निर्णय

©️®️ गीता गरुड.
सुनंदाने तीनचारदा दाराची बेल दाबली तेंव्हा कुठे सुधाकरने दार उघडलं.
सँडो बनिअन नि बर्मुडातला तो दाढीचे खुंट खाजवीत तिच्याकडेच नाराजीने पहात होता. सुनंदाने पायातल्या सोनेरी चपला रेकवर ठेवल्या नं लग्नातल्या भरजरी साडीचा बोंगा आवरीत ती बाथरूममध्ये शिरली. पायावर, तोंडावर पाणी घेतलन. वाटलं, या टायमाला आयता चहा मिळावा पण सुधाकर टिव्हिसमोर बसला होता. कसलसं गाणं सुरु होतं नि तो बोटांनी खुर्चीच्या कडांवर तबलेबाजी करत होता.
“सुनंदा, चहा टाक गं जरा.” त्याने ऑर्डर सोडली. ती त्याकडे दुर्लक्ष करत बेडरुममध्ये गेली. आरशात स्वतःला न्याहाळलं. लालबुंद साडी, वरती खड्यांची नक्षी किती शोभून दिसत होती तिला. इतर समवयस्क शेजारणींच्या मानाने आपण अजून फिगर राखून आहोत असं तिने स्वतःचंच कौतुक केलं. वेणीत माळलेला मोगऱ्याचा गजरा काढून टेबलवर ठेवला.
तिला आठवलं, बंगाली भाभी तिच्या शेपट्याला बोटांनी कुरवाळत बोलत होती,”भाभी, कितने सोंदर है ऑपके बाल!”
सगळं सगळं देवाने दिलेलं, आईकडून वारस्याने लाभलेलं तिचं स्वत:चं तिने राखून ठेवलं होतं, जपणूक केली होती देहाच्या मंदिराची. ब्लाऊज हँगरला लावून तिने आपलेच ठसठशीत, सुडौल उरोज कौतुकाने न्याहाळले नं गाऊन चढवला. बाहेर येत ती कामाला लागली. पहिला चहा ठेवला. तिला वाटलं, सुधाकर विचारेल,”कसं झालं लग्न? कोण कोण आलं होतं?” पण सुधाकर पक्का व्यवहारीक. त्याला हे असले लग्न, वाढदिवसांचे सोहळे आवडतच नव्हते. लग्न म्हणजे स्वतःहून ओढवून घेतलेली गुलामी असं त्याचं स्पष्ट मत होतं. अशा लग्नाचा सोहळा तरी कशाला करायचा तो दात काढून हसत म्हणे.
सात्विक यायला झाला होता. तिने कणिक तिंबून पोळ्या करायला घेतल्या. दुपारचा वरणभात, डाळींबीची उसळ होतीच. लग्नाला गेली तरी घरची कामं चुकतात का! सगळा स्वैंपाक करून ठेवून गेली होती. पोळ्याही सहाएक होत्या पण सात्विक पहाटे साडेपाचाला घर सोडायचा तो संध्याकाळी साडेसात आठच्या मानाने यायचा मग लेकराला ऊन ऊन पोळी द्यावीशी वाटे तिला.
बेल वाजली. सुधाकर उठेना, तसाच तंगड्या पसरून कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. सुनंदानेच दार उघडलं सात्विक आत आला. ” किती रे भिजलास!”
“छत्री विसरून गेलो होतो ना.” तो शुज काढत म्हणाला.
“नशीब, स्वतःला विसरून नाही जात. मस्तक असतं कुठे ताळ्यावर.” सुधाकरची कुजकी बडबड.
“आई, मला आतच पाठव जेवण.” असं म्हणत तो वॉश घेऊन त्याच्या रुममधे शिरला. मास्टर बेडरूमच्या बाजुलाच सात्विकची बेडरुम होती. सुनंदा जेवणाचं ताट, पाण्याचा ग्लास घेऊन सात्विकच्या खोलीत गेली. टेबलवर तिने त्याचं ताट ठेवलं. तो लेपटॉवर काही काम करण्यात दंग होता. “सात्विक जेवण गार होईल. जेवून घे राजा.” ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.
“आई, पत्याच्या लग्नाला गेली होतीस ना. कसं झालं लग्न..मस्तच झालं असणार.” स्वतःच्या प्रश्नाला स्वत:च उत्तर देण्याची लेकाची ही नेहमीचीच सवय पण त्यामागे कुठेतरी अंतरीची वेदना जाणवत होती. हा पत्या सात्विकहून पाच वर्षांनी लहान. वडलांच्या वशिल्यावर बंँकेत नोकरीला लागला..नोकरीला लागला तशी स्थळं येऊ लागली एकाहून एक सरस. पत्याला चॉइस होता. वीसेक स्थळं नाकारली त्याने. हे स्थळ कसं ते पास केलन.
सात्विकचं तसं नव्हतं. अगदी साधीशी नोकरी ,आता आहे तर उद्या नाही अशी. मुलींना परमनंंट नोकरीवाला, हँडसम वगैरे हवा असायचा. सात्विक दिसायला सुधाकरचाच छाप, सावळा नव्हे काळ्याकडे झुकणारा रंग, जाडगेले ओठ,नाकही आकारहीन पीठाचा गोळा ठेवल्यासारखं. आईच्या रेखीव चेहरेपट्टीतलं सात्विकने काहीच उचललं नव्हतं.
सुधारकरची मुलगाच हवा ही प्रबळ इच्छा इतकी जोरकस होती की मुलगाच झाला आणि तोही सुधाकरच्या चेहरेपट्टीचा पण गुण मात्र त्याने आईचे उचलले होते. सुधाकरसारखा आगडोंब नव्हता की कोत्या मनाचा नव्हता. अगदी सोशिक होता म्हणूनच मित्रमंडळींमधे लाडका होता.
एखाद्या मित्राची बहीण गटवेलं तर तेही नाही. सगळ्यांकडून हक्काने राखी बांधून घ्यायचा. अपवाद फक्त खालच्या मजल्यावरच्या पाटणकरांची जाई. जाई सात्विकची बालमैत्रीण. ती समज आली तशी एकदा राखी घेऊन आली होती वरती. किती धांदल पोरीची?”काकू ओवाळणीचं ताट करा. मला सात्विकला राखी बांधायची आहे.” हुकुमच सोडलान. सात्विक हातभर राख्या घेऊन बसला होता पण जाईला म्हणाला,”जाई, तू माझी मैत्रीण आहेस. बहीण नव्हे. मी नाही तुझ्याकडनं राखी बांधून घेणार.”
जाईला रागच आला त्याचा. तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला. “जाई, अगं थांब. गुलाबजाम आणते.” सुनंदा म्हणेस्तोवर जाई गेलीसुद्धा.
एकदा पोरंपोरी खेळत होती मैदानात. लंगडी खेळत होती. सात्विकवर राज्य होतं. तो जाईला पकडत होता नि जाई गोल गोल धावत होती. शेवटी तोही इरेस पेटला. वेगाने लंगडत त्याने तिच्यावर अक्षरशः झेप घेतली. जाई कोसळलीच. हात पोटाखाली आणि ..आणि कायमचा जायबंदी झाला. प्लास्टर केलं होतं खरं पण ते हाड नीट बसलच नाही. विक्रुती राहिली हातात.
जाई घरी होती तेवढे दिवस सात्विक तिच्या वर्गातल्या मुलांच्या वह्या आणून तिच्या वह्या पूर्ण करत होता. जमेल तेवढी तिला मदत करत होता.
त्या प्रसंगानंतर जाईची आई तर सात्विकला नजरेने बघत नव्हती. त्याच्यामुळे जाई पडली होती ना. जाई पडली त्यादिवशी हे भांडण केलेलन तिने. पोलीसकेस करते नि काय नि काय. सुधाकरही इरेला पेटला होता. जा जा करा काय ते, म्हणाला होता. तेंव्हापासनं त्यांच्या घराची दारं एकमेकांसाठी बंद झाली होती. जाईची आई सुनंदाला पाहून तोंड फिरवायची पण जाई मात्र आई कामावर गेली की यायची सुनंदाकडे, तेही सुधाकर नाही याची खात्री करून. सुधाकरकाकांचं खोचक बोलणं आवडत नसे तिला.
सात्विक नि जाई जसजसे वयात येऊ लागले तसतसं त्यांच्या मैत्रीची जागा प्रिती घेऊ लागली. प्रेमाचे कोवळे धुमारे त्यांच्या मैत्रीच्या वेलीला फुटू लागले. सुनंदाला सगळं जाणवत होतं ते. सात्विकला काय आवडतं काय नाही आवडत ते सारं जाईला ठाऊक. तिची आई घरात नसताना नि सुट्टी असली की सात्विकच्या आवडीचा प्रसादाचा शिरा करून आणायची. किती सुंदर बनवायची! जीभेवर चव रेंगाळत रहायची मग बरेच दिवस. पोरीचा हात बेढब झाला असला तरी हाताला गुण होता तिच्या. तिलाही बऱ्याच ठिकाणी दाखवणं चाललेलं पण नकारच पदरी पडत होते.
सात्विकचं मन सुनंदा ओळख़त होती पण सात्विक वडलांसमोर आपलं प्रेम जाहिर करायला घाबरत होता. कदाचित नोकरीची शाश्वती नव्हती म्हणून तो व्यक्त व्हायला कचरत होता. तसा तो धसमुसळा अजिबात नव्हता पण आपल्या वडलांचा घमेंडखोर, मीपणाचा स्वभाव त्याला ठाऊक होता. कदाचित नोकरीची शाश्वती असती तर पळवून न्हेलंही असतं त्याने जाईला पण इथे तोच आईवडलांवर अवलंबून होता. दोनचार महिन्यांनी कधी कंपनीतनं पगार मिळायचा. तरी तो निराश न होता इतर ठिकाणीही ट्राय करत होता.
रात्री सुधाकरने सुनंदाला जवळ घेतली. वय झालं तरी त्याचा आवेग काही कमी झाला नव्हता. सुनंदाही न चिडता त्याला सर्व काही करू द्यायची, पण मनाने ती तिथे नसायचीच. सुधाकर नंदे नंदे म्हणत तिचे आखीवरेखीव अवयव कुरवाळत असायचा. ती मात्र लगतच्या खोलीत निजलेल्या एकुलत्या एक लेकराचा, सत्विकचा विचार करत असायची. त्याची नोकरी परमनंट झाल्याशिवाय त्याच्या लग्नाचं बघायचं नाही, परवाच सुधाकरने सात्विकसमोर तिला सुनावलं होतं. मुलाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार नाही. नोकरी परमनंट नाही पण आपण खंबीर आहोत नं पोसू काही दिवस त्यांना ती बोलली होती यावर तुझं अर्धवट ज्ञान पाजळू नकोस असं सुधाकरने सुनंदाला सुनावलं होतं.
लेक पस्तिशीचा होऊनही कोरडाच आणि बाप मात्र रात्री रंगवतोय. सुनंदाला त्याच्या कामव्रुत्तीचीही किळस आली. तिला थंड, अलिप्त पाहून सुधाकर तिच्याकडे याचना करू लागला.. आवेगाची, समर्पणाची, पण तितक्याच कोरडेपणानं ती म्हणाली. ”आजचं हे शेवटचं. आता लेकाचं लग्न लागेस्तोवर माझ्याकडून देहसंबंधांची अपेक्षा ठेवू नका.”
“नोकरी धड नाही, रुप नाही..चारेक स्थळं पाहिली त्यांनी नाकारलं नं त्याला. मी जन्मभर त्याच्या संसाराचं ओझं नाही वाहू शकत.”
“मी माझं आईपण नाही नाकारू शकत. त्याच्या मनात जाई आहे. मी सून म्हणून आणतेय तिला. तिच्या आईची किंवा तुमचीही संमती नसली तरी काहीच बिघडत नाही. संसार त्या दोघांना करायचा आहे.”
“तिची आई ऐकेल? आणि या महागाईत त्याला पोरं झाली की त्यांचं खाणंपिणं, औषधं, शाळेच्या भरमसाठ फिया कोण भरणार,मी? आणि प्रेम करून केलन कोणाबरोबर ती जाई अधु.हाताची तिच्याशी!”
”अधु हात कोणामुळे झाला होता? आपल्या सात्विकमुळेच ना. तिच्या आयुष्याला लागलेलं ग्रहणही आता तोच सोडवील. त्यांच्या मुलांच्या खर्चाचं म्हणाल तर जिल्हापरिषदेच्या शाळा काही ओस नाही पडल्यात. तिथे शिकलेली बरीच लोकं आज मोठ्या हुद्द्यांवर आहेत.”
“काय हवं ते करा तिकडे.” असं म्हणत सुधाकर पाठ करून झोपला.
सुधाकर ऑफिसला निघून गेल्यावर सकाळी दहाएक वाजता जाई थालिपीठं घेऊन आली. सोबत लोणीही आणलेलंन नुकतंच काढलेलं.सुनंदाने ते तिलाच सात्विकला न्हेऊन द्यायला सांगितलं. अनायासे सात्विक घरी होता.
जाईला बघताच सात्विकचा चेहरा खुलला. सुधाकर घरात नसल्याने जाईलाही त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. लगतची बेडरुम आता सजीव झाली होती, त्या खोलीत चैतन्य पसरलं होतं. काही वेळ थांबून सुनंदा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन गेली. “काकु, तुझ्याहातची कॉफी अप्रतिम लागते बघ.” ती कॉफीचा सीप घेत म्हणाली.
“आता रोजच मिळणार तुला माझ्या हातची कॉफी नि सात्विकसाठी इथेच बनवणार तू शिरा नि थालिपीठं.”
“काकू, काय बोलताय तुम्ही? बऱ्या आहात ना.”
“हो गं. नुसती बरीच नाही तर ठाम आहे माझ्या निर्णयावर. तुला माझी सून करून घेणार.”
काकु पण माझा बेढब हात, सात्विकचे वडील, माझी आई..”
जाईच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली,”माझ्या सात्विकला तू पसंत आहेस आणि सात्विक तुला. हो ना. मग इतरांचा विचार करायचा नाही.रजिस्टर मँरेजसाठी नावनोंदणी करा.”
सात्विक आईच्या या ठामपणाकडे अतिव क्रुतज्ञतेने पहात राहिला.
समाप्त
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.