Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® विश्वनाथ घनश्याम जोशी

“एक सज्जन, परोपकारी व जाणता माणूस म्हणून गाव त्यांच्याकडे आदराने पहायचा.”

“अडीअडचणीला धाव घ्यावी असा माणूस.”

“हल्लीच्या काळात जो तो आपला स्वतःचा स्वार्थ बघतो. तात्यांसारखा निस्वार्थी माणूस विरळाच.”

पिंडाला नमस्कार करण्यासाठी आलेले आप्तेष्ट अहमहमिकेने तात्यांचे थोरपण सांगत होते आणि आडून आडून आपलीही थोरवी ऐकवत होते. शेजारच्या जनुभाऊनी एव्हाना आपल्याभोवती आठ-दहा श्रोते गोळा केले होते.

“गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या सौजन्याचा फायदा घेऊन आपापला कार्यभाग साधला. मी मात्र त्यांच्या कडून कधी एका पैचीही मदत घेतली नाही. एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे माझ्या तत्वात नाही बसत.” इति जनुभाऊ. खरंतर या जनुभाऊनी बऱ्याचदा तात्यांना भरीस पाडून आपली कामे साधवून घेतलेली आहेत. हेच जनुभाऊ तात्यांच्या परोक्ष गावात वेगळच बोलायचे. “म्हाताऱ्याने भरपूर पैसा जमा करून ठेवलाय. त्याला म्हणावं इथल्या नोटा स्वर्गात चालत नाहीत.”

जनुभाऊंच्या अशा प्रचारामुळे गावातल्या बऱ्याच लोकांनाही वाटायचं की तात्यांकडे पैसा आहे. कसा कोण जाणे किंवा तात्यांच्या दुर्दैवाने म्हणा हेमंतदादा सुद्धा हल्ली या गोष्टीवर विश्वास ठेऊ लागला होता. शिवाय वहिनी येताजाता त्याचे कान भरत राहायची.

“तुम्ही डोळ्यांवर कातडं ओढून ठेवलंय. मग घरात सध्या काय चाललंय ते तुम्हाला दिसेल कसं ? सगळी ‘माया’ लाडक्या मुलीकडे जाऊन पोहोचली. तुमच्या राज्याला पत्ता तरी आहे का?”

“असला बाप मात्र कुठे पाहिला नाही ग बाई.”

“तुमचा बाप जिवंत असे पर्यंत माझी हौसमौज काही या घरात व्हायची नाही.”

वहिनीच्या शब्दांमधला हा विखार हल्ली हेमंतदादाच्याही डोक्यात भिनू लागला होता. तात्यांनी आपलं डबोलं आणून माझ्याकडे ठेवलंय ही गोष्ट हेमंतदादालाही हल्ली खरी वाटू लागली होती.

आणता येईल तेवढं दुःख चेहऱ्यावर आणीत सीतामावशी आत आली आणि माझी विचार शृंखला तुटली. ही वहिनीची दूरची मावशी. त्यामुळे साहजिकच वहिनीनेही होता होईल तेव्हढी शोकविव्हलता चेहऱ्यावर आणीत तिला मिठी मारली.

“मला पोटच्या मुली सारखी वागवायचे ग. मी सासरी आहे असं मला कधी वाटूच दिलं नाही. हल्ली फार हिंडणं फिरणं जमत नसे. दिवसभर वरांड्यात बसून असायचे.” ते काही काम करत नसत हे ही आडून सूचित केलंच.

“वडील माणूस कस नुसतं घरात बसून असलं तरी पुरतं. वडील माणसाशिवाय घराला शोभा नाही हो.” याला जोडून पुढे हुंदक्यावर हुंदके आणि त्याला सीतामावशीकडूनही तसाच प्रतिसाद.

“हॅलो चेक ! माईक टेस्टिंग वन टू थ्री !” गावातील देवळाच्या सभामंडपात लाउडस्पीकर गर्जू लागला. त्यामुळे वहिनी आणि सीतामावाशीचं पुढचं बोलणं ऐकू आलं नाही.

दुपारच्या मुहूर्ताला सभामंडपात दत्तू सावंताच्या मुलीचं लग्न होतं. त्याचा डांगोरा गावभर पिटण्यासाठीच हा लाउडस्पीकर लावला होता. खरं तर दत्तू सावंताकडे तात्यांचे फार चांगले सबंध होते. तात्यांच्या मदतीने त्याने एक महत्वाची कोर्टकेस सुद्धा जिंकली होती. ठरलेल्या मुहूर्ताला लग्न हे व्हायचंच. परंतु तात्यांच्या दशपिंडाच्या दिवशी दत्तू सावंत गावात लाउड स्पीकर वाजवील अस वाटल नव्हत. असो ! जिथं पोटचा मुलगाच बापाला मानीत नाही तिथं इतरांच काय घेऊन बसायचं?

तात्यांनी इतरांना भरभरून दिलं. पण इतरांकडून त्यांना मिळाली ती फक्त उपेक्षा. आयुष्यभर त्यांनी पुष्कळ कष्ट सोसले. पण या स्वार्थपरायण जगाचा व्यवहार मात्र त्यांना कधी कळलाही नाही आणि जमलाही नाही. कष्ट त्यांनी उपसले; उपभोग इतरांनी घेतले. हाल त्यांनी सोसले; फळे भलत्यांनीच चाखली.

आपला मुलगा शिकून सवरून मोठा व्हावा म्हणून त्यांनी हेमंतदादाला मुंबईला ठेवले होते. स्वतः गरिबीत राहून ते दर महिन्याला हेमंतदादाला पैसे पाठवत असत. तेथील उच्च शिक्षण काही हेमंतदादा पूर्ण करू शकला नाही. पण तात्यांनी पाठवलेले पैसे उधळण्यात मात्र त्याने कोणतीही हयगय केली नाही. मुंबईहून परत येताना डिग्री नाही आणली, पण तात्यांसाठी एक कजाग व कपटी सून मात्र आणली.

सदुकाका हे तात्यांचे धाकटे बंधू. आपल्या परिस्थितीचे रडगाणे गाऊन तात्यांकडून पैसे उकळण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी तर जवळ जवळ अर्धा खर्च तात्यांना सोसावा लागला होता. तात्यांकडे तरी एवढे पैसे कुठले असायला. गावातल्या सोसायटीतून कर्ज घेऊन त्यांनी काकांना पैसे दिले होते. तात्यांनी अशी अनेकांची नड भागवली होती. पण त्यांच्या स्वतःच्या अडचणीच्या वेळी मात्र कुणीही त्यांना मदत करायला पुढे येत नसे. अर्थात् तात्यांची तशी अपेक्षाही नसायची. 

माझं लग्न ठरलं तेव्हाची गोष्ट. तात्यांच्या हातात त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते. वयपरत्वे त्यांना फार दगदग झेपत नसे. माझ्या लग्नासाठी तात्या आपल्याकडे मदत मागतील या भीतीने सदुकाका आधीच येऊन आपली रडकथा सांगून गेले. हेमंतदादाला तर वहिनीने ताकीदच देऊन ठेवली होती.

“अनुच्या लग्नात पदरचा एक पैसा देखील खर्च करायचा नाही. सांगून ठेवते. नसल्याचं दाखवत असले तरी त्यांच्याकडे पैसा आहे. शिवाय आपलाही वाढता संसार आहे.”

सुदैवाने माझ्या सासरच्या लोकांनी हुंडा किंवा अन्य कोणतीही अट घातली नाही. कार्य निर्विघ्नपणे पार पडले. माझ्या लग्नानंतर तात्या मात्र अगदी एकाकी पडले. माझी आई तर मी चौदा वर्षांची असतानाच मला आणि तात्यानाही पोरकं करून निघून गेली होती. आई तात्यांना खूप जपायची. कामात असले म्हणजे तात्यांना जेवणाचीही शुद्ध नसायची. पण आईचं नेमकं उलट असायचं. कितीही कामात असली तरी तात्यांच्या जेवणाची अथवा चहाची वेळ कधी चुकली नाही. परलोकाच्या प्रवासाला जाताना मात्र तात्यांना चुकवून ती एकटीच पुढे निघून गेली.

जेवण्या खाण्याच्या बाबतीत तात्यांच्या खास अशा काही आवडी नव्हत्या. दिवसातून तीन-चार वेळा चहा मात्र लागायचा. दुपारच्या चहाबरोबर तोंडात टाकायला त्यांना शेव किंवा तत्सम काहीतरी हवं असायचं. आई असेपर्यंत तात्यांसाठी ठेवलेला शेव-चिवड्याचा डबा कधी रिता झाला नाही. दुपारच्या चहासोबत शेव अथवा चिवड्याची एक लहानशी बशी त्यांच्या समोर न चुकता ठेवली जायची.

आई गेल्यावर तात्याचं सर्व वेळापत्रक मी सांभाळायची. त्यासाठी मला येता जाता वाहिनीचे टोमणे व उठता बसता दादाची बोलणी खावी लागली. तात्यांची आबाळ झाली तर आईच्या आत्म्याला शांती लाभायची नाही अस माझं मन मला सांगायचं. त्यामुळे दादा-वहिनीचा जाच सहन करून सुद्धा मी आईचं व्रत मोडलं नाही. मी सासरी गेल्यावर तात्या पूर्णपणे एकाकी पडले. ज्याच्याशी सुखदुःखाच्या चार गोष्टी बोलाव्यात असं एकही माणूस त्यांच्याजवळ राहिलं नाही.

लग्नानंतर साधारण तीनेक महिन्यांनी मी पहिल्यांदाच माहेरपणाला आले होते तेव्हाची गोष्ट. मी तात्यांना सासरच्या गोष्टी सांगत बसले होते. चहाची वेळ झाल्यावर मी विचारलं – “तात्या, चहा करू का तुमच्यासाठी?”

“टाक एक कपभर. तुही घे थोडासा.” मी स्वयंपाकघरात जायला वळणार तोच पुढे म्हणाले – “अनू, शेव आणला असशील तर चहासोबत थोडा देशील?”

तात्यांचा दीनवाणा चेहरा आणि कातर स्वर मला सारं काही सांगून गेला. मला गलबलून आलं. डोळ्यातील पाणी लपवीत “आणते हं ” अस म्हणून मी लगबगीने स्वयंपाकघरात गेले. परत सासरी निघण्याआधी मी शेव-चिवड्याचा एक डबा तात्यांकडेच वेगळा ठेवून दिला. त्यानंतर कधी ह्यांना पाठवून तर कधी इतर कुणामार्फत मी तात्यांसाठी वरचेवर डबा पाठवायचे. आणखी काही खास पदार्थ केलेला असल्यास तोही पाठवायचे.

असाच काही काळ गेला आणि एक दिवस हेमंतदादाचं एक पत्र येऊन थडकल. त्या पत्रातले शब्द म्हणजे जणू धगधगते अंगारकणच. आठवण झाली की अजूनही गलबलून येतं.

‘सौ. अनुराधास

अनेक आशीर्वाद,

इकडील सर्व क्षेम आहे. हल्ली तुझ्याकडून शेव व चिवड्याची पार्सलं वरचेवर आमच्या घरात येत असतात. त्यामागचं कारण कळलं नाही म्हणून हे पत्र पाठवतोय. तू श्रीमंत घरची सून. त्यातून तात्यांच्या मायेचा ओघही तुझ्याचकडे वाहतोय. तुमच्या मानाने आम्ही तसे गरीबच. परतू गरीब आहोत याचा अर्थ अन्नाला मोताद झालो आहोत असा नव्हे. तुझ्या लाडक्या तात्यांसह आम्ही सर्व जण तिन्ही वेळेला पोटभर जेवतो. तेव्हा कृपया यापुढे पार्सलं पाठवायची तसदी घेऊ नये. तुझ्या पार्सलांमुळे गावात माझी छी-थू होते आहे. लोक तात्यांची कीव करताहेत व तुझे गुण गाताहेत. माझ्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा तुझा हेतू सफल झाला या आनंदाप्रीत्यर्थ तुझ्या गावात हवे तर पेढे वाट. परंतु तुझी पार्सलं यापुढे माझ्या घरात येता कामा नयेत. तुझ्या श्रीमंतीचा जो काय टेंभा तुला मिरवायचा असेल तो तुझ्या गावातच मिरव. तात्यांना आम्ही नीट जेऊ-खाऊ घालतो की नाही हे पाहायला म्हणून गरीबाघरी कधीतरी पायधूळ झाडलीस तरी आमची हरकत नाही.’

कळावे

                                                      तुझा दादा

त्या पत्रानंतर मी तात्यांना कधीही काहीही पाठवलं नाही. महिन्या दोन महिन्यातून एकदा मी तात्यांना भेटून यायची. घरातही दादा आणि वाहिनीने बरीच आगपाखड केली असावी. कारण त्यानंतर तात्यांनी चहा पिणेच बंद करून टाकले. जे ताटात वाढून समोर येईल ते मुकाट्याने खायचे. आपण होऊन कधीही काहीही मागायचं नाही असं व्रत त्यांनी घेतलं.

ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. एखादा वृक्ष जमिनीत ओलावा असेपर्यंत वादळाचे तडाखे झेलीत प्रखर उन्हाचे चटके सोशीत ताठ उभा राहतो. जमिनीतला ओलावा संपल्यानंतर मात्र लगेच कोमेजुन जातो; करपून जातो. तात्याचंही तसच झालं असावं. आई असेपर्यंत त्यांनी कष्टाचे अनेक डोंगर पार केले. परिस्थितीचे दाहक चटके सोसले आणि तरीही ताठ उभे राहिले. आईबरोबर त्यांच्या जीवनातील मायेचा ओलावा संपला. त्याचं जीवन एक वैराण वाळवंट झालं. कुठं मायेचा झरा नाही की सुखाची हिरवळ नाही. एके काळी कल्पवृक्षासारखे साऱ्यांना हवं ते देणारे तात्या आज एखाद्या वठलेल्या वृक्षासारखं जिणं जगत होते.

दहा दिवसांपूर्वी मी तात्यांना भेटायला माहेरी आले होते. त्यांच्या जवळ बसून प्रकृतीची विचारपूस करत असताना वहिनी तिथे आली व नेहमी प्रमाणे आग ओकली. त्या रात्री तात्या जेवले नाहीत. रात्री झोपल्याठिकाणीच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा आत्मा शरीराच्या पिंजऱ्यातून मुक्त झाला. त्यांचा मुलगा व सून हौस व मौज करायला मुक्त झाली. त्यांची स्तुति-स्तोत्रं गाण्यासाठी आप्तेष्टांचे कंठ मुक्त झाले. ज्यांनी त्यांच्या कडून पैसे उसने घेतले होते ते सारे ऋणमुक्त झाले. मीही त्यांच्या काळजीतून कायमची मुक्त झाले.

एकंदरीत सगळ्यांनाच मुक्ती मिळाली होती.

दादाच्या हाकेने मी पुन्हा भानावर आले. “ अग अनू, आतून थोडा शेव व चिवडा आणून पानावर वाढ बरं. तात्यांना फार आवडायचा.”

अनावर झालेले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करीत मी शेव आणायला धावले. तिकडे देवळाच्या सभामंडपात लाउडस्पीकरवर गाणं वाजू लागलं – ‘जन पळभर म्हणतील हाय हाय | मी जाता राहील कार्य काय |’

        —— विश्वनाथ घनश्याम जोशी 

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *