Skip to content Skip to sidebar Skip to footer

स्वतः मध्ये बदल करून, यशाच्या इतक्या उंचीवर नेऊन ठेवा की लोकांना बघताना मान वर करावी लागेल.

motivational lekh in marathi: मित्रांनो आयुष्य म्हटले की, संघर्ष तर आलाच आणि तो असायलही हवाच ना ?? नाहीतर संघर्ष न करता जर सगळ्या गोष्टी, सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हायला लागल्या तर मग त्याची किंमत उरणार नाही आणि जगण्याला मजा पण येणार नाही. त्यामुळे संघर्षाची भीती ठेवायची नाही तर त्याचा नेटाने सामना कसा करता येईल हे शिकायचे.

पण अनेकदा होते काय की, आपल्या वाट्याला आलेला संघर्ष आपल्याला इतरांपेक्षा खूप जास्त आहे असेच वाटत रहाते किंवा मग संघर्ष करण्याची, संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली की आपण आपल्या नशिबाला, कर्माला दोष देऊन मोकळे होतो. नाहीतर मग देवाकडे जाऊन गाऱ्हाणे गातो की बाबा रे तुला मीच सापडले / सापडलो का अशी परीक्षा घ्यायला ?? माझ्याच वाट्याला नेहमी अशी संकटे का ?? म्हणून रडत रहातो.

खरतर संघर्ष किंवा संकटे प्रत्येकालाच असतात. पण प्रत्येकाला ती बाकीच्यांच्या मानाने जास्त वाटतात. कदाचित परिस्थिती वेगळी असू शकते किंवा मग प्रमाण कमी जास्त पण ती असतात हे मात्र नक्की.

भगवान कृष्ण, भगवान विष्णू,भगवान शंकर, द्रौपदी, देवी राधा, भगवान राम, देवी सीता अशा कितीतरी देवतांना जिथे कर्माचे भोग चुकले नाहीत तिथे आपण तर अगदीच सामान्य व्यक्ती आहोत. मग तो त्रास आपल्या वाट्याला आला तर बिघडले कुठे ?? आपल्या आयुष्यात जी काही माणसे येतात ते भेटण्यामागे काहीना काहीतरी कारण असते, जुने ऋणानुबंध असतात.

—————————

असे म्हणतात की, झाडाची पाने पण इश्वरी मर्जी शिवाय हलत नाहीत मग आपल्या आयुष्यात तरी विनाकारण कसे काय काही घडेल ?? त्या त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही ईश्वरी खेळ किंवा लीला लपलेली असते म्हणूनच ठराविक वेळी ठराविक माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात ज्यांना आपण नात्यांच्या रूपात स्वीकारतो. मग ते आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, मुले, मित्र, नातेवाईक असे कोणीही असो पण त्यांना आपण कर्मानुसार देणे लागत असतो म्हणून मग त्यांच्या रुपात कधी त्रास होतो तर कधी आनंद.

भगवान कृष्णाने भगवत गीतेच्या रुपात जीवनाचे सार अगदी अचूक मांडले आहे. आपल्याला रोजच्या जगण्यात अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे मिळत नाहीत म्हणून जास्तच त्रास होतो आणि परिणामी चिडचिड होते. पण त्यासाठी गीता फक्त न वाचता नीट समजून घेतली तर प्रश्न पडणार नाहीत आणि आयुष्य जगण्याचा सुंदर मार्ग समोर असेल हे नक्की.

हे करून पहा आयुष्य कधीच किचकट वाटणार नाही

तुम्ही कधी ब्रह्ममुहूर्तावर जागे झाला आहेत का ? ? तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय ?? तर रात्र संपून पहाट किंवा सकाळ होण्याची वेळ. ही वेळ साधारण पहाटे तीन ते चारच्या दरम्यान असते. मित्रांनो रात्र संपून सकाळ होण्याच्या आधी खूप काळोख असतो, इतका की काहीच दिसत नाही. पण त्याच वेळी काळोख संपून म्हणजेच रात्र संपून नवा दिवस उगवणार असतो म्हणजेच सूर्य उगवण्याची वेळ जवळ येत असते.

आपल्याही आयुष्यात जेंव्हा संकटे येतात तेंव्हा आपल्यालाही जगण्याचा, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा होतो, सगळा अंधारच आहे असे वाटायला लागते पण ती वेळ असते संकटांच्या अंतिम टप्प्याची. तो टप्पा एकदा न डगमगता पार केला की मग उगवता सूर्य हमखास तुमची वाट पहात आहे हे नेहमीच लक्षात ठेवावे आणि संकटाना खचून न जाता सामोरे जाऊन येणाऱ्या प्रकाशाचे स्वागत करावे.

तुम्ही कधी वडाचे झाड पहिले आहे का ?? नकीच सगळ्यांनी पाहिले असणार. हे झाड जितके मोठे तितकेच मुलांना घट्ट धरून ठेवणारे असते. याउलट दलदलीत, चिखलात असलेली झाडे ही दिसायला नाजूक आणि सुंदर असतात खरी पण वाऱ्याच्या हलक्या झोक्याने कोलमडून पडणारी पण असतात. वडाच्या झाडाची पाने उन्हाळ्यात पडून जातात पण कितीही जोरदार वाऱ्यात ते झाड कधीच कोलमडून पडत नाही. कारण त्याची मूळ जमिनीला घट्ट धरून असतात.

—————————

आपल्या आयुष्यात मित्र आणि शत्रू सगळेच असतात. खरतर दोन्ही महत्त्वाचे आहेत. आपले मित्र आपल्याबद्दल नेहमीच चांगला आणि सकारात्मक विचार करतात तर शत्रू शारीरिक, आर्थिक आणि मानसिक हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतात. पण ही हानी जर नकोच असेल तर एक छान मंत्र सांगते आणि तो म्हणजे आयुष्यात शत्रूच बाळगू नका. सगळ्यांना मैत्रीच्या धाग्याने छान गुंफून टाका म्हणजे त्रासच होणार नाही. कारण मित्रांनो वाईटाला वाईटाने नाही तर चांगल्या वागण्याने जिंकता येते. अन्यायाला न्यायाने लढा देता येतो. रागाला रागाने नाही तर माफ करण्याने जिंकता येते.

म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य आणि नीट विचार करा कारण चुकीचे विचार आणि त्यातून निर्माण झालेली कृती कधी आयुष्य उद्ध्वस्त करेल कळणार ही नाही.

आपल्याला एखादी नवीन गोष्ट घडवायची असेल तर जुने मोडावेच लागते ही अत्यंत साधी गोष्ट आहे. बघा पावसाळा सुरू होणार म्हटले की उन्हाळ्यात झालेली झाडांची पिकलेली पाने, आणि खुंटलेल्या झाडांची वाढ होण्यासाठी झाडांची काही फांद्या आणि पाने आपण तोडून टाकतो. कारण झाडांच्या योग्य वाढीसाठी तेच योग्य असते. पण आपण जुन्याच फांद्यांना आणि पानांना गोंजारत राहिलो तर वाढ तर होणारच नाही उलट खुंटेल. आपले ही अगदी तसेच आहे. चुकीचे, नकारात्मक विचार आपण तसेच मनात ठेवत असू, तसाच विचार करत असू तर तसेच आपल्या आयुष्यात पण घडेल आणि आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

———————–

सोने कोणाला प्रिय नाही ?? स्त्रीवर्गातच नाही तर पुरुषवर्गात पण कोणाला सोन्याचा मोह आवरता आला नाही. पण हे सोने जमिनीतून खणून काढल्यानंतर एका गोळ्याप्रमाणे असते. त्याला एखाद्या दागिन्यांचे स्वरूप देण्यासाठी छनी, हतोड्याचे असंख्य घाव सोसावे लागतात तेव्हा कुठे त्याला दागिन्यांचे रूप प्राप्त होते आणि मग त्याला मोल येते. तसेच स्वतःच्या निर्मितीसाठी म्हणजेच विचार घडवण्यासाठी योग्य तो वेळ द्या आणि मग तुम्ही यशाची इतकी उंची गाठाल की सगळे तुमची उंची बघण्यासाठी माना वर करतील.

वीरता कशाला म्हणतात जिंकणे म्हणजे वीरता नाही तर आलेल्या संकटाना उत्तर देण्यासाठी नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवणाऱ्याला वीर पुरुष म्हणतात.

साहस म्हणजे युद्ध करणे नाही तर कोणत्याही वेळी संकटासमोर उभे राहण्याचा स्वभाव म्हणजे साहस.

शौर्य म्हणजे कधीही न पडणे नाही तर पडल्यावरही पुन्हा उठणे म्हणजे शौर्य. म्हणजेच सतत, अविरत कष्ट करणे म्हणजेच शौर्य.

आणि शौर्यवानाला विजय म्हणजेच यश नक्कीच मिळते.

तर मित्रांनो आलेल्या संकटांना घाबरु नका, हारून खचून जाऊ नका तर येणाऱ्या नवीन दिवसाची सुरुवात समजून नेटाने पुढे जा आणि विजयी व्हा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !!!!

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.