Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मी ठकी,म्हणजे माझं खरं नाव प्राजक्ता आहे.पण माझं खोटं नाव ठकी.म्हणजे सगळे मला ठकीच म्हणतात.
सगळे म्हणजे सगळेच नाही काही.
तशी माझी नीक नेम्स बरीच आहेत.
म्हणजे बघा आई मला पप्या बोलते.
बाबा मला डार्लिंग बोलतो.
आजी मला राणी म्हणते.
आजोबा ..पंपूशेट,आत्ते ..पाजूतर माझा काका मला ठकसेन म्हणतो.अजून बरीच आहेत.

माझे गाल थोडे गोबरेयत ना तरना आमचे बसकाका म्हणतात मी गालात रसगुल्ले भरुन ठेवलेत.
ते बसकाकाना रोज बसच्या केबिनमध्ये मोगर्याचे चारपाच गजरे लावतात.
मी नेहमी त्या केबिनमध्येच बसते.
त्या फुलांचा सुगंध मला जाम आवडतो.
बाबा ना कधीकधी हिरव्या पानाची पुडी घेऊन येतो.
त्यात असे गजरे असतात.
अशी पुडी आणली की आई,आजी खूश.
एक सिक्रेट सांगते,कोण घरात नसलं ना,म्हणजे मला सोडूनहा की आजोबा आजीच्या पोनीटेलमध्ये गजरा माळतात.
आजी कसली लाजते नी माझा गालगुच्चा घेते.
माझी आजी आहेच मुळी गोड.
तीला बरचं कायकाय बनवता येतं, लाडू,करंजी,चकली,चिवडा..कायतरी बनवून ठेवतेच.
मला तिच्या हातची पुरणपोळी,अळूवडी,कोथिंबीर वडी,ताकाची कढी,सोलकढी.. खूप आवडते.😋
आई तिच्या हाताखाली शिकतेय अजून नी आजीला विचारते,” मला कधी हो येणार तुमच्यासारखं?”
आजी म्हणते ,”येईल गं हळूहळू.तुपण छानच करतेस हो स्वैंपाक.”
माझे आजोबायत ना त्यांचे सगळे दात पडलेत.
आताना ते नकली दात लावतात नी मग खातात.
झोपताना दात काढून स्वच्छ करतात.

बाबा रात्री घरी येतो.
आलाकी मला पप्पी देतो.
बाबाचा साहेबना टकल्या,खडूस,सनकी आहे,असं बाबाच सांगतो.
मला एकदा त्याला भेटायचयं.
बाबाची पेरेंट्स मिटींग असली की मग मी आजीबरोबर जाईन म्हणतेय.
मी त्या खडूसचंदला चांगला फैलावर घेणारयं.
माझ्या बाबाला लवकर घरी पाठवायचं.
नी सुट्टीच्या दिवशी हाफिसात बोलवायचं नाही.
हाफिसातली कामपण घरी करायला द्यायची नाही म्हणून तंबीच देणारय.
म्हणजे बघा हां बाबा रात्री येतो जेवतो नी परत त्या लेपटापवर हाफिसचं काम करत बसतो.
मग माझ्याशी तो बिचारा खेळणार कधी?
मला त्याला भातुकलीचं जेवण करुन भरवायचं असतं.
पण त्याला बिचाऱ्याला फुरसतच नसते.

त्या ट्रेनमध्ये तर श्वास घ्यायला जागा नसते.
अगदीच चिमटायला होतं म्हणतो.काल तर म्हणत होता, “चार गाड्या सोडल्या.पाचव्या गाडीत कसातरी चढलो.उभं रहायलाही जागा नव्हती.” इतकी कशी गर्दी असते ट्रेनमध्ये?🤔
मग ट्रेनचे डबे अजून वाढवायचेना.
नायतर ट्रेन वाढवायच्या.

आईतर म्हणते,तिच्या मेट्रोतपण खूपच गर्दी असते.
नी एसीमुळे दरवाजे,खिडक्या बंद.
एकदम कोंदट वातावरण होतं त्या मेट्रोत.
माझ्या आईलाना बाळ होणारंय.
आजीने सांगितलं मला.
मग मी ताई होणार.🤰
मी त्याचं नीकनेम टिल्ल्या नायतर पेंद्या ठेवणार.
चांगलीच शिस्त लावणारय मी त्याला.

माझ्या आजोबांचं ना सतत कायतरी हरवतच असतं आणि मग ते जो कोण बसलेला असेल त्याला उठवतात नी त्याच्या खाली शोधत बसतात.
‘माझा चष्मा कुठे गेला?’,हा तर त्यांचा पेटंट डायलाग.असं त्यांनी म्हंटलं की मी नी आजी एकमेकांना टाळी देतो.
तुम्हाला सांगू,दुपारचे आजीआजोबा गाण्याच्या भेंड्या खेळतात.
त्यांची खूप मराठी,हिंदी गाणी पाठ आहेत.
आजीचा आवाज तर असला गोड आहे!💕
आजोबा आजीची कंबर दाबून देतात.मी पण चेपते माझ्या हाताने.नायतर पाठीवर पाय देते.
मग आजी मला माझा गोडोबा म्हणते नी पापी देते.

आमच्या बाजूलाना शरु रहाते.
म्हणजे तीचं खरं नाव शर्वरी.
शर्वरीला मामाने बाहुला आणलाय.
तिच्या बाहुल्याचं माझ्या बाहुलीशी लग्न लावायचा विचार चाललाय आमचा.
आजी म्हणाली,तुळशीचं लग्न झालं की मुहुर्त काढून लग्न करुया.
आजी मला लग्नात वाटायला लाडूचिवडा पण करुन देणारेय.
शिवाय माझ्या बाहुलीसाठी काठापदराचा लाँगफ्राक👗 शिवून देणारेय.
आमच्या सोसायटीखालच्या फुलवाल्या काकांकडून मी चाफ्याची फुलं आणणार माझ्या बाहुलीच्या,सखुच्या लग्नात वाटायला.
चाफ्याची फुलं सगळ्यांनाच फार आवडतात.

बंड्यालाना टिचरने शाळेत कोंबडा केलेला नी त्याच्या पाठीवर डस्टर ठेवलेला.
त्याने खोडीच तशी काढलेली.
त्यानेना बोलपेन बेंचच्या फटीत उभं केलं.
प्रद्युम्न बिचारा एकी करुन आला नी बेंचवर बसला.
ते पेनाचं टोक घुसलंकी त्याच्या चड्डीतून आत.
असला किंचाळला.
रक्तपण आलं.
मग या बंड्याला शिक्षा होणारच ना.
ऑफ पिरियडला बेंचवरुन उड्या मारतो माकडासारखा.
एकदा पडला धुपकन खाली.तोंड फुटलं.🐒
खूप रक्त येत होतं.
मग सरांनी शिपाईमामाकडून दोन पेप्सी आणून त्याला चोकायला दिले.अंगात मस्ती लय त्याच्या.

चला बोलत काय बसलेय,अभ्यास करायचाय मला.
खूपच होमवर्क देतात ओ टिचर.
हात दुखतात लिहूनलिहून.
आधीच दुखलेले असतात,दप्तराचं ओझं उचलून.काय करणार मोठ्ठं व्हायचयं ना,हे सगळं केलचं पाहिजे.
आजोबा म्हणतातना ‘आलीया भोगासी असावे सादर.’

—-गीता गजानन गरुड.

===========

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *