नंदादीप भाग १

“ माधव लवकर चल ना, आज उशीर झाला तर हाफ डे कट होईल .आता या महिन्यातला दुसरा लेट मार्क आहे. “रमा काकुळतीला येऊन बोलत होती.माधव ठरल्या स्पीडनीच गाडी हाकत होता.
रमा जवळ जवळ ओरडून म्हणाली “अरे ऐकतो आहेस ना?”
माधव तिच्याकडे थंडपणे कटाक्ष टाकून म्हणाला, “अगं आठ वर्षाची म्हातारी अजून किती जोरात पळणार? त्यात सेकंड हॅन्ड ऍक्टिवा. तुझ्या आग्रहामुळे घेतली. त्यापेक्षा दोन नव्या सायकल घेतल्या असत्या तर बरं झालं असतं , आणि आपापल्या वेळेत आपण पोचलो असतो.”
रमा लटक्या रागाने म्हणाली,” हम्म आणि गाडी वरचे दहा मिनिटांचे मिळालेले क्षण. जाऊ दे ,तू अजिबात रोमँटिक राहिलेला नाहीस.पूर्वी आपण एकत्र ऑफिसला जाऊ म्हणून किती हट्ट धरायचा .तेवढीच दहा मिनिटं एकत्र घालवून अशी मखलाशी पण करायचा.”
माधव जरा अजून मागे सरकत मागे वळून पहात म्हणाला “अरे वा, आठवता तर तुला जुने दिवस . आज तु सुट्टी घे ना? मस्त फिरायला जाऊ”.
शहाणा आहेस. ही खटारा गाडी बदलायची असेल तर पुढचे दोन-तीन महिने पूर्ण पगार मिळायला पाहिजे राजे.चला माझे ऑफिस आले बाय पळते .आज आरआर चे काय होणार माहीत नाही?
राज रेगे ना? चांगला पोरगा आहे . जरा त्याला समजावं,चांगली नोकरी आहे, एकुलता एक आहे ,घरी छान आई-वडील आहेत, स्वतःचे घर आहे . आता लग्नाचा घाटपण घातला आहे .एक छान बेस तयार आहे कशाला नाटक, सिनेमा च्या नादी लागतो व हातातली चांगली नोकरी गमावतोयेस.
च्या आयला, मला दे म्हणावं VP Corporation मध्ये नोकरी . माझ्यासाठी नोकरी नसून लॉटरी असेल लॉटरी?
रमाने विचारले , ते कसं बुवा?
अगं VP Corporation मध्ये नोकरी पण ,आणि माझी छोकरी पण. एकाच ठिकाणी म्हणजे दिवस-रात्र आपण एकत्र.
रमा हसत म्हणाली, ओ मेरे DDLG चा शाहरुख , चला खरंच हाफ डे लागेल .आणि काय रे आपल्या जुन्या कंपनीतले रुल बदललेत का?मी असताना दररोज पंचिंग व्हायचे.
” तुम क्या जानो रमा, आमच्या कंपनीतले पंचिंग मशीन तू सोडल्या दिवशीच बिघडले, आणि तुला तर माहित आहे आपला खडूस नाना खर्च म्हणून करत नाही. च्या आयला, आपण पण खूप मज्जा करतो हल्ली ऑफिस मध्ये ,कधीही या कधीही जा ” सब चलता है,आता एवढ्या पगारात अजून किती काम करणार? तुमच्यासारखे कॉर्पोरेट कल्चर नानाकडे कुठे?
रमा भडकून म्हणाली,” ए बाबा नेहमीसारखे रडू नकोस”.त्यापेक्षा CV अपडेट कर आणि लवकर दुसऱ्या नोकरीसाठी एप्लिकेशन सुरु कर. तुला पण चांगला जॉब मिळेल. आणि हो जरा ‘ नाना म्हणणे बंद कर त्यांना. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे छान नामकरण केले आहे श्रीयुत नारायणराव नागमोडे’ .
माधवचा चेहरा पडला. “सॉरी चल जातो तुला उशीर होतोय”.
रमा थोडी हिरमुसली .” सॉरी माधव मला तुला दुखवायचे नव्हते.”
“ सॉरी कशा साठी तू तर खर बोललीस.आई वडिलांनी दिलेल्या नावाचे महत्व माझ्यासारख्या अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलाला काय समजणार? असो मला पण उशीर होतोय”आणि साला नाना सॉरी सॉरी श्रीयुत नारायणराव नागमोडे माझी वाट लावायला वाट पाहात असतील”.
रमा खळखळून हसली आणि दोघे जण आपापल्या ऑफिसच्या दिशेने ऑफिसला गेले .
रमा माधव पाच सव्वा पाच वर्षापूर्वी नारायणराव नागमोडे यांच्या “Nagmode &Sons” कंपनीत पहिल्यांदा भेटले होते.माधव स्वभावाने एकदम शांत व सरळ मार्गी माणूस होता. तो सगळ्यांना मदत करायला कायम तत्पर असायचा. बरेच वेळा आपली कामे माधव वर टाकुन स्टाफ बिनधास्त सुट्ट्या घ्यायचा. या अजब तरुणाने कधिच सुट्टी घेतली नाही, घरगुती कार्यक्रम, ट्रिप असं काहीच नाही. तो अखंड कामाच्या रगाड्यात स्वतःला झोकून देत असे. हळूहळू रमाची त्याच्याविषयीची उत्सुकता वाढतच गेली.
आता तिला सव्वा वर्ष झालं होतं या कंपनीत लागून. माधव मितभाषी असल्यामुळे त्याचा संपर्क फारसा कोणाबरोबर नसायचा. ऑफिसच्या कुठल्याही पार्ट्या तो अटेंड करत नसे. कोणी स्वतःच्या घरी पार्टीला बोलावले तर तो नम्रपणे नाही म्हणून सांगत असे व कधीही स्वतःच्या घरी त्याने कोणाला बोलावले नाही. त्याच्या कुटुंबाविषयी कोणालाच काही माहीत नव्हते व तो कधीच याविषयी बोलायला उत्सुक नसायचा. हळुहळू रमा व माधव यांचं एकत्र काम सुरू झालं आणि रमा या साध्या-सरळ हुशार तरुणाच्या प्रेमात पडली. त्याला पण ती आवडायची पण तसे तो कधी म्हणाला नाही.
एका प्रोजेक्टच्या सक्सेस बद्दल नारायणराव नागमोडेयांनी एक छोटेखानी पार्टी आयोजित केली होती. नेहमीप्रमाणे माधवने नारायणरावांच्या केबिनमध्ये जाऊन ,सर मला नाही जमणार यायला म्हणून क्षमस्व म्हणत हात जोडले होते.
आता रमा माधव ला पुरती ओळखू लागली होती.रमाला या पार्टीला जायचे होते, पण माधव बरोबर.
तिने माधवला थेट प्रश्न विचारला,”तू का नाही येणार पार्टीला ? काही प्रॉब्लेम आहे का? घरी कोणी आजारी वगैरे ?”
माधव एकदम चपापला. त्याला हा अनपेक्षित प्रश्न होता. गोंधळलेल्या अवस्थेत तो म्हणाला ,”नाही मी एकटाच राहतो”.
रमा खुश होऊन,”अरे वा ,छान मग का बर नाही येत?”
माधव म्हणाला,” मला नाही आवडत जास्त लोक, गप्पा दारू आणि दंगा”.
रमा मिश्किलपणे हसत म्हणाली, “हो हो सॉरी सॉरी. थोडं वयस्कर लोकांना होतो त्रास या सगळ्याचा .मी विसरलेच होते, बरबर माधव सर तुम्ही नका येऊ पार्टीला”.
माधव कावराबावरा झाला,” नाही नाही मी तर 29 वर्षाचा आहे फक्त”.
आता मात्र रमा खो खो हसली.” मला वाटले 92 वर्षाचा आहेस तू. चल की माझ्याबरोबर.
नको पिऊ दारू, नको घालू दंगा पण नुसता ये . अरे हे आपले प्रोजेक्ट होते. आपण दोघांनी पण याच्यावर कष्ट घेतले तर आता याचे श्रेय मी एकटीच कशी घेऊ? चल मी देईन तुला कंपनी.अरे नुसतेच काम करून उपयोग नाही.जे केलंय ते प्रेझेंट पण करता आले पाहिजे आणि कौतुक पण करून घेता आले पाहिजे.
“हमारे साथ रहोगे तो ऐश करोगे” रमा आज जास्तच फ्रॅंक झाली होती. जरा मनातून घाबरूनच त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि आता त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती.
माधव थोडा लाजला पण मनातून थोडा सुखावला. एक तरुणी आणि चक्क आपला हात हातात घेऊन आपल्याला पार्टीला चल म्हणून आग्रह करते आहे.
रमाचा अग्रह मोडणं माधवच्या जीवावर आलं व त्या संध्याकाळी तिच्या गाडीवर मागे बसून तो रिसॉर्ट मध्ये गेला. आयुष्यात एवढ्या लोकांबरोबर आणि ते पण कामाशिवाय बोलायची ही माधव ची पहिलीच वेळ होती.
सगळ्या सहकाऱ्यांनी याचं श्रेय रमाला दिले व नेहमीप्रमाणे रमा माधव जोडी जुळवली .
रमाला तर तो आवडत होताच आता तो पण तिच्या प्रेमात पडला.
सहा महिन्यांपूर्वी रमाला ‘VP Corporation’ मध्ये असिस्टंट मॅनेजर ची चांगली नोकरी मिळाली होती. ‘Nagmode & Sons’ मध्ये तिने तब्बल चार सव्वाचार वर्ष नोकरी केली होती.
माधव चे MCA झाले व कॅम्पस मध्ये ‘Nagmode & Sons’ ची ऑफर आली आणि गेली सात वर्षे तो तिथे चिकटून होता. वर्षापूर्वी रमा व माधवने घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते.
रमाचे एकत्र मोठे कुटुंब. आई, वडील, बहीण ,काका ,काकू, आजी आजोबा. रमाची बहिण श्वेता. तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान होती. श्वेता दिसायला खूपच सुंदर आणि कम्प्युटर इंजीनियर.रमा दिसायला बेताचीच ,थोडी बुटकी आणि जाड. दोन्ही नातींची लग्न एकाच मांडवात उरकून म्हणून आजीने तगादा लावला होता. काका-काकूंना मूलबाळ नव्हते.काकूचा भारी जीव रमा वर,घरातली पहिलीच मुलगी लाडाकोडात वाढलेली.
रूप काय कोणाच्या हातात असते का? रमा खूपच चुणचुणीत, कामसू आणि मनमिळावू होती. शेजारी, नातेवाईक ,मित्र परिवारात सगळ्यांना धावून धावून मदत करायची. कामाचा तर प्रचंड उरका होता.
तिचे व काकूचे चांगलेच गूळपीठ जमायचे. आजोबांची पण ती लाडकी होती. आई ,बाबा ,आजी यांना तिची धाकटी बहीण श्वेता जास्त आवडायची आणि म्हणूनच कमी मार्क्स असूनही मॅनेजमेंटकोट्या मधून तिला इंजीनीरिंगला अॅडमिशन घेतली होती.
जवळजवळ पन्नास स्थळांनी नकार दिल्यावर रमा खूपच वैतागली होती. तिच्या फार अपेक्षा नव्हत्या पण लोकांना दिसणे जास्त महत्त्वाचे वाटते याचा तिला मनातून खूप राग यायचा.
श्वेताला एक श्रीमंत कॅनडात राहणाऱ्या मुलाची मागणी आली होती. आजीची तर दररोज धुसफूस सुरू असायची.
एक दिवस धीर करून रमाने माधवला थेट प्रश्न केला” तुला मी आवडते का?”
माधव खूपच गोंधळला, काय यार नेहमीच हि मुद्द्यालाच हात घालते. काय बोलावे ते त्याला समजलेच नाही पण धीर एकवटून त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
रमाने त्याला त्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले.माधव एका भाड्याच्या खोलीत राहतो आणि बाकी त्याच्या कुटुंबाचा काहीच पत्ता नाही, हे समजताच घरी जणू आरडीएक्सचा स्फोट व्हावा तसे आई, बाबा, आजी आणि या वेळेला आजोबा पण फुटले.बाबांनी तर चक्क जमणार नाही म्हणून सांगितले.
एक जावई कॅनडाचा गर्भश्रीमंत ,उच्चभ्रू आणि दुसरा अनाथ ज्याच्याकडे राहायला साधी भाड्याची जागा नाही.
त्यापेक्षा रमाचे लग्न नाही जमले तरी चालेल. माधवचा खूपच अपमान करून त्याला हाकलून दिले.रमाला सक्त ताकीद दिली परत माधव हा विषय नको.
काकूनी सगळ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
“माधव दिसायला छान गोरा, उंच,रुबाबदार, शिकलेला. आश्रमात वाढला तरी खूपच संस्कारी मुलगा आहे. स्वतःची नोकरी आहे व पुढेमागे स्वबळावर थाटेल संसार. आणि आपली रमा पण कमावती आहे. आपल्यानंतर हे सर्व या दोन मुलींचच आहे ना? मग काय हरकत आहे? जर त्यांच एकमेकांवर प्रेम असेल तर ,वहिनी, भाऊजी नका करू विरोध”. काकू काकुळतीला येऊन सांगत होती.
पण रमाच्या आईने तिला गप्प बसवलं. “तुझी पोटची मुलगी असती तर तू काय अनाथ मुलाच्या गळ्यात बांधल असतस का तिला”?
आज प्रथमच काकूला आपण आई नसल्याची जाणीव झाली. घरात नुसते वाद- विवाद ,भांडणे आणि तंटे सुरू झाले.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.