Skip to content Skip to sidebar Skip to footer

माझ्या आठवणीतली “ती” भाग २

अजयने आपली कविता सादर केल्यावर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. कुणाच्या लक्षात नाही आलं पण कविता म्हणताना अजयचा नेम अंजलीवरच होता. ज्या दिवशी अंजली कॉलेज मध्ये आली अगदी त्यादिवसापासून अजय तिच्या प्रेमात पडला होता. परंतु हे त्याने कुणालाही कळू दिले नव्हते. अंजलीला सुद्धा नाही.

अंजलीही अजयला एक मित्र म्हणूनच बघायची. आणि कदाचित त्यासाठीच अंजलीचे भाव बघून, अजयने अंजलीला कधीच आपल्या तिच्यासाठीच्या भावना कळू दिल्या नाही. असेच दिवस गेले. वार्षिक परीक्षाही होऊन गेली आणि नुकताच शेवटचा पेपर झाला होता. पेपर देऊन सगळेजण कॅफे मध्ये बसले होते.

स्वानंदी – “बरं आता सांगा पाहू ह्या सुट्टीमध्ये कुणाचे काय काय प्लॅन आहेत. माझा तर ठरलेला आहे…मी मस्तपैकी आधी घरी जाणार आणि तिथून आमचा सगळ्या फॅमिलीचा शिमला मनालीला जायचा प्लॅन आहे!!!!”

संजय – “अरे वाह्ह! भारी की!! बरं आहे बुआ तुमचं…तुमचे आई वडील तुम्हाला सुट्टयांमध्ये फिरायला घेऊन जातात…इथं आमच्याकडे सुट्टीमध्ये घरी गेलो की पहिले २-३ दिवस…”आलं माझं लेकरू…आला माझा संज्या…किती सुकलं गं बाई माझं पोरगं….” असे लाड करतात आणि मग चौथ्या दिवसापासून पाठीत लाथ घालून शेतात दारे धरायला लावतात…साला इथं पण होस्टेलवर त्या अभ्यासापायी लवकर उठायला लागतं आणि घरी गेलो की त्या शेतापायी…. “

संजयच्या बोलण्यावर सगळेजण पोट धरून हसायलाच लागले.

संजय तोंड वाकडं करून  “हा हसा हसा तुम्ही….तुम्हाला हसायला काय जातंय….पाठीत रोज एक लाथ पडण तेव्हा कळण…”

“अरेरेरे!!!! बिचारा संज्या…लय जोरात लागतं आसन ना तुला??”   – अजय संजयची खेचत

मंजिरी – “ए आज्या बस्स झालं रे आता…खूप झालं त्याला चिडवणं…त्याची काय अवस्था झालीय बघ….बरं माझा प्लॅन पण ठरलेला आहे….मी मस्त कूकिंग आणि बेकिंग चे क्लासेस लावणार आहे आणि नवीन नवीन रेसिपीस ट्राय करणार आहे…”

अजय – “ए मांजरे…घरात जुलाबाच्या आणि पोटदुखीच्या गोळ्या आहे का..?”

मंजिरी – “हो आहेत ना….का रे..हव्यात का तुला ?”

“नाही नको गं…मला नको..तुझ्या घरातल्यांसाठी म्हटलं मी….त्याचं काय आहे तू आताच म्हणालीस की नवीन नवीन रेसिपीस ट्राय करणार आहेस….ते खाऊन तुझ्या घरातल्यांची तब्येत बिघडायला नको म्हणजे झालं!!!!” अजय मंजिरीला चिढवून लांब पळायला लागला.

“आज्या थांब आता तुला बघतेच… इकडे ये…..पळतो कशाला…” मंजिरीही त्याच्या मागे पळायला लागली…

मंजिरी धापा टाकत “बाई गं.. काय हा माणूस….नुसती खेचतंच असतो..बरं जाऊ दे…अंजली तुझा प्लॅन नाही सांगितला तू….”

अंजली – “उम्म्म…माझा काही खास प्लॅन नाहीये….पण आज मी तुम्हा सगळ्यांना कुणाशीतरी ओळख करून देणार आहे….”

स्वानंदी एकदम उत्साहात – “कोण गं? काय लग्न वगैरे जमलंय की काय”

अंजली – “नाही गं बाई…लग्न एवढ्या लवकर कुठे….”

तेवढ्यात एक हँडसम मुलगा अंजलीला शोधत कॅफे मध्ये पोहोचतो….

अंजली त्याला हाक मारून बोलावून घेते – “अभय!!!! इकडे….बघ….इकडे आहे मी”

अभय अंजलीच्या घोळक्या जवळ येतो….

अंजली – “हा आहे माझा बॉयफ्रेंड अभय….पुण्याच्या नामांकित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षाला आहे..”

मंजिरी – “काय!!!!! ओहो!! तुम तो बडे छुप्पेरुस्तम निकले…”

स्वानंदी – “हो खरंच की अंजली…हे मित्रांमध्ये असं लपवायचं नसतं बरं का काही…एका वर्षात तू काहीच नाही सांगितलं ह्याबद्दल….”

अंजली – “यार आता तुम्ही सुरु नका होऊ हा..असं काही नाहीये….मला सांगण्यासारखं नाही वाटलं कधी..आणि असा कधी विषयच नाही झाला ना आपल्यात..”

संजय – “तुझ्या आई बाबांना माहित आहे का? “

अंजली – “हो तेवढ्या बाबतीत आम्ही निश्चिन्त आहोत… खरं म्हणजे आमच्या दोघांच्याही आई बाबांची इच्छा आहे की आमचं लग्न व्हावं म्हणून…अभयचे बाबा आणि माझे बाबा दोघे चांगले मित्र आहेत आणि आम्ही फॅमिली फ्रेंड्स….”

अभय – “हाय..फार काही ऐकलं आहे तुमच्या सर्वांबाबत अंजली कडून…मैत्री असावी तर अशी…बरं चल अंजली उशीर होतोय आपल्याला..आज मी यायच्या खुशीत काकूंनी आमरसाचा प्लॅन केला आहे.”

अंजली – “अरे हो आई म्हणालीच होती की आज लवकर ये म्हणून…चला रे निघते मी…बाय…हैप्पी व्हॅकेशन टू ऑल….बाय!!!!”

संजय – “अरेच्चा! हिचा बॉयफ्रेंड आला अन आपल्याला विसरूनच गेली बुआ…. पाखरू भुर्र्कन उडून गेलं की…”

स्वानंदी – “जाऊ दे रे…तुला तुझी मिळाली मग बघतोच आम्ही कसा आमच्यासोबत वेळ घालवतो ते…”

तेवढ्यात अजय येतो – “अरे काय झालं …मी पाचच मिनिटांसाठी इथून गेलो तोवर काय झालं इथं…आणि ही अंजली कुणासोबत गेली…”

मंजिरी – “बॉयफ्रेंड आहे रे तिचा…काय हँडसम आहे ना रे …मस्त दिसतेय जोडी….”

संजय – “डोम्बल्याच हँडसम….नुसतं काडीसारखं बारीक…नाक दाबलंकी जीव जाईन..आपल्याकडे काय पोरांची कमी होती का…आता हा आपला अज्याच बघ काय कमी आहे त्याच्यात…दिसायला सुंदर…अभ्यासात हुशार…आपल्या कॉलेजचा एकमेव भावी कवी…काय आज्या खरं म्हणतोय का नाही मी?…आज्या ए आज्या ..”

अंजलीच्या बॉयफ्रेंड बद्दल ऐकल्यावर अजयच्या काळजावर जस कुणी दगड ठेवला होता असं वाटत होतं त्याला…संजयने आवाज दिल्यावर लगेच तो आपल्या तुंद्रित आला…”हा बोल संज्या काय म्हणतोय?”

संजय – “अरे केव्हापासून मी आवाज देतोय तुला…कुठं हरपला होतास…अरे मी बोललो की तुझ्यात काही कमी होती का ..तेव्हा अंजलीने काडिमाकडासारखा बॉयफ्रेंड शोधून आणला…

अजय – “छे!! काहीतरीच काय बोलतो संज्या तू….अरे तिच्यात अन माझ्यात काहीतरी साम्य आहे का रे…तिचे वडील एवढे मोठे सरकारी अधिकारी…त्यात माझ्या घरची परिस्थिती बेताची आणि आपल्या सारख्याला दारात तरी उभं करतील का ते….बरं चल उशीर होतोय मला….उद्या निघायचंय घरी…सकाळचीच बस आहे….बॅग भरावी लागेल…चला रे बाय बाय …भेटू आता २ महिन्यांनी “

मित्रांना बाय करून अजयने तिथून पळता पाय काढला आणि तो लगेच माघारी फिरला त्याचे ते डबके डोळे सर्वांपासून लपवायलाच….

क्रमश:

लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय “माझ्या आठवणीतली “ती” भाग ३ “

© RitBhatमराठी

 

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.