Skip to content Skip to sidebar Skip to footer

माझ्या सुनाच माझ्या मुली

कावेरीला दोन मुलं. दोन्ही मुलगे हुशार होते. मोठ्याचं लग्न नात्यातल्या मुलीशी लावून दिलं.. थोरल्या सुनेला,आसावरीला कावेरी मुलीप्रमाणे वागवायची. आसावरी आईवडिलांची एकुलती एक. तिचा ओढा तिच्या पालकांकडे जास्त होता. आसावरीची आई गेली. आसावरी उन्मळून पडली. सासूने सावरलं. आसावरीची दोन्ही बाळंतपणं आईच्या मायेने काढली. आसावरीला नोकरी लागली तर कावेरी म्हणाली..” जरुर कर नोकरी. तुला बाहेरचं जग पहायला मिळेल. मुलांकडे आम्ही दोघं आहोत नं.”

कावेरी नातरवांच्या खाण्यापासून शिकवण्यापर्यंत सगळं करायची. तिची जणू सेकंड इनिंग सुरु होती. सुनेला प्रमोशन्स मिळत गेली. तिला घरी यायला उशीर होई पण ती निर्धास्त. सासू होती ना तिच्या पाठीशी. कावेरीचे यजमान आजारी पडले…आजारपणं..हॉस्पिटलच्या वाऱ्या..शेवटी देवाज्ञा..कावेरीला आता फार एकटंएकटं वाटू लागलं. तिनं सारं लक्ष नातरवांच्या संगोपनावर केंद्रित केलं.

कावेरीचा धाकटा मुलगा राजूही नोकरीला लागला. त्याच्यासाठी स्थळं शोधण्यासाठी शब्द टाकणार तोच एके दिवशी तो एका मुलीला घरी घेऊन आला. राजश्री..दिसायला काळीसावळी पण तोंडावळा छान होता. पाणीदार डोळ्यांमधे आत्मविश्वासाची झलक होती.

कावेरीने त्यांना चहापोहे करुन दिले. मनात म्हणाली,’जोडा शोभून दिसतोय. राजूला विचारलं पाहिजे.’ निघताना राजश्री कावेरीच्या पाया पडली. कावेरीनेही तोंडभर आशीर्वाद दिला.

“छान आहे रे मुलगी. वागणंही विनम्र आहे.” राजश्रीला निरोप देऊन आलेल्या राजूला कावेरी म्हणाली.

राजू प्रसन्न हसला.

“आई,मला वाटलेलंच नव्हे खात्री होती..तुला माझी आवड नक्की आवडेल याची.”

“तसं असेल तर लवकरात लवकर बोलणी करुन घेऊ. तिच्या आईवडलांना भेटायला हवं. कुठे रहातात ते? काय करतात? गाव कुठचं? जात वगैरे..”

राजू क्षणभर गप्प झाला.

“अरे बोल ना काहीतरी. असा का घुम्यासारखा..” कावेरी वैतागून म्हणाली.

राजू धीर करुन म्हणाला,”राजश्रीला आईवडील नाहीत आई. ती अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली. सुशिक्षित आहे. बीएबीएड आहे.”

“काय बोलतोयस राजू तू. टाळकं ठिकाणावर आहे का तुझं? कोण कुठलं पाप्याचं पितर असेल ती..कुठल्यातरी गटारीत नको असलेलं म्हणून टाकलेलं..तिला आपण स्वीकारायची..समाज काय म्हणेल? हे शक्य नाही राजू. तिचा नाद सोड.” कावेरी कापत्या आवाजात ओरडली.

राजू म्हणाला,” आई,मला राजश्री आवडते. तिचे आईवडील कोण होते याच्याशी मला कर्तव्य नाही. मी लग्न करणार तर राजशीच.”

“अरे ती ना नात्याची ना गोत्याची. तिचा धर्म कोणता,जात कोणती..काही ठाऊक नाही..नि असंकसं लग्न करायचं म्हणतोस तिच्यासोबत?”कावेरीने स्पष्ट विरोध दर्शवला पण राजश्रीशिवाय राज दुसऱ्या कुणाची कल्पना करु शकत नव्हता.

“तू इथे राहू शकत नाहीस, तिला घेऊन. आम्हाला लोकांत रहायचं आहे. किती जणांना उद्या उत्तरं देऊ..तू स्वतंत्र रहा.”कावेरीने निर्वाणीचं सुनावलं.

कावेरीने हरतर्हेने राजूचं मन वळवून पाहिलं तरी राजूने राजश्रीशी लग्न केलं.

राजेश राजश्रीला घेऊन वेगळं राहू लागला. वर्षभरातच राजश्रीने जुळ्या मुलांना जन्म दिल पण त्या नातरवांना बघायलाही कावेरी गेली नाही. आईचं मन म्हणत होतं..जाऊ पण मग परत लोक काय म्हणतील..आधी नकार दिला. आता बघायला जाते..सून नीट वागली तर बरी. आधीचं उगाळत बसली तर सहन नाही व्हायचं. कावेरीच्या मनातलं द्वंद्व काही केल्या मिटत नव्हतं. उन्हाळे,पावसाळे येतजात होते. वर्षे मागे सरत होती.

मोठ्याची मुलं आता मोठी होत होती. त्यांचे मित्र येत तासनतास चकाट्या मारीत बसत. चपलांचे,बुटांचे पाय घरभर फिरवीत. कावेरीच्या डोक्यात तिडीक जाई. एकदा हे सहन न होऊन ती नातवाला ओरडली,” चपला घालून घरभर फिरु नका म्हणून सांग तुझ्या मित्रांना.”

मित्रांनी ऐकलं ते. ते निघून गेले. नातू कावेरीवर जाम भडकला. त्याने तिच्यावर हातदेखील उगारला.

तेंव्हाच थोरली सूनबाई,आसावरी ऑफिसवरून घरात आली. तिने सणासण लेकाच्या थोबाडीत मारल्या. कावेरीचं काळीज कलकललं.आपल्या बुरसटल्या विचारांमुळे यांच्या घरात अशांती नको असं तिला वाटून गेलं. तेंव्हापासनं तिचं जगच वेगळं झालं. नातवाने काहीही करुदेत. ती तोंडातनं ब्रदेखील काढायची नाही पण मनोमन खचत चालली होती.

व्रुद्धाश्रमात राहील तर तेवढे पैसे नव्हते तिच्या गाठीला. मुलांकडे मागावे तर स्वाभिमान आड येत होता तिचा. अशातच रात्रीची बाथरुमला गेली असताना पाय घसरुन पडली.मांडीचं हाड मोडलं. मोठ्याने धाटक्याला फोन केला. धाकटा बायकोला घेऊन इस्पितळात आईला भेटायला आला. त्याने विनवण्या केल्या. चल माझ्याकडे. कावेरीकडे पर्याय नव्हता. ती पराधीन झाली होती. थोरली बघेल तर तिला नेमका डेंग्यू झाला होता. तिला एडमिट करावं लागलं होतं.

कावेरीने मूक होकार दिला. धाकट्या सुनेने सासूचं छान स्वागत केलं. तिच्या मुली,आर्या,योजना अगदी गोड होत्या. आजीला येऊन बिलगल्या. धाकट्या सुनेने प्लास्टर काढीपर्यंत कावेरीची मनापासनं सेवा केली.

अनाथाश्रमाचा वार्षिक महोत्सव होता. राजश्री कावेरीला अनाथाश्रमात घेऊन गेली. म्हणाली,”आई, मी इथेच लहानाची मोठी झाली. जी काही मदत अनाथाश्रमाला मिळत होती ती संचालिका पिंगे बाई आम्हा मुलांच्या पालनपोषणासाठी,शिक्षणासाठी खर्च करत होत्या. आम्हा मुलांवर त्यांनी अतिशय उत्तम संस्कार केले. आता अनाथाश्रमाची धुरा पिंगे बाईंची सुकन्या रोहिणी व जावईबापू पहात होते. इतर माजी विद्यार्थ्यांशीही राजश्रीने कावेरीची ओळख करुन दिली. त्यातले कुणी डॉक्टर,कुणी रिक्षाचालक, कुणी नर्स तर कुणी सरकारी नोकर होते.

ते सारं वातावरण पाहून कावेरीच्या मनातला अनाथाश्रमाबाबतचा व तेथील मुलांबाबत निर्माण झालेला चुकीचा समज गळून पडला. तेथील लहान मुलांसाठी कावेरीने स्वतः पाच हजार रुपयाचं शैक्षणिक साहित्य देऊ केलं. त्या हसऱ्या निरागस चेहऱ्यांनी हात जोडत एका सुरात धन्यवाद काकू म्हंटलं. सर्वांनी एकत्र अल्पोपहार केला.

कावेरीला एक वेगळं जग आज दिसलं होतं. लोक काय म्हणतील, चार डोकी आपल्याला मान देतील का? आपलं म्हणतील का? हे सारे प्रश्न त्या आश्रमातील निर्मळ वातावरणापुढे तिला दुय्यम जाणवले. मुलगा राजू बरोबरच होता,आहे याची खात्री पटली. तिने राजश्रीचे हात हातात धरले. काही बोलण्याआधी भरुन आलेल्या नेत्रांतली दोन टिपं राजश्रीच्या हातावर पडली. राजश्रीने सासूचे हात हातात घेऊन स्नेहाने दाबले. त्या स्पर्शात आपुलकी,जिव्हाळा,मान,..सारं काही होतं.

थोरली सून,आसावरी मुलासह येऊन भेटून गेली. नातू आजीला सॉरी म्हणाला. कावेरीने त्याला जवळ घेतलं. त्याच्या कपाळाचा मुका घेतला. आई,तुम्हाला यावंसं वाटलं की एक फोन लावा बस..थोरली सून सांगून गेली.

कावेरीला आता दोन मुली मिळाल्या होत्या सुनांच्या रुपात.

–सौ. गीता गरुड.


Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.