
अंजली आणि तिची आई दोघी धापा टाकत नवीन घराच्या पायऱ्या चढत होत्या. अंजलीचे वडील रत्नाकर हे सरकारी अधिकारी असल्याने त्यांची बदली सतत वेगवेगळ्या ठिकाणी होयची. ह्या वर्षी त्यांची बदली अहमदनगर मध्ये झाली. अहमदनगरमध्ये मुळा डॅम जवळ सुंदर आणि प्रशस्त बंगला त्यांना राहायला दिला होता. चार खोल्यांचं मोठं कौलारू घर, समोर प्रशस्त बाग आणि परसदारीही खूप सारी हिरवीगार झाडे हि त्या घराची खासियत.
अंजलीचा नुकताच बारावीचा निकाल लागला होता. त्यामुळे हे बरं झालं होतं कि तिला अर्धवट शाळा…. कॉलेज न सोडता…. नव्याने आता नवीन ठिकाणी सुरुवात करता येणार होती. अंजलीला लगेच बी.ए. च्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला. थोड्याच दिवसात अंजलीच्या सुट्ट्या संपल्या आणि तिचं कॉलेज चालू झालं. पहिल्या दिवशी अंजली थोडी गोंधळलीच होती. नवीन कॉलेज, नवीन जागा, नवीन शहर सगळं तिच्यासाठी नवीनच होतं. बाकी विद्यार्थ्यांना विचारपूस करता करता अंजली तिच्या क्लास रूम मध्ये पोहोचली.
आज तसाही सगळ्याच विद्यार्थ्यांचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे आजचा दिवस रितीनुसार सगळ्यांचं इंट्रो करून घेण्यातच गेला. अंजलीची वेळ आली तेव्हा तिने खूप आत्मविश्वासाने स्वतःची ओळख करून दिली.
“मी कु. अंजली रत्नाकर देशपांडे, अकरावी बारावी माझी साताऱ्याच्या “न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स” कॉलेज मध्ये झालं. बारावीला मला आर्टस् फॅकल्टीमधून ८४% मिळाले. मला फिरायचा आणि कविता करायचा छंद आहे. भविष्यात मला कवियित्री व्हावेसे वाटेनं.”
वर्गशिक्षिका – “अरे वाह!! आपल्याला एक कवियित्री मिळाली म्हणायचं मग”
स्वतःची ओळख सांगितल्यावर अंजली आपल्या जागेवर जाऊन बसली.
काही दिवसातच अंजलीचा काही मित्र आणि मैत्रिणींचा एक चांगला ग्रुप जमला. अंजलीसोबत अजय, स्वानंदी, संजय आणि मंजिरी असा ५ जणांचा मस्त ताळमेळ बसला होता. प्रत्येक जण कशा न कशात पारंगत होतं. कुणी नृत्यांगनांत, कुणाला वाचनाचा छंद तर कुणी अभ्यासात हुशार…. त्या ५ हि जणांत सगळ्यात बडबड्या आणि मनमिळाऊ स्वभावाचा कुणी असेल तर तो होता अजय…”अजय कुलकर्णी”. अजय बडबड्या तर होताच परंतु फार विनोदी स्वभावाचा…म्हणजे कुणाची कशी खेचायची हे त्याला चांगलंच जमायचं.
अंजली आणि त्याच्यात एक गोष्ट सामान्य होती ती म्हणजे दोघांनाही शेरो शायरीची आवड आणि त्यामुळे दोघांनाही कविता करायचा छंद होता. लेक्चर्स…आणि कधी लेक्चर्स ऑफ मिळाले कि गप्पा, विनोद आणि कविता…आणि कॅन्टीन मध्ये मोर्चा वळाला कि पुन्हा गप्पा, विनोद आणि कविता असा एकंदर दिवसभराचा क्रम त्यांचा ठरलेला असायचा. ग्रुप मध्ये अजय कुणाचीही टांग खेचल्यापासून राहायचा नाही. पण का कुणास ठाऊक अंजलीशी मात्र तो सांभाळूनच बोलायचा.
एके दिवशी स्वानंदी कामानिमित्त बाहेरगावी गेली होती आणि संजय आपल्या आईला भेटायला पुण्याला गेला होता. सकाळी कॅन्टीन मध्ये मंजिरी आणि अजय दोघे चहाची सुर्की मारत एकमेकांची गप्पा टप्पा करत होते आणि गप्पांसोबतच अजयने मंजिरीची घ्यायला सूरूवात केली.
अजय – “मांजरी म्हणू का गं मी तुला….?”
मंजिरी – “अज्या मांजरी नको म्हणू हं मला…नाहीतर मांजरीसारखाच पंजा मारिन बघ तुला. …”
तेवढ्यात अंजलीही त्या दोघांना शोधत कॅन्टीन मध्ये आली.
अंजलीला पाहून मंजिरी – “अंजली बरं झालं बाई तू आलीस….बघ ना मघापासून मला हा अज्या मांजरी म्हणून चिडवतोय आणि तेही मोठ्या आवाजात…कॅन्टीन मध्ये सगळे माझ्याचकडे बघतायेत बघ….”
तेवढ्यात अजय – “अंजली बरं झालं आली तू…आज वड्यांची पार्टी तुझ्याकडून….आहे का मंजूर?”
अंजली अजयला डोळे मिचकावून – “हो का नाही ..जरूर देईल कि पण आपल्या मांजरीने पंजा मारला नाहीतर..”
मंजिरी – “काय गं अंजली तू सुद्धा ?”
अजय – “शिकल्या शिकल्या अंजली मॅडम पण शिकल्या…शेवटी आपला गुण लागला म्हणायचं.”
अंजलीचे डोळेच एकदम चमकले होते. तिची कॉलर ताठ झाली होती कि आज तिने पहिल्यांदा कुणाची तरी खेचली…मनातल्या मनातच स्वतःला शाबासकी देत होती ती.
गप्पा टप्पांमध्येच अंजलीने सर्वांसाठी गरमागरम चहा आणि वडे ऑर्डर केले. तिघेही मस्तपैकी वाफाळलेला चहा आणि वड्यांवर ताव मारण्यात गुंग होते. यावर अभ्यासाची चर्चा आणि नवीन आलेल्या सिनेमावर विषय रंगत होता. असंच वर्ष उलटून गेलं आणि वर्षाच्या शेवटी रितीनुसार कॉलेज मध्ये संमेलनाचं आयोजन केलं होतं. मग त्यात काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश केला होता.
अजयने नेहमीप्रमाणेच प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला होता आणि आज कवी संमेलनाचा दिवस उजाडला होता.
त्यात अजयनेही भाग घेतला आणि एक छानसी कविता सादर केली होती ,
अँकर – आता रंगमंचावर आपली कविता सादर करण्यासाठी स्वागत करू या अजय कुलकर्णीचे….
अजयने अगदी हृदयाच्या तळापासून कविता सादर करायला सूरूवात केली …..
“माझ्या आठवणीतली ती”
कशी असेल माझ्या आठवणीतली ती….
मोहक हसणारी ती….
हसताना गालावर खळी पडणारी ती….
अबोली असणारी ती….
बोलताना हळूच जीभ चावणारी ती….
काम करताना गुणगुणणारी ती….
चालताना ओढणी सावरणारी ती….
मी आलो नाही म्हणून बावरणारी ती….
का आलो नाही म्हणून जाब विचारणारी ती….
माझ्या नकळत मस्करी करणारी ती….
घड्याळ्याच्या एक एक ठोक्याला माझी वाट पाहणारी ती….
खरंच असेल का हो माझ्या मनाचा ठाव घेणारी ती….
मिळेल का मला माझ्यातली ती….
माझ्या आठवणीतली “ती” – भाग १ क्रमश:
काय म्हणताय मग? मिळेल का अजयला त्याच्यातलीच आणि त्याच्या आठवणीतली ती?
त्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल
अजय पुन्हा येईल तुमच्या भेटीला पुढील भागात…तोपर्यंत घरीच राहा आणि सुखरूप राहा.
© RitBhatमराठी
====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.