
अगं आई!! आटोपलं का तुझं? चल लवकर उशीर होत आहे आपल्याला.
सुरज नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता आणि मालुताई आपली सकाळची पूजा करत होत्या.
आज सुरजसाठी मालुताई आणि श्याम काका मुलगी बघायला जाणार होते. पण सकाळपासून मालुताई थोड्या निराशच दिसत होत्या, कारण त्यांना आजची मुलगी(राधा ) पसंत नव्हती. राधा दिसायला खूप सुंदर, सोज्वळ, संस्कारी आणि उच्चशिक्षित होती. राधाने इंग्रजी विषयामध्ये एम.ए. आणि त्या नंतर बी.एड केलं होतं. ती एका नामांकित कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाची प्राध्यापिका होती. खरंतर राधाला बघताच कुणी पसंत करेल अशी ती होतीच. पण मालूताईंना सुनेचे नोकरी करणं मुळीच पसंत नव्हतं. त्यामुळे त्या ह्या स्थळाच्या सुरुवातीपासूनच विरोधात होत्या.
आणि सुरजला ह्याउलट शिकलेली बायको हवी होती आणि श्याम काकांना देखील असंच वाटायचं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तर सुरजलाही हातभार लागेन. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आई वडील दोघेही जर नोकरी करत असतील तर त्यात काहीच हरकत नाही. कसेबसे श्याम काकांनी आणि सुरजने मालूताईंना समजावून सांगितलं. शेवटी मुलाच्या हट्टापायी त्या नाही म्हणू नाही शकल्या.
मालुताई :- “हे बघा…. मी तुम्हा दोघांनाही आधीच सांगतेय.. सून घरात आली कि माझी जबाबदारी संपली…. तुमच्या हट्टापायी मी नोकरी करणारी सून घरात आणतेय, पण माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे अनुभव वाईट आहेत. नोकरी करणारी सून घरात लक्ष देत नाही.
सून बाहेर पडली कि…. मग घरातली काम कोण करणार…. ? आणि परत बाईसाहेब दमून घरी आल्या की त्यांच्याच हातात चहा… पाणी द्या…. मग मला कधी आराम मिळणार? एवढं सगळं करूनही तिचे चोचले वेगळेच!! ते कोण पुरवणार ? हा सगळा विचार करा तुम्ही दोघे…. आणि मग ठरवा आज मुलगी बघायला जायचं की नाही.”
सुरज :- “अगं आई, तू कशाला आतापासूनच एवढा विचार करतेस? अजून लग्न तर ठरू दे आणि राधाचा बायोडेटा खूप चांगला आहे. घरंदाज वाटतेय ती….”
श्याम काका :- “अगं मालू!! एवढा विचार नको करू आणि कुणास ठाऊक तू उद्या एक गृहिणी सून म्हणून आणलीस तर ती तुझे सगळे चोचले पुरवेल आणि तुझी कायमची स्वयंपाक आणि घरकामातून सुटका होईल. ह्या सगळ्या “जर…. तर….” च्या गोष्टी आहेत. आधी मुलगी तर बघून येऊ या.”
मालुताई शेवटी कशाबशा तयार झाल्या. राधाच्या घरी गेल्यावर राधा सगळ्यांना पसंत पडली आणि २ महिन्यातच सुरज आणि राधाच्या लग्नाचा बार उडाला. लग्नाचे सगळे सोपस्कार आटोपले होते. राधा आणि सुरजने लग्नासाठी ३ आठवड्यांची सुट्टी घेतली होती. तीही आता संपली होती.
आज लग्नानंतर राधा पहिल्यांदा कॉलेज वर जॉईन होणार होती. रोजची राधाची ९ ते ५ ची ड्युटी असायची. त्यामुळे ती लग्नाआधी ८ वाजताच घर सोडायची. सासर तर तिचं कॉलेज पासून अजून दूर होतं. त्यामुळे तिला ७:३० लाच निघावं लागणार होतं.
मालुताई सकाळी रोज ६ वाजताच उठायच्या. त्यावेळी तर राधा उठलेली नसायची. आजही मालुताई रोजच्या नियमानुसार ६ वाजता उठल्या.
मालुताई स्वतःशीच बडबडत :- “चला!! मॅडम आज कॉलेजला जाणार…. अजून तर उठल्या नसतील ….मलाच तिला चहा आणि डब्बा करून द्यावा लागेल… आज करेन मी पण तिला मी स्पष्टच सांगेन कि आज करून दिला आहे… उद्यापासून नाही करून देणार..”
मालुताई फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आल्या तर तिथे राधाला बघून चकितच झाल्या.
राधा अंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी सकाळचा नाश्ता आणि जेवण बनवत होती.
राधा :- “आई आल्या का तुम्ही? चहा घेणार ना ? तुमचा पण चहा ठेवला आहे मी. आपण सोबतच पिऊ या आणि हो नाश्त्यासाठी मी पोहे भिजवले आहेत. पप्पा आणि हे उठताच पोहे बनवते. माझ्या आणि ह्यांच्या डब्यासाठी मी मेथीची भाजी बनवली आहे. तुमच्यासाठी बटाट्याची भाजी टाकली आहे आणि भात वरण बनवला आहे. चपात्या आताच बनवू का तुम्ही नंतर गरम गरम बनवंतानं?
मालुताई हे सगळं बघून आश्चर्यचकितच झाल्या होत्या.
मालुताई :- “अगं तू कधी उठलीस? नि हे सगळं कधी केलं ?”
राधा :- “५ वाजताच उठले मी आज.. आणि मला सवयच आहे लवकर उठण्याची. आईच्या घरी रोज आम्ही ५ वाजता उठून काकड आरतीला जायचो.
तिकडे चहा पण झाला होता आणि मग काय सकाळी सकाळी सुर्र्कन चहाचा आस्वाद घेता घेता मालुताई आणि राधाच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. राधाचं रोजच रुटीन ठरलेलं होतं. रोज सकाळी ती नित्यनियमाने ५ वाजताच उठत आणि सगळी काम उरकून कॉलेजला निघत…. कॉलेज वरून आल्या नंतर देखील मालुताईना स्वयंपाकात हातभार लावत. सगळी कामं ती अगदी न सांगता नित्य नियमाने करत.
अगदी सगळ्या सणावाराला.. समारंभाला.. देखील…. मग ते गौरी गणपती असो.. कि दिवाळी असो ..कि अजून काही ….राधा सगळ्या कामात पुढाकार घेत असे. त्यामुळे मालुताईचं बरंचसं कामं हलकं झाला होतं आणि त्यांना देखील आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला होता लग्नानंतर काही महिन्यातच राधा नि मालुताईंमध्ये घट्ट नातं निर्माण झालं होतं. कुठे समारंभाला दोघी गेल्या कि सगळे त्यांना बोलत कि राधा तुमची मुलगीच वाटते…. ऐकून मालुताईना सुनेबद्दल अभिमान वाटायचा आणि त्या मनातल्या मनात बोलतं
“नोकरी करणारी सून नको तर हवीच “
बोध : आज मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. पण तरी देखील बहुतेक ठिकाणी स्थळ बघताना पहिली अट हि घातली जाते, कि लग्नानंतर मुलीला नोकरी नाही करता येणार. मुलगी मग अभियांत्रिक असो वा उच्चशिक्षित. बहुतेक वेळा मुलाकडचे मुलाच्या शिक्षणाचा खर्च हुंड्याच्या माध्यमातून मुलीकड्च्या कडून उकळतात. मग मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाचं काय ?
आज मुली नोकरी करून देखील सुद्धा आपल्या घराची जबाबदारी , मुलांची जबाबदारी उत्तम सांभाळतात. बऱ्याच लोकांचा भ्रम असतो कि नोकरी करणारी मुलगी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवणार नाही.. पण मी अशी बरीच उदाहरणं पाहिली आहेत कि जिथे मुली पाककलेतही कौशल्यवान आहेत.
तेव्हा “चूल आणि मूल ” हि संकल्पना सोडून द्या आणि मुलींनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा द्या.
===================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
1 Comment
Vaishali Shelke
Nice message 👍