Skip to content Skip to sidebar Skip to footer

नीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

neera in marathi : काय म्हणालात..मुलगी माडावर चढते!! माडावर चढून पोयीतनं नीरा काढते! एवढंच नाही नीरेपासनं साखर, गुळही बनवते! कोण आहे ही मुलगी(toddy tapping girl) तसंच काय असते नीरा पाहुया आजच्या लेखात.◆◆

नारळाचं झाड जणू आकाशाशी स्पर्धा करते. माडाचा असा एकही भाग नाही की जो उपयोगात आणला जात नाही. शहाळी, नारळ, खोबरेल तेल, जाडजूड दोर, लाकूड, शोभिवंत वस्तू, खराटे..काय नि किती वस्तू बनवतात या झाडापासून.

नीरा म्हणजे नारळाच्या पोयीमधील रस. नारळाला दर महिन्याला एक पोय फुटते. ह्याच्या पुढील भागात पुंकेसर असते तर मागील भागात स्रीबिजे असतात. ह्या बिजांडांवर जेव्हा पुंकेसर पडतात तेव्हा संकर होतो आणि बिजांडांचा नारळ बनतो. हे सारे एका कडक आवरणात झाकलेले असते. ह्याला पोय म्हणतात.

जोपर्यंत नीरा रस ताजा असतो तोवर त्याला नीरा असे म्हणले जाते. नीरेत बरेच औषधी गुण असतात. नीरेत जवळजवळ ८४℅ पाणी असते. नीरेत केल्‍श‍ियम, पोटेश‍ियम, आयर्न, फॉस्‍फरस विपुल प्रमाणात असतात. नीरेत व‍िटाम‍िन सी व व‍िटाम‍िन बी कॉम्‍प्‍लेक्‍स ही असतात. नीरा चवीला गोड असते व सफेद रंगाची असते.

नीरा ही चवीला गोड असते. नीरा काढल्यावर काही ठराविक वेळात प्यावी लागते. जर का उशीर झाला तर त्याची ताडी तयार होते. ताडी उग्र वासाची, आंबट असते व ताडी पिल्याने नशा येते. बरीचजण नीरेलाच ताडी समजतात व नीरेपासून मिळणाऱ्या फायद्यांना वंचित रहातात.

● नीरा प्याल्याने शरीरातली कमजोरी दूर होते.
● नीरा शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढते.
● मुतखडा, उन्हाळी लागणे, मुत्रमार्गातील संसर्ग यांवर नीरेचे सेवन लाभप्रद ठरते.
● नीरा शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते.
● नीरेपासून जी साखर बनवतात तिचा ग्लायसेमीक इंडेक्स हा सर्वसाधारण साखरेच्या एक दशांशपट असतो, त्यामुळे मधुमेही रुग्णही या साखरेचे सेवन करू शकतात.
● पोटाच्या विविध आजारांवर गुणकारी आहे.
● काविळीवरही नीरा गुणकारी आहे.

रस्त्यावर काही ठिकाणी  तुम्हाला माडी विकणाऱ्यांची लहानशी दुकानं दिसत असतील. या माडी किंवा नीरा विक्रीसाठी त्यांना सरकारकडून लायसन्स मिळवावं लागतं. मग नारळाची झाडं/ माड भाड्याने घ्यावी लागतात. या माडांना खापा करून ठेवलेल्या असतात ज्याचा उपयोग हा पायऱ्यांसारखा होतो. सरसरसर ही माणसे वर चढताना पाहताना बोटं आपसूक तोंडात जातात.

या लोकांना रेवंदे म्हणतात. रेवंद्यांच्या कमरेला कोयती अडकवलेली असते. जिला खापी म्हणतात. या खापीला धार, पांगेऱ्याच्या झाडाच्या लाकडावरच काढतात.
पोय म्हणजे माडाला आलेला कोंब. यात असंख्य लहानगे  दाणेरुपात नारळ असतात. ही पोय नायलॉनच्या दोराने टोकापासनं चार बोटं खाली बांधत जातात. टोकाला खापीने छेद देतात. मधे काही दिवस जाऊ देतात. मग माडावर चढून या पोयीला खापीच्या दांड्याने हलकेहलके ठोकतात. आठेक दिवसांनी माडी निघण्यास सुरुवात होते.

पोयीच्या शेंड्याजवळ नारळाच्या हिरव्या पातींनी बांधतात. पोयीच्या टोकाला मातीचं मडकं बांधतात. या मडक्यातच माडी साचते.
दिवसातनं दोन वेळा माडी काढण्यासाठी रेवंदे माडावर चढतात. सकाळी सहा ते सात व संध्याकाळी सहा ते सात या दोन वेळातच माडी काढतात.

रात्रभर मडक्यात ओघळलेली माडी ही चंद्राच्या शीतकिरणांच्या प्रभावामुळे शीत असते. हिला शीतमाडी म्हणतात. तर संध्याकाळी काढलेली माडी ही सुर्याच्या तेजाच्या प्रभावामुळे कडक असते जिला खाटी माडी म्हणतात.

एका माडाला वर्षभरात बारा पोयी येतात. पावसाळ्यात या माडावर शेवाळामुळे निसरडे झालेले असते त्यामुळे जीव धोक्यात घालून ही लोकं माडी गोळा करतात.

कोकणात बरेच लोक माडी काढून विक्री करतात व त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आतापर्यंत या क्षेत्रात फक्त पुरुषमंडळीच कार्यरत होती पण आता एका मुलीनेही या क्षेत्रात आगेकूच केली आहे. कोण आहे ही मुलगी? चला जाणून घेऊ या धाडसी मुलीबद्दल.

श्वेता गावकर ही दक्षिण गोव्यात रहाणारी मुलगी. घरची शेती असल्याने श्वेताला लहानपणापासूनच शेतीची आवड होती.

श्वेता इंजिनिअरींगला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षांचा अभ्यास करत होती मात्र तिचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. ती करत असलेल्या अभ्यासातून तिला आनंद मिळत नव्हता.

याचवेळी श्वेताला शेतकी महाविद्यालयाची माहिती मिळाली. आईवडिलांचा पुर्ण पाठिंबा असल्याने श्वेताने डॉन बॉस्को शेतकी कॉलेजात प्रवेश घेतला. हे शेतीविषयक ज्ञान तिला जवळचं वाटू लागलं. काही वर्षांत तिने पदवीपरीक्षा दिली व ती शेतकीक्षेत्रातली पदवीधर झाली.

★★पदवीनंतर बँगलोरकडे

पदवीनंतर श्वेता बँगलोरमधे रिसर्च करत होती. एका नारळापासून अनेक रोपे करण्यासंबंधीचं ते संशोधन होतं पण कोरोनाची लाट आली आणि ते काम अर्ध्यावर सोडून तिला पणजीला माघारी यावं लागलं.

★★मळलेल्या वाटेहून वेगळी वाट निवडली:

श्वेता पणजीत  एका फार्मवर मेनेजरचं काम करत असताना ती एकदा नारळाच्या झाडावर चढली, अगदी वरपर्यंत चढली. तिने पोयीतली निरा काढली. हे काम तिला परत परत करावसं वाटू लागलं. श्वेताच्या आईने सांगितलं, जे काय करशील ते सावकाश, काळजी घेऊन कर.

श्वेता स्वतः नीरा काढण्याचे काम करू लागली. इतकेच नाही तर गावात रेवंदे(नीरा काढणारे) तरुण कमी झाले होते. श्वेताने इतर तरुणांनाही माडावर चढून सूर/नीरा कशी काढायची याचं प्रशिक्षण दिलं.

 नीरेचा औषधी उपयोग आहेच शिवाय या नीरेपासून गुळ बनवतात, व्हिनेगरमधेही वापरतात.  हा उद्योग वर्षभर केल्यास वर्षाकाठी साडेतीन चार लाख ते सहजच कमवू शकतात, असा आत्मविश्वास तिने तरुणपिढीत जागृत केला आहे.

श्वेता, निरेपासून  कोकोनट शुगर, कोकोनट गुळ ही उत्पादनेही बनवते. माडावर चढण्यासाठी श्वेताने मशीन आणले आहे. ते मशीन माडाला लावून माडावर पायी चालल्यासारखे चढता येते.

श्वेता सांगते की ती अगदी योग्य अशी पोय पारखते, पोयीला मसाज करून ठोके देते व दोऱ्याने बांधते. पोयच्या टोकाला सात से.मी.पर्यंत छेद देते व ते टोक पॉलिथीन बेगने बांधून ठेवते. मग आठेक दिवसांत त्यातून नीरा  ठिबकू लागताच स्पेशली डिजाईन्ड बॉक्स पोयीच्या टोकाला लावून ठेवते जेणेकरुन अगदी बारीक किटकही माडीत प्रवेश करू शकत नाहीत. 

—————

मडक्यांऐवजी हे बॉक्स वापरण्यात येतात. एका पोयीपासून पंधरा ते वीस लीटर सूर/नीरा निघते. श्वेताच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीकडे दहा माड असतील तर एका माडाला बारा पोयी वर्षभरात धरल्यास , एका पोयीपासून पंधरा ते वीस लीटर नीरा मिळते.

एक लीटर नीरेची घाऊक बाजारातील किंमत एकशेवीस व किरकोळ बाजारातील किंमत दोनशे रुपये आहे. एकशेवीस गुणिले पंधरा लीटरचे अठराशे रुपये मिळतात. वर्षाकाठी साडेतीन ते चार लाख रुपये दहा माडांपासून सहज मिळतात.

या उद्योगात मुलींनीही पदार्पण करावे असा श्वेता गावकर आग्रह करते. लहान माडाची प्रजाती असल्यास माडावर चढावेही लागत नाही. उभे राहूनच toddy tapping करता येते. माडावर चढण्याचा रोज सराव केल्यास माडावर चढणे सहज शक्य होते व सरावाने toddy tapping म्हणजेच पोयीतून निरा काढण्याची प्रक्रिया सहज आत्मसात ककरता येते.

श्वेता गावकरची ही उमेद, वेगळ्या वाटेवरील वाटचाल तरुणाईला नक्कीच प्रेरणा देणारी आहे.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.