मदर्स डे (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
©️®️ मिथून संकपाळ
“पिंकी, ए पिंकी.. उठ पटकन् आणि आवर आता झोपून राहू नको, मी निघाले बघ”
पटापट पावले टाकत ती निघाली आपल्या कामावर. जेमतेम २ किलोमीटर चालली तेव्हा ती पोचली बंगल्यावर.
आत जाताच तिने स्वयंपाक घराचा ताबा घेतला. नीट वाट करतच होती इतक्यात कानावर आवाज आला..
“कविता, थांब एक मिनिट मी आले, तोवर नाश्ता बनव फक्त”
“व्हय रीनाताई”
नाश्ता बनत आला होता इतक्यात रीना तिच्याकडे आली, “झाला का नाश्ता बनवून? आज ना आपण केक बनवायचा आहे”
“पण ताई, मला न्हाई येत केक”
“ते काही मला माहित नाही का, तू फार फार तर पोहे, मिसळ आणि अगदीच खास म्हटले तर डोसा बनवू शकतेस.. त्याचं पण नाव काय तर – आंबोळी म्हणे”
नेहमी प्रमाणेच कविताला रीना चा टोमणा आवडला नाही, दुर्लक्ष करत ती म्हणाली “आज कुणाचा वाढदिवस हाय का?”
“अग बाई, आज mother’s day आहे ना म्हणून आई साठी मला केक बनवायचा आहे, आता lockdown मुळे केक शॉप बंद आहेत ना, म्हणून घरीच बनवावा लागणार”
“पण केक तर वाढदिवसाला कापत्यात ना?”
“आता तू तुझे प्रश्न बाजूला ठेव आणि सांगते तसे कर पटकन” असे म्हणत रीना ने तिला सूचना वजा रेसिपी सांगायला सुरुवात केली.
रीना च्या सूचना आणि कविताचा हातभार यांच्या संगतीने काही वेळात केक तयार झाला.. कविता केक पाहून खुश झाली कारण आयुष्यात पहिल्यांदा तिने असे काही बनवले होते. रीना ही म्हणाली, “जमला की ग तुला, आता फावल्या वेळेत केक च्या ऑर्डर्स घेत जा.. पण त्यासाठी चे सामान तुला कुठे परवडणार आहे म्हणा” असे म्हणत पटकन कविताच्या क्षणिक आनंदावर पाणी सोडले.
रीना स्वयंपाक घरातून बाहेर पडली तिच्या आई ला आवाज देतच, “आई, आवरला की नाही तुझा मेकअप, बघ केक पण रेडी झाला. आता ये बरं पटकन मला सेल्फी काढायचा आहे तुझ्या सोबत. माझ्या सर्व friends नी स्टेटस लावले सुध्दा”
कविता ला कळत नव्हतं की काय सुरू आहे, ती आपल्या पुढच्या स्वयंपाकात लागून राहिली. काही वेळानी तिला हसण्याचा, टाळ्यांचा आवाज ऐकू आला तशी ती बाहेर डोकावली.
मालकीण बाई आज खूपच छान तयार झाल्या होत्या, प्रत्येकजण त्यांना केक भरवत होते, फोटो काढत होते, टाळ्या वाजवत होते.
तिला ते दृश्य पाहून खूप भारी वाटत होते. त्या विचारात तिने पुढच्या तासाभरात आपले बाकीचे काम संपवले अन् परवानगी घेत जायला निघाली, “रीनाताई निघाली बरं का मी, मालकीण बाई येते ओ”
तिचा आवाज ऐकून मालकीण बाई बाहेर आल्या आणि कविताच्या हातात केक चा तुकडा ठेवला, “घे, तू बनवलेला केक कसा झालाय बघ तरी” कविताने तो कागदात गुंडाळून घेतला आणि निघाली.
पण तिला आताच्या मालकीण बाई आणि तासभर पूर्वीच्या मालकीण बाई यात खूप फरक दिसत होता.
“रीना ताई दिसत न्हाईत, त्यासनी सांगा म्या गेले म्हणून”
“हो, असतील सगळे इथेच कुठेतरी. फोटो काढून झालेत, आता मला एकटीला सोडून बसले असतील माझ्यावरच प्रेम जगाला दाखवत”
“म्हणजे?”
“काही नाही, तू ये आता. उशीर होईल तुला.”
ती हिरमुसल्या चेहऱ्याने घरी निघाली, आता तिचा चालण्याचा वेग पण मंदावला होता आणि ती विचार करत होती, मालकीण बाई असं का म्हणाल्या असतील.
ती घरी पोचली आणि आत जाताच अवाक् झाली, समोरच्या भिंतीवर चार फुगे, मोडकळीला आलेलं छोटं टेबल आणि त्याच्यावर ताटात काहीतरी झाकून ठेवलेलं.
“पिंकी, अगं काय ग हे?”
१२ वर्षांची पिंकी आतल्या रूम मधून बाहेर आली “happy mother’s day आई, बाबू तू पण म्हण बरं”
तसा ६ वर्षांचा बाबू सुध्दा म्हणाला, “ह्यापी मलल दे आई”
कविताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, आपल्या दोन्ही मुलांना तिनं कवटाळले आणि त्या शुभेच्छाना तिने अश्ररुपी प्रतिसाद दिला.
“आई, बघ मी तुझ्यासाठी काय बनवलय” असे म्हणून पिंकीने ताटाकडे बोट दाखवले.
कविताने उघडून बघितले तर त्यामधे तिला ३ वडे दिसले, तिला आश्चर्य वाटलं अन् कौतुकही. आपल्या मुलीने आपल्यासाठी स्वतःच्या हाताने हे बनवले.
कविताने एक वडा घेवून एक – एक घास बाबू आणि पिंकी ला भरवला, तिसरा घास स्वतः खाल्ला आणि तो “तिखट केक” खावून ती तृप्त झाली.
कागदात गुंडाळून आणलेला, मालकीण बाईनी दिलेला केक आपल्या दोन्ही मुलांना तिने खावू घातला पण स्वतः मात्र खाल्ला नाही. पिंकीने बनवलेल्या तिखट केक ची चव तिला आपणहून घालवायची नव्हती.
©️®️ मिथून संकपाळ
=============================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/