नवी सुरुवात

©️®️ सायली
निमाला आपल्या खोलीत वाड्यातल्या’ हळदी- कुंकू ‘समारंभाला जमलेल्या बायकांचे आवाज ऐकू येत होते. न राहवून तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं.जमलेल्या बायकांना हळदी -कुंकू लावत तिच्या दोन जावा, नणंदा मोठ्या उत्साहाने सगळीकडे फिरत होत्या. रंगबिरंगी साड्या, केसांत माळललेले गजरे, नाकात नथ, गळ्यात मोठाली मंगळसूत्र, नटून थटून सजलेल्या तिच्या मैत्रिणी..किती छान दिसत होत्या साऱ्याजणी. डोळ्यातून दोन मोती टपकन तिच्या हातावर पडले. हो..मोतीच ते.
अजय म्हणायचा , निमे तुझ्या सतत टपकणाऱ्या मोत्यांची माळ तुझ्या गळ्यात घालणार आहे बरं मी ! या ही परिस्थितीत तिला हसू आले. आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी तिचे मन फार आतुर झाले होते. पण तिच्या जाऊबाईंनी सांगितलेले शब्द तिला आठवले. “निमे अशी बाहेर येऊ नकोस हा. कोणाला आवडणार नाही ग तुझं हे असं रूप. नवरा नसलेल्या बाईला कसली आलीय हौस? फार तर साऱ्याजणी गेल्यावर घर आवरायला खाली आलीस तरी चालेल.” हे आठवून मन हळवं झालं तिचं. बराच वेळ शांतपणे पडून राहिली ती.
निमा आणि अजयचा सहवास केवळ एका वर्षाचा. अचानक अजयच्या जाण्याने घरचं वातावरण पार बदलून गेलं. निमा एकटी पडली. तिचे आई -वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते. पण निमा अजयच्या आठवणींना जपत सासू -सासऱ्यांच्या आधाराने आपल्या सासरीच राहिली. तिच्या दोन्ही जावांनी मात्र याचा पुरेपूर फायदा घेतला.आता निमावर सारे काम ढकलून त्या आराम करू लागल्या. सासू- सासरे आपल्या दोन्ही सुनांना समजावून थकले. पण त्या एका कानाने ऐकत आणि दुसऱ्या कानाने सोडून देत. निमा मात्र न तक्रार करता घरची सारी कामे करी. कधी कधी तिलाही वाटे आपण ही छान नटावे, मैत्रिणीत मिरवावे. अशावेळी अजयच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी येई.
जिन्यात पावले वाजली तशी निमा उठून बसली. डोळे पुसून तिने हळूच दार उघडले तर ‘सुमती ‘मोठया नणंदबाई दारात उभ्या होत्या. “निमे किती रडशील ग? पूस बघू डोळे आधी आणि लवकर खाली ये. आम्ही सारे वाट पाहत आहोत तुझी.”
थोडयाच वेळात निमा आवरून बैठकीच्या खोलीत आली. मैत्रिणींचा चिवचिवाट आता थांबला होता. टेबलावर मांडून ठेवलेले शिल्लक राहिलेले वाणाचे साहित्य तसेच पडले होते. त्यावर एक नजर टाकून तिने ते सारं आवरायला घेतलं. तशा तिच्या दोन्ही जावा नीमाला पाहून आपापल्या खोलीत निघून गेल्या.
“ते सारं राहूदे गं. निमे चल जरा. मला तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे”. नणंदबाई दारातून आत येत बोलल्या. तशी निमा निमूटपणे त्यांच्या पाठोपाठ बाहेर गेली. बाहेर येताच नणंदबाईंनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. “निमे अशी किती दिवस एकटीनेच काढणार आहेस? मी आई आणि आप्पांशी या विषयावर बोलली आहे. तुझी हरकत नसेल तर, त्यांची ही काही हरकत नाही. तू काही आई-आप्पांना जड नाहीस, पण त्यांना तुझा पुन्हा नव्याने उभारलेला संसार डोळे भरून पाहायचा आहे गं. निमे तु माझ्या धाकट्या दिराशी सुरेशशी ‘पुन्हा’ लग्न करशील?” नणंदबाई निमाचा हात हातात घेत म्हणाल्या.
“सुरेशचे हे पहिलेच लग्न असले तरी त्याच्या आग्रहाखातर माझे सासू-सासरे ही तयार आहेत या लग्नाला. म्हणतात, “नशिबापुढे निमाचा काय दोष?” विधवा मुलीशी लग्न करणे हा विचार नक्कीच कौतुकास्पद आहे. नाही का? आणि खरं सांगू का, मला ही माझ्या सासू-सासऱ्यांच्या या पुढारलेल्या विचारांचे खरंच खूप कौतुक वाटते.”
इतक्यात नणंदबाईंच्या मागे उभारलेला सुरेश पुढे होत म्हणाला, “निमा तुला अजयला विसरणे शक्य नाही, हे माहित आहे आम्हाला. मी वचन देतो तुला निमा, तुझ्या मनातल्या अजयच्या आठवणी मी नक्की जपायचा प्रयत्न करेन.”
सुरेश आणि निमाला बोलण्यासाठी वेळ मिळावा म्हणून नणंदबाई आत निघून गेल्या.
तसे निमाने सुरेशकडे नजर वर करून पाहिले. त्याची नजर अगदी स्वच्छ होती. “निमा या प्रसंगाची एक आठवण म्हणुन तुझ्याजवळ हे ठेवशील?” असे म्हणत सुरेशने एक सुरेखशी पेटी निमाच्या हातात ठेवली. त्या पेटीत असणारी पाणीदार मोत्यांची माळ पाहून निमाच्या चेहऱ्यावर एक हळुवार हास्य फुलले.
“खरंच मनापासून हा निर्णय घेतला आहे मी. तुझ्या होकाराची वाट पाहीन निमा.” सुरेश निमाच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला. पुन्हा एकदा तिने सुरेशकडे पाहिले. आता त्याच्या डोळ्यात विश्वास दिसत होता तिला.
“मी विचार करून सांगेन.” निमा हळुवारपणे त्याला म्हणाली.
आपल्या खोलीत येऊन तिने ती मोत्यांची माळ आपल्या गळ्यात घातली. समोर ठेवलेल्या अजयच्या तसबिरीकडे पाहून तिला वाटले, जणू काही अजय म्हणत आहे. सुरेशला होकार दे आणि आपल्या आयुष्याची नवी सुरूवात कर निमा..नवी सुरुवात.
©️®️ सायली
========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/