माझं आभाळ (भाग पहिला)

-©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
बाहेर हलकासा रिमझिम पाऊस. हॉस्पिटलला लागूनं असलेल्या कँटीनमधे मी व शंंतनू बसलो होतो. माझ्या पुढ्यातल्या कॉफीच्या मगाच्या कडेवर मी उगाचच बोटांनी वर्तुळं काढत होते. शंतनू डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्या हालचालींच निरीक्षण करत होता. काय विचार करत असेल हा??
किती वाळलाय हल्ली! ती कॉलर..कॉलरचे कोपरे मळलेत. अरे हे काय..बाह्यांचंही तसंच. मला मात्र हाताने घासायला सांगायचा आणि आता..केसही विरळ होत चाललेत. ब्लेक अँड व्हाइट कॉम्बिनेशन नाही तरी आवडीचंच याच्या. हातातलं ते जाड कडं कुठं दिसलं नाही. बरं हा एकटाच इथे! घरातली बाकीची मंडळी कुठेयत? सासूबाईंची लाडकी थोरली सून..राहिलीच कशी त्यांना या अवस्थेत सोडून! छे पण मी का एवढा विचार करतेय..शेकडो योजनं दूर गेलेय याच्यापासनं, याच्या कुटुंबापासनं.
मी बाहेर पाहू लागले. हिरवंगार लॉन पाणथेंबांनी सजलं होतं. पण का कोण जाणे वातावरणात जोश नव्हता,चैतन्य नव्हतं. सगळं कसं संथ गतीने चाललं होतं. येणाऱ्याजाणाऱ्यांचे चेहरे चिंताक्रात. काही ट्रेनी डॉक्टर्स पायरीवर बसून एकमेकांत गुफ्तगू करत होते. देशाच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून येत असतील इथं रहायला! सहज विचार आला मनात. यांना हे वातावरण रोजचंच झालं असणार. कौतुक करावं तेवढं थोडं या लेकरांच.माझी परीही मेडीसीनला गेली तर..इथे प्रवेश मिळाला तर या मुलांसारखी आपल्या दोस्तांसोबत फावल्या वेळात याच पायंऱ्यांवर बसेल. शंतनूने गळ्यातनं आवाज काढला तसं माझं लक्ष परत त्याच्याकडे गेलं.
“शर्वरी,कॉफी घे. गार होईल.”तो त्याच्या जाडसर आवाजात म्हणाला.
मी डोळ्याच्या कोपऱ्यातनं त्याला पाहून घेत होते.
मनात विचारचक्र सुरु होतं. एके काळी मरायचे मी याच्या गाण्यांवर.
काय गायचा..अहाहा! त्याच्या गाण्यावर फिदा होऊनच तर कसलीही भीडभाड न बाळगता रोज डे ला सर्वांसमक्ष रेड रोज दिलं होतं मी याला. कसला क्यूट दिसायचा..बोटांनी केस मागे घ्यायची ती विशिष्ट लकब. हाय! माझ्याचसारख्या इतरही दिवाण्या होत्या शंतनूच्या. हा क्रिष्णाच होता जणू. सारंगी, हार्मोनियमसारखी वाद्यही सुरेल वाजवायचा. क्रिकेट, टेनिस सगळ्यात पुढे.
मी प्रपोज केलं तेंव्हा म्हणाला होता,”शर्वरी, तुझ्या घरचे नकार देतील आपल्या लग्नाला. अगं तुम्ही सो कॉल्ड उच्चवर्णीय. तुझा भाऊ तर तुमच्या जातीचा कट्टर समर्थक. तुझे वडील तुमच्या समाजातील मान्यवर व्यक्तीमत्व, आमदार. तू तुमच्या तोलामोलाच्या घराण्यातील मुलाला जोडीदार म्हणून निवड. अर्थात तुझ्या वडलांनी, तात्यासाहेबांनी पारध हेरुन ठेवली असेलच. माझा नाद सोड.
माझ्याकडे काय आहे! दोन खोल्यांत रहाणारं मध्यमवर्गीय कुटुंब आमचं. ते घरही भाड्याचं. घरात मी,आई,वडील,दादा, वहिनी..कसं काय एडजस्ट करणार तू! तेंव्हा माझा नाद सोड.” आणि मी दिलेलं गुलाब शंतनूने दोन दिवसांनी मला परत केलं होतं. मी ते परत त्याच्या खिशात ठेवत म्हणाले,”माझ्या प्रेमाचा अनादर करु नकोस शंतनू. तूच माझी फर्स्ट अँड लास्ट चॉइस आहेस.”
शंतनू माझ्या गहिऱ्या डोळ्यांत बघत राहिला होता. त्याने माझा हात धरुन मला बोगनवेलीच्या झुडपामागे न्हेलं होतं नि कवेत घेतलं होतं. त्याची ती उबदार मिठी..बास..त्याक्षणी मला होणाऱ्या इतर परिणामांचा विसर पडला होता. दोघं एकमेकांना घट्ट बिलगलो होतो. त्यावेळीही..हो त्यावेळीही अशीच रिमझिम सुरु झाली होती. निसर्गाची रागदारी सुरु होती नं आमचं प्रीतीराधन सुरु होतं.
शंतनूने भानावर येत माझ्यापासून दूर होण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न मी हाणून पाडला होता. माझ्या गोऱ्यापान गालांवरनं पावसाचे थेंब ओघळत होते. दोघेही प्रीतीरसात चिंब न्हालो होतो. इतक्यात, कौन है रे उधर झाडीके पिछे! शिपाईमामाचा आवाज नं शंतनूने सर्कन बाजुच्या झुडपात लपणं.
शिपाईमामा ओरडलाच मला,”बिटिया क्यों भिग रहीं हो? घर नहीं जाना!” मग मी निमुटपणे गेटच्या बाहेर निघाले होते. थोड्याच वेळात शंतनूही आला होता. पावसात टपरीजवळ उभं राहून आम्ही चहा घेतला होता. हळूहळू शंतनूचीही भीड चेपली. आम्ही एकत्र हिंडूफिरु लागलो होतो.
कॉलेज संंपलंं. मला पुढे शिकायचं होतं पण आईला मला पुढे शिकवण्यात काडीमात्रही रस नव्हता. शरे, तुला नोकरी थोडीच करायचीय! तुझ्यासाठी तात्यासाहेबांनी नगराध्यक्षांचा मुलगा फिक्स केलाय. दागिन्यानी वाकशील तू. दिमतीला इथल्याहून दुपट्ट नोकरचाकर असणार.
शंतनूने एम कॉमला एडमिशन घेतलं होतं. घरात शंतनूबद्दल सांगून त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर.
माझा भाऊ, बंडू घोटे घराण्याच्या इभ्रतीसाठी कुठल्याही पातळीवर गेला असता. स्वत:च्याच मस्तीत वावरणारा तो. बापजाद्यांनी कमावलेल्या दौलतीवर ऐश करणारा, इतरांना कस्पटासमान मानणारा. मी माझा निर्णय माझ्याजवळच राखून ठेवला. गुपचूप प्लान तयार केला .
आईला सांगितलं,”दर मंगळवारी देवीच्या देवळात जाणार आहे.” आईही खूष झाली..लेक देवाधर्माला लागली म्हणून. दोनेक मंगळवार गेलेही. ड्रायव्हरकाका माझे जानी दोस्त. त्यांना सांगितलं मी शंतनूबद्दल. ड्रायव्हरकाका मदत करतो म्हणाले. त्यांनी त्यांची पानं हलवली नि मला पळून जायला मदत केली. दोन दिवस शंतनूच्या मित्राच्या गावी होतो. तिथेच देवळात लग्न केलं नि आम्ही जीवनसाथी बनलो.
भावाला सुगावा लागला, माझ्या लग्नाचा पण निवडणुकीची तारीख जवळ आली होती. ..अगदी महिन्याभरावर. त्याने शंतनूला काही केलं असतं,अगदी त्याच्या केसाला जरी हात लावला असता तरी विरोधी पक्षाला आयतं कोलीत मिळालं असतं. बंडू, तात्यासाहेब दोघेही मुग गिळून गप्प राहिले.
शंतनूच्या घरी आलो. दारावर ना रांगोळी होती ना धान्याने भरलेलं मापटं. शंतनूच्या आईला मी आवडली नव्हते कारण .. कारण मी कमवत नव्हते. पाचजणांत अजून एक खाणारं तोंड वाढणार होतं, माझ्या रुपाने.
माझी मोठी जाऊ, सासूबाईंच्या नात्यातली म्हणजे त्यांच्या मामेभावाची मुलगी म्हणून त्यांचा तिच्यावर जीव होता. शिवाय ती नोकरी करत होती. मला आईने पुढे शिकू दिलं नव्हतं. शंतनू एम कॉमच्या पहिल्या वर्षाला..त्याचं शिक्षण चालू होतं म्हणजे आम्ही दोघंही घरातल्यांसाठी बांडगुळंच होतो..त्यांच्या पैशांवर जगणारी.
दर महिन्याला हवे तितके, हव्या
त्या किंमतीचे ड्रेसेस खरीदणारी मी चार सुती साड्यांवर आले होते. कसलीच हौसमौज करता येत नव्हती. हे घर मला का कोण जाणे आपलंसं वाटतच नव्हतं. एक शंतनू सोडला तर घरातली इतर माणसं मला आपलं मानायला तयारच नव्हती. रात्री किचनमधे सासूसासरे तर बाहेरच्या खोलीत खाटीखाली दिरजाऊ नि खाटीवर आम्ही दोघं नवविवाहित.
मी कोमेजून जात होते. शंतनूच्या जवळ जाण्याचं सोडाच. हा असा चोरटा प्रणय मला मान्य नव्हता. झालं,शंतनूची चिडचिड वाढली. बाहेर कुठे फिरायला गेलो की सगळ्या खिडक्यांना डोळे फुटायचे. सासूबाईंनी सतरा कामं सांगितलेली असायची. शंतनूने त्याचं लक्ष अभ्यासात वळवलं. मलाही तेच हवं होतं. शंतनूला चांगली नोकरी लागली की छोटसं का होईना घर घेऊ अशी मी स्वप्नं पहात होते.
जाऊ काहीतरी खुरापती काढायची. तिला मी नको होते. माझ्याशी भांडण काढायला बघायची. मुद्दाम माझ्या घरच्यांना उद्देशून टोमणे मारायची जे माझ्या जिव्हारी लागायचे. जेवण वाढतानाही मुद्दाम मला कमी भाजी,आमटी वाढायची. परत घ्यायला गेलं तर पातेलं रिकामं असायचं. शंतनूला सांगून पाहिलं एकदोनदा पण तो मलाच बोलायचा..महाराणी तू..तुला आमच्या घरात एडजस्ट होता येत नै..वगैरे. कुठल्याकुठे संभाषण वळवायचा. वेड घेऊन पेडगावला जायचा. लग्नापुर्वीचा माझा शंतनू हाच का, मला वारंवार प्रश्न पडायचा.
कधी मी केलेल्या भाजीत केस मिळायचा. मोठे दिर बोटाने उचलून माझ्याकडे द्यायचे. केस पहाताक्षणी लक्षात यायचं..हा सरळसोट केस माझा नाही. माझा तर वळणावळणाचा..मी तसं बोलूनही दाखवलं तर ते जेवण बाजूला सारुन निघून गेले. दोन दिवस ते प्रकरण धुमसत होतं घरात. जाऊ, कानावर हात ठेवून रहावं असं नको नको ते बोलत होती. मला दाट संशय होता..तिनेच स्वत:चा केस उपटून भाजीत..पण मी ते सिद्ध कशी करणार होते!
एकदा सासूबाईचं मंगळसूत्र सापडेना. त्यांनी अंघोळीआधी काढून ठेवलं होतं म्हणे आणि मी तिथेच भाजी निवडत बसले होते म्हणून माझ्यावर संशय. सगळं घर शोधलं. शेवटी माझ्या बेगेला हात घातला. मी उठून उभी राहिले, जोर एकवटून ओरडले,”चोर समजता की काय मला!”यावर सासूबाई म्हणाली,”कर नाही त्याला डर कशाला.”
मी म्हंटलं,”तसं असलं तर आधी जाऊबाईंच कपाट तपासा. आश्चर्य म्हणजे,जाऊबाई यावर अजिबात रागावली नाही. डाळीत काळं आहे..मला कळायला हवं होतं पण हे असले छक्केपंजे मला ठाऊक नव्हते.
जाऊबाईच्या कपाटात मंगळसूत्र मिळालं नाही. आमचं तर कपाट नव्हतंच. मी माझी बेग पुढे केली. घरात थोडीच मी चावी लावायचे! माझ्या बेगेत अगदी तळाला ते मंगळसूत्र मिळालं. तितक्यात शंतनू आला.
सासूबाईने माझ्या नावाने बोटं मोडली, कलकलाट केला. शैजारपाजारची माणसं गोळा झाली. सगळी माझ्याकडे रोखून बघत होती. शंतनूने सण्णकन माझ्या थोबाडीत मारली. मला तो अपमान जिव्हारी लागला. तरी मी गप्प राहिले. कुठूनसा सोशिकपणा आला होता अंगात. खरंतर तेंव्हाच सोडून जायला हवं होतं ते घर पण माहेरचे दरवाजे बंद होते नि मला कुठे नोकरी मिळेल किंवा काहीतरी व्यवसाय करावा एवढा आत्मविश्वास नव्हता माझ्यात. लहानपणापासून मुलीची जात, मुलीची जात,संयमाने वागावं..असं काहीबाही माझ्या मनात पेरुन आईने माझे आत्मविश्वासाचे पंखच जणू छाटले होते. लोचटासारखी राहिले तिथेच.
शेजारी रहाणाऱ्या वसतकरबाईंना माझी दया आली. दुपारची सासूबाई निजल्या की मी जायची त्यांच्याकडे, बसायला. त्यांचे लाघवी शब्द म्हणजे रखरखीत आयुष्यातली हिरवळ वाटायची मला. त्या म्हणायच्या,”शर्वरी, धीर सोडू नकोस. निघेल काहीतरी मार्ग. तुझं चांगलंच होईल बघ.”
वसतकरबाईंच्या बोलण्याने मला धीर यायचा. काहीबाही खाण्याचं त्या माझ्यासाठी राखून ठेवायच्या. मला प्रेमाने खाऊ घालायच्या. त्यांनी त्यांच्या बँकर भावाला माझी कहाणी सांगितली. त्यांच्या ओळखीवरुन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी मिळाली. घरातलं जमेल तेवढं आवरुन मी बँकेत जाऊ लागले. शंतनूचं दुसरं वर्ष पुर्ण झालं होतं. तोही नोकरीसाठी फॉर्म भरत होता पण अपयश हाती लागत होतं.
मित्र त्याच्या कानात काहीबाही भरायचे नि तो माझ्यावर संशय घ्यायचा. माझा शंतनू माझी पर्स चेक करायचा. मित्रांना माझ्या पाळतीवर ठेवायचा.
आता तर त्याचा अंकुर वाढत होता माझ्या उदरात. त्याने खरे तर माझे लाड केले पाहिजे होते पण सतत महाराणी, मोठ्या घरची असं काहीबाही बोलायचा..मग जाऊ खूष व्हायची. मनापासून हसायची. वसतकरबाईंनीच डोहाळे पुरवले माझे. काय हवं नको ते हक्काने सांग म्हणायच्या.
नववा महिना लागायला नं माझी नैसर्गिक प्रसुती झाली. मुलगी झाली मला. माझ्या मुलीचं कोणाला कोतुक नव्हतं. जाऊ नि सासूबाई दोघी बायका असून त्यांना मुलगी म्हणजे ओझं वाटत होतं. त्यांची वाकडी तोंडं पाहून कसंसच वाटायचं.
जाऊबाईलाही दिवस गेले होते. सासूबाई तिच्या पोटाला हात लावून म्हणायची,”मी सांगते, तुला मुलगाच होणार.” जावेचे लाड सुरु होते आणि मी..मी ओली बाळंतीण पदर खोचून कामाला लागले होते.
(क्रमश:)
©️®️ सौ.गीता गजानन गरुड
वाचकहो नमस्कार. शर्वरी शंतनूच्या बाह्यरुपाला भुलून त्याला आपलं काळीज देऊन बसली. दोघांचं लग्न झालं खरं पण शर्वरीचं माहेर अंतंरलं नं सासरच्यांनी मनापासनं तिचा स्वीकार केला नाही. अशावेळी नवऱ्याचा भक्कम आधार पाठीशी लागतो, बाईच्या..मिळेल का तिला आधार ? सासरची सामावून घेतील का..का अजून काही. तुम्हाला काय वाटतं..लिहा कमेंटीत.
पुढील भाग :
https://www.ritbhatmarathi.com/maz-abhal-part-2/
================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.