Skip to content Skip to sidebar Skip to footer

संहारिणी

Navratri Katha :

©Sonali Tamhane

“सती निद्रिस्त पहुडलेली आहे. मोहनिद्रा म्हणतात त्याला….” काहीशी अशीच असायची आजीच्या महिषासुर मर्दिनीच्या गोष्टीची सुरुवात. आताही ती गोष्ट तिला जशीच्या तशी आठवतेय, ती तळ्याकाठी बसलेली असताना. म्हटलं, तर एकटीच, पण सोबत विचारांची अनावर गर्दी. पांढरा शर्ट , निळी जीन्स, तिचा नेहमीचा पोशाख, ज्यात सहज असायची ती. वाऱ्यावर उडणारे तिचे केस. एकटक तळ्याच्या काठाकडे ध्यान लागलेली तिची नजर. तिथे तिला दिसतेय  आशु…जिच्या नजरेत  असह्य वेदना, तीव्र संताप आणि अनिवार दु:ख…आशु, तिची जिवलग मैत्रीण. आजीनंतर एकमेव प्रिय व्यक्ती. शिवमच्याही आधीची. शिवम बद्दल तिला काही वाटतय हे आशुनेच लक्षात आणून दिलं होतं तिच्या.

अंधार झाकोळून येतो, तशी तिच्या मनातली अस्वस्थता आणखी वाढत जाते. ती उठते. केसांना रबर लावून पोनीटेल मध्ये बांधून टाकते. विचारांना बांधून ठेवता येत नाही असं. ते प्रचंड बेकाबू. ती होस्टेल वर  परतते . खोलीतल्या बेडवर झोकून देते स्व:ला. भूक कधीच मेलीय. झोपही येत नाही. सगळ्या जगाशी संपर्क तोडलाय तिने. अगदी शिवमशी सुद्धा. तो परत आल्यापासून जाणवतय त्याला, ही ‘ती’ नाहीये.

घरघरत्या पंख्याकडे पाहत ती टक्क जागी. पापण्याही मिटायचे विसरून गेलीय जणू. पडल्या पडल्या आजीची गोष्ट पुढे सरकत राहते तिच्या मनात, “ राक्षसांनी सगळीकडे अन्याय , अत्याचार यांचं रण माजवलय . सर्वत्र हाहाकार  माजलाय. देव मानव त्रस्त झालेत. पृथ्वी त्यांच्या पापाच्या भाराने डळमळू लागली. त्राही  माम, त्राही माम, वाचवा, वाचवा, प्राणांतिक आरोळ्यांनी आसमंत भरून गेलाय.” त्य किंकाळ्यांमध्ये तिला आशुची किंकाळी ऐकू येऊ लागते…ठळकपणे…ती कानांवर हात दाबून धरते. दचकून उठते. घामाने डबडबते. तिच्या घशाला कोरड  पडलीय. ती उठून पाणी पिते. एसिड घशातून पोटात जातं पाण्यासोबत.

तिला आठवतं, आजीच्या आठवणीनं अशीच कासावीस झाली होती ती एकदा, मध्यरात्री झोपेत. होस्टेलचे सुरवातीचे दिवस होते ते. एकटेपणाची लहानपणापासून भीती वाटायची तिला. कोणात मिसळणं , मैत्री करणं, बोलणं, जमायचं नाही तिला. अभ्यास. फक्त अभ्यास. आशु हिच्या उलट. बोलकी, चटकन मैत्री करणारी. हसरी. तिच्या अखंड बडबडीला ही फक्त किंचित हसून हुं म्हणायची.  पुन्हा स्वत:मध्ये मग्न


त्यादिवशी  तिला स्वप्न पडलं. आजी तिला जवळ घेऊन थोपटत , कुरवाळत झोपवतेय. तीच महिषासुर मर्दिनीची तिची आवडती गोष्ट सांगतेय. तिचे डोळे जड झाले, ती पेंगू लागली. तिनं आजीच्या मांडीवर डोके ठेवायला मान खाली केली, पण तिथे आजीची मांडी नाही. आजीच नाही..”आजी…” अशी हाक मारत ती झोपेतच पलंगावरून धाडकन खाली पडली. आशुनं धावत येऊन सावरलं तिला. पाणी दिलं . शांत केलं . तिच्या प्रेमळ नजरेत तिला आजी भेटली. त्या दिवसापासून आशु तिची आपली झाली. दोघींची सुख दु:ख एकमेकांत मिसळली. “भक्तांचा टाहो ऐकून देवी जागृत झाली. तिचे भक्त तिला शरण आले. अत्याचारांच्या कथा तिला सांगू लागले. मातृ रुपिणीचे मन द्रवले. उष्ण अश्रू तिच्या डोळ्यांतून वाहू लागले. ती संतापानं थरथरू लागली. सोज्वळ, शांत रूप आता अक्राळ विक्राळ  संहारिणी रुपात परिवर्तीत होऊ लागलं . लालभडक डोळे, राक्षसाच्या रक्ताला लालसावणारी तिची जीभ. देवी संतापाच्या उद्रेकाने थयथय नाचू लागली. युद्धाची नांदी दर्शवणारे ढोल सर्वत्र वाजू लागले.” ते ढोल तिलाही ऐकू येतात. आताही पुन्हा ती तिथेच आलीय, तळ्याच्या काठी. पाण्यात आशुचा निष्प्राण देह दिसतोय तिला. पांढऱ्या कपड्याने झाकलेला. ठिकठिकाणी रक्ताळलेलं कापड. तिच्या शरीराचे, मनाचे, आयुष्याचे, स्वप्नांचे , आत्म सन्मानाचे असंख्य तुकडे ते एक कापड कसं झाकू शकेल? पोस्ट मोर्टेम रीपोर्टची लसलसणारी जीभ सांगतेय, बलात्कार.अत्याचार.दगडाने ठेचून खून. बोथट शब्द निव्वळ. काय झालं , कसं झालं याचा निर्जीव तांत्रिक अहवाल फक्त. तिच्या डोळ्यसमोर दिसतेय ती निष्पाप आशु. मदतीसाठी पराकोटीचा टाहो फोडणारी. प्रचंड आकांताने तिची सुटण्यासाठीप्राणांतिक तडफड. ते नराधम तिचा घोट घ्यायला उतावीळ . शेवटी ती हरली. असहाय्य ठरली. ती कोण? फक्त देह? भोग्य शरीर? कोणी हाडामासाची , भावभावना असलेली जिवंत माणूस नाहीच? भोगून झाल्यावर शरीरची विल्हेवाट दगडाने ठेचून? किती क्रूर , नीच , कृत्य! पहाड फुटला तिच्या डोक्यात. त्याच्या ठिकऱ्या फेर धरून नाचू लागल्या तिच्या डोळ्यासमोर. ती डोळे गच्च मिटून घेते. डोकं आवळून धरते दोन्ही हाताने. पोटातले आतडे पिळून एकमेकांत गुतून जातात. ती थरथरू लागते. संतापाच्या भरात. तिरीमिरीत उठून जाते ती. संपवून टाकावसं वाटतं तिला सगळं एकदाचं .

“शक्तीरुपिणीने शस्त्र घेतली हातात. तिचं विशाल, भव्य, उग्र रूप शस्त्रासारखे तळपतेय. सिंहावर आरूढ होऊन ती वेगात पुढे झेपावली.” गोष्टीतल्या महिषासुर मर्दीनीने  आता साकार रूप धारण केलेय.

 

“इन्स्पेक्टर मोहिते, करता काय तुम्ही? तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेत  हे गंभीर गुन्हे. एकापाठोपाठ एक खून झालेत सलग. कोण करतेय, कसे होताहेत याचा तपास अजून लागलेला नाही. वरिष्ठांना काय उत्तर देऊ मी? मिडिया तीरासारखी अंगावर धावून येतेय माझ्या.”

“सर,ज्यांचा खून झालाय, ते सगळे एका बलात्कार प्रकरणातील  आरोपी आहेत. “

“काय?”

“हो सर, आणि सर्वांचा एकाच पद्धतीने, एकाच शस्त्राने आणि एकच पद्धतीने खून झालाय. शिवाय गुन्हेगाराने कसलाच पुरावा मागे सोडला नाहीये.”

“मला असं वाटतं तुम्ही मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी, त्यातून तपासाला काही ना काही दिशा निश्चितपणे मिळेल. “

 

इ. मोहिते,जे काही तुम्ही सांगताय त्यावरून, आपण असा अंदाज बांधू शकतो, की  नक्कीच खून करणारी व्यक्ती मेंटली डिस्टर्ब असावी. एकच पद्धत वापरलीय म्हणजे अतिशय थंड डोक्याने, व्यवस्थित प्लानिंग करून काम करणारी आहे. आणखी एक, सराईत गुन्हेगारच असेल असं नाही, कदाचित अशा प्रकारचा प्रसंग  स्वत:वर किंवा जवळच्या व्यक्तीवर गुदरलेली कोणीही असू शकेल.अशा घटना आयुष्य उध्वस्त करतात, स्वत: बळी पडलेल्या व्यक्तीचे आणि जवळच्या माणसांचेही.” डॉ देवतळे, नामांकित मानसोपचार तज्ञ इ. मोहित्यांना सांगत होते.

“आता हेच बघा ना, येतान जो तरुण तुम्हाला धडकला, तो तरुण, शिवम त्याचं नाव, तो त्याच्या मैत्रिणीसाठी इथं आला होता. त्या मुलीच्या अगदी जवळच्या मैत्रिणीवर काही गुंडांनी पाशवी बलात्कार केला आणि दगडाने ठेचून तिचा खून केला. तेव्हापासून याची मैत्रीण अतिशय उद्विग्न मन:स्थितीत वावरतेय, असं तो सांगत होता.” इ. मोहित्याना सगळ्या गोष्टी भरभर उलगडत गेल्या. त्यांनी शिवम चा नंबर मिळवला आणि त्याला फोन लावून भेटायला बोलावून घेतलं. “शिवम, मी तुला मदत करू शकतो, पण एका अटीवर…”

“तुमची कोणतीही अट मला मान्य आहे, सर. तिच्यासाठी काय वाट्टेल ते करू शकतो, मी. तिला असं बघवत नाही माझ्याच्याने. आताशी कुठे तिच्या नजरेत भावना दिसायला लागल्या होत्या. मी प्रोजेक्ट साठी दूर गेलो, अन हे असं घडलं.” थोडावेळ थांबून तो पुढे म्हणाला, “शून्यात हरवली असते ती सतत, अनोळखी नजरेने बघते मला, भेटत नाही, बोलत नाही, संपलं सगळं, एवढंच म्हणाली ती त्यादिवशी.” त्याचा गळा भरून आला. “सावर स्वत:ला शिवम. आणि आता मी काय सांगतो ते नीट ऐक. …

शिवम त्यांचं बोलणं ऐकून विचारात पडला…आशेचा किरण त्याला दिसू लागला.

 

“संहारिणीने आपली शक्ती पणाला लावून त्या दुष्ट नराधम राक्षसाचा वध केला. अत्याचार संपला. तिचं कार्य पूर्ण झालं. राक्षसाच्या रक्ताने माखलेले अस्त्र तिने शांतपणे मंगलजळात धुवून टाकले.” आताही पुन्हा तिला आशु पाण्याच्या पृष्ठावर दिसते आहे. श्रांत, क्लांत. अचानक तिचे दोन्ही हात पुढे होतात, आणि ती अलगद आशुच्या कुशीत शिरते. जलपृष्ठावर दोन्ही आकृत्या एक होऊन विसर्जित होतात.

“विसर्जन का ग पण  देवीचं?” तिनं विचारलं होतं एकदा. “ देवीचं मूळ रूप सृजन आहे, संहार नाही. भक्तांच्या रक्षणासाठी, दुराचारी संपवण्यासाठी तिनं हे संहारिणी रूप धारण केलंय. म्हणून या रूपाचे विसर्जन.” आजीनं समजावून सांगितलं होतं.

 

“ इ. साहेब, हे बघा तिची फाईल. ती  तळ्याकाठी गेली असताना मी तिच्या रूम मध्ये शिरून सगळं शोधलं, अगदी तुमच्या सांगण्याप्रमाणे. पेपर मधल्या त्या बातमीला रेड मार्कर ने सर्कल केलेलं, कसले कसले नकाशे, खुणा केलेले कागद..” इ. मोहित्यांनी ती फाईल हातात घेऊन बारकाईने तपासायला सुरुवात केली आणि त्यांचा फोन वाजला.

“ काय? ओह नो, शोकिंग…” मानसिक ताण असह्य होऊन तिने आत्महत्या केली होती. ही बातमी शिवमला सांगणं त्यानाही कठीण गेलं

 

“ या पेरलेल्या गव्हाची रोपं झाली आता, त्याचं काय करायचं ग आजी?”

“ती रोपं शेतात नेवून लावायची. एका दाण्यापासून अनेक दाणे तयार होणं, हेच तर खरं सृजन.”

“इ. साहेब, तुमच्याच हातून उद्घाटन व्हायला हवं, प्रेरणा तुम्हीच तर दिलीत.” शिवमने आग्रहाचे निमंत्रण दिले. इ. मोहिते उद्घाटनाच्या दिवशी वेळेवर पोचले आणि समोरचं दृश्य बघून समाधानाने हसले..शिवमच्या शक्ती संस्थेत पांढरा शर्ट , निळी जीन्स असा गणवेश घातलेल्या अनेक मुली, स्त्रिया आत्म रक्षेचे धडे गिरवायला सज्ज झाल्या होत्या.

सोनाली ताम्हाणे

३२ / B, श्रद्धा, गांधी नगर , अमरावती, ४४४६०६, फोन ९४०५९८८५८४, sonalio8tamhane@gmail.com

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.