नवदुर्गा

“अगं साधना जरा आज बँकेचे थोडे काम करून ये ना” समीरने साधनाला नाश्ता करताना सांगितले.
“अरे तू आहेस ना करायला, मला घरातलं खूप काम आहे.” साधना म्हणाली.
साधना व समीर हे एक मध्यमवर्गीय व मध्यमवयीन जोडपे. साधनाचे वय पस्तीस तर समीर सदतीस वर्षे वयाचा. दोघांना दोन गोंडस मुले होती. शाळेत जाणारी.समीर एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता, तर साधना एक गृहिणी होती. ग्रॅज्युएट झालेली, पण कधीही नोकरी न केलेली .आपल्या संसारात खुश असणारी. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडणारी, सासू-सासरे ,नणंदा यांचे कर्तव्य पार पाडणारी. घराच्या बाहेरच्या कामाचा तसा तिला फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या तिचा अनुभव कमीच होता .म्हणून समीरला तिची काळजी वाटायची. तो तिला तसे बरेचदा बोलून पण दाखवायचा “साधना थोडी बाहेरची कामे पण शिकून घे”पण ती त्याकडे दुर्लक्ष करत असे.
भविष्यकाळातील घडू शकणाऱ्या काही गोष्टींकरता आपण नेहमीच तयार असावे, मानसिकरित्या व आर्थिक रित्या. पण बरेचदा आपण हा विचार करत नाही.
तसेच काहीसे यांच्या बाबतीत घडले. संध्याकाळची वेळ होती साधना समीर ची वाट पाहत होती. त्यांना एका जेवणाचे आमंत्रण होते. समीर पण ऑफिस मधून लवकर निघाला.थोड्या वेळात साधनाला एक अनोळखी फोन आला की तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. दुचाकीवरून घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला होता व त्याला दवाखान्यात भरती केले होते.
साधनाला काहीही सुचेना तिने घरात सगळ्यांना याची कल्पना दिली व ती वेगाने दवाखान्यात निघाली. थोडेफार पैसे तिच्या जवळ होते ते घेऊन ती निघाली. तशी फारशी ती बाहेर जात नसे. त्यामुळे अवघडलेली साधना ऑटोरिक्षा करून निघाली. दवाखान्यात पोहोचल्यावर त्याची अवस्था पाहून ती खूपच घाबरली. काय करावे सुचेना.पण मन घट्ट करून तिने डॉक्टरांना विचारले “डॉक्टर समीर ठीक होईल ना”?डॉक्टर म्हणाले “मार खूप लागला आहे औषध उपचार सुरू आहे. आपल्याला एक ऑपरेशन करावे लागेल त्यानंतर बघू. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा”.
तिला समीरचे वाक्य आठवू लागले ,”की थोडी बाहेरची कामे शिकून घे”.आता तिने खूप हिम्मत दाखवली व पुढच्या प्रसंगांना नेटाने तोंड देण्याची तयारी केली. डॉक्टरांनी तिला ऑपरेशन साठी पैसे जमा करायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी ती बँकेत गेली व मॅनेजरला भेटून मदत करण्याची विनंती केली व त्यांच्या मदतीने तिने तिथे असलेली एफडी मोडली व पैसे जमा केले.थोडीफार मदत नातेवाईकांनी केली व ऑपरेशन पार पडले. त्यानंतर समीरची प्रकृती धोक्याबाहेर होती. पण आता पुढे काय हा प्रश्न तिला सतावत होता.
परमेश्वराने स्त्रीला नैसर्गिकरित्या सक्षम,प्रेमळ व हिम्मत न हारणारी असे बनवलेले आहे. त्याचा प्रत्यय तिला येऊ लागला. समीरच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला भरपूर विश्रांतीची गरज होती.तो खाजगी कंपनीत असल्यामुळे कंपनीने सहा महिने मदत केली पण त्यानंतर त्याला कामावरून कमी करण्यात आले.
साधनाने घर चालवण्यासाठी बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला व त्याचबरोबर हळूहळू छोटे उद्योग ती करू लागली, जसे की डबे बनवून दे, कुणाची लहान मुले सांभाळ .यामध्ये ती अनेक गोष्टी शिकत गेली ,की ज्या ती पूर्वी कधीही करत नसे.त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढू लागला .हळूहळू ती व्यावसायीकरण करायला शिकली.तिला हे सगळे शिकण्यात आनंद मिळत होता. समीर तिला मार्गदर्शन करत होता. एक वेगळीच साधना त्याला आता दिसत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक येऊ लागली.काहीतरी वेगळे केल्याचा आनंद तरळत होता.कुठल्याही गोष्टीत जम बसायला वेळ लागतो पण ती प्रयत्न करत होती.
स्त्री ला कुठलीही वेळ आली तरी ती त्या वेळेला प्रसंगानुरूप तोंड देते,याचे उत्तम उदाहरण साधनाने दाखवून दिले.दोन-तीन वर्षात तिने घर, बाहेर, मुले सगळे चांगले सांभाळून घेतले.समीरही ठीक होऊ लागला व नवीन कामावर जाऊ लागला.
दसऱ्याचा दिवस होता समीरने तिच्या साठी एक साडी विकत घेतली व घरी येऊन तिला सुखद धक्का दिला.
“साधना ही साडी नेसून दाखवा ना”तो म्हणाला,” इतके दिवस झाले,तू किती करते आहे सगळ्यांसाठी ,मला वाटायचे की तू कसं सांभाळशील हे सगळे , पण तू फार छान सांभाळले आहे, मला तुझा अभिमान वाटतो आहे.”
साधनाने त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले व म्हणाली “मी हे सगळे आपल्यासाठी केलेले आहे व आपल्या संसारासाठी केलेले आहे”. आणि ती साडी नेसून आली.
तिला बघितल्यावर समीरला नवदुर्गां चे दर्शन झाले व त्या तेजासमोर तो नतमस्तक झाला. स्त्रीचे सामर्थ्य त्याला कळून चुकले.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============