर्रऽऽऽऽ झाले.आत्तापर्यंत तिला उद्दाम मग्रूर,पैशाचा माज असलेली माजोर्डी अशी कितीतरी दूषणे मनातल्या मनात लावून मोकळा झालेला निनाद तिला पाहून दचकला.तिचे भीषण सत्य त्याच्या समोर उघडे झाले होते.त्याला स्वत:च्याच विचारांची लाज वाटली.इतक्यावेळ आपण तिला किती काय काय उपरोधिक बोललो पण तिने ते सगळे निमूटपणे का ऐकुन घेतले हा विचारही आपण केला नाही.किती स्वत:पुरता स्वार्थी विचार केला मी.स्वत:हून तिची एकदाही चौकशी केली नाही.तो आज स्वत:च्याच नजरेत उतरला होता.त्याला खूप अपराधी वाटत होते स्वत:च्याच विचारांसाठी.त्याने डोळ्यातील आश्रु पूसत तिला आधार देत पून्हा खूर्चीत बसवले.तिचे डोळे टिपत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरत तिला विचारले,”का नूपुर ..का इतके परके केलेस मला..?का नाही ह्याआधीच भेटलीस?का मला तुझ्या दु:खाचा वाटेकरी होऊ दिले नाहीस गंऽऽ..?मला तुझा ठावठिकाणा माहित नव्हता पण तुला तर माझ्याबद्दल सगळेच माहित होते नाऽऽ,मग का कधी मला भेटायला आली नाहीस?काऽऽ राणीऽऽ का?मला तुझ्या लायकीचे समजत नाहीस का तू??

तो तिच्या मांडीवर डोके टेकवून ढसढसा रडत होता.दोघेही एकमेकांना सावरत रडत होते.अखेर नूपुरने बोलायला सुरवात केली.आज ती कहाणीचा तो उत्तरार्ध सांगणार होती ज्याची निनादने कल्पनाही केली नव्हती.

“निनाद… तुझ्या त्या पेंटिगवरून मी जीजूंशी बोलून तुझी सगळी माहिती पत्ता मिळवला.तूला सरप्राईज भेट द्यायची म्हणून एकटीच ड्राईव्ह करत मुंबईहून निघाले.मी माझ्याच तंद्रीत गाडी चालवत होते.कशी कोण जाणे समोरून येणाऱ्या ट्रकवर माझी गाडी आदळली.मी बेशुद्ध झाले.गाडीचा तर पार चक्काचूर झाला होता.मी कशीबशी त्यातुन वाचले.पण त्यात माझा एक पाय निकामी झाल्याने तो अँम्प्युट करावा लागला.

असे अधुरेपण घेऊन तुझ्या आयुष्यात अधुरेपण निर्माण करण्याचा मला काय अधिकार होता सांग…असेही मी तूला भेटायला येतेय हे तूला मी सांगितले नव्हतेच म्हणून मी पून्हा कधीही तूला संपर्क करायचा नाही हे ठरवुन टाकले होते.

पण प्रत्येक चित्राखाली तुझी ती पैंजणाची स्वाक्षरी काळजाला चरे पाडायची.तूला ह्या वेड्या आशेतून बाहेर काढण्याकरताच मी मूद्दाम तूला घरी बोलावले.मुद्दाम तुझ्याशी उर्मटपणे वागले.माझ्या प्रेमातून कायमचे मूक्त करण्याचा ह्याहून चांगला मार्ग मला सापडला नाही..खूप प्रयत्नपुर्वक मनातल्या भावनांवर आवर घातला मी.

पण देवाला कदाचित हे मंजूर नसावे म्हणुनच त्याने तूला माझ्या दारी माझी ही अधूरी अवस्था बघायला पाठवले…

माझी खात्री आहे सत्य समजल्यावर तु नक्कीच तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग विसरशील.आणि तुझ्या आयुष्यात सेटल होशील..माझ्या खूप शुभेच्छा तूला..आता तरी माझा नाद सोडुन तु तुझ्या वाटेने पूढे जावेस अशीच माझी इच्छा आहे…..करशील नाऽऽऽ…माझ्यासाठी एवढे???

आत्तापर्यंत तिचे बोलणे शांतपणे एेकणाऱ्या निनादने तिच्याकडे पाहिले.तिचे हात हाती घेत म्हणाला,”आता तु इतकी विनवणी करतेस तर तुझी इच्छा मला पूर्ण करायलाच हवी नाऽ..मी नक्की सेटल होणार..पण तुझी थोडी मदत लागेल. करशील?”

“नाही नको म्हणूस प्लिजऽ..!!!”

“बोल तु म्हणशील ती मदत करायला तयार आहे मी.तुझ्या सुखासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे मी…तु फक्त बोल.”

नूपुरने होकार भरताच निनाद तिच्या पायाशी आला. तिच्या पावलाला आपल्या ओंजळीत धरत म्हणाला,”तुझ्या आयुष्यात मला ह्या पायाची जागा देशील नूपुर…मी त्या नूपुरां प्रमाणे कायम तुझ्या आयुष्यात सुखाची किणकिण करत राहीन हे वचन आहे तूला माझे…” त्याने अलगद तिच्या पावलावर आपले ओठ टेकवले.

आतल्या ड्रेसिंग टेबलवर पडलेले तेच नूपुर त्याने तिच्या पायात बांधले.तिला दोन्ही हातांनी उचलून घेत आपले आेठ तिच्या ओठांवर टेकवले.नूपुरने त्याच्या गळ्याभोवती आपल्या हातांचे कडे करत त्याच्या मिठीत शिरली….

दोघेही एकमेकांच्या मिठीत बद्ध झाले.आताही नूपुरांची तिच नाजूक किणकिण त्याच्या कानात गुंजत होती.

आज त्या नूपुरांचा शोध खऱ्या अर्थाने संपूर्ण  झाला होता…..

        ~~~~~~~~~~~~~~~~

जयपूर फुटच्या मदतीने नूपुर पून्हा एकदा आपल्या पायावर उभी होती.कथ्थकचे तिचे शोज् करत ती जगभर फिरत होती.निनादने आपले वचन पूरे करून खरच तिच्या पायाची कमी भरून काढली होती….

नूपुरांच्या प्रवासात एक अजुन भर पडली होती ती म्हणजे रूनझून..नूपुर आणि निनादच्या प्रेमाची पावती-गोड मोहक रूनझून…

~~~~~~~~~~~समाप्त~~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.


 

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.