
निर्मलाबाई…नेहमीप्रमाणे आपलं काम आवरत होत्या…जसं काम चालू होत तसा आपल्या तोंडाचा पट्टाही चालूच होता त्यांचा…”काय ग बाया ….ह्यो…कामाचा पसारा…नकु..नकु होत..” इतक्यात शेजारच्या द्रौउपदाबाई आल्या तशा निर्मलाबाईंनी आपलं हातातलं काम उरकत घेतलं आणि आपलं मन त्यांच्याशी मोकळं करायला लागल्या..
द्रौपदाबाई – काय ग…निर्मले..का ग बडबड लावलीयस…आता सून येईल की हाताशी…
निर्मलाबाई – बाई ग…बाई…ती येईल..तंवर मलाच हाकाय नकु…संसाराचा गाडा..
द्रौपदाबाई – तुझ्या….हाताशी तर..सून नांदणं…कठीणच दिसताय…बग मला…एक तर त्वा…अशी..तोंडानं फटकळ…लईच कसरत दिसतिया…सुनेची…?
निर्मलाबाई – अय…धुरपे…काय बरळलीस…मपली सून काय ऐशी तैशी नाय हाय…चांगली हापिसर हाय…माज्या क्रीष्णाच तर नशीबच फळफळलं हाय….
द्रौपदाबाई – आग…निर्मले म्या…न्हाय बरळत….समदा…गाव बरळतोय..सुनचा निभाव लागायचा न्हाय तुह्या म्होरं
निर्मलाबाई – गावाचं कवतिक नग…सांगुस मला…मी चांगली का न्हाय….माही सुनच पघिल…मग कास दाताडवार पडलं कस….समद गाव अन त्वा बी…
द्रौपदाबाई – आग…निर्मले….म्या आपलं काळजीपोटी म्हटलं…नाव काय हाय…तुपल्या सुनच …
निर्मलाबाई – रुक्मिणी….रुक्मिणी…नाव हाय तीच…मपल्या..क्रिष्णाची…रुक्मिणी..!
द्रौपदाबाई – नाव बाकी…झकास…हाय पग…न्हय म्हटलं…क्रिष्णा असतोय…कुठं तुपला…
निर्मलाबाई – मपला…क्रिष्णा…असतोय बघ…एन्गनेईअर…का…काय..फारीनला असतुया…अन सुनालाबी तिकडंच न्हिणार हाय बघ त्यो…
द्रौपदाबाई – आग…बाया..बाया…तुला म्हयती तर हाय…का नीट नाव…न्हयतार…सुनच…केरसुणी करील बघ तुपली…
निर्मलाबाई – लई बोललीस…मपला…क्रिष्णा तर ..पुंडलिकाचं अवतार हाय…त्यो असं करणार न्हय…अन माही सूनही लई गुणाची हाय…आपण जीव लावला ना की रानची पाखर जवळ येत्यात… …लगीन तर म्होरल्या मासात हाय..आतापातुर यया पायजे ..व्हतं तेनी…अन तू काय थाम्बलीयास जा…की सुनेला हात लाव कामाला…
तेवढ्यात निर्मलाबाईचा मोबाईल फोन खणाणतो…आपल्या लेकाचा फोन आहे म्हणून अगदी आनंदून जातात बिचाऱ्या…निर्मलाबाईंना कळत की २ दिवसात आपलं लेकरू येणार आहे…तशा त्या लगबगीनं तयारीला लागतात…अगदी कमी वेळात करंजी,शंकरपाळी,साजूक तुपातले बेसन लाडू,सांजोऱ्या असे गोडा–धोडाचे पदार्थ त्या करून ठेवतात आणि आपल्या मुलाच्या येण्याची वाट पाहत बसतात अधून मधून आपल्या लेकाशी बोलतही असतात…
निर्मलाबाई – हॅलो…क्रिष्णा…कसा हायस र तू…?
क्रिष्णा – मी मस्त आहे ग…तू कशी आहेस…?
निर्मलाबाई – कधी तु…येशील र..मला…तुला लई डोळ भरून पाहायचं रं…
क्रिष्णा – आई…पण आपल्या नातेवाईकांत सांगितलंस ना तू…की माझा प्रेमविवाह आहे…तसंच रुक्मिणीच्या घरचे पण ह्या लग्नाविरुद्ध आहेत..
निर्मलाबाई – आरं..पोरा…त्या नातेवाईकांची ठसाळली तिरडी…सगळयांनी पाठ फिरीवली…तरी म्या…मपल्या पोराच्या अन सुनेच्या पाठी हुबी…ऱ्हानारच…भीती का काय कुणाच्या बापाला….तुज…ते कोरट मारीज का काय लावून दिती म्या…तू ये…हिकडं
क्रिष्णा – आई…मला माहितीय माझी आई कशी आहे ते…तुझ्या मुलाची पसंत काय अशी–तशी असणार का काय…
निर्मलाबाई – मायती…र माला…
क्रिष्णा – चल…ठेवतो…मीटिंग आहे आता…येतोय मी उद्या…तुझ्या रुक्मिणीला घेऊन..
निर्मलाबाई – हा…ठुते…ठुते ..ये र बाबा…
आपला लेक येणार म्हणून निर्मलाबाई सगळ्या गावाला आनंदाने सांगत सुटतात,खूप जंगी तयारी करायला लागतात,गोडाच्या जेवणाचा बेत आखतात,आपल्या लेकासाठी आरतीचं ताटही करून ठेवतात..सगळं गाव निर्मलाबाईंच्या दिमतीला हजर असत….. काही वेळातच क्रिष्णा आपल्या गावी येतो…निर्मलाबाई आरतीचं ताट घेऊन आपल्या लेकाला ओवाळतात,भाकर–तुकडाही ओवाळून टाकतात… तसा तडक आपलं मोर्चा रुक्मिणीच्या घरी नेतात ते रुक्मिणीच्या घरच्यांना समजवायला…
निर्मलाबाई – येवा का हामी…!
वत्सलाबाई – कस येन केलत..?
निर्मलाबाई – आव…गोष्ट..तशी जुनीच हाय…पण पटण्यासारखी हाय…
वत्सलाबाई – निर्मलाबाई…तुम्हाला चांगलंच ठाव हाय…मपल्या लेकीला अशी खाष्ट सासू नकोय…एक तर इथं हापिसर हाय माझी लेक…तुमच्या हाताखाली नको बाबा…
निर्मलाबाई – आग…बाया…हे रुक्मिणीलाच ठरू देत की…अन म्या काय…आज हाय नि उद्या नाय…पिकलं पान म्या…कवाबी गळून पडलाच की…पण महा ल्योक…फारीनला असतुया…लई जीव हाय त्याचा तुपल्या लेकीवर..अन तिचाबी…इचार तिलाच [इतक्यता वत्सलाबाई आपल्या लेकीला म्हणजे रुक्मिणीला बोलवतात]
वत्सलाबाई – रुक्मीने… आग… रुक्मीने.. भाईर यि…
रुक्मिण – काय ग आई…अन हे काय आत्याबाई केव्हा आलात…[पाय पडते]
निर्मलाबाई – तुला माझा लेक पटतो न्हवं…[रुक्मिणी खालीच पाहते]
वत्सलाबाई – आग…काय इचारतात त्या…बोल की घडाघडा..जमीन काय पघतीयास…
निर्मलाबाई – आग…वत्सले…पोरीचं मन वळख की…म्या आय नसून वळीखते इच मन…अन अशी खेकसतीस कामून…तुला महा लेक पटत असल…तर चल..लगीच लगीन लावतु पग म्या…
रुक्मिणी – आत्याबाई…पण माला खूप नाव कमवायचं आहे अजून..तुमच्या लेकाच्या तोलामोलाची व्हायचंय मला..त्यासाठी खूप वेळ लागेल..
निर्मलाबाई – आग…सोने…लगीन झाल्यावर बघू की…म्या काय आडकाठी घालीन का तुला…
रुक्मिणी – ठीक आहे तर मग…चला…
असे म्हणून रुक्मिणी आपल्या सासूसोबत उभी राहते…हे पाहून वत्सलाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात जाते…तसे आमच्याशी असलेले नाते तुला तोडावे लागेल असा सज्जड दम रुक्मिणीला तिचे वडील हंबीरराव देतात ..रुक्मिणी परत मागे न पाहता आपल्या संसाराला लागते आणि कृष्णासोबत लग्नाची गाठ बांधते…जवळच्याच ठिकाणी कोर्ट मॅरेज उरकून दोघेही सुखी संसारात गृहप्रवेश करतात…निर्मलाबाई आपल्या सुनेची मीठ मोहरीने दृष्ट काढतात…प्रत्येक कार्यक्रम करताना रुक्मिणीचा विचार प्रामुख्याने घेतात…लग्न होऊन फक्त जेमतेम महिनाच झाला तसं निर्मलाबाई आपल्या सुनेला तिच्या पुढच्या प्रवासाबद्दल स्वतःची काही मत सांगत असतात…दुपारची वेळ असते–
रुक्मिणी – आत्याबाई…चहा ठेऊ का थोडासा…म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक करायला…उत्साह येईल..
निर्मलाबाई – आग..इचारतीयास काय…ठेव की…आधण ठिव…अन ये हिकडं बस…मला बोलायचं हाय…
रुक्मिणी – आलेच हा…आत्याबाई..! [टपकन चहा ठेऊन रुक्मिणी पडवीत आपल्या सासूबरोबर बोलण्यासाठी येते]
निर्मलाबाई – आग…रुक्मीने..पुढचं काय ठरिवलस…आत्ता…काय शिकलीयास तू…
रुक्मिणी – आत्याबाई…मी इंजिनीरिंग केलंय आणि ते हि केमिकल मधून…
निर्मलाबाई – अन ती म्हंजी काय ग…
रुक्मिणी – आत्याबाई…सांगते…म्हणजे मी रसायनांवरती अभ्यास केला आहे…म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर…आपले हे खत असतात की नाही ते बनवण्याचं काम…म्हणजे ते कसे बनवतात..बनवण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते तसं…
निर्मलाबाई – अन…परक्रिया म्हजी…काय असतंय ती..?
रूक्मिणी – आत्याबाई…म्हणजे आपण स्वयंपाक करतो की नाही…त्यासाठी कसं आपण..मसाले दळून आणतो..नीट वाटण वाटतो..मग त्याची फोडणी करतो…अगदी त्यालाच प्रक्रिया म्हणतात..
निर्मलाबाई – मग…पुढच्या शाळेची तयारी कर की…आपल्या गावाला तेचा फायदाच हुईल की…
रुक्मिणी – [हसून] आत्याबाई…शाळा नाही ओ…पुढची डिग्री म्हणा..
निर्मलाबाई – हा…बाई तेच…कर की तू तसं..
रुक्मिणी – आत्याबाई…आता होणार का माझ्याच्यानी…एक तर…इथली सगळी जबाबदारी तुमच्यावर येईन…तुमचं आता आरामच वय…त्यात इथला भार कसा तुमच्या एकटीवर टाकू मी…लोक काय म्हणतील ते वेगळंच…
निर्मलाबाई – अय….बाय माझे…त्या लोकांची ठासळली तिरडी…कोण काय म्हंतु…पाहतेच मी…अन त्यांना कसं सांगायचं ते मी बघते…इथली चिंता करू नगस..म्या हाय खमकी सगळं कराया…अन हे रांधा,वाढा,उष्टी काढा,सारवन करा लिंपण करा हे करून काय नाय मिळत बग बाईच्या जातीला…तू असं माझ्या सारखं…ऱ्हाऊ नाय असं मला वाटत…ऐकशील ना माझं…
रुक्मिणी – व्हय आत्याबाई…करील मी तुमच्या मनासारखं…मग झालं…
निर्मलाबाई – हा…आन…ही साडी नेसली न्ह्यास ना…तरी चाललं मला…डिरेस कवाच आणून ठुलेत मी…
रुक्मिणी – आत्याबाई…खरंच…वाटलं नव्हतं…तुम्ही इतक्या नव्या विचारांच्या आहेत असं…
निर्मलाबाई – मग…जग कुठं चाललंय..अन आपण कुठं आहोत..आपल्या बाईच्या जातीनं कसं..सगळ्याबाजून इचार केला पाहिजे…आपण जर बाईला पुढं जाण्यापासून रोखत आलोत…मग कशा बायका पुढं जातील..याची सुरवात आपल्याच कडून झाली पाहिजेल ना..
रुक्मिणी – अगदी बरोबर…मी आजच यांच्याशी बोलते अन माझ्या पुढच्या डिग्री बद्दल सांगते…
निर्मलाबाई – काहीही कर…पण हित…रांधा,वाढा,उष्टी काढा…अशात अडकू नगस..तू एकतर शिकलेली हाय अन सरकारी कचेरीत नोकरीबी करती…तुझ्यात धम्मक हाय…मग तेच कर जे म्या सांगती हाय…तू शिक अन लई मोठी हो…
आपल्या सासूबाईंच्या बोलण्याने रुक्मिणीला खूप आधार वाटतो…एक स्फुरण चढल्यासारखं वाटत..तसं लगेच आपल्या नवऱ्याला आपल्या सासूबाईंचा मनसुबा सांगते…तसं कृष्णालाही आपल्या आईच म्हणणं पटत…पुढचं शिक्षण अमेरिकेत करायचं असं कृष्णा लगेच ठरवतोही…आपलं मत आपल्या बायकोला आणि आईला सांगतो लगेचच निर्मलाबाईही आपल्या मुलाच्या मताला सहमती दर्शवतात व आपल्या सुनेला अमेरिकेला जाण्याची तयारी करायला सांगतात निर्मलाबाईंचा पासपोर्ट आणि व्हिसा तयार नसल्याने त्यांना निघता येत नाही…रुक्मिणीचा पासपोर्ट तयार असल्याने तिला जास्त प्रॉब्लेम येत नाही.साधारण महिन्याभराने रुक्मिणीला अमेरिकेत पुढच्या शिक्षणासाठी जायचं ठरलेलं असत…जाण्याआधीच दोघी सासू-सुनांची मस्त गट्टी जमली होती…
रुक्मिणी – आत्याबाई…अहो…राहू द्यात की काम बाजूला…गडी आहेत ना कामाला…
निर्मलाबाई – अग…बाई…तू म्होरल्या महिन्यात जाशील परदेशी…मग मला कोण हाय सोबत…हे कामचं असल माझ्या सोबतीला…
रुक्मिणी – खरं…सांगू..माझा काय इथून पाय निघत नाही हा…पण हा पासपोर्ट तयार व्हायला जरा वेळ लागतो मग तुम्हीही येऊ शकता…माझ्याबरोबर भरपूर काही शिकण्यासारखं असत तिकडं…याला ना ?
निर्मलाबाई – व्हय…ग बाई..येईल मी…तू आपलं नाव कमव तुझं…,माझं काय बाय…म्या आज हाय…तर उंद्या नाय..
म्हणता-म्हणता अमेरिकेतल्या एका मोठ्या विद्यापीठात कृष्णाने रुक्मिणीचं ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन करूनच ठेवलं होतं रुक्मिनी…निघायच्या दिवशी आपल्या सासूच्या गळ्यात पडून खूप रडली…हसऱ्या चेहऱ्याने सासूबाईंचा निरोप घेतला….दुसरीकडे सगळं गाव नवल करत होत…‘एवढी कजाग सासू कशी काय बदलली‘..पाहता-पाहता बातमी रुक्मिणीच्या आई-वडिलांपर्यंत पोचते…मग मात्र वत्सलाबाईंना आपल्या लेकीच्या निर्णयाचं कौतुक वाटायला लागत..पण आपल्या लेकीला आपण आधीच तोडून टाकलं ही सल वत्सलाबाईंना सारखी-सारखी बोचत असते..
बघता-बघता दिवस सरत होते आपल्या सुनेशी मस्त संभाषण निर्मलाबाईंचं चालूच होत…एम.टेक. ही पूर्ण झालं…शिवाय रुक्मिणी खूप चांगल्या ग्रेड ने उत्तीर्णही झाली…अशा आपल्या खुशालीतून प्रत्येक गोष्ट सासूबाईंच्या कानावर घालत होती…मग तिथल्याच विद्यापीठातिल कॅम्पस मधून रुक्मिणीला चांगल्या पगाराची नोकरीही लागली…मग मात्र रुक्मिणीने आपल्या सासूबाईंना अमेरिकेत आणण्याचा निर्णय घेतला तशी सगळी तजवीज रुक्मिणीने अगदी व्यवस्थित करून ठेवली होती… म्हणजे पासपोर्ट,व्हिसा या सगळ्याची तयारी,शिवाय सासूबाईंसाठी ड्रेसही घेऊन ठेवले होते,त्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टीची तयारी आधीपासूनच करून ठेवली होती… ..ठरल्याप्रमाणे सासूबाईंशी अमेरिकेला येण्याबद्दल बोलणंही झालं…खूप विनवणी करून रुक्मिणीने कृष्णाची परवानगीही काढली…आणि सज्ज झाली आपल्या सासूबाईंना भारतातून अमेरिकेत आणण्यासाठी…. दोन दिवसात रुक्मिणी आपल्या सासूबाईंना घ्यायला भारतात आली…व लगेच अमेरिकेला जाण्याचं ठरवलं कारण रजा मोठ्या मुश्किलीने मिळाली असल्याने मुक्कामी थांबण्याचा प्रश्न नव्हता…तशी सासूबाईंची केविलवाणी नकारघंटा चालूच होती-
निर्मलाबाई – अगं…रुक्मिणी…माझं काय काम तिकडं त्या परदेशात…अन तिथं कोण हाय..आपलं..?
रुक्मिणी – कोण नाही कसं..? आम्ही आहोत…तुम्हीही चला…तुमच्या सुनेनं कमावलेलं यश पहा…माझं नाही तर तुमच्या लेकाचं तरी वैभव पहा…
निर्मलाबाई – ते ग कसलं वैभव…खरं वैभव इथं हाय…मला बाई दगडमातीन सारवलेलं घर आवडत…ते सिमेंटच जंगल नको ग बाई….
रुक्मिणी – काय हे…आत्याबाई…तुमची इच्छा मी नाही का पूर्ण केली…आत्ता तुमची पाळी तुमच्या सुनेची एवढी
इच्छा पूर्ण नाही करणार…आत्याबाई तुमचे आशीर्वाद किती फळाला आलेत हे तुम्ही पहा ना तिकडे येऊन…तुम्हाला तिथे काहीही काम करावं लागणार नाही…सगळी सोय आहे तिथं…फक्त तुमची कमी आहे…
निर्मलाबाई – कामाचं काय बाई…इथं काम होत म्हणून तर राहिले…अन तिथली भाषा कोण शिकिवणार मला..
रुक्मिणी – आत्याबाई…मी असताना काळजी कसली करताय..मी शिकवेन की..बोलण्यापुरती..तुम्ही चला तर..
निर्मलाबाई – ठीके ..आवराव लागलं..दोन दिसांनी निघायचं ना आपल्याला…
रुक्मिणी – हम्म…इथली सगळी काम पाहण्यासाठी मी एका माणसाला नेमवलंय…हरी काका आत या…[वय जेमतेम 40 च्या आसपास]
निर्मलाबाई – अगं…पण तो करेल का सगळं इकडचं..
रुक्मिणी – आत्याबाई…तुम्ही निश्चिन्त राहा…काकांना खूप वर्षांचा अनुभव आहे या सगळ्या कामाचा…
हरी – व्हय…मालकीणबाई…सगळा हिशोब मी तुम्हाला देत जाईल…अगदी दूध काढण्यापासून ते दारं धरण्यापर्यंत अशी सगळी काम मला जमतात…तुम्ही बिनघोर राहा…
निर्मलाबाई – [स्मितहास्य करत] वाह…सुनबाई आता मी यायला तयार आहे…इथली काम मार्गी लागली ते एक चांगलं झालं बघ…
दोन दिवसांनी सासू-सुना अमेरिकेला जाण्यासाठी निघतात…अमेरिकेत पोहचल्यानंतर निर्मलाबाई फक्त ‘आ‘ वासून पाहत राहतात…कारण पहिल्यांदाच एवढ्या उंचच-उंच इमारती पाहून त्यांचे डोळे गर-गर फिरतात,सगळीकडं टापटीप पाहून आपल्या सुनेला म्हणतात…
निर्मलाबाई – आपल्या इकडं अशी टापटीप असती का ग..?[हसून]
रुक्मिणी – नाही..ओ…इकडं कुणाला कोणत्याही कामाची लाज वाटत नाही..कुणीही मिळेल ती काम करतात…
निर्मलाबाई – अग्ग…बाई आपल्या इकडं तर…रखवालदारही साहेब असल्यासारखा वागतो…अगं…अगं…हे काय आलं मधेच…
रुक्मिणी – आत्याबाई…काही नाहीय ते असच करमणुकीसाठी रस्त्यावर वेगळे वेगळे खेळ दाखवतात…
घरी पोहचल्यानंतर…रुक्मिणी लगबगीनं आपलं सगळं काम आवरते…सासूबाईंना काहीच काम करू देत नाही…दोन दिवसांनी रुक्मिणीचे ऑफिस असते म्ह्णून आपलं काम आवरायचं सपाटा चाललेला असतो…आपल्या सासूबाईंचा वेळ घर बसल्या बसल्या जावा म्हणून भक्तिगीतांची कॅसेट सुनबाई लावून ठेवत असत…तसेच टीव्ही कसा चालू करायचा ?,कसा बंद करायचा? हे माहिती करून दिलं,एकूण घरातल्या प्रत्येक गोष्टी कशा हाताळायच्या याची सगळी माहिती रुक्मिणी सांगून ठेवते…सासूबाई आल्यानंतर ८ दिवस होऊन जातात तशा बोलक्या स्वभावाच्या असल्याने सासूबाईंना रुळायला जास्त वेळ लागत नाही…हे पाहून रुक्मिणीला खूप आनंद होतो…कारण नव्या जागेत असल्याने सुरवातीला समजून घेणं प्रत्येकाला अवघड होत पण आपल्या सासूबाईंचा उत्साह पाहून कृष्णाला विशेष आनंद होतो…आणि त्याची खात्री पटते की आपली आई काहीही करू शकते…म्हणून हळू हळू रुक्मिणी सासूबाईंना थोडं थोडं इंग्लिश शिकवू लागते…सासूबाईंचं शिक्षण जेम-तेम असल्याने त्यांना फक्त इंग्रजी शब्दांची ओळख होती…म्हणून ६ महिन्यात तात्पुरतं इंग्लिश बोलता येईल एवढं सुनेनं शिकवलं…हळू-हळू रुक्मिणीने आपल्या सासूबाईंना स्मार्ट फोन कसा हाताळायचा हे शिकवलं कारण गावी असताना फोन आल्यावर कसा उचलायचा,कसा बंद करायचा या पलीकडे काही त्यांना फोनविषयी माहिती नव्हती…ऑनलाईन चॅटिंग,फेसबुक,व्हाट्सअँप कसं वापरायचं,इंटरनेट कसं वापरायचं हेही शिकवलं..
काही दिवसांनी घराशी ओळख झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी त्यांची ओळख करून द्यायचं ठरवलं…मग रुक्मिणी आपल्या सासूबाईंना भाजी आणायला कसं जायचं ,मॉल मध्ये वस्तू कशा घ्यायच्या याची माहिती देऊ लागली, आणि सासूबाई अत्यंत आवडीने ही काम करत असत त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नव्हता… भाज्यांविषयी जास्त माहिती असल्याने तिकडच्या भाजीवाल्या काकांशीही खूप छान गट्टी जमलेली त्यांची हळू-हळू अमेरिकेतल्या वातावरणाशी त्यांची मस्त गट्टी जमली…
आपल्या सुनेकडून नव-नवीन गोष्टी शिकून घेण्यात निर्मलाबाईंना कसलाही कमीपणा वाटत नसे त्याचप्रमाणे रुक्मिनीही अगदी न कंटाळता सांगत असे…काही दिवसांनी रुक्मिणीचं प्रोमोशनही झालं,त्याकरता आपल्या ऑफिसमधील सहकारी घरी बोलावण्याचं रुक्मिणीने ठरवलं…जेवणाचा खास बेत आखला गेला होता..आपल्या सासूबाईंच्या आवडी-निवडी लक्षात ठेऊन अगदी मराठमोळ्या शैलीच जेवण देण्याचं रुक्मिणीने ठरवले होते…आपल्या सासूबाईंनाही रुक्मिणीने मस्तपैकी तयार केलं…केशरी रंगाची नऊवारी…गळ्यात बोरमाळ अशा साध्या वेषातही निर्मलाबाई खुलून दिसत होत्या…कार्यक्रमाच्या शेवटी रुक्मिणीला, ‘यशाचं श्रेय कुणाला द्याल ?’ असा प्रश्न विचारण्यात आला तर रुक्मिणीने आपलं मनोगत संपूर्ण मराठीतून व्यक्त केलं…
”माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आत्याबाईंना म्हणजेच माझ्या सासूबाईंना देतीय कारण मला शिकवण्यापासून ते मला नोकरी लागेपर्यंत त्या माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या राहिल्या अगदी माझ्या आई-वडिलांनीही माझ्या या लग्नाला नकार दर्शवला होता पण आत्याबाईंच्या खंबीर स्वभावामुळे ते शक्य झालं…माझ्या सासूबाई जरी नऊवार साडी नेसत असल्या तरी त्यांचे विचार एकदम नवे आहेत…बाईने स्वतः आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे फक्त रांधा,वाढा आणि उष्टी काढा हे बाईचं जग नसत त्यापलीकडेही काहीतरी जग असत हे मला माझ्याच सासूबाईंनी पटवून दिलंय म्हणून मला माझ्या सासूबाईंचा खूप गर्व आहे….अशा सासवा जर मुलींना मिळाल्या ना तर त्यांच्या आयुष्याचं सोन झाल्याशिवाय राहणार नाही…माझं आयुष्य आज खऱ्या अर्थाने सोन्याने उजळून निघालाय…थँक्स अलोट..” असे म्हणून रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि सगळं घर टाळ्यांनी दुमदुमून गेलं…
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.
1 Comment
excedgetE
lasix McGraw Hill, New York