Skip to content Skip to sidebar Skip to footer

नवनीत हाती येताना

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

बोचरी थंडी पडली होती..संजीवनीने हातापायांना तीळाचं तेल चोळलं..हातापायांवरची चरबी झडून, अनुभवाच्या सुरकुत्यांचं जाळं विणलं जात होतं ,त्वचेवर.

हात फिरवता फिरवता संजीवनीला आठवण झाली ती लहानपणीच्या थंडीची..गोधडीतून बाहेरच पडावसं वाटत नसे तिला पण चिमण्या चिवचिवू लागायच्या, रेडिओवरची गाणी वाजू लागायची, त्यासोबत स्टोव्हचे आवाज..मग आईच्या चारेक हाकांनंतर ती बळेबळेच उठायची. आन्हिकं आवरल्यावर उरलासुरला ग्रुहपाठ करत दप्तर भरायची. 

आईने वाढलेला वरणभात, दादासोबत जेवायची, मग आई,  खोबरेल तेल चोपडून दाट केसांच्या घट्ट दुपदरी वेण्या घालून द्यायची, वरती पांढऱ्या रिबीनींची फुलं, हातापायांना भेगा पडू नये म्हणून तेल चोळायची. किती आठवणी..काढू तेवढ्या थोड्या. थेंबभर तेल ते काय नं कसं आयुष्यात मुरलय..संजीवनी स्वत:शीच म्हणाली नि मंद हसली.

फ्रीजमधे जमवून ठेवलेली साय तिने रात्रीच बाहेर काढून विरजण लावून ठेवली होती. ती मोठ्या पातेल्यात घेऊन त्यात थोडं पाणी घालून, रवीने घुसळू लागली. हे असं ताक केलं की ताकाची कढी हवीच असायची तिच्या लेकीला,अर्चनाला.

राई,लसणाची फोडणी दिलेली पिवळीधम्म ताकाची कढी, भात, तिळकूट जोडीला..की मन लावून जेवायची..अर्चु..याचवर्षी पन्नास पुरी होतील अर्चुला. .किती गोजिरवाणा संसार होता..नवरा,दोन साजिरी मुलं..नवरा,यशोधन अगदी हसतमुख..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवाहवासा,प्रत्येकाच्या अडीअडचणींत धावून जाणारा, हातचं राखून न ठेवता मदत करणारा. पहिल्यांदाच घरी आला होता तेंव्हा घाबऱ्याघुबऱ्या म्हणाला होता,”मला तुमची अर्चना आवडते. मला तिच्याशी लग्न करायचंय.” अर्चुच्या वडिलांचा..अर्चुवर भारी जीव. त्यांनी अर्चुला बोलावून विचारलं..तिनेही प्रेमाची कबुली दिली.

एकुलती एक मुलगी ..मुलगी कसली संजीवनीच्या यजमानांचा बेटाच तो..नुसतं लाडावून ठेवलेलं अर्चुला. तिचं बाईक चालवणं,पुरुषी पेहराव करणं..इतपत ठीक होतं पण शिट्ट्या मारणं, तोंडी असलेल्या शिव्या..संजीवनी हजारदा अर्चुच्या वडिलांना याबाबत सांगुनही ते तिला काही बोलत नव्हते. जमाना बदललाय हे त्यांचं पालुपद होतं.

अर्चु शेवटी आपल्या सासरी गेली नांदायला..नांदायला की भांडायला..तिथे सासूसासऱ्यांशी तिचं पटेना झालं. वेगळं रहायची टुम काढली तिनं पण यशोधनला ते मान्य नव्हतं. आईवडिलांना एकटं सोडणं त्याला जमणारच नव्हतं.

अर्चु आली माहेरी निघून..गळ घातलीन पप्पांकडे..”पप्पा, आपला ठाण्याचा फ्लॅट आहे ना..त्याच्या चाव्या द्या. यशोधनचं मानगुट पकडून त्याला घेऊन जाते तिकडे. कसा येत नाही तो बघते! त्याच्या खिशातनं थोडंच भाडं भरावं लागणार आहे! त्या मिळमिळीत सासूसासऱ्यांच्यात नाही रहायचं आपल्याला. तोंड जाम आंबलय. साला,एक शिवी हासडता येत नाय. सालापण बोलायची चोरी, बोला. ती सासू तोंडाचा आ करुन बघत रहाते.”

संजीवनी मधे पडली,”भाषा सुधर मग तुझी. मोठ्या माणसांसमोर कसं बोलावं काही ताळतंत्र! इथे होतीस तेंव्हा सतरांदा सांगायचे तुला जीभेला आवर घाल अर्चु, गल्लीछाप शब्द बोलू नकोस अर्चु..पण तू नि तुझे पप्पा..गावंढळ समजत आले मला.”

“आई, तू पण त्या सासूसारखीच आहेस ..बुरसटलेली. पप्पा,चाव्या द्या चला.”

“माझ्या नावावर आहे ते घर. चाव्या माझ्याकडे मागाव्या लागतील तुला आणि मी तुला त्या देणार नाही.” प्रथमच संजीवनी एकेका शब्दावर जोर देत द्रुढ निश्चयाने बोलत होती.

“अगं पण आपलं जे काही आहे ते अर्चुचंच तर आहे. आता दिलं काय नं नंतर दिलं काय!”

“त्या घराचे हफ्ते मी भरलेत. तिथे या अक्कडबाज मुलीला मी राहू देणार नाही.” संजीवनी उत्तरली.

यावर तह करत अर्चुचे वडील म्हणाले,”मग आपण ठाण्याला जाऊ रहायला नं हे घर देऊ त्या दोघांना रहायला.”

दादरचं हे घर रहायला मिळणार म्हणून अर्चु आनंदली. आंधळा मागतो एक डोळा नं देव देतो दोन असं तिचं झालं पण तिचा तो आनंद फार काळ टिकला नाही जेंव्हा”मी काही इथून हलायची नाही,” असं संजीवनीने निक्षून सांगितलं..त्यानंतर ती जी पाय आपटत बिपटन गेली ते गेलीच. क्वचितच यायची,षटामासी.

बाळंतपणंही सासरीच करुन घेतलंन. संजीवनीबद्दल अढी बसलेली तिच्या डोक्यात. सासू मात्र अगदी सांभाळून घेणारी तिची. अर्चुचा धसमुसळेपणा,खवचटपणा सगळं सांभाळून घेतलंन..दोन गोरीगोमटी मुलं. सुखाने नांदतं घर पण अर्चुचा पाय घरात टिकत नव्हता. कुठल्याशा नाटकसंस्थेत काम करत होती. सदीचे दौरे..

मधे अर्चुचे सासरे निवर्तले,तेंव्हाही चौथ्या दिवसापासून ही बया दौऱ्यावर. नोकरीही सोडली, नाटकाच्या वेडापायी. कसले कसले पुरस्कार मिळवलेन..कुणाच्या जीवावर..सासूच्याच ना पण माझी सासू घरात करते म्हणून मी बाहेर मुक्तपणे फिरु शकते असं कधी तिच्या तोंडी नव्हतं.

यशोधनला ती क्वचितच मिळायची. पत्नीसुखाबाबत तो असमाधानीच राहिला. त्याच्या वाढदिवसाची तारीखही ध्यानात नसायची तिला..आठवलंच तर एखादा पुष्पगुच्छ नं शुभेच्छाकार्ड पाठवायची फक्त.

संजीवनी नं तिचे यजमान दोघेही वयाने थकत चालले होते. अर्चुच्या या अशा वारा प्यालेल्या व्रुत्तीचाही त्यांना त्रास होत होता.

उतरत्या वयात अर्चुच्या वडिलांना जाणवत होतं..मुलीला जरा जास्तच सुट दिली आपण..तोंडातनं शिव्या फेकणे म्हणजे पुरुषांची बरोबरी करणे नाही, घराची जबाबदारी वाऱ्यावर सोडणे म्हणजे पुरुषांची बरोबरी करणे नाही पण आता पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. बेफाट,बेलगाम सुटलेल्या अर्चनाचं पाऊल वाकडं पडलं होतं. तिच्याहून सात वर्षाने लहान असणाऱ्या नटाशी तिचे संबंध,तिची शय्यासोबत असते हे त्यांना इथूनतिथून सुस्पष्ट ऐकू येऊ लागलं होतं. बाहेर तोंड दाखवायची चोरी झाली होती.

लोण्याचा गोळा एव्हाना ताकावर तरंगत होता..संजीवनीच्या मनातील विचारही असेच घुसळले गेले होते..वरती तरंगत होती विषण्णता.तिने तो गोळा अलगद पातेल्यात काढून ठेवला.

दारावरची बेल वाजली. हात स्वच्छ धुवून पंचाला पुसत तिने दार उघडलं. दारात जास्मिन होती..तिची नात..अगदी अर्चुचा तोंडवळा..तसेच कुरळे केस,गालावर पडणारी खळी, पिंगट डोळे, मऊमुलायम केस.

“हातपाय धुवून घे हो. थालिपीठ टाकतेय. लोणी काढलय आताच.” संजीवनी असं म्हणताच जास्मिन म्हणाली,”आज्जी,मम्मी परत आलेय..पाच वर्षांनी.”

“तू आधी खाऊन घे बयो मग बोलू.” जास्मिनला थांबवत तिने भाजणीचा डबा काढला. मुठीनं पीठ घेतलं, त्यात कांदा,मिरची,कौथिंबीर बारीक चिरुन टाकली. थोडं तिखट,गोडा मसाला..नं पीठ मळलं. तव्यावर थापू लागली. वरतून तेल सोडलं. चुर्र चुर्र आवाज आला.

थालीपीठाच्या खमंग वासाने जास्मिनची भूक चाळवली. लोणी नं थालीपीठ तिने यथेच्छ खाल्लंं. हात वगैरे धुवून चटईवर पहुडली. संजीवनीही नातीसोबत लवंडली. तिला जवळ घेत म्हणाली,”आता सांग काय ते.”

तितक्यात परत बेल वाजली. दारात यशोधन उभा होता.
“यशोधन, आज अचानक.”

“हो. ही जास्मिन राग डोक्यात घालून इथं आली. तिची आज्जी काय ऐकतेय मला!”

“बरं, अर्चुचं काय?”

“तिला तिच्या चुका कळल्यात. तिच्या बोलण्यावरनं कळतय. ती ज्याच्यामागे गेली होती..तो चक्क टाळतोय तिला. तुझं वय झालं म्हणाला तिला नि कुण्या तिसरीसोबत..त्याचं तसं वागणं अर्चुला अशक्य झालं. तिला कळून चुकलं..म्रुगजळाच्या मागे लागून आपण हातात असलेलं गमावून बसतोय.. ती आली परत, संसार करायला.”

“पप्पा, ती परत आली पण तुम्ही तिला का स्वीकारताय? घाबरताय तिला?

” मुळीच नाही. बेटा,मी तिला स्वीकारतोय कारण मी निर्व्याज प्रेम केलय तिच्यावर. कधी तिच्या नावानं बडबडलो असेन,आक्रंदलो असेन पण आता ती खरंच हरलेय..परतलेय माझ्याकडे तर मी परत स्वीकारेन तिला..कारण माझं खरं प्रेम आहे तुझ्या मम्मावर.”

“मग मी नाही येणार परत घरी.”

“बरं. रहा तुझ्या आज्जीआजोबांकडेच पण एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये. चुकली असेल ती..नव्हे चुकलीच ती..पण पण मम्मी माणूसच असते ना! चुकू शकते मग तीही आणि चुकलेली एखादी व्यक्ती आपण परत सामावून घेतली तर बिघडलं कुठे! तिला आपल्यात सामावून घेऊ..तिचा भूतकाळ न उगाळता.”

“पप्पा, तू खरंच ग्रेट आहेस.” असं म्हणत जास्मिन पप्पाच्या मिठीत शिरली. एक दुरावलेलं कुटुंब एकत्र होणार होतं..भूतवर्तमानकाळातल्या घटनांचे पडसाद घुसळून नवं उमलत होतं. नात्यांचं नवनीत हाती येत होतं.

संजीवनीने जावयासाठी थालीपीठ करायला घेतलं..थालपीठावर लोण्याचा गोळा ठेवताना आता मात्र तिला प्रसन्न,समाधानी वाटत होतं.

–©️®️सौ. गीता गजानन गरुड

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Leave a Comment

error: