नवी पहाट (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२”
©️®️ दिपाली कुलकर्णी
सुधाताई आणि दिनकर राव हे दोघेही तसे सुखी दांपत्य, आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडत आदर्श सहजीवन कसे असावे याचे हे दांपत्य म्हणजे उत्तम उदाहरण. सुधाताई आपल्या आई-वडिलांची एकुलती एक कन्या त्यामुळे दिनकर रावांनी सुधाताईंच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुधाताईंच्या आईचीही जबाबदारी समर्थपणे आणि सामंजस्याने उचलली. दिनकरराव आणि सुधा ताईंना दोन मुलगे आणि दोन सुना, तीन नातवंडे. सर्वच जण उच्चशिक्षित सुसंस्कारित आणि मुख्य म्हणजे या काळातही आनंदाने एकत्र कुटुंबात राहणारे. असे हे सुधाताई आणि दिनकर दिनकर रावांचे चार पिढ्या एकाच छताखाली अतिशय खेळीमेळीने राहणारे कुटुंब.
सुधा ताईंची आई माई आजी,…. माई आजी म्हणजे घराचा प्राण. गोरा रंग , सुती नऊवारी साडी, केसांचा अंबाडा , त्यावर माळलेले एखादे छोटेसे फुल, हातात कायम जपाची माळ अशी सोज्वळ आणि साधी माई आजी घरात सर्वांना खूप प्रिय होती. संस्कार जरी जुने असले तरी नवीन विचारांनी नवीन पिढीशी जुळवून घेणारी अशी माई आजी.!! घरात कोणालाही लागलं, दुखलं, खुपलं की आजीच्या बटव्यातून औषध काढून देणारी चुकलं की ओरडणारी आणि तितकच प्रेम करणारी माई आजी घरात सर्वांना हवीहवीशी वाटायची. पतवंडांवर तर ती जीवापाड प्रेम करायची. असे हे खेळीमेळीने राहणारे कुटुंब परंतु या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने माई आजीचे निधन झाले माई आजी अचानक केल्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता.
दिवाळी थोड्याच दिवसांवर येऊन ठेपली होती मोठ्यांच्या तोंडी ‘यावर्षी आपण दिवाळी साजरी करायची नाही’ …’गोड नको काही करायला’…. ‘फटाके आणायचे नाहीत’…. अशी वाक्य येऊ लागली. पतवंडांचे ही माई आजीवर खूप प्रेम त्यामुळे सर्वजणांनी यावेळी दिवाळी करायची नाही असे मनोमन ठरविले. मोठ्यांनी कितीही सांगितले तरी ती लहान मुलेच !
जस-जशी दिवाळी जवळ येऊ लागली फटाक्यांचे आवाज येऊ लागले तसतशी ही छोटी भावंडे हिरमुसली. नाराज दिसू लागली, त्यांचे वयच तसे होते एकीकडे माई आजीचे दुःख तर दुसरीकडे बाहेरचे चमचमणारे जग, त्यांचे नवीन कपडे फटाके घेतलेले मित्र-मैत्रिणी त्यांना दिसू लागले तसे ते अजूनच हिरमुसले. सुधाताईंच्या नजरेतून मात्र ही गोष्ट लपली नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशी सुधाताई लवकर उठल्या आणि काही कामा निमित्त बाहेर निघून गेल्या. मुले मात्र अजूनही नाराज होती.
लक्ष्मी पूजनाचा दिवस उजाडला सुनांनी यावेळी काहीही फराळ तयार केला नव्हता. घरात एकूणच शांतता होती सुधाताई पहाटे लवकरच उठल्या दिनकर राव यांनाही त्यांनी उठविले. दोघांनी मिळून आवश्यक तयारी केली आणि मुलांना सुनांना नातवंडांना उठवले.सर्वजण झोपेतून डोळे चोळत बाहेर आले पाहतात तो काय सर्व घरांमध्ये पणत्या लावल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या, घराला सुंदर रोषणाई केली होती, अभ्यंग स्नानाची जय्यत तयारी केलेली होती….
टेबलवर फराळाचे सर्व पदार्थ सजविले होते एकूणच सगळे घर पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाले होते दारासमोर तुळशी वृंदावना जवळ एक मोठी पणती लावलेली होती. घरातील सर्वजण आश्चर्याने बघतच राहिले कोणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना शेवटी दोन्ही सुनांनी सुधा ताईंना याबद्दल विचारलेच. यावर त्या म्हणाल्या,” मला माझ्या आईच्या जाण्याचे दुःख तर आहेच पण या वर्षी दिवाळी साजरी करायची नाही म्हटल्यावर माझ्या नातवंडांचे पडलेले चेहरे पाहून मला जास्त दुःख झाले ‘ गेलेला माणूस तर परत येत नाही ‘ पण त्यासाठी माझ्या अवतीभवती जिवंत असणाऱ्या माणसांचे मन मी नाही मोडू शकत.””त्यांचे केविलवाणे चेहरे मी नाही बघू शकत नाही. माई आजीचा तर माझ्यापेक्षाही जास्त जीव या मुलांमध्ये होता तिला तरी त्यांचे हे उदास चेहरे बघवतील का? तिला तरी हे घर दुःखात बुडालेले कसे आवडेल, ती नेहमी म्हणायची हे माझं गोकुळ नेहमी हसतं खेळतं राहिले पाहिजे म्हणूनच मी हा निर्णय घेतला कि काहीही झालं तरी या वर्षी दिवाळी साजरी करायचीच म्हणूनच मी हा सगळा घाट घातला.”
सर्व जण खूप आनंदित झाले एक नवीन उत्साह आणि उमेद घेऊन एक नवीन पहाट उगवली होती सर्वांनी अभ्यंग स्नान केले. माई आजीच्या फोटोला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेतले सर्वांनी खेळीमेळीने यथेच्छ फराळ केला. मुले तर केव्हाच फटाके वाजवायला निघून गेली. दोन्ही मुलांनी आकाशकंदील लावला.
घर पुन्हा पूर्वीसारखे हसतेखेळते झाले. हे सर्व बघून सुद्धा ताईंचे मन भरून आले. दिनकररावांनी आपल्या पत्नीची कौतुकाने आणि प्रेमाने पाठ थोपटली. त्यात दिनकररावांना सुधाताईंचा खूप अभिमान वाटला. ज्या पद्धतीने सुधाताईंनी आपले दुःख बाजूला सारून नव्या पिढीच्या स्वप्नांना वाट करून दिली याबद्दल दिनकररावांना सुधा ताईंचे खूपच कौतुक वाटले. दोघांनी माई आजीच्या फोटोकडे पाहिले जणूकाही माई आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते. सुधाताई आणि दिनकरराव यांच्या घरात समाधानाने आनंदाने नव्या विचारांनी ओथंबलेली नवी पहाट उजाडली होती.
©️®️ दिपाली महेश कुलकर्णी
==================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/