Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

नाम्याचं लग्न झालं. नाम्याला सासुरवाड तालेवार मिळाली. मित्रमंडळी म्हणू लागली,”नाम्या मजा आहे रे तुझी.” नाम्याची बायको माहेरी गेली. चांगली दहा दिवस माहेरी राहिली. नाम्याला मात्र बायकोची आठवण येऊ लागली. खानावळीतलं अन्न खाऊन कंटाळला. दहाव्या दिवशी मात्र नाम्याने दोन दिवसाची रजा टाकली व एसटीतून सासरवाडला निघाला.

नाम्या घाटावरचा असल्याने त्याला त्याच्या कोकणातल्या सासरवाडीविषयी विशेष उत्सुकता होती. नाम्या घरी पोहोचला तशी त्याची बायको सुधा किंचीत लाजत बाहेर आली. त्याला हातपाय धुण्यासाठी तिने न्हाणीघराकडे न्हेलं व पंचा घेऊन उभी राहिली. नाम्याने कढत पाण्याने आंघोळ उरकून घेतली. त्याचा तो सुस्नात देह पाहून सुधा लाजली तशी तिच्या गालावरच्या खळीने नाम्याच्या अंगात फुलपाखरं उडू लागली.

नाम्याच्या सासूने नाम्याला घरच्या दुधाचा फक्कड चहा व शेवचिवडा दिला. खळ्यात बसून नाम्याने तो फराळ फस्त करेस्तोवर नाम्याच्या सासूने त्याच्यासमोर हापूस आंब्यांच्या केशरी फोडींनी भरलेले ताट आणून ठेवले. कोकणातल्या लाल मातीतला अस्सल हापूस आंबा खाताना नाम्याची जीभ,डोळे,पोट सर्वच त्रुप्त झाले.

संध्याकाळी नाम्यासाठी सासूने म्हळव्यांचा सार व सुरय भात रांदला. सोबत गरमागरम टम्म फुगलेल्या तांदुळाच्या भाकऱ्या वाढल्या. सारात कैरी,तिरफळं घातल्याने सार अगदी अफलातून झाला होता. नाम्याला माशांची आवड होती पण त्याच्या घरी कोणाला मासे शिजवता येत नव्हते म्हणून हॉटेलात मिळणाऱ्या मच्छीकढीवर तो समाधान मानायचा. पण सासूच्या हातचा नदीतल्या ताज्या म्हळव्यांचा सार खाऊन त्याला जणू स्वर्ग दोन बोटं उरला.

दुर्गम भाग असल्याने नेहमीसारखीच लाईट गेली. दिव्यात तेल भरुन सुधाने दिवा पेटवला. कोकणात दिवा म्हणजे औषधाच्या बाटलीच्या बुचाला भोक पाडून त्यात कापडाच्या चिंधीची वात घालतात. पिंगाणी दिव्यासमोर फेर धरू लागली.

नाम्याला वाढायला बसलेली सुधा त्या दिव्याच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसत होती. सैलसर अंबाडा,त्यावर माळलेला अबोलीचा वळेसर, तिच्या गौर वर्णाला शोभून दिसणारी डाळिंबी रंगाची साडी,ती कमरेला खोचून घेतल्याने त्यातून दिसणारा मोरपिसी परकर व त्याखाली तिच्या गोऱ्यापान पोटऱ्या,पायांतले चांदीचे पैंजण,बोटातली जोडवी..नाम्याला तिच्यात अप्सरेचाच भास होत होता.

सुधाचे लाडिक कटाक्ष झेलत नाम्या सारातला गाबोळीने भरलेला फुगीर,चवदार म्हळवा व भात खात होता. त्यातच अनवधानाने म्हळव्याचा काटा त्याच्या तोंडात गेला व तो थेट त्याच्या पडजीभेत रुतला. नाम्या अगदीच कासावीस झाला,घाबराघुबरा झाला. सुधाचा लहान भाऊ सदा भाओजींची ही फजिती पाहून खदाखदा हसू लागला. नाम्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

सासू बाहेर काय प्रकार चाललाय ते पहायला वळईत आली. ती नाम्याला म्हणाली,”जावयांनू,सुको घास गिळा पटापटा.” नाम्याने सासूच्या म्हणण्याप्रमाणे चार पाच भाताचे सुके घास गिळले. एका घासासोबत तो काटा गिळला गेला तेंव्हा नाम्याला हायसे वाटले व त्याने नजरेनेच सासूला दंडवत घातला.

रात्री लाईट नसल्याने डास नाम्याच्या कानाशी गुणगुणू लागले. त्याच्या उघड्या पायांची चाळणी करु लागले. नाम्या स्वतःच्याच गालांवर,पाठीवर फाडफाड करुन मारु लागला. ते पाहून त्याचा मेहुणा सदू अजून हसू लागला.

इतक्या दिवसांचा उपवास सुटणार,आज सुधाला कुशीत घेणार या आशेवर नाम्या होता. सुधानेही बाहेरच्या खोलीत त्यांचे अंथरुण घातले व तांब्याभांडे आणायला माजघरात गेली. तितक्यात सदूने त्याची गोधडी भाओजींच्या बाजूला अंथरली. सदूला घाटावरच्या नामदेव भाओजींच जाम कौतुक होतं. त्याला भूगोलात विशेष रुची होती व घाटावर घेण्यात येणारी ज्वारी,बाजरी,कापूस,गहू,मका,विविध डाळी,भुईमूग.. ही पिके,तिथल्या जमिनीचा पोत,सिंचन पद्धती हे सारं सारं त्याला जाणून घ्यायचं होतं. मोठं होऊन एक प्रगतीशील शेतकरी बनण्याचा त्याचा मानस होता. त्याद्रुष्टीने ही नामी संधी साधून सदू त्याच्या ज्ञानात भर घालू पहात होता.

नाम्याची सासू सदूला वळईत तिच्यासोबत निजावयास सांगत होती पण सदू ऐकायचं नाव घेईना तसं नाम्याच्या सासूने पडवीतला मुगडा आणला. तो पहाताच सदूने भोकाड पसरलं. सुधाला काय करावं ते कळेना. सदूच्या कर्णकर्कश रडण्याने वैतागून, शेवटी भीक नको पण कुत्रं आवर या म्हणीस अनुसरून नाम्याने सासूस सदूलाच त्याच्याशेजारी झोपूदे असं सांगितलं.

रात्री एक वाजेपर्यंत सदू नाम्याकडून ज्वारीला लागणारं हवामान,पाणी,खतं..याविषयी माहिती घेत राहिला. शेवटी नाम्या कसातरी झोपला. तीन वाजता नाम्याला जाग आली. त्याला आपण जणू पाण्यात पोहत आहोत असं स्वप्न पडलं. त्याने डोळे उघडले. त्याची बर्मुडा,अंथरुण सारंच ओलचिंब झालं होतं. सदूने ज्वारीच्या पिकाला झोपेत चांगलच पाणी घातलं होतं. तेही नाम्याच्या अंथरुणात जाऊन. व ओलं लागताच स्वतःच्या कोरड्या अंथरूणावर जाऊन निजला होता. नाम्या शेवटी अंगावरची चादर अंगाखाली घेऊन झोपला. चारेक वाजले असतील,त्याच्या अंगावर धपकन कायतरी पडलं..चांगलं जाडजूड..नाम्याने भीतभीत रामराम म्हणत डोळे उघडले. त्याला अंधारात दोन चमकते डोळे दिसले. घरातल्या भाटीने नाम्याच्या अंगावर उडी मारली होती व त्याच्याकडे हा कोण नवीन माणूस म्हणून पहात होती. तिला सदूने बाजूला सारले. भाटीने म्याव म्याव केले व तेथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी नाम्या सुधाला घेऊन गाडीत बसणार होता पण सासूने थांबवून घेतले. जावईबापूंसाठी कोंबडा कापण्यात आला. वडे सागोतीचा झक्कास बेत होता. नाम्याने भरपूर वडे व सागोती खाल्ली. त्या रात्रीही सदूने नाम्याचा व सुधाचा बेत हाणून पाडला व कापसाची लागवड एक वाजेपर्यंत ऐकत बसला.

आदल्या रात्रीप्रमाणेच कापसाच्या पिकाला सदूने भरपूर पाणी घातले व त्या जलाशयात नाम्या चिंब भिजला. ‘मेहुणा’ या प्रकाराचा त्याला जाम वैताग चैताग आला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघायचे ठरले. सदू सकाळीच नाम्याला रतांबीच्या झाडाजवळ घेऊन गेला. सदू झाडावर चढला तसा नाम्यालाही हुरुप आला. तोही चढू लागला पण एका फांदीवरच्या पानाआड हुमल्यानी घरटं केलं होतं. त्याठिकाणी नाम्याने पाय ठेवताच लालभडक हुमल्यांनी नाम्यावर हल्लाबोल केला. नाम्या कसाबसा त्या झाडावरुन खाली उतरला.

नाम्याला सदूचा खूप राग येत होता पण सांगणार कोणाला! सासूने जावयबापूंसाठी दुपारी खास रसशिरवळ्यांचा बेत केला होता. नाम्याने भरपेट रसशिरवळ्या खाल्ल्या. सासूने कुळदाची पिठी,कोकम,आगळ,चण्याच्या पीठाचे लाडू,आंबे,चुलीत भाजलेले काजूगर अशी भेट बांधली. रात्री बाराची गाडी होती पण नऊ वाजताच लॉक डाऊनची अनाऊंसमेंट झाल्याने नाम्याचं जाणं बारगळलं व सासुरवास लांबला.

सध्या नाम्या सासरवाडीला राहून मेहुण्याला रोज रात्री भूगोल शिकवतो. सुधासोबत पावसाळ्यासाठी शेणी,लाकडे भरुन ठेवत आहे. रतांबे फोडून सोलं करत आहे . एकूणच कोकणच्या राहणीमानाचा, नाम्याचा अभ्यास दांडगा होत आहे व सदूबद्दलचा आकसही दिवसेंदिवस वाढत आहे. सदूही ताई व भाओजींसोबत शहरातल्या शाळेत जाण्याची स्वप्नं पहात आहे.

—–©️®️सौ.गीता गजानन गरुड.

=================================

फोटो साभार – गूगल

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, RitBhatमराठी घेऊन येत आहे लघुकथा स्पर्धा.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *