नातीगोती

©️®️ गीता गजानन गरुड.
नुकताच खळा करुन माटव घातला होता. त्या माटवातून गळालेल्या सुर्यकिरणांची छानशी नक्षी खळाभर पसरली होती. काजीच्या सावलीत शिवाचे बैल रवंथ करत बसले होते.
शिवा तसा गावचा,मुंबयचा दोन्हीकडचा..म्हणजे दहावीपर्यंत गावातल्या शाळेत शिक्षण झालं नि मामाने त्याला लालबागला बोलावून घेतलं. एका टीचभर खोलीत मामाच्या पोरांसोबत राहू लागला. नोकरी शोधू लागला.
कुणा डॉक्टरकडे तो कंपांऊंडर म्हणून चिकटला. लालन डॉक्टर..हाडाचा डॉक्टर होता. माणुसकी होती त्याला. रात्री अकरापर्यंत दवाखान्यात ही गर्दी असायची. शिवबा पेशंटची नावं लिहून घ्यायचा. पेशंटने आणलेल्या बाटलीत लाल औषध ओतायचा. डॉक्टर पुकारतील तशा भराभरा गोळ्या प्रत्येक डब्यातून काढून पेशंटला सकाळ,दुपार,संध्याकाळ किती व कोणत्या घ्यायच्या त्या नीट समजेपर्यंत दाखवायचा.
आईसोबत वासंती यायची..भरल्या अंगाची,गोरीगोमटी,परकरपोलक्यात असायची नेहमी. मोठ्यामोठ्या फुलांच्या कापडाचं परकर पोलकं वासंतीला शोभून दिसायचं. तिची आई कोणत्या टेलरकडे काजबटणं करायला जायची. वासंतीचा पुनवेच्या चंद्रासारखा गोल चेहरा,डोळ्यातले मिश्कील भाव..तरुण शिवाच्या मनात तिच्याबद्दल ओली जाणीव निर्माण होऊ लागली. कित्येकदा तिने खिडकीतनं आत गोळ्या घेण्यासाठी डोकावलं की तिचा रंगीबेरंगी बांगड्यांनी भरलेला गोरापान हात शिवाला धरावासा वाटायचा.
वासंतीच्या मनातही शिवाबद्दल प्रेम जाग्रुत झालं. शिवा काही विचारायला धजत नाही आणि आपली आई कोणाच्याही सोबत आपलं लग्न लावून मोकळी होईल या धास्तीने तिने डॉक्टरांशीच बोलायचं ठरवलं.
एके दिवशी सकाळीच दवाखान्याजवळ येऊन उभी राहिली. शिवा सायकलवर येत होता. वासंतीला दारात पहाताच..इतक्या लवकरशी..तब्येत बरी नाही की काय..जीभेवर आलेले प्रश्न त्याने घशात लोटले नि दवाखान्याची दारं उघडली. कचरा काढून दवाखाना झळझळीत केला. दोघांनाही एकमेकांशी भरभरुन बोलायचं होतं पण..सुरुवात कोणी करायची!
इतक्यात डॉक्टरांच्या गाडीचा आवाज आला. वासंती बाकड्यावर जाऊन बसली. शिवाने तिचं नाव वहीत लिहिलं. वासंती आत जाऊन खुर्चीवर बसली. डॉक्टर तिला पहाताच म्हणाले,”काय वासंती आज तू..आई कुठाय? का तुच पेशंट.”
“तसं न्हाई डॉक्टर. आज जरा स्पष्टच बोलायचंय तुमच्याशी.”
“काही प्रोब्लेम आहे का! निसंकोच बोल. मी आहे ना. अगं डॉक्टरांना सगळं मनमोकळेपणे सांगायचं असतं बाळा. दुखणंच नाही कळलं तर औषध कसं करणार!”
“दुखणं यांना विचारा की.” वासंतीने शिवाकडे बोट दाखवलं तसा शिवा चपापला.
“नीट सांग बरं मला नेमकं काय झालंय ते. शिवाने काही त्रास दिला का तुला?”
“डॉक्टर, ते काहीच करत नैत हीच तर गोमय. आता बघा,माझी आई माझ्यासाठी स्थळं बघतेय.”
“अगं मग यात माझ्या शिवाचा काय संबंध?”
“ते आवडतात मला. त्यांनाबी मी आवडते.” वासंती मान खाली घालून बोलून गेली.
लालन डॉक्टर गडगडाटी हसले. “यासाठी पण औषध आहे बरं माझ्याकडे.” असं म्हणत त्यांनी शिवाला जवळ बोलावलं.
“शिवा,ही वासंती म्हणतेय ते खरं आहे का?”
“नाय तसं होय तसं नाय डॉक्टर..” शिवाची फजिती पाहून डॉक्टर हसू लागले..म्हणाले..काही काळजी करु नका. मी तुमच्या आईवडिलांशी बोलतो नि तुमचं लग्न जुळवून देतो.”
“डॉक्टर.. यंदा लग्न करता नाही येणार मला. ते मामाच्या घरात रहातो ना. हिला कुठे ठेवणार!” शिवा चाचरत म्हणाला.
“मी खोलीचंही बघतो बरं. एकमेकांशी बोला आता. लाजू नका. मी जरा चहा पिऊन येतो.” असं म्हणत डॉक्टर बाहेर गेले नि शिवाने वासंतीकडे पाहिलं. तिच्याजवळ जायचंही धैर्य होईना त्याला. वासंतीच पुढे झाली. त्याच्या हातातली घडी बाजूला करुन त्याच्या मिठीत सामावली. शिवबाचे दोन्ही हात आपसूक तिच्या पाठीभोवती वेढले गेले. दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रु वाहात होते.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोघांच्याही पालकांची भेट घेतली. लग्नाचा छोटेखानी सोहळा संपन्न झाला. लग्नाला शिवाच्या भावाचं बिर्हाड व आई,मामाचं कुटुंब, चाळकरी उपस्थित होते.
दवाखान्याच्या मागील बाजूच्या चाळीत हे राघूमैनेचं जोडपं राहू लागलं. दोन वर्षात दोन गोरेगुटगुटीत पोरगे झाले. वासंती आई झाली. पहाटे उठल्यापासनं निजेपर्यतचा वेळ हा या दोन लवकुशात जाऊ लागला. बघताबघता दोघे शाळेत जाऊ लागले. डॉक्टरांची मेहेरनजर कुटुंबावर कायम होती. लवकुश त्यांना आजोबा म्हणायचे. दोघं शिकलेसवरले. नोकरीला लागले. त्यांनीच त्यांच्यासाठी बायका पसंत केल्या. लोन काढून घरं घेतली.
लालन डॉक्टर एकाएकी गेले नि शिवाचं काम बंद पडलं. तशी डॉक्टरांनी त्याच्या नावाने नियमित काही रक्कम ठेवलेली ती त्यांच्या पत्नीने शिवाला दिली.
शिवाचं मन आता कशात लागेना. त्या दवाखान्याच्या जागेत न्हाव्याने दुकान थाटलं. शिवाचे पाय सारखे दवाखान्याजवळ वळायचे. गोळ्या,औषधं द्यायला हात शिवशिवायचे त्याचे. मनात त्याच्या तो दवाखाना कायम होता नि रात्रीअपरात्री तो एक नं.जावडेकर, दोन नं. बेलवलकर..चला आत चला..चपला बाहेर काढा बाहेर..जावडेकर..बाटली द्या औषधाची..ह्या गोळ्या..ही बारकी पांढरी..दिवसातून दोनदा. हिरवी,गुलाबी नि पांढरी अर्धी..सकाळ,दुपार,संध्याकाळ..चला निवाते चला ..उद्या दवाखाना बंद..असं बरळू लागला तसा वासंतीच्या मनाचा ठोका चुकला.
शिवा सकाळी उठला की दुकानाच्या पायरीवर जाऊन बसायचा. वासंती कसंबसं त्याला जेवायच्या टायमाला घेऊन यायची. शेवटी वासंती मुलांना बोलली,”मी यांना घेऊन गावी जाते.” दोघातला एकही मुलगा नाही म्हणाला नाही. सुना तर परक्याचा. वासंतीने गपचूप आवंढा गिळला. दोघांची कापडं भरली नि एसटीत बसली. गावी आली. तशी ती दरवर्षाला गावी यायचीच. गणपतीत,ग्रीष्मात..मुलांना गावची ओढ असावी म्हणून वर्षभर गाठीला पैसे साठवून दिराला,सासूला कापडं,खाऊचं सामान,डाळी,कडधान्य घेऊन जायची.
तिथे गेल्यावर येईपर्यंतचा सगळा खर्च करायची. दर महिन्याची मनी ऑर्डर गावाकडे असायचीच.पण आताची परिस्थिती वेगळी होती. चार दिवस दिर,भावजय बरेसे बोलले नि नंतर वेगळी चूल लावा म्हणू लागले. भावजय क्षुल्लक कारणांवरुन भांडू लागली.
गावात राहिलेल्या भावजयीसारखी पटाटा कामं वासंतीच्याने होत नव्हती. शिवाय नवऱ्याच्या तब्येतीच्या विचारांचा भुंगा तिचं डोकं खुरपत होता. चार वर्षांपुर्वी देवाघरी गेलेल्या सासूची तिला आठवण यायची. तिचे डोळे पाण्याने भरुन यायचे. पतेरा भरायचा,कोपऱ्यात टाकायचा,कोपरे भाजायचे, शेणी थापायच्या,घराभोवतीची कामं..ही करण्यात वासंती कमी पडू लागली नि तिला मुंबयची सायबीन..आयता गिळाक व्हया..असं बोलून भावजय तिचं मन दुखवू लागली.
शिवाचा लहानपणीचा मित्र जनार्दन शिवाकडे आला. शिवाच्या वैनीचं सुटलेलं तोंड ऐकून त्याला फार वाईट वाटलं. शिवाची अवस्था बघवत नव्हती. दाढी वाढून तिचा जणू मोरी घासायचा पांढरा ब्रश झाला होता. नजर भकास. वासंती पाणी घेऊन आली तशी जनार्दन वासंतीला म्हणाला..थोडे दिस मांगरात र्हवा. ही बाय जगाक देवची नाय. नायतर माझ्या घराक येशात(याल का?) पन मंग तर ही घोबायल(नवराबायको) समद्या जागेर हक दाखवतीत. जागा सोडू नकोसा. घर त्यांचा नसला तरी रोज उठून भांडन्यापरीस मांगरात थाटा सौंसार. झ्याक घर बांधुया.
वासंती म्हणाली,”भावजींनू,सगळा काय ता खरा पन पैको(पैसा)..”
जनार्दन म्हणाला,”वैनी,दोन झील(मुलगे) आसत तुजे नि पैक्याची कित्याक काळजी करतहस तुया!”
त्यावर वासंती म्हणाली,”ता सगळा खरा ओ भावजींनू,पन पोरांनीव घरा घेतलीहत. तेंचेपाठीव कर्जाचो बोजो असा.”
“मिया समजावतय तेंका. हयसर(इथे) घर बांधाक ढीगभर पैको(पैसा) नाय लागुचो. मजूर,गवंडी आपलेच हत. स्वस्तात करुन घेवया कामा. नि काय कमीअधिक लागलाच तर मिया(मी) आसय ना. वाऱ्यार सोडुचय नाय माज्या मित्राक. जीवाभावाचो मैतर(मित्र) असा माजो.”
वासंती म्हणाली,”भावजींनू,इतक्या बोललात..मॉप(खूप) झाला. आता माका हुसको नाय. करुक लागा तुमी बोलनी.”
वासंतीकडे थोडीबहुत रक्कम होतीच. नवीन भातुकली आणली नि म्हाताराम्हातारीचा संसार सुरु झाला. कधी मांगरात ठेवलेल्या लाकडातनी जनावर लपून बसे तर कधी फुटक्या नळ्यांतून पाणी गळून शेणाची जमीन ओली बरबरीत होई.
जनार्दन स्वतः मुंबईला गेला. दोन्ही भावांशी (लवकुश) अगदी पोटतिडकीने बोलला. जनार्दन काकाच्या अंगाखांद्यावर लवकुश लहानपणी खेळले होते. गावी गेले की जनार्दन काका त्यांना सिनेमा दाखवायचा. रानात फिरायला न्यायचा. त्याना कोंबडीचा मटान नि घावणे करुन घालायचा. जनार्दन काकाचं म्हणणं लवकुशला पटलं. दोघांनीही जनार्दनच्या हाती घर बांधण्यासाठी रक्कम सुपूर्द केली.
शेतावरल्या फाळीत भूमिपूजन झालं नि घर आकार घेऊ लागलं. भावजयीचे टोमणे वासंती गुपचुप सहन करत होती. जनार्दनही घराच्या कामाला येऊ लागला. तो शिवाशी सतत बोलत रहायचा. संध्याकाळचा त्याला शेतातनं फिरवून आणायचा.
घर बांधून झालं तसं दोन्ही मुलं लवकुश आपापल्या बायकांना घेऊन आले. थाटामाटात घरप्रवेश केला.
आईवडिलांना वाईट वागणूक दिल्याने लवकुशला काकाकाकूचा राग आला होता. कुशच्या कपाळावरली शीर ताडताड उडत होती.
“काकानू,घर वाडवडिलांचा हुता मगे आमची आवसबापूस रवाक इली तर ह्यांका डोंगळो कित्याक डसलो! मिया जाऊन इचारतयच. आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतय.” असो म्हणत तो काकाच्या घरादिशेने चालू लागणार इतक्यात जनार्दनने त्याला अडवलं.”कुशा,कितीव झाला तरी चुलतो असा तो तुजो. मोठ्यांचा चुकला तरी मोठ्यांका मान देवकच व्हयो.”
“आवो पन काकांनू, हे सगळाच गळपाटतीत नि आमी निसता बगीत रव्हाचा. कित्या तर ही जाणती! आमच्या आवशीबापाशीक पायताणाची किमत दिल्यानी नाय. नवो सोंसार थाटूक लावल्यानी.”लव म्हणाला.
“पोरांनो,तुमचा सगळा बरुबर हा पन असो डोसक्यात राग घेवन उपेग नाय. दमान घेऊक व्हया. सांगतय तसा करुक लागा.”
जनार्दनने काही नेक गोष्टी त्यांच्या कानी घातल्या. जमीन ताब्यात घ्या म्हणाला,कसू लागा. बैलजोडी घ्या. भगवतीच्या क्रुपेने पोरं तयार झाली.
आठवड्याच्या बाजारातून लाल्या नि ढवळ्याची जोडी विकत आणली. गोठा बांधला. या दोन मुक्या जीवांनी शिवाला खऱ्या अर्थाने माणसात आणलं. लाल्या,ढवळ्याला चरायला घेऊन जाणं,गोठा साफ करणं,त्यांना पाणी दाखवणं यात त्याचा वेळ सार्थकी जाऊ लागला.
मिरगाच्या पहिल्या पावसाने जमीन न्हातीधुती झाली. शिवाने बियाणं विकत घेतलं.सुताराकडून शेतीसाठी लागणारी जू,नांगर,गुटा..अशी अवजारं करुन घेतली. शेतात शिवाचा नांगर फिरु लागला. पर्जन्यराजानेही साथ दिली. शिवा व वासंतीने जीवतोड मेहनत केली. जनार्दन व त्याच्या बायकोचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. रात्रीचे गेसबत्ती घेऊन जनार्दन व शिवा कुर्ल्या पकडायला जाऊ लागले. वासंती परसवात उगवणाऱ्या अळवाची,पेवग्याची भाजी बनवू लागली.
आजुबाजूच्या शेजाऱ्यांनीही शिवाला शेतीच्या कामात मदत केली. मजुरी घेऊन का होईना पण हाकेला धावून आली.
एवढं सगळं होऊनही गणपती मात्र जुन्या घरातच बसवला. गणपती वेगळा करायचा नाही हा शिवाचा विचार गावकऱ्यांना आवडला. अकरा दिवस दोन्ही घरातली माणसा एकत्र जेवली. शिवाचा थोरला मुलगा लव त्याचं बिर्हाड घेऊन आला. गणपती विसर्जनापर्यंत होता.
शेतात भाताच्या लोंब्या डोलू लागल्या. शिवाचा धाकटा मुलगाही कापणीला दहा दिवस रजा काढून आला. भात झोडून गिरणीला लावून आणलं. नवीन भाताच्या पोह्यांत गुळ दूध घालून चावदिवसाला(दिवाळीचा पहिला दिवस) देवाला नैवद्य दाखवला.
खऱ्या अर्थाने शिवा आता शेतकरी झाला. मुक्या प्राण्यांच्या सहवासात राहून,त्यांची मनस्वी सेवा करुन,जनार्दनसारख्या मित्रांच्या सोबतीने शिवाची मानसिक स्थिती सुधारली. भाऊ,भावजयही आधी त्यांच्यात काही झालंच नव्हतं असे मधासारखे गोड बोलू लागले.
शेतीची काम संपली तशी बैलांना विश्रांती मिळाली. लहान बाळासारखं टुकुटुकु शिवा आपल्या बैलजोडीकडे बघत होता आणि आपला घरमालक सावरतोय हे बघून वासंती आई भगवतीला मनोमन दंडवत घालत होती.
इतक्यात जुन्या घराकडून मोठ्याने आरड एऐकू आली,”धावा धावा..बेगिन येवा.” शिवा नि वासंती धावत गेली. बघतात तर काय,शिवाच्या भावाला दरदरुन घाम सुटला होता. त्याची माहेरपणाला आलेली लेक रडत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं नि शिवाची भावजय भयभीत झाल्याने मोठमोठ्याने आकांत करत होती. शिवाने ताबडतोब रिक्क्षावाल्याला बोलावलं. जनार्दनही फोन केल्यावर धावत आला. ताबडतोब इस्पितळात घेऊन गेले.
भावजयीला वासंतीने कशीबशी गप केली. आडाळ्यावर लिंबू कापलं,नि माठातलं तांब्याभर पाणी घेऊन दोघी मायलेकींना सरबत करुन दिलं. इकडे इस्पितळात डॉक्टर म्हणाले पेशंटला सौम्य झटका येऊन गेलाय. दोन दिवस इथे राहूदे. नंतर गोव्याला घेऊन जा. तिथे सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. शिवाने मान डोलावली. दोन दिवसांनी शिवाने भावाला गोव्याच्या मोठ्या इस्पितळात न्हेलं. तिथे सगळ्या टेस्ट करुन एंजिओप्लास्टी करण्यात आली. शिवाचे दोन्ही मुलगे चुलत्यासाठी धावत आले. पैसा खर्च केला. चुलता बरा झाला तशी त्याने पुतण्यांना कडकडून मिठी मारली.
खरंच मंडळी नाती रक्ताची असो,मानलेली असो,माणसामाणसांतली असो वा प्राणी व माणसांतली असो नातीगोती मौल्यवान असतात.
–समाप्त
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============