नकोशी

®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. काळे ढग जमा झाले होते, पाऊस पडेल का? तिच्या मनात विचार आला. कदाचित पडेल, कालपण असंच वातावरण झालं होतं याच वेळी आणि मग धुव्वादार पाऊस पडला. आजपण तसाच पडेल? सर्व वातावरण अल्हाददायक होईल. पानं हिरवीगार होतील मातीचा सुगंध येईल. रस्त्यारस्त्यावर पाण्याचे लोट वाहतील. छत्री, रेनकोट नसलेल्यांची तारांबळ होईल. रिक्षा, बस यांची चलती होईल. किती बदल होतील ना? पण…
पण काय करायचंय आपल्याला पाऊस पडेल का? आपल्याला पाऊस पडला काय किंवा कडकडीत ऊन पडलं काय? सारं सारखंच. फक्त थंडीशी आपला संबंध येतो कारण घरात झोपून राहायचे झाले तरी थंडी वाजतेच बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? कडाक्याचं ऊन पडूदे, तुफान पाऊस होऊदे की सोसाट्याचा वारा सुटूदे.
या खिडकीतून बसून ते बघण्याशिवाय आपल्या हातात तरी दुसरं काय आहे? किती दिवस हे असं आयुष्य काढायचं आपण? मरेपर्यंत? आपण जिवंत आहोत का? परत तिच्या मनात प्रश्न आला. काय अर्थ आहे आपल्या जिवनाला? दोन वर्षं झाली या कॉटवर आपण पडून आहोत.
सून, मुलगा वेळोवेळी खायला देत आहेत, नर्स येऊन सर्व करत आहे. नातवंड कधीतरी येऊन चौकशी करून जात आहेत, पण पण सगळीच माझ्यामुळे अडकून गेली आहेत. सुनेच्या चेहर्यावर नाराजी तर दिसतेच आहे पहिल्यापासून पण मुलाला जरा प्रेम होतं. कधीतरी हातात हात घेऊन बसत होता चौकशी करायला पण अलीकडे मुलाच्या चेहर्यावरही नाराजी दिसू लागली आहे आणि का नसणार? माझ्यामुळे ती दोघं कुठेच जाऊ शकत नाहीयेत.
त्याच्या कामाच्या व्यापात माझ्यामुळे भरच होत आहे अगदी भार झाली आहे मी. आणि माझी मुलगी ती तर कधीतरी अगदी आठवड्यातून एखादी चक्कर मारते. आल्यावर मला वेळच नसतो ग असे पाढे गाते. त्यापेक्षा सून बरी म्हणायची. सुनेलाही वाटत असेल ना हिला हिच्या आईसाठी वेळ नाही आणि मी मात्र इथे राबतेय. कोणाला काही वाटूदे आता मला मात्र कंटाळा आलाय.
परमेश्वर तरी माझी किती परीक्षा बघतोय? का मला असं झुलत ठेवलंय? असं कोणतं पाप केलंय मी की लोकांना अगदी नकोशी होईपर्यंत मी जगतेय. पण खरंच मी नकोशी झालीय का? अत्ता कितीतरी लोकं माझ्या पोस्टची वाट बघत आहेत. एव्हाना 50-60 जणांचे तरी मेसेज आजचा भाग कधी पोस्ट करणार? आपण लिहीत असलेली ‘नकोशी’ या कादंबरीचा आजचा शेवटचा भाग आहे. लोकांच्यात प्रचंड उत्सुकता आहे. काय होईल तिचं?
लिहावा का शेवटचा भाग? काय लिहावं काय राहिलंय आता माझ्या आयुष्यात? नवर्याला नकोशी झाले. दुसर्या बाईनच्या तो नादी लागला आणि त्याने दुसरं लग्न केलं. मुलांना आणि मला वार्यावर सोडलं. मुलं लहान होती, त्यांना काही कळू दिलं नाही. तुमचे वडील वारले असंच सांगितलं मुलांना आणि दुसर्या गावी येऊन राहिले. ना माहेरचा आधार होता ना सासरचा. आधी धुणी-भांडी, मग स्वयंपाकाची कामं करत मुलांना सांभाळलं, त्यांच्यासाठी जिवाचं रान केलं. त्यांना चांगल्या मार्गाला लावलं. त्यात माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, तब्येतीची हेळसांड झाली आणि आता ही वेळ आलीय माझ्यावर!
आता मी एका जागेवर पडून आहे. जणू माझं शरीर त्याची नासाडी केली म्हणून माझ्यावर सूड घेत आहे. जोपर्यंत मी काम करत होते तोपर्यंत सर्वांना हवीशी होते, पण… जेव्हापासून आजारी पडले माझ्या नवर्याप्रमाणेच मुलांनाही मी नकोशी झालेय. नकोशी नकोशी… हाच माझा अंत आहे.
काय करावं जगावं की मरावं? जगावं तरी कुणासाठी? कोण आहे या जगात आपलं? आपण म्हणजे एक अडगळ आहोत अडगळ. जिवंत अडगळ… श्वास आहे म्हणून जगत आहोत, बाह्य जगाशी आपलं देणं-घेणं नाही, आपल्यावाचून कुणाचं काही अडत नाही मग कशाला असं जीवन जगायचं? कशासाठी? सुवर्णाने शेजारी फळं कापण्यासाठी ठेवलेल्या चाकूने आपल्या हाताची नस कापून घेतली आणि तिने या जगाचा निरोप घेतला.
नकोशी कादंबरीचा शेवट लिहून तिने तो फेसबुकवर पोस्ट केला. ‘‘अरेरे दुर्दैवी शेवट…’’ ‘‘अ्रसं लिहायला नको होतंत.’’ ‘‘पॉझिटीव्ह शेवट हवा होता, पण कादंबरी छान होती अशा कमेंट येत होत्या
‘‘हॅलो, रचना अगं आज त्या कादंबरीचा शेवट झाला वाचलास का तू? बिचारी सुवर्णा…’’
‘‘हो ग खरंच बिचारी सुवर्णा..’’ नकोशीची सून सुवर्णाबद्दल कढ काढत होती.
‘‘मुलाबाळांसाठी इतकं केलं काय फळ मिळालं तिला? असंच असतं बाई जनरीतच आहे ही…’’
‘‘हो ग असंच आहे जग…’’ सून अगदी मोठा आव आणून बोलत होती. तितक्यात ऑफिसमधून घरी आलेल्या नकोशीच्या मुलाला आपल्या आईची आठवण झाली,
‘‘आईला चहा दिलास का ग?’’
‘‘अगं बाई त्या कादंबरीच्या नादात विसरलेच…’’
‘‘आज शेवट झाला ना त्या कादंबरीचा? किती छान लिहिलीय ना कादंबरी त्या बाईंनी? त्यांना एकदा भेटायला हवं. मला तर काही वेळा त्यात आईच दिसत होती, आणि आजचा भाग वाचून तर आईविषयी कणव दाटून आलीय. कधी एकदा तिला भेटतो असं झालंय. तिला असं वाटायला नको की ती मला नकोशी झालीय. दे लवकर आईचा चहा दे, तिला नेऊन देतो.’’ नकोशीचा मुलगा म्हणाला.
‘‘आई, तुझ्या आवडत्या कादंबरीचा आज शेवट झाला वाचलास का ग?’’ म्हणत त्याने दार ढकललं. तर नकोशी शांतपणे अनंतात विलीन झाली होती.
हातात मोबाईल होता आणि त्यावर तिच्या वेगळ्याच फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केलेली ‘नकोशी’ कादंबरीचा शेवटचा भाग.
कमेंटवर कमेंट पडत होत्या पण त्याला रिप्लाय देणारी नकोशी मात्र आता परमेश्वराला हवीशी झाली होती.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
=============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============