Skip to content Skip to sidebar Skip to footer

रजोनिवृत्तीमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची

menopause treatment in marathi : बाई आणि तिचं जीवन म्हणजे काय बोलावे ?? कशाची उपमा द्यावी ?? शब्द सुचत नाहीत. वयात आल्यापासून ते वयाचा एक विशिष्ठ टप्पा गाठेपर्यंत तिच्या शरीरात मानसिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर झालेले बदल आणि शब्दात न व्यक्त होणार त्रास. त्यातच पार पाडलेली सगळी कर्तव्ये आणि बजावलेल्या वेगवेगळ्या भूमिका. यामुळे स्त्री शक्तीची एक मिसाल प्रत्येक स्त्री जगासमोर उभी करत असते. प्रत्येकीची परिस्थिती आणि स्टोरी वेगळी असेल पण संघर्ष मात्र सारखाच असतो.

स्त्रियांच्या आयुष्यात ३ मोठ्या प्रक्रिया घडतात ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलासाठी कारण असतात.. सगळ्यात पहिली
१. मासिक पाळी चालू होणे.. : ह्यामधून स्त्रीत्वाची चाहूल लागते.. शारीरिक बदल होतातच.. पण मानसिक बदल देखील खूप होतात..

२. दुसरी प्रक्रिया म्हणजे मातृत्व.. शारीरिक आणि मानसिक बदलच काय, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी घटना म्हणजे आई होणे..

ह्या दोन्ही घटना खूप त्रासदायक असल्या तरीही, आनंदात साजऱ्या होतात.

३. तिसरी घटना म्हणजे मोनोपॉझ.. म्हणजेच मासिक पाळी जाण्याची प्रक्रिया..

ढोबळ मानाने पन्नाशी नंतर ही प्रक्रिया सुरू होते.. सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवई, शारीरिक स्वास्थ्याची कमतरता आणि धकाधकीच्या जीवनामुळे स्त्रियांचा मोनोपॉझ चाळीशी नंतरही येऊन ठेपला आहे.
आणि ही प्रक्रिया काही महिने नाही.. तर काही वर्षे चालते.

————————-

मोनोपॉझ म्हणजेच रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. वयाच्या तेराव्या, चौदाव्या वर्षी सुरू झालेली मासिक पाळी आता थांबायची वेळ आलेली असते. यानंतर तिची आई होण्याची क्षमता संपणार असते. आणि याचवेळी स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच काही काळजी घेणं आवश्यक आहे.
काही स्त्रियांच्या बाबतीत खूपच लवकर म्हणजे चाळीशीच्या आधीच रजोनिवृत्ती येते. याचं कारण म्हणजे काहीतरी शारीरिक बदल किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड व्याधी यामागे असते. कधीकधी अंडाशयाचा कॅन्सर आणि त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते नंतर त्याचे उपचार, केमोथेरपी या सगळ्यांचा परिणाम म्हणून रजोनिवृत्ती लवकर होते.

मोनोपॉज मधून जात असलेल्या बऱ्याच स्त्रियांना मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रासही खूप होतो. मूड स्वीन्गस तर होतातच पण अंगदुखी, रात्री अपरात्री अचानक घाम फुटणे, शरीराची उष्णता खूप वाढणे, चिडचिड, डोकेदुखी असे खूप त्रास होतात.. मोनोपॉझ मध्ये असताना स्त्रियांना असंतुलित वजन वाढ, डायबेटीस, ऑस्टिओपोरोसिस, हृदरोग देखील संभवतात..
स्त्री जन्माला येते ती तिच्या बिजकोषातल्या बिजांसहित. तिच्या अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन हे हार्मोन्स तयार होत असतात आणि हेच हॉर्मोन्स बीज कधी सोडायचं आणि कधी नाही यावर कंट्रोल करतात. यांच्यामुळेच स्त्रीची मासिक पाळी सुरू असते. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मोनोपॉझ सुरू होतो. ही प्रक्रिया काही एकदम होत नाही, ही स्लो प्रोसेस आहे.

१) मासिक पाळी नियमित राहत नाही. कधी कधी खूप जास्त आणि वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो. तर कधी खूप कमी रक्तस्त्राव होतं.

२) गरमी होणं, घाम येणं आणि जीव घाबराघुबरा होणं.

३) पुरेशी झोप न होणं. निद्रानाशाचा विकार जडणं. डोकेदुखी वाढणे. उदास वाटणं. घरातील लोक आपल्याला टाळत आहेत असं वाटून अजून उदास होणं.

५) सतत थकवा जाणवणं.

६) स्वभावात विक्षिप्तपणा येणे. मूड स्विंग हा प्रकार बऱ्याच जणींमध्ये फार दिसून येतो.

७) सांधे दुखी आणि स्नायूंचे दुखणे यावेळेस सुरू होते. योनीमार्गात कोरडेपणा जाणवतो.

९) कामेच्छा कमी होणे, शारीरिक संबंध नको वाटणे, त्यात उदासीनता येणे.

१०) काहीजणींना मूत्रमार्गात अडचणी जाणवतात किंवा त्यावरचा कंट्रोल कमी होतो.

यापैकी कुठल्याही तक्रारी जर चाळीशीनंतर एखाद्या स्त्रीला जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाणे आणि व्यवस्थित तपासणी करून घेणे हितकारक असतं. त्यामुळे पुढे जर काही समस्या उद्भवणार असतील तर त्यांचं निराकरण करणं डॉक्टरांना सोपं जातं. बऱ्याचजणींना थायरॉइडचा त्रास याच कालावधीत सुरु होऊ शकतो म्हणून त्यावरही आधीच उपचार सुरू करून घेणे श्रेयस्कर आहे.

मोनोपॉझ ही खरंतर नैसर्गिक गोष्ट गोष्ट आहे. ठराविक वेळेनंतर ती येते आणि जाते, ज्या काही साध्यासुध्या अशा तक्रारी असतात त्या थोड्या दिवसांनी हळूहळू कमी होतात. पण कधीकधी हा कालावधी जाण्यासाठी त्रास होतो.
किंवा काही वैद्यकीय समस्या निर्माण होतात त्यावेळेस मात्र डॉक्टरांकडे जाणे आणि योग्य ते उपचार करून घेणे गरजेचं असतं. त्यातील काही उपचार पद्धती बघुया.

ज्यावेळी स्त्रीच्या शरीरात हार्मोन्स कमी होत जातात आणि नवीन तयार होत नाहीत, त्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते. त्यामुळे योनिमार्गाच्या काही तक्रारी कमी होणे गर्मी कमी होणे, हाडांची मजबुती वाढणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. परंतु या थेरपीचा एक मोठा धोका आहे तो म्हणजे याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी कमी कालावधीसाठी करणं चांगलं किंवा त्याचा डोस कमी घेणं गरजेचं असतं.

हा उपचार बाहेरून म्हणजेच शरीरावर केला जातो. याचा कोणताही धोका नाही. यात योनीमार्गातील ड्रायनेस कमी व्हावा म्हणून क्रीम मिळते ज्यामधून इस्ट्रोजन मिळू शकते.

मासिक पाळीमध्ये वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

वैभवलक्ष्मी व्रताविषयी संपूर्ण माहिती. कुणी व कसे करावे?

बाहेरून हार्मोन्स घेतलं तर काही त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणून हार्मोन्स न घेता पण इतर दुसरी औषधे घेऊनही गर्मी कमी करणे, थकवा कमी करणे आणि इस्ट्रोजन लेवल वाढवणे यासाठी दुसरी काही औषधे उपलब्ध आहेत. जी ह्या काळासाठी स्त्रियांना उपयोगी पडतील.

संपूर्ण पाळीच्या कालखंडात, बाळंतपणामध्ये स्त्रियांचा बराच ब्लड लॉस किंवा रक्तस्त्राव होतो तसचं मोनोपॉझनंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते.
त्याचाच परिणाम म्हणजे स्त्रियांची हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. त्यासाठी विटामिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमितपणे चालू केल्या पाहिजेत.

या सोबतच आपल्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये काही बदल केले तर मोनोपॉझ खूप आनंदाने घेता येऊ शकतो. जसे की खाण्या पिण्याच्या सवई मधे बदल. भरपूर पाणी पिणे, रोज व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे, अति तिखट, कॉफी, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, अति गोड असे पदार्थ टाळावेत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसे की, दूध, दही, मासे, अंडी असे पदार्थ खावेत. पुरेशी झोप घ्यावी जेणेकरून चिडचिड कमी होईल. तसंच हार्ट डिसीज, डायबिटीज आणि ऑस्टियोपोरोसिस यांना प्रतिबंध घालता येईल. शक्यतो धूम्रपान करूच नये कारण तंबाखूमुळे मोनोपॉज लवकर चालू होतो आणि उन्हाचा त्रास जास्त होतो.

नियमित योग, दीर्घश्वसन यांचाही खूप फायदा होतो. रिलॅक्सेशनसाठी कधीकधी मसाज पण करून घ्यावा.
वेळोवेळी शरीराच्या सर्व चाचण्या करून घेणे.

मेनोपॉजसाठी काही आयुर्वेदिक, हर्बल औषधं बाजारात उपलब्ध आहेत पण, शक्यतो एखाद्या तज्ञ वैद्य किंवा डॉक्टर यांना विचारूनच अशी औषधे घ्यावीत.
शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

यातूनही जर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आशा करते की, ही माहिती वाचून मोनोपॉज विषयी शंका आणि भीती नक्कीच कमी झाली असेल. तर हा शेवटचा टप्पा आनंदाने आणि सहजतेने पार करा.

================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.