मी स्नोई


मी या घरात आलो तेंव्हा छोटसं पिल्लू होतो. या घरात चार माणसं रहातात. वरद,त्याचे आईबाबा व आजी. आजीला पहिल्यांदा माझी अडचण व्हायची. पण हळूहळू तिलाही माझा लळा लागला.
कधी वरदची आई तर कधी बाबा मला फिरवून आणतात. मला वेळोवेळी डॉक्टरकडे न्हेतात. बाहेर जात असले की मला विन्डो सीटवर बसवतात. वरदसोबत केचकेच खेळायला मला खूप आवडतं.
तुम्हाला माहितीय,आज्जीने माझ्यासाठी स्वेटरपण विणलय. माझ्यासाठी छान पांढरशुभ्र चिनीमातीचं वाडगं घेतलय. त्यात मला जेवण देतात. बंगल्याच्या बाहेर माझ्यासाठी छोटसं डॉग हाऊससुद्धा आहे पण मला वरदसोबत त्याच्या बेडवर झोपायलाच जास्त आवडतं.
आमच्या गल्लीतले इतर कुत्रेही माझे मित्र झालैत. वरदची आई त्यांनाही पोळ्यांचे तुकडे दुधात भिजवून घालते.
वरदला शाळेत सोडायला,शाळेतून आणायला मीच जातो. शाळा जवळच आहे दहा मिनिटांवर. मला व वरदला रस्ता क्रॉस करताना पाहून लोकांना आमचं कौतुक वाटत़ं. वरद शाळेतून परत येताना मला शाळेतल्या गमतीजमती सांगतो. त्याचे एक सर फारच रागीट आहेत. मुलं जरा बोलली की म्हणे सगळ्यांना बेंचवर उभं करतात व सपासप तळहातावर मारतात. मी एकदा त्यांच्या पार्श्वभागाचा लचकाच तोडणार आहे.
आज वरद शाळेत गेलेला. त्याचे आईबाबा कामावर गेले होते. घरात मी व आज्जी एकटेच होतो. आज्जी वरदसाठी त्याचा फेवरेट गाजर हलवा बनवत होती. आणि अचानक आजी खाली बसली. तिच्या छातीतून कळा येऊ लागल्या. ती पुरती घामाघूम झाली.
मी घराची कडी कशीतरी ढकलून ढकलून काढली. बाजूच्या बंगल्याकडे जाऊन भुंकू लागलो. तिथले मोरे आजोबा बाहेर आले तसे मी त्यांचा पायजमा ओढत ओढत त्यांना घरी घेऊन आलो. मोरे आजोबांनी इतरांना फोन लावले. आजीला इस्पितळात न्हेलं. मोरे आजोबा परत आले तेंव्हा मला शाब्बास म्हणाले. आज्जी लवकर बरी होईल म्हणाले.
पण हा वरद घरी आला तो आजी घरात नाही म्हणताच त्याने बाहेरच फतकल मारली. आत्ता कसं समजावू याला? परत मोरे आजोबांनाच बोलवून आणतो.
—–गीता गजानन गरुड.
===================