मी कशाला आरशात पाहू गं!! (भाग पहिला)

©® गीता गजानन गरुड.
उकाडा खूपच वाढला होता. बाराच्या पुढे काटा जाऊ लागला की सुर्यनारायण जणू तोंडातनं आगीचे लोळ ओकू लागायचा. वाऱ्याचं नामोनिशाण नव्हतं. झाडांची पानही अगदी मढ्यागत स्तब्ध होती.
रंगीम्हातारी शेणाने सारवलेल्या ओसरीवर ढोपरं गळ्याजवळ घेऊन बसली होती. गरम्याने कासावीस झालेल्या तिने अंगात चोळी घालणं सोडून दिलं होतं. पदर मात्र छातीच्या पिंजऱ्याभोवती लपेटून घ्यायची.
पानसुपारी खाऊनखाऊन दातांचा मुळचा रंग जाऊन त्यांवर लालतांबडी किटणं चढलेली. डोळ्यात फुल पडल्याने नीटसं दिसतही नव्हतं तरी झेपेल ती कामं करीत रहायची. तिची मान चावी दिलेल्या बाहुल्यासारखी एका तालात हलत असायची.
गुरांना चरवून आणल्यावर चार भाकऱ्या थापून नि कोरड्यास करुन ठेवून रंगीम्हातारीची सूनबाई घराबाहेर पडली होती. धुण्याला म्हणून लांब रानातल्या झऱ्यावर गेली होती. सकाळीच तिने रस्त्यापलिकडच्या विहिरीवरनं चार दुडी पाणी आणून ठेवलं होतं. म्हातारीला अंघोळीला पाणी ओतून दिलं होतं, तिचं नेसूचं तिथंच पिळून बाहेरच्या लाकडांच्या भाऱ्यावर वाळत टाकलं होतं.
सूनबाई घरात असली की घर जीत्त वाटायचं. तिचा पायरव ऐकत रहावंसं रंगी म्हातारीला नि घरादाराला वाटायचं.
सूनबाय तशी लांबच्या गावची पण माहेराला जाते म्हणून सततची पिरपिर नाही की टिवटिव नाही. आपलं काम भलं नि आपुन भलं अशा माणसातल्या जातीची. तिच्या माहेरीही गरीबीच पाचवीला पुजलेली. इथं आली तर इथंही तेच. म्हातारीचा मुलगा चंदू जेमतेम नववी शिकला होता. ही पोरगीबी त्याला म्हातारीकडे बघुनच डोळे झाकून दिली होती.
चंदू तसा स्वभावाने बरा होता पण आजकाल त्याला तमाशाचा नाद लागला होता. चार पैसे कमवले की चालला तमाशाला. अशाने संसार होतो! का ती तमासगिरीन डब्यातनी डाळतांदूळ भरणार याच्या! रंगीम्हातारी लेकाला खूप बडबडायची पण ऐकेल तर शपथ.
दोन शब्द रीतीचे सांगायला जावं तर सदानकदा तोंड पानानं नाय तर गुटख्याने भरलेलं. पोटुशी रहात नाही म्हणून बायकोला रातच्याला खूप मारायचा. तिच्या सावळ्या रंगावरनं तिला खूप खूप बोलायचा. म्हातारी बिचारी आरडाओरडा, गयावया करत रहायची.
म्हातारीची सून वासंती कामाला वाघ होती. म्हातारीच्या दोन रेड्यांची निगा राखायची. त्यांना गवतकाडी घालायची, पाणी दाखवायची. वासंती आल्यापासनं म्हातारीचं घर कसं झळझळीत झालं होतं. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे. अंथरुणापांघरुणांना झऱ्याचं पाणी लागलं होतं. घराबाहेरची बागही रंगीत फुलांनी बहरली होती. वासंतीचा मायेचा हात सगळ्या झाडापेडांवर फिरत असायचा.
म्हातारीने डोळे बारीक करुन बघितलं. लेक हो लेकच तो. त्याची पावलं काय नीट लागत नव्हती. कसाबसा तोल सावरीत सावरीत येत होता तो. पायरीवरच दोनतीनदा अडखळला मग खांबाला धरून उभा राहिला नं वासंतीला हाकारू लागला.
“वासले ए वासले..कुठं गेली तोंड घेऊन. अवदसा कुठची. काय ध्यान तरी गळ्यात पडलय माझ्या”
चंदू असा पिऊन यायची ही काय पहिलीच वेळ नव्हती,पण कामाला नाय धंद्याला.दारू खाया पैकं आलं कुठून! कर्मदरिद्री दोस्तलोकांनी पाजली असणार..म्हातारीने त्या पाजणाऱ्यांच्या नावाने बोटं मोडली आणि लेकालाही शिव्या हासडल्या. इकडे झऱ्याजवळ वासंती धुणं धुत होती. आज तिचा नंबर जरा उशिराच लागला होता. घरातलं, वाड्यातलं आवरून झऱ्यावर येईस्तोवर उशीरच झाला होता.
आता भर दुपारची ती एकटीच होती झऱ्यावर. अधनंमधनं येणारी पक्ष्यांची किलबिल नं पानांची सळसळ त्या शांततेला भग्न करत होती.
बाकीच्या बाया एकेक करून गेल्या होत्या. वासंतीने आपले पाय झऱ्याच्या पाण्यात सोडले. थंडगार पाणी पावलांना स्पर्शताच तिची गात्रं नं गात्रं थंडावली. रात्रीच्या माराचे वळ जिथेजिथे ठसठसत होते तिथे तिने पाणी लावलं. वरचं निरभ्र आकाश पाण्यात डोकावत होतं नं आजुबाजूच्या झाडांच्या सावल्या त्या पाण्यात हिंदकळत होत्या.
वासंतीला आठवलं, माहेरी बापूसुद्धा मायला असंच बुकलून काढायचा. बुकलायला काहीही कारण पुरायचं त्याला. माय तोंडातनं शब्द नाही काढायची कधी. मुकाट सहन करायची तो मार. त्याने मारणं नि तिने तो मार खाणं हा जणू परिपाठच होता.
लग्न झाल्यावर वासंती सासरी आली. पहिले काही दिवस चंदू तिच्यामागे सावलीसारखा असायचा. तिच्यावर प्रेम करायचा पण मग मित्र घरी येऊ लागले. “अगदीच बायलवेडा हैस लका.” मित्र म्हणू लागले नं चंदूला आपल्यासोबत पिक्चर, तमाशाला न्हेऊ लागले., नको त्या फिल्मस दाखवू लागले.
चंदूच्या वासंतीकडून अपेक्षा वाढल्या. तिला फुलवण्याचं राहिलं बाजूला. तो तिच्यावर बळजबरी करु लागला नं त्याचं समाधान झालं नाही की तिला मिळेल त्या वस्तूने बदडू लागला. तिच्या कंबरड्यात उठसूठ लाथा हाणू लागला. गेल्या महिन्यापासनं तर माहेराला जा नं मोटरसायकलसाठी बापूकडून पैसे आण म्हणून वासंतीच्या पाठनं टुमणं लावलं होतं.
वासंती ताकास तूर लागू देत नव्हती म्हणून त्याला तिची जास्तीच चीड यायची नि तो तिला मग गुरासारखं झोडायचा पण ती मुकाट मार सहन करायची. माहेरी पैसै मागायला जाणं तिला पटत नव्हतं. बापू कुठं एवढा श्रीमंत लागून गेला होता! नि मोटरसायकल कशाला..रुबाब दाखवायला! कमवायचे पैसे नि स्वत:च्या जीवावर घ्यायची की. वासंतीचे विचार स्पष्ट होते पण या गाढवासमोर गीता वाचून उपयोग तो काय म्हणा.
वासंती धुणं धुवू लागली. काळ्याशार खडकावर कापडं चोळू लागली, साबू लावू लागली. पाण्यात बुडवून बुडवून सुबकू लागली. कितीही कपडे त्या वातावरणात धुतले तरी तिला थकायला होत नसे. झऱ्याचं, तिचं नि त्या खडकाचं, खडकावर उमटलेल्या प्रत्येक चिरीचं मैत्र जुळलं होतं.
मनातली सारी खळबळ जणू ती कपडे विसळताना पाण्यात विसळायची. कपडे आता होतच आले होते. तिने ते पिळे बादलीत घेतले नि घराकडे जाऊ लागली तर पांदीत तिच्या गोतावळ्यातल्या नणंदा दिसल्या. सुली नं ललगी. त्यांच्यासोबत त्यांची आई होती.
“इतक्या उन्हाचं कुणीकडं?”वासंतीने विचारलं तसं तिची चुलत सासू म्हणाली,”आगं पोरीस्नी जत्रला पाठिवतोय. दोघीच चलल्यात. माजा बाय जीव निसता अस्सा अस्सा होतोया. मी गेली आसती संगतीला पन घरात आमची णंदबाय आलिया. आसं करतीस वासंती, तू जा ना हेंच्यासंग जत्रला. मी पैकं देते तुला खर्चाला. “
“असं म्हनतायसा पन मामी हे माजं धुणं.”
“दे ते इकडं. मी घरला न्हेऊन वाळत घालीते. तुझ्या सासूबायलाबी सांगीन नि तिला जेवान वाढून दिन.”
“पन ह्याच कपड्यात जाव काय?”
“आगं घरला गेलीस तर त्यो बाबा मारल तुला आज लई पिऊन आलाय. झोकांडी घित जायत व्हता वाटेनं. तुमच्या घराकडनं रातच्याला आवाज येत हुता. आयकला मी इरागतीला गेलती तवा. बरी बाय सहन करतीस. येक दिस मजा कर जीवाची.” असं म्हणत चुलत सासूबायने तिच्या हातात पैसे दिले.
एसटी यायला वेळ होता. तिथे उजाड रानात एक झाड उभं होतं. त्याच्या फांद्या पसरल्या होत्या, वाटसरुंना सावली द्यायला . सुली नं ललगीनं वासंतीला झाडाखाली न्हेलं. तिच्या केसांची छान तिपेडी वेणी घातली.
आपल्या डोकीतली दोन फुलं काढून तिच्या केसात माळली नि पर्सीतला मिना खाकी पावडरचा खोका काढून वासंतीच्या हातावर पावडर शिंपडली. त्या गुलाबी पावडरने उन्हातही तिला ताजंतवानं वटलं. पावडरीचा हात तिनं चेहऱ्यावर फिरवला. बारकाल्या आरशीत कपाळावरची टिकली न्याहाळली आणि तसं न्याहाळताना ती स्वत:शीच हसली.
“का गं वैनी हसायलीस?” ललगीने विचारलं.
“अगं, आज असं जत्रला जायला गावणार आसं सपान देखूल पडलं नव्हतं नि तुमी अचानक भेटता काय नं तुमच्यासंग मला येया गावंतं काय..सगळंच नवल..नशिबाचं काय सांगावं मी हिरवीनदेखूल व्हइन.” यावर त्या तिघीही खळखळून हसल्या.
“काय गं वैने हिरवीन होयाला आवडल तुला?” ललगीने हसतहसत विचारलं.
“न्हानपनी गावात पडद्यार सिनमा लागायचा. तेतुरले डायलाग तोंडपाठ असायचे माज्या नि गाणीसुदीक.”
वैनी म्हन की गं एकांद गानं या सुलीच्या आग्रहाखातर
वासंती गाऊ लागली..
मी कशाला आरशात पाहू गं
मीच माझ्या रुपाची राणी गं..
तोवर एसटी धुरळा उडवत आली. एसटीतली उतरनारी माणसं उतरताच या तिघी एसटीत चढल्या. एसटीच्या सीटा तापल्या होत्या पण वासंतीला खूप खूप मस्त वाटत होतं. सासूची तिला भीती नव्हतीच आणि नवऱ्याच्या तावडीतून एक वेळतरी सुटका झाली याचा तिला आनंद झाला होता.
जत्रेत लग्न झाल्यानंतर ती आलीच नव्हतं. शिवाय हे गाव माहेरच्या गावाहून मोठं. सड्यावर दुशे बाजुंनी जत्रा भरली होती. रंगीबेरंगी मोठाले फुगे हवेसोबत डोलत होते. वाटेन चालणाऱ्या पोरांच्या डोस्क्यावर रंगीत पिसांच्या गोलाकार टोप्या, तोंडात पिपाण्या, हातीत बर्फगोळे होते. देवीच्या पाया पडून या त्रीदेवी जत्रेत सामील झाल्या. पैलवानांची कुस्ती पाहिली. धुळीने माखलेला पैलवानाचा रांगडा देह पोरी पापणी न लवता पहात होत्या.बंदुकीने नेम धरून फुगे फोडले,साबणाभोवती रिंगा टाकल्या, जादूचा प्रयोग तंबूत बसून बघितला. जादूगार वीसाच्या नोटा दाखवून त्याच नोटा दोनशेच्या करून बघ्यांना आश्चर्यचकित करत होता. सुली नि ललगी आकाशपाळण्यात बसल्या. वासंती त्या पाळण्याकडे बघत राहिली.
पुढे जाताच, सुली नि ललगी टिकल्याबांगड्यांत रमल्या.गळ्यातल्या माळा, लोंबते कानातले..तसे चुलत सासूबाईने वासंतीलाही पैसे दिले होते पण ते तिने नाही वापरले. कनवटीला लावलेली दहा रुपयाची नोट मोडली नि तिने शेवबुंदीचा पुडा घेतला. सुली नं ललगीने जिलबी नि भजी घेतली. वासंतीलाही दिली.
तिथे एका निर्मात्याने तंबू ठोकला होता. ऑडिशन चालू होतं. सुली नं ललगी वासंतीला दारापाशी उभी करून आपण रांगेत उभ्या राहिल्या. निर्मात्याला हवा होता तसा अगदी साधाभोळा वासंतीचा चेहरा, तिथल्याच एका कामगाराच्या द्रुष्टीस पडला. रांगेतल्या मुलींकडे दुर्लक्ष करून त्याने वासंतीला निर्मात्यासमोर न्हेऊन उभं केलं. निर्मात्याने दिलेलं स्क्रीप्ट तिने न घाबरता वाचून दाखवलं.
निर्माता,दिग्दर्शक खूष झाले. त्यांनीच वासंती व सुली, ललगीला घरी न्हेऊन सोडलं. पेढ्यांचा पुडा त्यांनी रंगीम्हातारीच्या हाती दिला व म्हणाले,”शंभर नंबरी सोनं आहे तुमची सूनबाई. आम्ही आमच्या पुढच्या पिक्चरसाठी वासंतीची निवड करतोय.” रंगीम्हातारीने वासंतीची अलाबला काढली.
इतक्यात वासंतीचा नवरा चंदू पुढे आला. छाती पुढे करत म्हणाला,”ही बायकोय माझी. माझी परमिशन लागलं आणि ती मी माझ्या बायकोला देणार नाय. हजार लोकांसमोर तोंडाला रंग फासून काम करायचं नाय म्हंजे नाय.”
(क्रमश:)
वासंतीला चित्रपटात काम करायला मिळेल का की चंदू खो घालेल आणि रंगी म्हातारी ती देईल का करू बघुया पुढच्या अंतिम भागात.
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============