मिंटी खारुताई

©®सौ. गीता गजानन गरुड.
फार फार वर्षापूर्वी सुंदरबन नावाचं भलंमोठं जंगल होतं. जंगलात जिकडेतिकडे हिरवेगार व्रुक्ष होते. बोरं,आवळी,जाम,पेरु,चिंचा अशी फळांनी लगडलेली झाडंही होती.
मिंटी खारुताई नि बंडूमाकडाची पक्की दोस्ती होती. बंडूमाकड या फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारे तितक्याच वेगात मिंटी खारुताईही आपली झुपकेदार शेपटी आवरीतसावरीत या फांदीवरनं त्या फांदीवर सरसरसर धावे.
किती गोजीरवाणी दिसायची मिंटी. तिच्या पाठीवरली श्रीरामाची तीन आशीर्वादरुपी बोटं उन्हात चमकायची. एका जागी बसून कडमकुडम कडमकुडम करत खाताना तिला बघणं बंडू माकडाला फार आवडे. तोही तिच्यासाठी लांबूनलांबून फळं घेऊन येई.
एकदा काय झालं, मिंटी खारुताई खेळायला आलीच नाही. बंडूमाकडाला कळेना, रोज पहाट झाली की चिंचिं करणारी मिंटी. झालं तरी काय नेमकं मिंटीला!
बंडू आईजवळ गेला. “आई गं. मिंटी बघ ना अजून नाही आली खेळायला.”
बंडूची आई आपली लांबुडी शेपटी हलवत म्हणाली,”अरे थांबली असेल घरी. आराम करत असेल नाहीतर बरं वाटत नसेल तिला.”
बंडू म्हणाला,”आई गं,आपण जाऊया का तिला बघायला? मला माझ्या इटुकल्या मैत्रिणीची फार फार आठवण येते.”
“बरं चल तर,” असं म्हणत बंडूची आई बंडूसोबत निघाली. ज्या झाडावर मिंटीची आजी रहायची तिथे ही दोघं पोहोचली.
“कोण आहे का घरात?” बंडूच्या आईने विचारलं.
“अगं बाई, तुम्ही. या या बसा.” मिंटीची आज्जी म्हणाली.
“आई गं. अगं आई गं.” पानाच्या शेजेवर झोपलेल्या मिंटीच्या कण्हण्याचा तो आवाज ऐकताच बंडूची आई म्हणाली,”बरं नाही का मिंटीला? तेंव्हाच आज खेळायला आली नाही. बंडू वाट बघून कंटाळला.”
“काय सांगू ताई तुम्हाला. रात्रीपासनं हे असं चाललय. कोणतंतरी विचित्र फळ खाल्लं म्हणे. रात्रभर पोटात मुरडतय पोरीच्या. गडाबडा लोळणं नि कण्हणं. खाणंपिणं काही नाही.”
बंडूच्या आईने आपल्या शेपटीने मिंटीचं पोट बांधलं, सोडलं,बांधलं,सोडलं..तिला एक मुळी उगाळून चाटवली नं संध्याकाळी परत येते बघायला म्हणत घरी परतली. बंडूला अजिबात करमत नव्हतं. त्याच्या इतर साथीदारांपेक्षा त्याला मिंटीच जास्त आवडायची. तो दुपारी नीटसा जेवलादेखील नाही. दुपारी बाहेर उष्मा वाढलेला म्हणून बंडूची आई पानांच्या सावलीत पहुडली होती तर बंडू आला कुशीत,”काय रे बंडू, रोज इतक्या हाका मारते तर येत नाहीस आणि आज अगदी कुशीत.”
“आई गं, चल ना मिंटीला बघायला. मला आठवण येतेय तिची.” बंडू स्फुंदत म्हणाला. जरा उन्हं ओसरु देत मग जाऊ म्हणत बंडूच्या आईने त्याला थारवलं. उन्हं ओसरली तशी दोघं निघाली. मिंटीच्या रडण्याचा आवाज येत होता. बंडूच्या आईने तिचं पोटं दाबून बघितलं मग चिंताग्रस्त चेहरा करत म्हणाली,”एखादं विषारी फळ खाल्लेलं दिसतय. ज्या फळांची आपणास माहिती आहे, तीच खायची असतात.”
यावर बंडू म्हणाला,”आई गं, तिला नको ना बोलू. मीच तिला पलिकडल्या विलायती बागेतलं शेंदरी रंगाचं फळ आणून दिलं होतं.”
“तू दिलंस बंडू पण तुला तरी कुठे ठाऊक होतं, ते फळ असे परिणाम दाखवणार. ते जाऊदे बंडूच्या आई..काहीतरी उपाय असेल नं यावर.” मिंटीच्या आज्जीने विचारलं.
बंडूच्या आईने विचार केला मग तिला आठवलं,”हो आहे, उपाय आहे. अस्वलाची भाकरी.”
“म्हणजे गं काय आई?”बंडूने विचारलं.
“बंडू,.अस्वलाचं कुटुंब गुहेत रहातं. अस्वल पानं,फुलं,मध खातं नि गुहेत गेला की ते उलटून काढतं. ती उलटी वाळली की झाली अस्वलाची भाकरी. अस्वल ह्या भाकऱ्या गुहेत दडवून ठेवतं. त्याच्या पिल्लांना ते ही भाकरी खाऊ घालतं. “
“इ..उलटीची भाकरी.” बंडूने नाक दाबलं.
“अरे वेड्या, औषधी असते ती भाकरी. ती चार दिवस थोडी थोडी खाल्ली तर तुझी मिंटी पाचव्या दिवसाला अगदी ठणठणीत होईल.”
“मग तर मी जाऊन आणतोच त्याच्याकडनं भाकरी.” बंडू म्हणाला नि या फांदीवरनं त्या फांदीवर टुणुकटुणुक उड्या मारत अस्वलाच्या गुहेच्या ठिकाणी पोहोचला.”
“कोण आहे ते बाहेर?” अस्वलाच्या आवाजाने बंडू थरथरला पण सगळा धीर एकवटून तो म्हणाला,”मी आहे बंडूमाकड. अस्वलदादा जरा काम होतं तुमच्याकडे. मला नं भाकरी हवी.”
“जा की तुझ्या आईला थापायला सांग.”अस्वल लोळत म्हणाला.
“तसं नव्हे. माझी मैत्रीण मिंटी खारुताई आजारी आहे. तिच्या औषधासाठी हवी तुमची वमनभाकरी,”
“देईन की पण विकत. वीस रुपये ठेव माझ्या हातात नं घेऊन जा माझी भाकरी.”
“अस्वलदादा, माझ्याकडे कुठले रे पैसे!”
“ते मला ठाऊक नाही. तू मला पैसे दे. मी तुला भाकरी देतो.”
अस्वल ऐकत नाहीसं बघून बंडू माकड तिथून निघालं. पैसे जमवण्यासाठी त्याने एक युक्ती केली. आवळा,चिंच,हेळू,पेरु,पपनस अशा झाडांची फळं ओरबाडून घेतली. एक लाकडी हातगाडी करुन त्यांवर ही फळं ठेवली नि निघाला ‘फळं घ्या फळं’ करत.
वाटेत एका व्यापाऱ्याने बंडूला थांबवलं. फळांची किंमत विचारली. व्यापाऱ्याने बंडूला कसलसं थंडगार पेय दिलं. बंडू हसला. किती मधुर ते पेय! बंडू डोळे मिटून नळीने पेयपान करु लागला. पेय संपताच त्याने समोर पाहिलं तर व्यापारी गायब नं फळांची गाडी गायब. बंडूला रडू आलं. तिथेच वाटेने एक रानपरी जात होती. बंडुला रडताना पाहून रानपरीला बंडूची दया आली. रानपरीने छोट्या मुलीचं रुप घेतलं. बंडूजवळ जाऊन बसली.
“बंडू बंडू का बरं रडतोस?”रानपरीने विचारताच बंडूने लबाड व्यापाऱ्याबाबत सांगितलं. रानपरी म्हणाली,”बंडू, तू रडू नकोस. आपण त्याला धडा शिकवू.”
बंडू न् रानपरी, लबाड व्यापऱ्याच्या घरी गेले. व्यापाऱ्याचं धोतर दांडीवर वाळत होत त्यावर परीने मंतरलेली खाजकुयली शिंपडली. व्यापाऱ्याने धोतर नेसायला घेतलं. एकीकडे धोतर नेसतोय तर दुसरीकडे खाजवतोय. अगागा..नुसती आगच आग.
“वाचवा वाचवा,” तो ओरडू लागला तेव्हढ्यात तिथे बंडू माकडाला घेऊन रानपरी हजर झाली. रानपरीने लबाड व्यापाऱ्याला सज्जड दम दिला. व्यापाऱ्याने रानपरीची व बंडू माकडाची माफी मागितली व बंडूस फळांचे पैसे दिले. रानपरीने जादूची छडी फिरवून व्यापाऱ्याच्या धोतरावरली खाजकुयली गायब केली.
पैसे मिळताच बंडू खूप खूष झाला. परीच्या पाया पडला. पैसे देऊन त्याने अस्वलाकडून ती भाकरी घेतली. बंडूच्या आईसोबत बंडू मिंटी खारुताईकडे गेला. बंडूच्या आईने चतकोर भाकरी मिंटीला खाऊ घातली. भाकरीची चतकोर पोटात जाताच मिंटीची पोटदुखी पळाली नि बंड्या व मिंटी खेळावयास पळाली.

समाप्त
©®सौ. गीता गजानन गरुड.
फोटो–फेसबुक साभार
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============