Skip to content Skip to sidebar Skip to footer

मीराची हरतालिका

आज हरतालिका मीरा सकाळी जरा लवकरच उठली. सगळं आवरून तिनं छानशी जुनीच पण बऱ्यापैकी चांगली हिरवीगार,लाल काठाची साडी नेसली. दारातलीच दोन-तीन मोगऱ्याची फुलं खुडून तिने केसात माळली.जवळच असलेल्या नदीवर जाऊन तिने थोडीशी वाळू आणली.वाळूचे शिवलिंग बनवून तिने त्याची मनोभावे पूजा केली.नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून देवाकडे प्रार्थना केली.एवढ्यात तिची पंधरा वर्षांची लेक राधा तिच्या मागे येऊन उभी राहिली. तिने मुद्दामच आईला विचारलं “आई काय करतीये?कशासाठी करतीयेस तू ही पूजा?” मीरा सांगू लागली “राधा,अगं या व्रताला हरतालिकेचं व्रत म्हणतात.तुझ्यापेक्षा लहान वयाची होते ना, अगदी नाकळती तेव्हापासून हे व्रत मी करत आलेय. माझी आई करायची तिच्याबरोबर मीही उपवास आणि पूजा करायचे. जशी जशी मोठी होत गेले तसे तसे आईने या व्रताविषयी सांगितलं. पार्वतीने शंकर महादेवच पती मिळावा म्हणून हे व्रत केलं होतं. वाळूचं शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करतात, दिवसभर उपवास करतात, रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतात आणि मग उपवास सोडतात. पार्वतीने हे व्रत केलं आणि तिला शंकर महादेव पती म्हणून मिळाले,अशाप्रकारे मनासारखा नवरा मिळावा आणि नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून हे व्रत करतात”.
राधा म्हणाली “आई,बाबा रोज दारू पिऊन येतात तुला मारझोड करतात.आजही तु साडी नेसत असताना तुझ्या पाठीवरचे वळ पाहिले मी. या असल्या दारुड्या नवऱ्यासाठी तु उदंड आयुष्य मागतीये का?” एवढ्यात दारू पिऊन तर् झालेला मीराचा नवरा रामा आला.चालायचं,बोलायचंही भान राहिलं नव्हतं त्याला. आल्या आल्या त्याने मीराला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तिने उलट उत्तर देताच नेहमीप्रमाणे त्याने तिला लाथा बुक्क्यांनी मारलं. त्याने पुन्हा तिला झोडायला सुरुवात केली तेवढ्यात राधा आडवी आली. ती म्हणाली, “आई ही व्रतवैकल्ये, उपवास करून बाबा सुधारतील की नाही मला माहित नाही,पण आता तुलाच काहीतरी करायला हवं.किती दिवस असा बाबांचा मार खाणार.वसुधा आत्या म्हणत होती,त्या व्यसनमुक्ती केंद्रात आपण बाबांना दाखल करू. लेक आईला शहाणपणा शिकवतेय आणि मला घराच्या बाहेर काढायचं म्हणतीये यामुळे रामाचा पारा अजूनच चढला.त्याने पुन्हा एकदा मीराला आणि राधाला मारायला सुरुवात केली. आता मात्र मीरामधल्या पार्वतीने दुर्गेच रूप घेतलं. तिने वरच्यावर रामाचा हात धरला आणि तसाच मागे पिरघळला आणि त्याला म्हणाली “बास झालं आता,किती दिवस सहन करायचं?नोकरी नाही, काम-धंदा नाही या टेन्शन पायी किती दिवस तुम्ही दारू पिणार आणि डोक्यावरचं कर्ज अजून वाढवणार. पैशा पाण्याचं काय हो ते फिटून जातील,पण या दारू पायी तुम्ही, तुमचं, माझं आपल्या लेकीचं उभं आयुष्य पणाला लावताय.आता हे चालणार नाही”. असं म्हणून तिने वसुधा आत्याला फोन लावला. वसुधा आत्या येईपर्यंत मीरा गावातल्या सोनाराकडे गेली आणि गळ्यातलं मणी मंगळसूत्र तिने गहाण ठेवलं आणि सोनाराकडून थोडे पैसे घेऊन आली ,व्यसनमुक्ती केंद्रात भरण्यासाठी.जवळच्याच वस्तीवर राहत असलेली वसुधा आत्या, तिच्या मुलाला घेऊन आली. वसुधा आत्याच्या मुलाने आणि या दोघी मायलेकींनी मिळून रामाला गाडीत टाकलं आणि गाडी थेट व्यसनमुक्ती केंद्रावर जाऊन थांबली. वाटेतही रामाने बराच आरडाओरडा केला, शिवीगाळ केली, पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून सगळे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून आले. माघारी वळताना मीराचे डोळे भरून आले, तिला सगळं आठवत होतं, याच माणसाबरोबर मी हसत हसत सप्तपदी चालले होते आणि आज ही अशी वेळ माझ्यावर यावी. तिने डोळे पुसले आणि तशीच ती घरी आली.आज पहिल्यांदाच ती रामाशिवाय घरात राहत होती. लग्न झाल्यापासून कसाही असला तरी तो कायम तिच्यासोबत असायचा.मीरा लेकीला पोटाशी कवटाळून मनसोक्त रडली. दोघी मायलेकी तशाच उपाशी झोपी गेल्या.मीरा सकाळी उठली तिने हरतालिकेची उत्तर पूजा केली आणि नेहमीप्रमाणे कामाला लागली.
दिवसा मागून दिवस सरत होते. मीराला रामाची खूप आठवण यायची.आज जवळजवळ दोन महिन्यांनी व्यसनमुक्ती केंद्रातून फोन आला. तुमचा नवऱ्या मध्ये बरीच सुधारणा झाली आहे,तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता. मीराला खूप आनंद झाला. गणपती गेले, दसरा गेला नवरा घरी नव्हताच. त्याच्याशिवाय घर तिला खायला उठत होतं. शेवटी दिवाळीच्या आधी दोन दिवस मीरा रामाला घेऊन घरी आली. रामा आता चांगलाच सुधारला होता, त्याच्या तब्येतीतही सुधारणा झाली होती. घरी येताच रामानं मीराला आणि राधाला जवळ घेतलं. त्यांची मनापासून माफी मागितली. आणि म्हणाला “झालं गेलं विसरून जा, मला मोठ्या मनाने माफ करा यापुढे मी दारूला स्पर्शही करणार नाही. जे काही काम मिळेल ते काम करून आपण पोट भरू.
मीराला त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, तिला वाटलं याचं काय हा उद्याही बदलू शकतो. तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या कामाला लागली. दोनच दिवसांनी लक्ष्मीपूजन होतं. मीराने कामातून मिळालेल्या पैशाने थोडं थोडं वाणसामान आणलं.आज लक्ष्मीपूजन,मीराने हळूच तांदळाचा डबा उघडला आणि त्यात मणी-मंगळसूत्र गहाण ठेवल्याची पावती तिने पाहिली. तिचे डोळे भरून आले, “आज लक्ष्मीपूजन आणि माझ्या गळ्यात सोन्याचा एक फुटका मणीही नसावा, किती ते दुर्दैव? “असं म्हणून तिने डोळ्याला पदर लावला. एकट्याच बडबडणाऱ्या मीराचं बोलणं रामाने ऐकलं. त्याला आठवलं, व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मीराने तिचं मणी-मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं. रामाने मीरा बाहेर जातात तो तांदळाचा डबा उघडला. त्यातून ती पावती घेतली आणि तो सरळ सोनाराच्या दुकानात गेला.
व्यसनमुक्ती केंद्रात असताना रामाने एकदा बागकाम करताना सुबक अशी एक गणपतीची मूर्ती बनवली होती. कित्येक दिवसांनी तो असं छान काहीतरी करण्यात रमला होता. त्याची ती कला पाहून तेथील डॉक्टरांनी त्याला पणत्या रंगविण्याचे, आकाश कंदील बनविण्याचे काम दिले. त्याच कामाचा मोबदला म्हणून मिळालेले पैसे घेऊन तो सोनाराकडे गेला.पैसे भरून त्याने मीराचे मणी-मंगळसूत्र सोडवले आणि घरी आला. संध्याकाळी मीराने लाडूचा नैवैद्य देवापुढे ठेवला आणि पाया पडली. तितक्यात मागून येऊन रामाने हळूच तिच्या गळ्यात ते मणी-मंगळसूत्र घातले आणि तिचे पाय धरले. रामाने पुन्हा एकदा मीराची माफी मागितली. माझा जीव वाचवण्यासाठी, मलाच सुधारण्यासाठी तू तुझ्या गळ्यातलं मणी-मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं. मीरा, “तू माझ्या घरातली लक्ष्मी आहेस तरीही मी पदोपदी तुझा अपमान करत आलो. तुझा छळ करत आलो,माझी चूक मला समजली आहे,यापुढे मी तुला कसलाही त्रास देणार नाही मला माफ कर.
तुझ्यावर जशी हरतालिका प्रसन्न झाली, तशीच आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न होऊन दे. मीरा तोंडाला पदर लावत लाजली. रामाने तिला जवळ घेतलं.आई -बाबांना असं आनंदात पाहून राधाने देवाचे मनोमन आभार मानले.
मीराच्या घरी आज खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन साजरे झाले. अशी ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण….
ॲड.अश्विनी सचिन जगताप.
सुरेखाकन्या.

============================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: