

समिधाला आज पहाटेच खूप लवकर जाग आली…यशोदाबाई म्हणजे समिधाच्या सासूबाई काही उठल्या नव्हत्या…घड्याळात तर पावणेआठ होत आले होते. प्रसादला ऑफिसला जाण्याची वेळ जवळ-जवळ येत होती…समिधा आपल्या सासूबाईंना उठवणार तरी कशी…म्हणून प्रसादच्या उशाशी जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रसादही झोपेतच होता. सासूबाईही मग उठल्या तसा तडक मोर्चा त्यांनी स्वयंपाकघरात वळवला…डब्याची कसलीही तयारी नाही हे पाहून यशोदाबाई खवळून उठतात आणि तावातावाने म्हणतात…
“समिधा….ऐकू येत नाही का…काय करतेस आत नवऱ्यापाशी…आज स्वयंपाकाची तयारी का नाहीय..मुहूर्त काढणार आहेस का स्वयंपाकाचा ?”
समिधा शांतपणे – आई…आज मला पीरिअड्स आलेत सकाळीच उठलीय मी…पण तुम्ही देवघर आहे त्या बेडरूममध्ये झोपतात मग..मी तुम्हाला कशी उठवू शकते…
यशोदाबाई – झालं…झाला का खोळंबा आता…तू राहू देत…मी मेलीनं अजून काय-काय करायचं..लग्नाला २ वर्ष होतील ना आता…आता तरी पाळणा हलू द्यात की घरात
आपल्या आईच्या बडबडीने प्रसाद जागा होतो…आणि स्वयंपाकघरात येतो आईचा रुद्रावतार बघून भानावर येतो…
प्रसाद – आई…काय झालं..एवढी का चिडलीयस…तुला नसेल होत तर सांग…मी करेल काहीतरी..
यशोदाबाई – काय करशील ? दुसरं लग्न करशील का…
प्रसाद – आई…काय बोलतेस…भानावर ये की…मीच येणार होतो तुला सांगायला…पण नाही जमलं मला..मला आज स्वयंपाकघरात जाता येणार नाही हेच समिधा सांगत होती मला…पण तुला सांगायची हिम्मत झाली नाही तिची…कशी सांगेल तुझा असा रागावलेला स्वर पाहून…एक तर कालवा-कालवं केलेली तुला चालत नाही…इकडं-तिकडं फिरलेलंही तुला चालत नाही…तू पण या सगळ्यातून गेलीय…त्यात तिला तू एकटीलाच बसवते..सगळं बेडशीट्स, कुशन कव्हर धुवायला सांगतेस…तिलाही त्रास होतंच असेल..
यशोदाबाई – तू…बायकोची वकीली करू नकोस…आम्ही काय बाजूला बसलोच नाही की काय..आमच्या सासूबाई तर…स्वतः न्हाऊ घालायला यायच्या डोक्यावरून…मगच आम्हाला स्वयंपाकघरात यायची मुभा होती…शिकलेली बायको म्हणून डोक्यावर घेऊ नकोस…
प्रसाद – आई…एक तर तुला समजावून सांगायचं म्हटलं तर..माझा वेळ फुकट वायाला जाणारे…तू काही डबा करू नकोस…मी बाहेर खाऊन घेईल काहीतरी…
यशोदाबाई – जा…जा..नेभळट कुठला…
समिधा बेडरूम मधूनच प्रसादला आवाज देते…लगेच प्रसाद बेडरूम मध्ये येतो…
प्रसाद – हा..बोल ..काय झालं..काही हवंय का तुला..?
समिधा – ऐका…ना मला माझे कपडे द्या ना…कपाटातून काढून आईंना नाही आवडणार ते…मी कपाटाला हात लावलेलं…म्हणजे मी ऑफिसचं काम करायला बसेल…आज वर्क फ्रॉम होम घेते…पोटातही खूप दुखतंय माझ्या..आता चार दिवस पाणीसुद्धा मला आईच देणार तेही चरवी भरून इथेच या रूमच्या दारापाशी ठेवतील…माझी भांडी पण वेगळी ठेवणार…जाऊ दे..तू फक्त कपडे काढून दे…
प्रसाद – आईना…अति करते हा..म्हणूनच मला तिचा राग येतोय खूप…बरं हे घे कपडे…मी जातो आता आवरून..
समिधा – चल बाय…
प्रसाद – बाय…जेवण कर आणि काळजी घे स्वतःची..आणि लक्ष देऊ नकोस आईकडे…
समिधा – आता आहे हा…पाच दिवस वनवास…जाऊ देत… ना तेवढीच स्वयंपाकाला सुट्टी…
प्रसाद आपलं आवरून ऑफिसला जातो…तेव्हड्यात सासूबाईंचा तोंडाचा पट्टा चालूच होतो…
यशोदाबाई – हा…घ्या…खाऊन…किती ग तू…वेंधळी…सकाळी पाळी आली तर निदान फोन तरी करायचा ना..
समिधा – आई…घरातल्या घरात कसा काय फोन करू…
यशोदाबाई – बरं…बरं…आवरते मी…देवपूजेला बसते..हा..आणि या खोलीच्या बाहेर येऊ नकोस…काही पाहिजे असेल तर आवाज दे…
समिधा बाथरूममध्ये जाते आणि पाय धुवून बाहेर येते…सासूबाई देवघरातून पाहत असतात…
यशोदाबाई – बाई…बाई…कहर झाला आता..समिधा तुला एवढं कळत नाही का ? ओले पाय घेऊन घरभर फिरतीस ती…सगळं पुसून काढ आता ते…सगळ्यांच्या अंघोळी झाल्याशिवाय अंघोळीला जाऊ नकोस…आणि हो कपडे मशीनला लावू नकोस…हातानेच धुवून टाक…एक तर मशीनच्या ड्रायर मध्ये सुकून निघतात…तू वाळत घालायला जाशील तर…पुन्हा कालवा-कालवं…हातानेच धुव आणि हातानेच पिळून काढ मगच वाळत घाल..
समिधा सगळं सासूबाईंच्या मनासारखं करत असते. पण काहीही करून हे सगळं कुठेतरी थांबवावं असं समिधाला मनापासून वाटत असतं….एक दिवस समिधा चांगलीच नामी युक्ती काढते…तेही प्रसादला आपल्या हाताशी धरून…ते पाच दिवस कसेतरी रडत-कढत जातात…तीन-चार दिवसांनी मुद्दामून प्रसादशी भांडण काढते..तेही मुलं होण्यावरून…
समिधा – कंटाळा आलाय मला…असं सारखं-सारखं पीरिअड्स असताना बाजूला बसणं…एक तर आईंची चिडचिड होते…मग त्या मला ताट वाढतात …नाही आवडत मला असं आयत खाणं..एक तर त्याही चीड-चीड करतातच की कामावरून…
प्रसाद – अगं नक्की काय म्हणायचंय तुला स्पष्ट सांग…आई हे सगळं आधीपासूनच करतीय…आपले पूर्वज सांगतात ते काही चुकीचं नाहीय…
समिधा – जाऊ देत…तुम्हा पुरुषांना काय कळणार म्हणा…मी एक निर्णय घेतलाय..
प्रसाद – कसला निर्णय ?
समिधा – मुलं होण्याबद्दलचा..!
प्रसाद – कुणाला विचारून घेतलास…निर्णय ? आणि काय ठरवलंस तू ?
समिधा – मला मुलं नकोय…!
प्रसाद – काय ?
यशोदाबाई सगळं ऐकतात आणि चवताळून म्हणतात…
यशोदाबाई – काय गं ….कुणाला विचारून घेतला हा निर्णय…? मुलं नकोय म्हणजे काय…कुठलं पाप
केलंय मी मागच्या जन्मी काय माहिती…या जन्मात नातवंड पाहायला मिळणार आहे की नाही काय माहिती…
प्रसाद – तिने काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असणार…नाही का ग समिधा…!
समिधा – विचार आपण खुर्चीवर बसण्याआधीपण करतोच ना…मुद्दाम कुणी तुटलेल्या खुर्चीवर बसत नाही..ह्या निर्णयाचं पण तसेच आहे…मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आज…
यशोदाबाई – बरं बाई…बरळ…काय विचार केलंयस या अतिशहाण्या डोक्यात…
समिधा – आई…पहा..एक तर माझ्या मासिक पाळीत तुमची खूपच चीड-चीड होतेय…हे मी खूपदा पाहिलंय…त्याच रक्ताचा जीव मी पोटात वाढवणार मग आणखी तुमची चिडचिड त्यापेक्षा नकोच ना…मग परत तेच विटाळ…तीच घाण तुमच्या आजूबाजूला माझ्या होणाऱ्या किंवा झालेल्या मुलाच्या रूपाने घरभर फिरणार…आणखी विटाळ होईल..सगळं घर कसं अपवित्र होईल ना…मग कशाला पाहिजे मुलं…नकोच ना
प्रसाद – मी समिधाच्या मताशी सहमत आहे…पटलंय मला तीच म्हणणं…आई तू तर त्या दिवशी मला डबाही दिला नाहीस…तिच्या पीरिअड्स च्या चिडचिडीमुळं…नकोच जाऊ देत ना…
यशोदाबाई – वा…ग.. वा..अरे बायकोच्या बैला…जरा नीट विचार कर..लोक हिला वांझोटी म्हणतीलच…पण तुलाही निपुत्रिक म्हणतील…म्हणू देत का…अरे ज्याचा संसार होत नाही लोकांमध्ये किंमत नसते रे त्या माणसाला..तू तर हिची तरफदारी करायला निघालास की रे…पोराचा कधी विटाळ होत असतो का..
प्रसाद – आई…हे तू म्हणतीयस…अगं पीरिअड्स आले म्हणून आकांडतांडव करतेस तू..अगं मग त्याच रक्तापासून बनलेलं मुलं अंगा-खांद्यावर खेळवायला आवडेल तुला…कसं शक्य आहे गं..?
यशोदाबाई – हे तू बोलत नाही…तुझ्यामागून ही तुझी अतिशहाणी…अति फॉरवर्ड बायको बोलतीय…
एवढा वेळ गप्प बसलेली समिधा बोलू लागते-
समिधा – आई…आहे मी अतिशहाणी…आणि फॉरवर्ड…काय म्हणणं आहे तुमचं….आई…कसली एवढी किळस करतायत तुम्ही…ज्या अवस्थेतून तुम्ही गेल्या आहात…त्याच अवस्थेतून सगळ्याच मुलींना जावं लागत..आपण म्हणतो देशासाठी आपले वीर जवान रक्त सांडतात…आपल्या प्राणाचा त्याग करतात…त्याच वीर जवानांचा जन्मही त्याच विटाळ मानल्या जाणाऱ्या रक्तामधून झालेला असतो हे विसरलाय तुम्ही…ते वीर जवान प्राणाची बाजी लावतात…पण असे कित्येक जीव बाई आपल्या पोटात…त्याच अपवित्र मानल्या जाणाऱ्या रक्तातून जन्माला घालत असते…त्याच रक्ताची दर महिन्याला तुम्ही किळस करता…का ??…का ?? मासिक पाळी ही काय शाप किंवा पाप नाहीय…ती तर नवीन निर्मितीच एक सुंदर आणि निरागस पाऊल आहे जे निसर्गानेच बाईला दिलंय..आनंदाने त्याचा स्वीकार करावा सगळ्यांनी…त्या बाईचा मत्सर किंवा द्वेष करू नये…नुकसान आपलंच आहे…
यशोदाबाई – अगं पण …ते सगळं जाऊ देत…तू मुलंच नकोय म्हणालीय त्याच काय…
समिधा – आई…जोपर्यंत घरात पाळी या नैसर्गिक चक्राचा तिरस्कार होत राहील तोपर्यंत…माझा निर्णय बदलणार नाही…आणि यांचीही माझ्या निर्णयाला सहमती आहे…
यशोदाबाई – प्रसाद…तू सांग ना समजावून हिला…का एवढी हेखेखोर झालीय ही…
प्रसाद – तिचा निर्णय बदलू शकतो…जर तू तिला पाळीच्या दिवसात समजून घेतलंस तर..
यशोदाबाई – काय…समजून घ्यायचं मी आत्ता..
प्रसाद – समिधाला…पाळीच्या दिवसात एकांतात बसण्याची शिक्षा देऊ नकोस…मानसिक रुग्ण होऊन बसेल ती..आणि मुलं जन्माला घालण्यासाठी मानसिकतेचीही गरज असते…फक्त माझी मानसिकता पुरेशी नाहीय…समिधाच्याही मानसिकतेचा विचार करायला हवा आहे आपण…
यशोदाबाई – ठीक आहे…काय वाट्टेल ते करा…पण मला नातवंड खेळवायची आहेत हे ध्यानात असुद्या म्हणजे झालं…
महिन्याभराने समिधाला न्हाण आलं समिधा बाजूला बसली…सासूबाईंना सांगितलं तेव्हा समिधाच्या सासूबाई म्हणाल्या…
यशोदाबाई – समिधा…बाजूला बसण्याची गरज नाही…मलाही आताशा होत नाहीय…तेव्हा तू स्वयंपाक करू शकते..देवघरात मात्र जाऊ नकोस…तेवढं तरी पाळ…काय होईल देव पारोसे राहतील..मी पण चार-पाच दिवस पूजा करणार नाही..कपड्यांसाठी मशीन आहेच…भांडी घासायला बाई लावून देऊ..
समिधा – ठीक आहे…
समिधाही आनंदाने स्वयंपाक घरात गेली. स्वयंपाक सगळं आवरून आपल्या ऑफिसला जॉईन झाली..एकूण घरातलं वातावरण आनंदी झालं…सगळ्यांच्या मनावरची घाण निघून गेली…आपणही अजून २१ व्या शतकात जगतो आहोत पण तरीही मासिक पाळी हा विषय निघाला की खुलेपणाने बोलू शकत नाही…सॅनिटरी नॅपकिन जरी बाजारातून आणायचं म्हटलं तरीही दुकानदार वर्तमानपत्र कव्हर करूनच देतो…का ?…तर कुणी पाहू नये म्हणून…हे चित्र बदललं पाहिजे..नवा जीव जन्माला घालण्याचं सुंदर काम पाळी करत असते..तरीही त्याची आपल्यासारख्यांकडून अवहेलना होते…आत्ता गरज कसली आहे…मुळातच आपल्या सारख्या मुलींनी, बायकांनी पुढे होण्याची गरज आहे..आपल्या पुढच्या पिढीतील मुलींना या सगळ्याचा त्रास होता कामा नये. याकडे कटाक्षाने पहिले पाहिजे… काय म्हणतील अतिशहाणी….आणि फॉरवर्ड अशी लेबल लावतील…दुसरं काय होईल…
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा


सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.