Skip to content Skip to sidebar Skip to footer

सासूबाई….तुमचा मुलगा हा माझाही नवरा आहे…..!

© प्रतिभा सोनवणे

नीरजा एक इंजिनीरिंग झालेली मुलगी आपल्या आईवडिलांची एकुलती एक आणि पाठी एक लहान भाऊ अशा चौकोनी कुटुंबात वाढलेली…कुटुंब शिक्षित असूनही वडील मिलिंदराव यांचा पूर्ण घरावर अंकुश…वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द समजला जायचा…नीरजा कॉलजमध्येही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून समजली जायची…आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिला फक्त एक डिग्री मिळावी या हेतूने मिलिंदरावांनी शिकवले…आपली मुलगी चार चौघात पदवीधर म्हणून मिरवली गेली पाहिजे एवढंच फक्त मिलिंदरावांना वाटायचं…एक दिवस नीरजा आपल्या आईपाशी म्हणजेच सुलभाताईंपाशी आपलं मन मोकळं करत होती…

नीरजा – आई….आज काय मग स्पेशल…?

सुलभाताई – काय म्हणजे काय…आज माझ्या लेकीच्या आवडीचे थालीपीठ करणार…बघ कसं शाही नाश्ता बनवते आज तुझ्यासाठी…

मिलिंदराव – सासरी जाऊन काय आयतं ताट नाही मिळणार म्हणावं….शिक्षण वैगेरे ठीक आहे…पण बाकीचं काय….

नीरजा – पप्पा…हे हो काय….आजकाल कोण स्वयंपाक करतं…मी बाई स्वयंपाकाला बाई ठेवणार….एकदा का कॅम्पस इंटरव्हियू दिल्या कि मग परीक्षेआधीच मला नोकरी मिळणार…बघा तुम्ही…

मिलिंदराव – त्या नोकरीचं आम्ही काय करणार….खरं तर हे नोकरी वैगेरे…नसते फॅड्स आहेत आत्ताचे…चूल आणि मुलं हे खरं बाईचं आयुष्य…!

नीरजा – पप्पा पण हे सगळं असं अठराशे सत्तावन्न सालातले विचार आहेत तुमचे…आत्ता कुणीही असा विचार नाही करत…उलट मी नोकरी केली कि शिक्षणासाठी लागलेले तुमचे सगळे पैसे वसूल होतील…बघा पटेल तुम्हाला माझं म्हणणं…!

मिलिंदराव – हे बघ….मला तू नोकरी केलेली नकोय….आत्ताही…आणि तुझं लग्न झाल्यावरही….तो डिसिजन म्हणा होणाऱ्या जावयाचा असेल….त्यात आम्ही आडकाठी घालणारे कोण आहोत…पण तरीही चांगलं शिक्षण मिळालं ना कि नवराही चांगलाच मिळतो मुलींना….या मताचा आहे मी…

असं म्हणून मिलिंदराव हातात वर्तमानपत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातात….पप्पा गेल्या-गेल्याच नीरजा आपल्या मनातल्या भावना आईसमोर बोलून दाखवते…

नीरजा – आई….पप्पा लहानपानापासून ऐकवत आलेले आहेत हेच वाक्य…’ चांगलं शिकलं ना की चांगला नवरा मिळतो….पप्पा असं का नाही म्हणाले आशीर्वाद देताना…शिकून खूप मोठे व्हा….कर्तृत्ववान बना…’ चांगला नवरा मिळण्यापर्यंतच त्यांचे आशीर्वाद…!

सुलभाताई – नीरजा…तुला चांगलाच माहितीय तुझ्या बाबांचा स्वभाव…साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला आणि तुझ्या बाबांचा स्वभाव बदलायचा प्रयत्न जरी केला तरी ते या जन्मात शक्य नाही…तू फार काही विचार करू नकोस…तूर्तास तरी नोकरीचा विचार करणं सोड तू….आता फक्त या थालीपिठांवर ताव मार…!

असं म्हणून सुलभाताईंनी आपल्या लेकीचा नाराजीचा स्वर बदलून मनधरणी केली….पुढच्याच आठवड्यात मिलिंदरावांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी स्थळ आणतात….

मिलिंदराव – अगं…सुलभा ऐकलंत का…जा आधी साखर घेऊन ये मला…पण सगळ्यात आधी देवापुढं ठेव साखर…मग सगळ्यांचं तोंड गोड कर…

सुलभाताई – अहो…पण असं झालं तरी काय…

मिलिंदराव.- अगं…जगतापांकडून स्थळ सांगून आलंय आपल्या निरजेसाठी…!

सुलभाताई – काय…अहो पण एवढ्यात कुठं लग्नाचं पाहताय तिच्या…?

मिलिंदराव – एवढ्यात नाही मग …कधी…हे बघ…चांगला मुलगा आहे…सुखात ठेवेल तिला…घरात सासू आहे सासरे आहेत आणि नणंद पण आहे तरी लग्न झालंय नणंदेचं….जवळच असते राहायला…. अधून मधून येत असते पण जाऊ देत ना मुलगा शोधूनही सापडणार नाही एवढा चांगला आहे….लग्नानंतर लगेच राजा राणीचा संसार सुरु होणार त्यांचा…सुखाने राहतील दोघेही….

सुलभाताई – अहो पण…तुम्ही विचारायच ना अपेक्षा तरी कळू देत ना मला….कारण आपली नीरजा इंजिनिअर तेही कॉम्पुटर इंजिनिअर…तुम्ही तर नोकरीला लावायलाही नाही म्हणालात तिला….आता सांगायला तरी मिळालं असत आपल्याला…

मिलिंदराव – अहो…पण तुम्ही आणखी त्रुटी काढत बसलात तुमची मुलगी बिनलग्नाची राहील……हो हो….जावई बापूही कॉम्पुटर इंजिनिअर आहेत….तेच नोकरीलाही लावतील बघ तिला….मग तू माझ्यावर ठपका ठेऊ नकोस नोकरीला का नाही लावली असा….नोकरीच स्वप्नही पूर्ण होईल तिचं…

सुलभाताई – ठीक आहे बोलून पाहावं लागेल तिच्याशी….

नीरजाही लग्नासाठी होकार देऊन टाकते….कारण आपल्या मनासारखं लग्नाआधी नाही तर लग्नानंतर तरी राहायला मिळेल म्हणून नीरजा ही लग्नासाठी आपल्या स्वतःकडून होकार दर्शवते…. बघण्याचा कार्यक्रम….सुपारी….साखरपुडा….आणि लग्न….असं साग्रसंगीत असं पार पडतं… …सातारा जिह्वा म्हंटल की निसर्गाचं वरदान लाभलेलं असं म्हणतात….एकूण लग्नानंतर सभोवतालची हिरवळ पाहून नीरजाला खूप प्रसन्न वाटत होतं …हि प्रसन्नता क्षणिकच म्हण्याची का… ? नीरजाचा नवरा वरद पुण्याला नोकरीला  असल्याने आठवड्यातून फक्त दोनच दिवस गावी येणं असायचं…त्यामुळे गाव ते पुणे असं करताना जीव मेटाकुटीला यायचा तरीही एक जबाबदारी म्हणून वरदला असं अपडाऊन करणं भागच होतं….लग्नाला पंधरा दिवस होऊन गेले तरीही वरद ची अशी दमछाक होतंच होती….एक दिवस आपल्या सासूबाई म्हणजेच सुभद्राताई आलेल्या पाहुण्यांना सांगत होत्या….

छायाताई – अहो…सुभद्राताई नशीब काढलंत की हो तुम्ही अशी इंजिनिअर सून मिळालीय तुम्हाला…. आता काय सुनबाईंच्या हातात संसाराचं रहाटगाडगं देऊन तीर्थाटनास जाणार की काय मग….

सुभद्राताई – अगं नाही गं….असं कसं काल आलेल्या पोरीच्या हातात देणार संसार सगळा….

छायाताई – अगं….मग काय करणार तू…. आता तीर्थयात्रा करायचे दिवस आपले…..जपमाळ हातात घ्यावी…

सुभद्राताई – नाही गं असं करता नाही येणार….घरातले विचार किंवा डिसिजन तरी मीच घेत असते….आपण फक्त ऑर्डर सोडायची आणि समोरच्याने हात चालवायचे… नीरजा….नीरजा अगं पाणी घेऊन ये….

छायाताई – अरे वाह….मानलं पाहिजे तुला सुभद्रा…लगेच ऑर्डर देऊन काम करून घेऊ लागली…  [ नीरजा पाणी घेऊन येते…. ]

सुभद्राताई – नीरजा अगं बस थोडंसं इथं… [ नीरजा लगेच शेजारच्या खुर्चीवर बसते ]

छायाताई – नीरजा….काय मग नोकरी करणार की काय मग… !

नीरजा – जशी यांची इच्छा…खरं तर मला नोकरी करायची खूप आवड आहे….पण पुण्याला जाऊन एकदा का सेटल झालं की नोकरीच करणार आहे मी….आणि तसं  हेही म्हणाले आहेत मला…

सुभद्राताई – बाई….मला नाही पटत लग्न झाल्या झाल्या असं नवऱ्याच्या मागे शेपूट बनून राहणं…. बाईच्या जातीने पहिलं संसार पाहावं ….म्हणजे नातेवाईक…सनसुद असा विचार करावा….मग नवऱ्यामागं फिरावं…

नीरजा एकही शब्द न बोलता तिथेच बसून राहती…. शनिवार असल्याने वरद गावी आला….सारखा असा प्रवास करून वरदचे पाय दुखत होते….म्हणून नीरजा पटकन आपल्या नवऱ्यासाठी पाणी आणायला उठते….आपल्या आईला अंग दुखत असल्याचे कारण सांगून वरद आपल्या खोलीत जातो आणि सुभद्राताई नीरजाला काहीतरी काम सांगतात आणि स्वतः वरदच्या खोलीत जातात आणि आपल्या लेकाची विचारपूस करतात …तोवर नीरजा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते….तेलाची वाटी घेऊन सुभद्राताई वरदच्या खोलीत जातात आणि वरदला म्हणतात….

सुभद्राताई – वरद बाळा…खूप दुखतंय का बाळा…मी अंग चेपून देते…आणि पाय कर बरं इकडे तळपायांना मस्त मालिश करून देते…[ आपल्या मुलाच्या अंगाला मस्त मालिश त्या करू लागतात ]

वरद – आई…असू देत गं…आराम केलं ना कि बरं वाटेल…!

सुभद्राताई – नाही मी तुझं काही एक ऐकणार नाही…एक तर स्वतःची काळजी घेता येत नाही तुला…मी आई आहे तुझी काळजी वाटणारच ना…लग्न होऊन आता दोन महिने झालेत असं सारखं सारखं येऊन तू का दगदग करून घेत आहेस….अशाने खंगून जाशील…

वरद – आई…मग काय करू सांग बरं तूच….कुटुंबाची काळजी घेणं हे कर्त्या पुरुषाचं पहिलं कर्तव्य असतं…हे तुला चांगलंच माहिती आहे…बाबाही तेच करायचे…

सुभद्राताई – एक सुचवू….तू आठवड्याला चक्कर मारतोस चांगली गोष्ट आहे…पण तुझी तबियत सांभाळून हे सगळं केलंस तर मला आवडेल ते….तू महिन्यातून एकदा अशी चक्कर मारत जा…म्हणजे कसं तुझी दगदगही होणार नाही…तसंही आपला फ्लॅट आहेच कि पुण्यात…

वरद – चालेन आई…!

असं म्हणून सुभद्राताई आपल्या मुलाला गावी न येता पुण्यातच राहण्याचा सल्ला देतात….आता आपला लेक आलाय तसं त्याच्या आवडी निवडी जपण्याचा पुरेपूर कयास सुभद्राताईंचा असतो….वरदचे अंग चेपून दिल्यावर स्वयंपाकघरात सुभद्राताई येतात आणि नीरजाने स्वयंपाक करून ठेवलाय हे पाहताच त्यांना मनातून वाईट वाटतं…त्या किंचितश्या रागीट स्वरात विचारतात…

सुभद्राताई – नीरजा…तू कशाला स्वयंपाकाच्या नादी लागली….मी येईपर्यंत वाट पहिली असतीस तरी चाललं असतं मला नाहीतर मला विचारायला काय हरकत होती…

नीरजा – मला वाटलं आता गप्पा मारता मारता खूप उशीर होईल म्हणून मी स्वयंपाकाच्या मागे लागले…!

सुभद्राताई – जाऊ देत…मी वेगळा स्वयंपाक करते माझ्या पिल्लासाठी…एक तर त्याच्या तोंडाला चव नाहीय…चांगलं असं चमचमीत देते त्याला करून…हे असं अळणी सपक जेवण नकोय त्याला….आता तू एक ऐक माझं….माझा मुलगा ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी सगळं काही मी करणार…तू स्वयंपाक घरात यायची काहीच गरज नाहीय…!

सुभद्राताई परत वरदसाठी स्वयंपाक बनवतात… नीरजा चेहरा पाडून तिथेच जेवणाची मांडामांड करू लागते…सासरे बुवा अत्यंत चांगल्या स्वभावाचे असल्याने सुभद्राताईंना बोलायचं सोडत नाहीत…

अरुणराव – सुभद्रे….काय गं हॉटेल वैगेरे आहे का हे….आता नीरजाने बनवलेला स्वयंपाक वाया जाणार…आता असली उधळपट्टी चालती तुला अन्नाची…!

सुभद्राताई – अहो…तुम्ही फक्त जेवायचं काम करा…बाकी नका सांगू आम्हाला…

अरुणराव – काय…? गेले काही वर्ष अन्नपुराण ऐकत आलो होतो आता कुठे गेलं ते ज्ञान…

असं म्हणून अरुणराव हातातलं वर्तमानपत्र घेऊन बाल्कनीत जाऊन बसतात….स्वयंपाकघरात जेवताना वरदला वेगळाच दृश्य दिसतं….आपल्या ताटात वेगळे पदार्थ आणि तिघांच्या ताटात वेगळे पदार्थ…तो काही बोलायच्या आतच सुभद्राताई म्हणतात…

सुभद्राताई – बाळा…तुझ्यासाठी असं मसालेदार जेवण नको…असलाच स्वयंपाकचं तू खात जा…म्हणजे टुणटुणीत राहशील…

वरद आणि नीरजाच्या लग्नाला आता आठ महिने होत आले होते… ..या आठ महिन्यात वरद महिन्यातून फक्त एकच दिवस गावी जात…लग्नानंतर वरद आठ दिवसाला दोनदा गावी जायचा त्यामुळे आपला नवरा आपल्या साठी येतो म्हणून नीरजाला हायसं वाटायचं पण आता तीच भेट महिन्यातून एकदा होऊ लागली…असेच एक दिवस वरद आपल्या गावी आला…नेहमीप्रमाणे वरदसाठी सगळा स्वयंपाक सुभद्राताईंनी बनवला नीरजाला फक्त धुणी-भांडी आणि लादी पुसण्याचा काम सांगितलं…या बाबतीत नीरजाला अजिबात वाईट वाटलं नाही कारण कुठलंही काम सांगितलं तरी ते अगदी बिनबोभाटपणे नीरजा करत…असेच रात्री या बाबतीत आपण वरदशी बोललं पाहिजे पण नीरजाला कुठेच असं सांगायला जमलं नाही कारण वरद ज्या वेळेला घरी येई त्या वेळेला सुभद्राताई नेहमी काहीतरी दुखण्याचा बहाणा करत यावेळीही सगळं स्वयंपाक झाल्यावर सुभद्राताई पाय आणि कंबर दुखून आली असा बहाणा करत दिवाणखान्यात पडून राहतात…आपली आई अशी पडून राहिलीय हि गोष्ट वरदला पाहवत नाही म्हणून न राहवून वरद आपल्या आईला विचारतो….

वरद – आई…अगं तू अशी पडून का राहिलीय…तेही आता जेवणाच्या वेळेला…

सुभद्राताई – काही नाही…कंबर आणि पाय खूप दुखून आलेत…वय झाल्यावर काही खरं नसत बघ…तरी सगळा स्वयंपाक केला बाळा तुझ्याचसाठी फक्त…

वरद – का बरं…नीरजा नाही स्वयंपाकघरात येत मदत करायला…?

सुभद्राताई – आता तू तिला काही बोलू नकोस…मीच सांगितलंय तिला की मी वरदसाठी स्वयंपाक करणार म्हणून नाही येत ती…

वरद – तू सांगितलं ते सांगितलं पण तिनं का बरं ऐकलं तुझं….वय झालंय तुझं आणि या वयात तिनं मदत करायला नको…वय झालंय आपल्या सासूबाईंचं हे समजायला नको का तिला…?

झालं….वादाची ठिणगी सुभद्राताईंनी टाकली….सुभद्राताईंच्या अशा वागण्याने आपला मुलगा आणि सून एकमेकांशी मनात अढी ठेऊन वागू लागतात…आणि सुभद्राताई मात्र या गोष्टीचा फायदा उचलायच्या…रात्री झोपण्यासाठी सुद्धा वरद आपल्या खोलीत जात नसे कारण वरद आल्यावर रात्री उशिरापर्यंत त्या वरदशी बोलत आणि हि गोष्ट मात्र नीरजाला खटकू लागली…असेच लग्नाला आता वर्ष होत आलं ज्या ज्या दिवशी वरद गावी येत त्या त्या दिवशी आपल्या बायकोबरोबर कमी आणि आई सुभद्राताईंच्या सोबत जास्त असा वरदचा वावर असे …..अशाने नवरा बायकोमध्ये दुरावा येऊ लागला…नीरजा मात्र सगळं काही सहन करत होती…

अशातच सुभद्राताईंच्या बहिणीचा एक दिवस सुभद्राताईंना फोन येतो…नीरजा आपलं लादी पुसण्याचं काम करतंच होती वत्सलाबाई आणि सुभद्राताईंचा संवाद सुरु होतो…

वत्सलामावशी – अक्का….काय मग कशी आहेस तू….फोटो पाहिला तुझा सून आल्यापासून तबियत सुधारली म्हणायची…

सुभद्राताई – काही नाही आहे तशीच आहे मी…बरं तू बोल कशासाठी फोन केलास…काहीतरी कारण असल्याशिवाय थोडी ना फोन करणार तू…

वत्सलामावशी – अगं…तुझ्या लेकीचं लग्न ठरलंय…आहेस कुठे…!

सुभद्राताई – काय…सोनूचं लग्न ठरलं…आणि तू मला आत्ता सांगतीयस…मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही उरकून टाकलास मला न विचारता…मला वाटलं आता काय डायरेक्ट पत्रिका येणार की काय हातात आमच्या…

वत्सलामावशी – असं कसं करेल मी…बहीण आहेस तू माझी…तेच म्हंटल…माझ्या साठी आली असतीस तर लग्नाच्या आधी आठ दिवस तर….फार बरं झालं असतं…आणि मला वाटतंय की तू यायलाच पाहिजे…

सुभद्राताई – अगं कसं येऊ तिकडे…इकडे तुझ्या दाजींचं माझ्याशिवाय पान हालत नाही….म्हणजे औषधपाणी सगळं मलाच बघावं लागत…मी कसं त्यांना सोडून आठ दिवस येऊ…

वत्सलामावशी – सून आलीय तरी तूच करतेस का अजून….

सुभद्राताई – हो….सून असली तरी बायको बायको असते….तिची सय कुणाला येत नाही हि गोष्ट खरीय…सून असली तरी बारकावे आपल्यासारख्या पारखी नजरेनेच शोधावे लागतात…ते सुनांचं काम नाही आणि एक वर्षात थोडीच समजणार आहे तिला काळजी कशी घ्यायची ते….बायको लागतेच…

हे सगळं नीरजा लादी पुसता पुसता ऐकत असते…दुपारी जेवण आटोपतं तरीही नीरजाच्या मनात एकच विचार…’ आपल्या सासूबाई सासऱ्यांशिवाय आठ दिवसही राहू शकत नाही तेही लग्नाला ४० वर्ष पूर्ण झाले असूनही….माझं तर नवीनच लग्न झालंय मग मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी राहू शकेल…वर्ष झालं तरी आमचा अजून संवादही नाहीय…जरी संवाद झाला तरी मनमोकळा संवाद नाहीय…हे कुठेतरी थांबलं पाहिजे… ‘ म्हणून एक दिवस काहीही करून हि गोष्ट वेगळ्या पद्धतीने वरदला सांगायचं असं नीरजा मनाशी ठरवते …वरद दोन दिवसांनी येणार असल्याने नीरजा आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक घरात वरदसाठी स्वयंपाक बनवायला जात नाही…म्हणून सर्वांची जेवणं आटोपून आवरा-आवर करून नीरजा आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून जाते आणि जाताना वरदचा फोन वरदच्या नकळत घेऊन जाते…नीरजा आपल्या खोलीत गेल्यावर वरद आपला फोन घरभर शोधत बसतो…मग फोन शोधत शोधत आपल्या खोलीमध्ये जातो…तर फोन नीरजाच्या हातात दिसतो…वरद तिच्यावर चिडक्या स्वरात म्हणतो…

वरद – माझा फोन कशासाठी घेऊन आलीस इथे…

नीरजा – मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं…

वरद – काय बोलायचं आहे…

नीरजा – मी एक इंटरव्हियू दिला होता लग्नाआधी त्याच संदर्भात कॉल आला होता मला… तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होते…शेवटी आज तुम्हाला सांगावं असं वाटलं…

वरद – मग काय करायचं ठरवलं आहे तू…?

नीरजा – काय म्हणजे मला जावं लागणार…ट्रेनिंग आहे महिनाभर आणि जावच लागेल मला जॉइनिंगही लगेच होईल एकदा का ट्रेनिंग झालं ना की…!

वरद – असं कसं शक्य होईल…मी इकडे पुण्यात आणि तू मुंबईला कसं शक्य होईल…?

नीरजा – का नाही होणार शक्य…तसंही मला सवय झालीय तुमच्यापासून लांब राहायची वर्षभर राहतेय ना तुमच्यापासून दूर…मग मुंबईला सहज शक्य होईल राहणं मला…

वरद – आणि…आई वडिलांचं काय…?

नीरजा – तुम्ही फक्त प्रॉब्लेम्स काढाल त्यावर सोल्युशन नाही काढणार….पण माझ्याकडे सोल्युशन आहे…आई बाबा आपल्या लग्नाआधी एकटेच राहत होते ना….तेव्हा तुम्हीही पुण्यात होतात…मग तेही सहज राहू शकतात आपल्याशिवाय…

वरद – अगं…पण तुला नोकरी करायची गरजच नाहीय ना…

नीरजा – लग्नाआधीही माझ्या बाबांनी या विषयावर नेहमी आडकाठी केली…माझी इच्छा असताना आता तुम्ही सुद्धा आडकाठी करताय…

वरद – अगं असं कसं होईल…मी तुझ्याशिवाय राहू नाही शकणार…लोक काय म्हणतील…

नीरजा – एक प्रश विचारते खरंच उत्तर द्या मला…..

वरद – तू प्रश्न तर कर…

नीरजा –  आपण खरंच नवरा-बायको आहोत का…?

वरद – प्रश्न आहे का हा….आपण नवरा-बायकोचं आहोत…!

नीरजा – पण मला असं नाही वाटतं…कारण लग्नाला आता वर्ष झालयं मला एकदाही मोकळीक नाही मिळाली…आणि तसंही महिना महिना वेगळं राहायची सवयच झालीय मला….अंगवळणी पडलंय असं म्हणायला हवं…

वरद – ठीक आहे…मला आईशी बोलावं लागेल…तरीही तू तुझ्या या निर्णयाचा परत एकदा विचार करावा असं मला वाटतं…!

नीरजा – वरद…तुम्ही आईंशी बोलावं असं मला नाही वाटतं कारण मला खात्री आहे की माझ्या या निर्णयावर नेहमी नकारात्मक भूमिका आईंची असेल…माझ्या निर्णयाचा मी फेरविचार करण्याची गरजच नाहीय कारण माझा निर्णय झालाय…!

वरद नीरजाच बोलणं मनात घोळवत झोपण्यासाठी आपल्या आईकडे जातो….आणि नीरजाला जाताना सामान पॅक करायला सांगतो….वरद रात्रभर नीरजाच्या म्हण्याचा विचार करत असतो…सकाळी जेव्हा सुभद्राताई देवपूजेसाठी उठतात त्यावेळी वरदसुद्धा उठलेला त्यांना दिसतो…आपलं लेकरू एवढ्या सकाळी उठलंय म्हणून सुभद्राताई कौतुकाने आपल्या लेकाला विचारतात….

सुभद्राताई – माझं कोकरू…एवढ्या सकाळी कसं बरं उठलं ते…ये इकडे डोकं मालिश करून देते अंघोळीच्या आधी…[असं म्हणून तेलाची वाटी घेऊन सुभद्राताई वरद पाशी जाऊन बसतात आणि अलगद वरदच्या केसांमधून हात फिरवतात ]

वरद – आई…राहू दे ना आता…लहान राहिलोय का….?

सुभद्राताई –  राहू देत मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी लहानच असतो…!

वरद – आई…मला तुझ्याशी बोलायचं…

सुभद्राताई – बोल ना बाळा…

वरद – आई…नीरजाला मुंबईला जावं लागतंय ट्रेनिंगसाठी…

सुभद्राताई – अरे पण…मुंबईलाच का…इथं जवळ नाही का नोकरी करू शकत ती…

वरद – आई…लग्नाआधी इंटरव्हियू दिलेलाय तिने आणि आता तीन महिने ट्रेनिंगसाठी बोलावलंय…मला असं वाटतं जाऊ देत तिला ट्रेनिंगसाठी…

सुभद्राताई – पण….वरद…नोकरी करण्याची खरंच काहीच गरज नाहीय…मी सुद्धा एक लेक्चररशिप सोडून दिलीय तेही तुझ्यासाठी नाहीतर मी अजूनही नोकरी केली असती…[ तेवढ्यात अरुणराव बोलणं ऐकून आत येतात आणि म्हणतात ]

अरुणराव – अगं…पण तू नोकरी करावी असं मला तेव्हाही वाटायचं…आणि अजूनही वाटतंय…पण तू तुझं आयुष्यच जणू वरदसाठी सोपवून टाकलं…माझाही विचार केला नाहीस…निदान माझ्या म्हण्याचा तरी विचार करायचा तू…वरद माझा पूर्ण पाठिंबा आहे नीरजाला…तिने जरूर नोकरी करावी…!

सुभद्राताई – सगळे एक प्रकारचा कट केल्यासारखं माझ्याशी वागत असतात….सगळ्याचं कधीच एकमत नसत या घरात…

वरद – कट वैगेरे असं काही नाहीय…मला माहिती होत या मताला तुझा पाठिंबा नसणार म्हणून नीरजाच्या आधी मीच तुझं मत विचारायला आलो नाहीतर ती स्वतः सांगणार होती…

सुभद्राताई – सगळं परस्पर ठरवलंच आहे ना तर माझं मत विचारण्याचं नाटक कशासाठी…बंद करा अशी नाटकं…

अरुणराव – तू का रामाच्या प्रहरात असले शब्द वापरतीय…

सुभद्राताई – फक्त एवढंच झालंय ना….पुढचं अजून निवड व्हायचीय तिची…सगळं जग जिंकल्यासारखं करू नका नाहीतर अंगाशी येईल…

वरद – आई….अगं तीन महिन्यांचाच तर प्रश्न आहे…नंतर पाहुयात ना काय होतंय ते…तिला मुंबईला राहावं लागलं तर काय होईल…मी पुण्यात आणि ती मुंबईला आणि तुम्ही इकडे गावी…तिकडे पुण्यात राहून माझे जेवणाचे हाल होतील…आई तुला चालणार आहे का माझे जेवणाचे हाल झालेले….एरवी माझी काळजी करते आता कुठे गेली तुझी काळजी…त्यापेक्षा आम्ही दोघेही पुण्यातच राहू…आणि जसं मी येऊन जाऊन राहतोय तसं आम्ही दोघेही येउ की सण वार तुमच्याशिवाय कसं करू आम्ही तिकडे…!

सुभद्राताई तावातावाने स्वयंपाकघरात जाऊन देवाची भांडी घासून काढतात…आणि वरद आपल्या खोलीत जाऊन नीरजाला म्हणतो…

वरद – नीरजा…मी आज आईशी बोललो…

नीरजा – काय म्हणाल्या आई…?

वरद – नकारात्मकता आहे तिच्या विचारात…पण तू काळजी नको करू…तुझं सामान पॅक करायला घे….तू फक्त ट्रेनिंगवर फोकस करशील…

नीरजा – [ वरदचा हात आपल्या हातात घेत म्हणते ] ठीक आहे…पुढच्या आठवड्यात जावं लागेल…!

वरद – मलाही आज निघावं लागेल उद्या ऑफिस आहे माझं…तू तयारी करायला घे…

अशा पद्धतीने वरदच्या मदतीने नीरजा आपल्या ट्रेनिंगची पूर्ण तयारी करते आणि आठवडाभराने मुंबईला ट्रेनिंगसाठी जाते…तीन महिन्यांनंतर नीरजाला मुंबईतच जॉइनिंगसाठी बोलावतात पण नीरजा मुंबईत जॉईन न होता आपली प्रॅक्टिस पुण्यात करायची मागणी करते….नीरजाच्या ट्रेनिंग मध्ये परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याने तिला तात्काळ आपली प्रॅक्टिस पुण्यात सुरु ठेवण्याची परवानगी मिळते…एक छोट्याश्या १ बीएचके मध्ये आपला संसार नीरजा आणि वरद थाटतात…पुण्यात राहूनही आपल्या आई वडिलांसाठी दोघेही अपडाऊन सुरु ठेवतात सण समारंभ…व्रत वैकल्य आपल्या सासूबाईंच्या मदतीने नीरजा कसोशीने करते…वरदचीही प्रकृती उत्तम होते…अशा पद्धीतीने नीरजाच्या धाडसी निर्णयाने सासू सासरे आणि आई वडील दूर राहूनही खुश राहू लागले…तर मैत्रिणींनो आपल्याही संसारात अगदी अशाच प्रकारे काही निर्णय धाडसी राहून घ्यावे लागतात…काही वेळा भावनिक विचार करत आपण आपल्या स्वतःच्या अशा निर्णय घेण्याला पारखं होऊन बसतो…तर सांगायचं तात्पर्य हेच की…धाडसी निर्णय मुलीने घ्यावेच….!

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.