नंदिनी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२”
©® आर्या पाटील
वाईन कलरच्या डिझायनर साडीत नंदिनी स्वर्गलोकीची अप्सरा भासत होती. अप्सराच म्हणावं लागेल कारण ती होतीच तशी. श्वेतवर्ण, पाणीदार डोळे, चाफेकळी नाक, गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे रंग उधळणारे ओठ, कमनीय शरिरयष्टी.. तिशीत तर तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. आणि आज तर त्यावर शृंगाराचा रंग चढला होता. वाईन कलरच्या साडीवर मॅचिंग असे स्टोनचे कानातले, गळ्यात स्टोन चोकर नेकलेस, हातात त्याच रंगाचा ब्रेसलेट, पायात अँकलेट आणि तिच्या व्यक्तिमत्वाला उंची प्रदान करणारी हिल्सची सॅण्डल.कितीतरी वेळ दर्पणासमोर बसून आपलं बदलेलं रुप न्हाहाळत होती ती.
” आई, अगं निघतेस ना..? पार्टीला उशीर होईल. शरद अंकल वाट पाहत असतील.” तिची आठ वर्षांची लेक रेवा म्हणाली.
” ओ येस माय प्रिन्सेस. तु आली असतीस तर चांगलं वाटलं असतं सगळ्यांना स्पेशली तुझ्या शरद अंकलना. वंदनाला तुझे फेवरेट पराठे करायला सांगितले आहेत. खाऊन घे आणि झोप. मला उशीर होईल..” म्हणत नंदिनीने लेकीच्या गालाचा गोड पापा घेतला आणि रूमबाहेर पडली.किचनमध्ये काम करत असलेल्या मेडला वंदनाला तिने जुजबी माहिती दिली. वंदना तिच्या सोबतच राहायची त्यामुळे रात्री उशीर झाला तरी रेवाची काळजी नव्हती.घरातून बाहेर पडणार तोच पुन्हा शरदचा फोन आला. शरद तिच्यासोबत ऑफिसमध्ये काम करणारा तिचा सहकारी आणि खूप जवळचा मित्रही..नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिच्या एकाकी जीवन प्रवासात तो आश्वासक मित्र बनून नेहमीच सोबत राहिला.दिड वर्षांपूर्वी ती त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आणि त्यांच्या रोजच्या सहवासाला मैत्रीची पालवी फुटली. तिच्या एकल पालकत्वातही तो खंबीर पाठिंबा बनून तिच्या सोबत होता.
भूतकाळातून बाहेर पडायला तो वर्तमान बनून तिच्या आयुष्यात आला.वयाच्या बाविसाव्या वर्षी नंदिनीची लग्नगाठ अवधूत बरोबर बांधली गेली. सप्तपदी चालत सात जन्मासाठी एकत्र आलेल्या त्या दोघांचा संसार सात वर्षेही टिकला नाही. अवधूत एका नामांकित कंपनीत वरच्या पोस्टवर कामाला होता. नंदिनीही शिकलेलीपण ” आर्थिक स्थैर्य असतांना उगाचच कशाला हैराणी करतेस. तु संसार सांभाळ तुला कसलीही कमतरता भासणार नाही याची काळजी मी घेईन..” अवधूत आश्वासकपणे म्हणाला होता.
तिनेही संसाराला प्राधान्य देत नोकरी करणे टाळले.सुरवातीची दोन वर्षे अगदी आनंदात गेली. अवधूतनेही तिला भरभरून प्रेम दिलं.. त्यांच्या संसाराच्या रोपट्याला प्रेमाचे धुमारे फुटले आणि त्यानंतर त्या रोपट्याला लागलेली फुलाची चाहूल त्यांच्या संसाराला पूर्णत्व देऊन गेली..पण आयुष्याच्या या सर्वात सुवर्ण पर्वाची सुरवात मात्र त्यांच्या नात्याचा अस्त घेवून आली. दरम्यानच्या काळात प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लीकेशन्स निर्माण झाल्यामुळे नंदिनीला सक्तीची विश्रांती सांगितली. इच्छा नसतांनाही अवधूतला सोडून तिला माहेरी राहावे लागले.याच दरम्यान अवधूतच्या एकाकीपणाला त्याच्या कंपनीत नव्याने रुजू झालेल्या निशाने आपल्या सोबतीने अगदी दोन तीन महिन्याच्या सहवासातच दूर केले. तो गुंतत गेला तिच्यात. संसाराच्या नव्या पर्वाची नांदी दृष्टिआड करत त्याने आपला जीवन प्रवाहच बदलला. निशा म्हणजे त्याचं सर्वस्व बनली. पण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपली,आपल्या आईवडिलांची इज्जत राखण्यासाठी त्याने नंदिनीला अंधारात ठेवत निशासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले. नंदिनीला मात्र त्याच्या या संबंधाची जाणिव झाली नाही. त्याच्या आंधळ्या प्रेमाचा चष्मा तिला मात्र डोळस भासत होता. तिचा स्वत: पेक्षा जास्त विश्वास होता त्याच्यावर. शेवटी नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर रेवाचा जन्म झाला आणि एका नव्या भूमिकेसाठी दोघेही सज्ज. आताही त्याने त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे याची पुसटशी कल्पना येऊ दिली नाही. कदाचित आईची भूमिका बजावण्याऱ्या नंदिनीला नवऱ्यामधील बदल दिसला नसेल. मात्र सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तिला तो बदललेला जाणवू लागला. त्याच्या डोळ्यांत आता पूर्वीसारखं प्रेम नव्हतं दिसत तिला, तिच्या रुपाला नक्षत्राची उपमा देणारा तो तिला ‘ गबाळेपणाची’ उपाधी देऊन मोकळा झाला होता. तिच्याशी बोलतांना शब्द सुचत नसायचे, संवाद संपत चालला होता आणि वाद होऊ नये म्हणून ती ही बोलणं टाळित होती. आताश्या रेवाबद्दलची मायाही कमी झाली होती त्याची. मनाने केव्हाच दुरावला तो आता शारिरीक जवळीकही टाळू लागला होता.आई वडिलांचा धाक असल्याने स्पष्टपणे वागता नव्हतं येत पण आता निशापासून दूर राहणेही अशक्य झाले होते.
नंदिनीने या साऱ्या गोष्टींचा छडा लावलाच आणि निशा आणि अवधूतचे विवाहबाह्य संबंध सगळ्यांच्या समोर आणले. लाज घोळून प्यायलेल्या त्या दोघांनीही सगळ्यांसमोर आपलं नातं कबूल केलं.” आई बाबा मला निशासोबत लग्न करायचं आहे. नंदिनी सोबत संसार करणे या जन्मात तरी शक्य नाही. घटस्फोटानंतर त्या दोघींना हवी तेवढी पोटगी द्यायला तयार आहे. पण आता नात्याची घुसमट सहन होत नाही.” तो निर्लज्जपणे म्हणाला.
” आई बाबा, मलाही नाही राहायचे अश्या व्यक्तीसोबत ज्याला नात्यातला विश्वास सांभाळता येत नसेल. सोन्यासारखा संसार उधळून देत तु त्याला घुसमट म्हणालास. आता मीच नाकारते तुझं अस्तित्व माझ्या आयुष्यातून. तुझ्या पोटगीची आम्हांला दोघींनाही गरज नाही. मी समर्थ आहे माझ्या लेकीची बाप व्हायलाही..” म्हणत ती त्याच्या घराबाहेर आणि आयुष्याबाहेरही पडली.
घटस्फोटानंतर जीवनाचा प्रवास आणखी खडतर बनला. पण तिच्यातील आईने हा खडतर प्रवासही प्रयत्नांच्या जोरावर सुकर केला. तिची काहीही चुकी नसतांना समाजाने तिलाच दोषी ठरवले.. क्रित्येक वासनांध नजरा न स्पर्शताही बलात्कार करत्या झाल्या.. तिच्या एकाकीपणाचा फायदा घेणारेही तिच्या भोवती गिधाडापरी घिरट्या घालू लागले.. या सर्वांना कंटाळून तिने राहतं शहर सोडलं आणि दुसऱ्या शहरात आयुष्याची नव्याने सुरवात केली.आणि या नवीन प्रवासाची नांदी झाली ती शरद सोबतच्या मैत्रीने..तो वेगळा होता सगळ्यांपेक्षा. ती अगदी नि:संकोचपणे आपलं मन हलकं करायची त्याच्या सहवासात. तिच्या प्रत्येक अडचणीत तो हक्काने सोबत द्यायचा.मैत्रीचं नातं फुलत होतं पण एक मर्यादा राखून. रोजचा सहवास आता एवढा हवाहवासा झाला होता की एकमेकांशिवाय दिवसाची कल्पना करणेही अशक्य झाले होते. घटस्फोटानंतर अबोल झालेल्या नंदिनीची कळी शरदच्या चांदण्यात खुलली होती. मैत्रीच्या पलिकडे काही भावना साद घालत होत्या जणू.ऑफिसच्या कामानिमित्त त्यांना एकत्र बाहेरही जावे लागायचे. त्यामुळे घरातल्या माणसासारखी सवय झाली होती त्यांना एकमेकांची.हळू हळू मैत्रीच्या जाणिवा बदलू पाहत होत्या. मनाला मिलनाची ओढ लागली होती. त्यादिवशीही ऑफिसच्या कामानिमित्त एकत्र बाहेरगावी गेले असतांना त्यांचा संयम ढळला. दोघांनाही ड्रिंक्स जास्त झाली होती. त्या नशेतच दोघेही सहवासातील अंतर संपवण्याचा प्रयत्न करू लागले. हृदयाची स्पंदने वाढली आणि ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले. तिला सर्वस्वी आपल्यात सामावून घ्यावे म्हणून त्याची भावना अनावर झाली. तर ती ही त्याला व्यापण्यासाठी सज्ज झाली. तिचा चेहरा ओंजळीत पकडून त्याने तो आपल्या चेहऱ्यासमोर धरला. अधरांना मिलनाची ओढ अनावर झाली. श्वासांचे हुंदके बंद खोली व्यापून टाकू लागले. एकमेकांत विसावणार तोच त्याच्या मनात एक आर्त किंकाळी उठली. मिलनाचा सोहळा त्या किंकाळीत पार विरून गेला. स्वत:ला सावरत शरद नंदिनीपासून लांब झाला आणि आपल्या रुममध्ये निघून गेला. त्याच्या वागण्याचा अर्थ जणू कळला तिला. तिनेही सावरलं स्वत:ला. आपल्या रुममध्ये आल्यानंतर शरदने खिशातून आपलं पाकिट बाहेर काढलं. कितीतरी वेळ त्या पाकिटात असलेल्या आपल्या कुटुंबाला न्हाहाळत तो अगतिक झाला.दुसऱ्या दिवशी त्याची खाली गेलेली नजर तो माणूस म्हणून चांगला असल्याची जाणिव देऊन गेली नंदिनीला. तिच्या नजरेत त्याचा आदर आणखी वाढला.
” नंदिनी, मला माफ कर. मी माझा संयम नाही सांभाळू शकलो. मी तुझा अपराधी आहे..” हात जोडत तो म्हणाला.
” शरद, माफी मागून मला माझ्याच नजरेत नको पाडूस. मी खूप कमनशिबी आहे एवढच म्हणेन. आयुष्यात फक्त आपल्याला हवी आहेत ती माणसच ठेवता आली असती तर..?” नकळतपणे तिने तिच्या भावना बोलून दाखवल्या होत्या.
शरदही तिच्याकडे तेवढ्याच गतीने आकर्षित होत होता पण संसाराचं वलय त्याला प्रतिकर्षणाच्या गर्तेत ढकळत होतं.पण तो तरी किती सहन करणार…?मनात कोरलेलं तिचं अस्तित्व किती नाकारणार..?नंदिनीलाही शरदच्या सहवासावर फक्त स्वत:चा हक्क प्रस्थापित करण्याची ओढ निर्माण व्हायची.त्याच्या सोबत भविष्य घालवण्याची दिवास्वप्नेही उघड्या डोळ्यांत दिसायची.आता मात्र दोघांनीही मनाचा कौल स्विकारायचे ठरवले. पार्टीत योग्य वेळ गाठून शरदने आपल्या भावना नंदिनीला सांगायच्या ठरवल्या. आपला संसार न तुटू देता तिच्यासोबत प्रेमाचं नातं ठेवण्याचा मानस त्याने आखला. नंदिनीलाही त्याच्या सुप्त योजनेचा सुगावा लागला होता जणू. ती ही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती.
घरातून बाहेर पडतांना त्याचा आलेला फोन पाहून तिचा चेहरा आणखीनच खुलला.” नंदिनी, खाली ये लवकर. मी थांबलोय. एकत्र जावूया.” म्हणत त्याने फोन ठेवला.
त्याच्या येण्याने ती आणखी उत्साहित झाली आणि वायुवेगे त्याच्याकडे निघाली. गाडीत बसलेला शरद तिच्या रुपाच्या चांदण्याला न्हाहाळत जणू आजूबाजूचं अस्तित्वही विसरला.
जवळ येताच तिने गाडीचा फ्रन्ट डोअर ओपन केला.” नंदिनी ताई, खूप सुंदर दिसत आहात.” मागे बसलेली शरदची पत्नी संजना म्हणाली.
तशी नंदिनी पटकन भानावर आली. त्याच्यासोबत संजनाला पाहून तिचा चेहरा पडला. पण तसे न दाखवता उसणं हसू चेहऱ्यावर आणत फ्रन्ट दरवाजापासून मागे जात मागचा डोअर उघडला.
” संजना, बऱ्या आहात ना..? इट्स अ प्लिझन्ट सरप्राइज फॉर मी.. आणि वेदू पण आहे का..?” शरदच्या तीन वर्षाच्या लेकीला पाहत नंदिनी म्हणाली.
” आमचंही अचानक ठरलं. मला वाटलं रेवाही असेल. तिला घ्यायचं ना..?” संजना म्हणतच होती की शरदने मधेच तिचे बोलणे थांबवले.
” तुमचं दोघींचं झालं असेल तर निघायचं का..?” शरद त्रासून म्हणाला.
” संजना, तुम्ही पुढे बसा. मी आणि वेदू बसतो एकत्र..” म्हणत हट्टाने तिने संजनाला उठवले आणि फ्रन्ट सीटवर शरदच्या बाजूला बसवले.
” नंदिनी, आर यु कम्फर्टेबल..?” समोरच्या आरश्यातून तिला पाहत तो म्हणाला.
“येस ॲबसुल्युटली.. मी आणि वेदूही..” विषय टाळित ती म्हणाली आणि वेदूशी गप्पा मारू लागली.
पुढच्या अर्ध्या तासातच ते पार्टीच्या ठिकाणी पोहचले. त्यांच्या सोबत नंदिनीला ऑकवर्ड फिल होत होतं. पण संजनाच्या आग्रहास्तव ती तिच्या सोबतच राहिली.शरदला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले. संजनाच्या येण्याने त्याचा सगळाच प्लॅन फसला होता.पार्टीचा आनंदही मनभरून नव्हता अनुभवता येत. शेवटी दोघींना एकत्र सोडून तो इतर स्टॉफला जॉईन झाला..वॉशरुमला जाते सांगून नंदिनीही थोडा वेळ बाजूला निघून गेली. तिला संजनापासून दूर जातांना पाहून लागलीच ऑफिसमधील काही लेडीज संजनाभोवती गोळा झाल्या.” मिसेस शरद राव. तुम्ही खूपच ओपन माईन्डेड आहात. नंदिनी मॅडम आणि शरद सराचं अफेयर किती सहज स्विकारलं आहे..” कशाचही गांभिर्य न बाळगता त्या म्हणाल्या.
” सॉरी, तुम्ही काय बोलत आहात कळतय का..? स्त्री पुरुष एकत्र दिसले की सहज अफेयरचं लेबल लावून मोकळ्या होत्या तुम्ही. त्यांच्यामध्ये निरपेक्ष मैत्री नसू शकते का..? त्यांच्यातील सहवास त्यांच्या मैत्रीचं प्रतिक नसू शकतो का..? कधी सुधारणार आपला दृष्टिकोन..? कधी इतर नात्याप्रमाणे या नात्यालाही स्विकारणार..?माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे तो कधीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि नंदिनी ताईचं बोलाल तर त्या कधीच असं वागणार नाहीत.संसार अर्ध्यावर संपल्याचं दु: ख अनुभवलं आहे त्यांनी. मग त्याच दु:खाचं त्या तरी कारण बनणार नाहीत. सो या विषयाला इथेच संपवा..” विनंती करित ती म्हणाली.
मागे उभ्या असलेल्या नंदिनीच्या कानावर नव्हे नव्हे तिच्या मनावर तिचा प्रत्येक शब्द सकारात्मक ठसा उमटवून गेला. नवऱ्याच्या चुकीची आपण सहन करित असलेली शिक्षा तिच्या अंगावर काटा उभा करून गेली. आता आपणच ही शिक्षा दुसऱ्या कोण्या नंदिनीच्या माथी मारत आहोत याची जाणिव होताच ती गहिवरली. ज्या कारणासाठी आपला संसार उद्धवस्त झाला आज त्याच कारणासाठी आपण संजनाचाही संसार उद्धवस्त करित आहोत याची जाणिव होताच ती अगतिक झाली. वेदूला आठवताच तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले. डोळ्यांच्या कडा ओसंडून वाहू लागल्या. अश्रूंना रोखण्याच्या प्रयत्नात ती वॉशरुमकडे वळली.तोच बाजूच्या रुममधून तिचा हात पकडून कोणीतरी आत खेचलं.हो शरदच होता तो. त्याला पाहून तिचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. त्याला गच्च मिठी मारून ती ओक्साबोक्सी रडू लागली.” शरद, मला कोणताही अधिकार नाही तुमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा. मी माझ्या वाट्याला आलेल्या दु:खाची बीजं संजनाच्या आयुष्यात नाही पेरू शकत. तुमच्या तुटलेल्या संसाराच्या पायावर मला माझ्या भविष्याचा महल नाही उभारायचा. वेदूच्या जागी क्षणभर मला माझी रेवा दिसली.नात्यात फक्त मिळवणे ही आसक्ती नसावी. आपण भलेही मैत्रीच्या पलिकडे पोहचलो असलो तरी वेळीच आणि योग्य ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. दोन जीवांच आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप नको ओढावून घेवूस. खूप विश्वास आहे संजनाचा तुझ्यावर आणि माझ्यावरही. निदान त्या विश्वासासाठी तरी इथेच थांबूया. तु मला हवा आहेस पण कोणापासून हिरावून नाही.. तिने मित्र म्हणून कधीच तुला माझ्या हवाली केलय. हेच माझ्यासाठी खूप आहे. तिच्या भावनांचा आदर करणे हे माझं आणि नवरा म्हणून तुझंही कर्तव्य आहे. आणि तुला तुझ्या कर्तव्याची जाणिव आहे म्हणूनच त्या दिवशी मोहाच्या क्षणी तु स्वत: ला सावरलस. तु असाच चांगला नवरा बनून त्यांच्या आयुष्यात रहा. आणि चांगला मित्र म्हणून माझ्या. एवढीच या मैत्रिणीची इच्छा आहे. सांग करशील ना पूर्ण..?” बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.
तिचा प्रत्येक शब्द त्याच्या हृदयालाही स्पर्शून गेला. होकार देत त्याने तिला मिठीतून मोकळं केलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवित सोबतीची शाश्वती दिली. क्षणात तिच्या अश्रूंचे आनंदाश्रू झाले.एक शाश्वत नातं घेवून ती बाहेर पडली आणि संजनाकडे गेली.नंदिनीच्या चेहऱ्यावर चढलेलं तेज पाहून संजना सुखावली.” ताई, तुमचा खूप अभिमान वाटतो मला. शरद एक मित्र म्हणून नेहमीच तुमच्या सोबत राहतील आणि मी एक छोटी बहिण म्हणून..” संजना आश्वासकपणे म्हणाली.
तशी नंदिनीने तिला गच्च मिठी मारली..योग्य नातं स्विकारल्याचं समाधान तिला त्या मिठीत जाणवलं..
( खरं आहे मैत्रिणींनो एक संसार उद्धवस्त व्हायला जेवढा पुरुष जबाबदार असतो तेवढी एक स्त्री ही असतेच ना.. दुसऱ्याच्या संसाराची रांगोळी करून त्यावर उभारलेलं नातं फक्त अपराधाची जाणिव देतं आणि ही जाणिव जिवंतपणी मरणयातना. म्हणूनच नाती तुटण्याचे कारण बनण्याऐवजी जोडण्याचा दुवा बनुया आणि मनुष्य जन्म सार्थकी लावूया..)
©® आर्या पाटील