Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अलिशा आपल्या मुलांना घेऊन कोकणात आपल्या आईकडे राहायला जाते…मुलांच्या परीक्षा संपून चार-पाच दिवस झालेले असतात म्हणून आपला मुलगा मयूर आणि निकिता यांच्याबरोबर बसून कोकणात जाण्याचा बेत आधीच आखलेला असतो…म्हणून आपले सामान-सुमान पॅक करून स्वारी आधीच तयार असते…अलिशा नचिकेतला घर कसं सांभाळायचं याबद्दल सूचना देत असते…

अलिशा – नचिकेत…आम्ही आता दहा-बारा दिवस जात आहोत…घर स्वच्छ झाडून घेत राहा…त्या जरबेराच्या झाडाला पाणी घालत जा…जेवण बनवता नाही आलं तर…नको बनवूस…उगाच घरात पसारा घालत जाऊ नको…पण उपाशी राहू नकोस…हवं तर पार्सल मागवत जा…अरे हो…चकली, चिवडा, लाडू करून ठेवलंय तुझ्यासाठी त्या वरच्या कपाटात ठेवलंय…आपली शेगडी आहे ना त्याच्यावरच्या फडताळात ठेवलंय…आठवणीनं खात जा…

नचिकेत – अलिशा…झाल्या तुझ्या सूचना देऊन…मला तुझी हीच गोष्ट आवडत नाही..तू आरामासाठी जातीयस ना मग जा ना…इथली नको चिंता करुस…मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला…

अलिशा  – नचिकेत…तू किती समर्थ आहेस माहिती आहे मला…एकदा का कामात अडकलास ना कि अडकून जातोस कायमचा…शुद्ध राहत नाही तुला…मी सगळ्या गोष्टी हातात देते तुझ्या….तेव्हा तुझी चिडचिड कमी होते…काळजी घे तुझी…

नचिकेत  – हो अलिशा…तू हि काळजी घे मुलांची…त्याना समुद्रात लांबवर जाऊ देऊ नकोस…

आपल्या नवऱ्याचा निरोप घेऊन अलिशा आपल्या मुलांबरोबर माहेरी जाते…प्रवासात मस्त गाण्यांच्या भेंड्या…कुरकुरे खाता खाता कधी आपलं माहेर येत हे तिलाच कळत नाही…स्टेशनवर येताच मुलं भूक-भूक म्हणू लागतात….

मयूर     – आई…किती लांब आहे ग घर अजून…पायी जावं लागेल…

अलिशा – धीर धर कि जरा…भूक लागलीय…तर कुरकुरे प्रवासातच खाऊन टाकलेत…डबा घेतलाय ना बॅग मध्ये पोळी-भाजी खा गुपचूप…आजीकडे गेल्यावर मस्त काहीतरी थालीपीठ करूयात..

निकिता – ई..ई…पोळीभाजी नको मला …मला ना मस्त…पानगी हवीय…आजीकडे गेल्यावर…थालीपीठ पण नकोय मला…केवढ तिखट करते आजी…

अलिशा – दोघेही मुकाट्याने घरी चला…डबा आहे म्हटलं तर नकोय…अजून अर्धा तास चालायचं आहे…पटपट चाललो तर लवकर पोहचू आजीकडे..

निकिता – आई…आजीला गाडी नाही का ग चालवता येत..तुझ्याकडे आहे ना तशी…येत असती तर घ्यायला तरी आली असती…

अलिशा – मोठी जहागीरदारीण लागून गेलीस कि काय…पायी चालायचं जीवावर आलंय..मुकाट्यानं चला..पाणी पाहिजे असेल तर पिऊन टाक…ही घे बाटली…डबा खा म्हटलं तर नकोय याना…अन्न नसेल ना एक दिवस की समजेल…

आपल्या मुलांना ओरडत-ओरडत अलिशा रस्ता कापत होती…इतक्यात अलिशाला रस्त्याच्या कडेला एक आलिशान इंडेवर गाडी उभी असलेली दिसली त्यात उंची साडी नेसलेल्या बाई होत्या…पायात सुंदर असे सॅंडल..डोळ्यांवर चष्मा…हातात एक पर्स अशा त्या मॅडम दिसत होत्या…सोबत एक सात-आठ वर्षांची मुलगी असेल…तिच्याही अंगात उंची वस्त्र..जणू राजकन्याच दिसत होती…अलिशा त्या गाडीकडे सारखी पाहत होती…म्हणून गाडीमधल्या मॅडम ने अलिशाला हात दाखवत मदत हवीय म्हणून असा खुणेने इशारा केला..अलिशा ने सुरवातीला पाहून न पाहिल्यासारखे केले…मग निकिताने सांगितले..आई…अगं त्या बाई बघ तुला बोलावतायत…काहीतरी हवंय त्यांना..! अलिशा मग हळू-हळू त्या आलिशान गाडीजवळ आली….

अलिशा  – हा मॅडम..बोलावलंत तुम्ही..?

मॅडम     – नमस्कार…माझं नाव राधिका दफ्तरदार…ही माझी नातं सागरिका..आम्ही मूळचे मुंबईचे..इथे रस्त्यातच गाडी बंद पडलीय…[आपल्या अंगावरचा घाम टिपत राधिका मॅडम बोलत होत्या]

अलिशा  – ओह्ह्ह…मी काय मदत करू शकते तुमची…

राधिका मॅम – काही नाही दोन तास झाले पण गाडी दुरुस्त होत नाहीय…इथं आस-पास एखाद हॉटेल आहे का ?

अलिशा  – मॅडम…इथं जवळ-पास तर हॉटेल नाहीय…कारण इथे रानातली वस्ती पडते…ह्या इथं जवळच माझं माहेर आहे…शिरुरकर आडनाव आहे माझं…माहेरचं….तुम्ही एक काम कराल…?

राधिका मॅम – बोला ना…

अलिशा  – माझ्या घरी याल का…इफ यु डोन्ट माईंड…काहीतरी खाऊन घ्या तिथे…म्हणजे हे ड्राइवर काका गाडी दुरुस्त करतील…मी आत्ता एका मेकॅनिक चा नंबर देते त्यांना..अगदी निश्चिन्तपणे या…संकोच करू नका..तुमच्या माहेरी आलोय असं वाटेल…

राधिका मॅम – बरं…चला…नाहीतर आमच्या नशिबात कुठाय माहेरपण…

राधिका मॅडम ला खूप आधार असल्यासारखं वाटलं…जाता-जाता अलिशाने आपल्या आईला फोन करून थालीपिठाचा बेत करायला सांगितला…साधारण अर्ध्या तासाने अलिशा आपल्या माहेरी असलेल्या वाड्यात जाते…सगळेजण हात-पाय स्वछ धुवून पडवीत बसतात…थालपिठाचा बेत होईपर्यंत अलिशाने आपल्या बॅग मधला डबा मुलांसमोर मांडला…पण नेहमीप्रमाणे मुलांनीही खाण्यासाठी नाक मुरडली…

मयूर    – ई..ई….आई नको ग मला ही पोळी-भाजी…भाजी तरी चांगली आणायची ना…तू आणलीस…पडवळाची भाजी…मला नाही आवडत पडवळ…

इतक्यात शांत असलेल्या राधिका मॅम म्हणतात…

राधिका मॅम  – अय्या…पडवळाची भाजी..माझा अगदी जिव की प्राण आहे…मला द्या तुम्ही थोडी…सागरिका घे ग खा…खूप छान लागते…बेसन पीठ पेरून केलीत ना…मस्त खरपूस लागते…

अलिशा  – मॅम…पण तुम्हाला ही भाजी आवडेल…तुम्हाला मस्त-मस्त डिशेस खायची सवय असेल…आमच्या गरिबा घरच आवडेल तुम्हाला…

राधिका मॅम – न आवडायला काय झालंय…आमच्या घरी अशा साध्या, कमी तेलकट भाज्या होतंच नाहीत…सगळा स्वयंपाक तेलकट आणि मसालेदार असतो…आज कितीतरी दिवसांनी खातीय मी..खरंच खूप मस्त झालीय भाजी…आणखी वाढा मला

अलिशा आपल्या मुलांकडे रोखून पाहून भाजी राधिका मॅम ला वाढते…अलिशाच्या आईने मस्त मिश्रपिठाच्या थालीपिठाचा बेत आखला होता…म्हणून अलिशा आपल्या आईच्या मदतीला जाते…राधिका मॅम ही थालीपिठांवर मस्त ताव मारतात…सोबत सागरीकाही थालीपिठांवर ताव मारते…अलिशा मात्र खूप आनंदित होते…खाता-खाता मस्त गप्पा रंगतात…तेव्हा अलिशाला कळते की…राधिका मॅडम या एक सेवाभावी संस्था चालवतात तिथे लाखो रुपयांची उलाढाल करतात…घरी खूप नोकर-चाकर असल्याने स्वयंपाक तेलकट आणि तुपकट असतो त्यात गृहिणीच्या हातची चव अनुभवायला मिळत नाही…

अलिशा मात्र आता आपल्या मुलांना बोलू लागली… 

अलिशा – मयूर…पहा आली ना कामी पडवळाची भाजी…मॅम ने किती आवडीने खाल्ली भाजी…समोरच्याने आवडीने खाल्लं ना की मग गृहिणीच आपोआपच पोट भरतं…मघाशी मला खूप भूक लागली होती..पण एखाद्याने पोटभर खाल्लं ना आपल्या हातच तर…आपोआपच मन तृप्त होत…

तासाभराने राधिका मॅमचा ड्राइवर गाडी घेऊन येतो…राधिका ताई अलिशा आणि अलिशाच्या आईचा निरोप घेऊन निघतात…इतका वेळ विमलताई स्वयंपाकघरात असलेल्या बाहेर येतात ..आणि आपल्या लेकीला म्हणजे अलिशाला म्हणतात..

विमलताई – कृष्णाने कसे सुदाम्याचे पोहे खाल्ले…तसा भास झाला मला आत्ता…

अलिशा   – म्हणजे…तू कुणाविषयी बोलतेस…

विमलताई – अगं राधिका मॅडम विषयी बोलतेय मी…

अलिशा  – हो…ना अगं मला नव्हतं वाटलं…त्यांना एवढं साधं जेवण आवडत नसेल…म्हणून तर त्यांना घरून आणलेला पोळी-भाजीचा डबा द्यायला मला संकोच वाटत होता…पण आवडीने खाल्ली त्यांनी भाजी…

विमलताई – बघ की…मला तर कृष्ण जेवण करून गेला की काय असच वाटलं…बरेचसे लघुउद्योगही आहेत न यांचे…

अलिशा   – हो…कार्ड देऊन गेल्यात माझ्याकडे त्या… आपल्या मुलांना किंमत नाही ग कसली…त्यांच्या नातीनेही खाल्ली भाजी आणि केवढी लहान होती ती…तरीही मिटक्या मारत खाल्ली की भाजी…

अलिशाने राधिकाताईंचं कार्ड जपून ठेवलं होत. अलिशा खरं तर १०-१२ दिवसांसाठी आली होती. एक दिवस ऑफिसला जाताना नचिकेतचा रोड अपघात झाला आणि तिला तात्पर जावं लागलं. सोबत विमलाताईही आल्याचं होत्या. पण नचिकेतचा नुसताच अपघात नव्हता झाला तर त्या अपघाताने नचिकेतचा एक पाय देखील हिरावून घेतला होता. ४-५ महिन्यांच्या सुट्ट्या संपल्यावर नचिकेतने पुढच्या ६ महिन्यांची बिनपगारी सुट्टी टाकली होती. सर्वांना वाटत होतं कि सगळं ठीक होऊन जाईल पण थोड्याच दिवसात नचिकेतची कंपनी घाट्यात गेली. आणि कंपनीने हळू हळू काही वर्कर्स ला काढायला सुरुवात केली.

आता पुढे जाऊन काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच खायला उठत होता. नचिकेतला अजूनही बाहेर जाऊन नवीन जॉब पाहणं शक्य नव्हतं. एक दिवस भाजीवाल्याला पैसे देण्यासाठी म्हणून आलिशाने तिच्या वोल्ट मधून पैसे काढले आणि पैशासोबत राधिकाताईंनी दिलेलं कार्ड पडलं. आलिशाने राधिका ताईंनी जस कार्ड दिलं होतं तसं तिच्या पर्समधेच ठेवलं होत.

आलिशाने ४-५ वेळा ते कार्ड पाहिलं. तिला समजत नव्हतं कि राधिकाताईंना फोन कसा लावावा. एवढ्या दिवसात तर त्या विसरल्याही असतील.

तेवढ्यात विमलताई येतात आणि अलिशाला समजावून सांगतात.

विमलताई – अगं बघ तू…कार्ड दिलंय ना त्यांनी तुला मग काहीतरी खटपट करावीच लागेल आपल्याला…आपण काय करू…आपल्या कोकणात करतात तसे काही मालवणी मसाले करून विकूयात..उद्या कॉल कर त्यांना..विसरणार नाही त्या तुला…

अलिशा   – बघुयात काही होतंय का ते…

लगेच दुसऱ्या दिवशी अलिशा राधिकाताईंना फोन लावते….आपला मनसुबा राधिकाताईंना सांगण्यापूर्वी ओळख लक्षात आहे की नाही ते पाहते…राधिका ताईंना अलिशाची ओळख पटते आणि अलिशा मालवणी मसाल्यांबद्दल सांगते..

अलिशा  – तुमच्या लघुउद्योगांमध्ये या मालवणी मसाल्याचा प्रकार ठेवण्यात यावा…कारण खूपच कमी जणांना या मसाल्याविषयी माहिती आहे…याचा खपही वाढेल कारण..बाजारातही अशा प्रकारचा मसाला अजून उपलब्ध नाहीय…

राधिका मॅडम – तुमचं बरोबर आहे…हा उद्योग मी महिलांना सक्षम बनवण्यासाठीच उभा केला आहे…आमच्या लघुउद्योगांमध्ये तुमचं स्वागत आहे ..खरं तर मी तुम्हाला..तुमच्या हाताची चव चाखून हेच विचारणार होते…पण तुम्हाला पटेल की नाही असं वाटत नव्हतं…पण आज खात्री पटली..आपण लवकरच मालवण स्पेशल मसाला बाजारात विक्रीसाठी आणूयात…

अलिशा   – खरंच…मनापासून आभारी आहे मी तुमची…

अलिशा मसाल्याचं पाकीट एक नमुना म्हणून दाखवायला नेते…राधिकाताईंना तो मसाला खूप आवडतो म्हणून सुरुवातीला एक हजार पाकीट बनवण्याचे काम देते…एक हजार मसाल्यांचे पाकीट विकले गेल्याने…राधिका मॅडम खूप खुश होतात…आणि पैशाचा धनादेश अलिशाच्या हातात देतात…पुढे जाऊन विमल मालवणी मसाले या नावे स्वतंत्र गृहउद्योग नावारूपास आणते.

दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर एक स्पेशल कोकणी मसाले जिथे उपलब्ध होतात अशी एकमेव कंपनी उदयास येते…मग मात्र फ्लॅशबॅक आठवताना….आपल्या माहेरी ओळख झालेल्या कृष्णाची ओळख पटू लागते…खरंच एक कृष्णाचेच दर्शन त्याकाळी झाले याची लक्ख जाणीव अलिशाला होते…एक समाधान चेहऱ्यावर दिसून येत तिच्या…

===================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories