मी गंपू हत्ती!


म्हणजे मी सध्या बाळ आहे हो. आय मीन बेबी एलिफंट. मला ना भूक लागते सारखीसारखी. मला केळी खूप आवडतात. तुमच्यासारखं नाही कै,आम्ही सालासकट केळी खातो. मीतर दोन डझन केळीसुद्धा खातो एकावेळेला. नायतर तुम्ही जास्तीत जास्त चार.
आमच्यात शाळा बिळा नसते तुमच्यासारखी. आई म्हणते,हा निसर्ग म्हणजेच आपली शाळा. मस्त ना. मी खूप मज्जा करतो. पावसात भिजतो. चिखलात लोळतोपण. मग आई मला नं सोंडेने धपाटे घालते. माझी आई खूप म्हणजे खूपच स्ट्रांग आहे. म्हणजे बघा तुमचा पाय आला ना तिच्या पायाखाली तर त्याची पोळीच झाली समजा.
आज मी जरा उशिरा उठलो. आईने आज उठवलच नै मला. आई,बाबा नी दादा जंगलात गेलैत कामाला. आई हल्ली दादालाही नेते सोबत. तो शिकतोय तिकडे.
आमच्या मालकांचा एक छोटा मुलगा आहे. भिकू म्हणतात त्याला सगळे. भिकू मला तिकडे लांब, तिकडे नं एक तळय.. तिथे जातो घेऊन. मग भिकू मला अ़घोळ घालतो. मी भिकूला अंघोळ घालतो. सोंडेनं भिकूवर पाणी उडवलंना की कसला खुदूखुदू हसतो! आय लव्ह यू गंपू म्हणतो. मग आम्ही रानात बरंच फिरतो. माझ्यावर उभं राहून भिकू वरच्या फांद्यांवरची फळं काढतो. आम्ही दोघं मिळून खातो.
कधीकधी सुट्टीला भिकूचे मित्रसुद्धा येतात आमच्यासोबत खेळायला. फुटबॉल खेळतो आम्ही. असली धम्माल येते म्हणून सांगू! मला व माझ्या फेमिलीला जेवण वाढल्याशिवाय भिकूच्या फेमिलीतलं कोणीच जेवत नाही.
आई सांगते, एकदा नदीला पूर आला होता. भिकूचे बाबा माझ्या बाबांना घेऊन जंगलात गेलेले. माझ्या बाबांनी त्या पुरातून नदी पार केली व भिकूच्या बाबांना सहीसलामत घरी आणलं. तेंव्हापासून तर आम्ही त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झालोय.
भिकूचे बाबा नं माझ्या बाबांच्या पाठीवर बसतात. खूप चांगले आहेत ते. माझ्या बाबांच्या सोंडीला गोंजारत असतात. कधीकधी भिकू आमच्या सोंडीवर नक्षीपण काढतो. एक सिक्रेट सांगतो तुम्हाला. भिकू त्याचे खाऊचे पैसे साठवतोय..माझ्यासाठी. मला तो गळ्यात बांधायची घंटा आणणारै.
तिकडे लांब रस्त्याच्या कडेला एक मंदिर आहे बाप्पाचं. म्हणजे भिकू त्याला बाप्पा म्हणतो. त्या बाप्पालापण नं माझ्यासारखीच सोंडय.
भिकू बाप्पाला साष्टांग नमस्कार घालतो तसा बघून बघून मीसुद्धा घालायला शिकलोय. नमो करता येतं मला. चला बोलत काय राहिलोय. भिकू साद घालतोय मला. केळी काढलंन वाटतं मागल्या दारची. अच्छा!
——-सौ.गीता गजानन गरुड.
===================
हेही वाचा