Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माझं आभाळ (भाग दुसरा – अंतिम भाग)

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

नववा महिना लागायला नं माझी नैसर्गिक प्रसुती झाली. मुलगी झाली मला. माझ्या मुलीचं कोणाला कोतुक नव्हतं. जाऊ नि सासूबाई दोघी बायका असून त्यांना मुलगी म्हणजे ओझं वाटत होतं. त्यांची वाकडी तोंडं पाहून कसंसच वाटायचं.

जाऊबाईलाही दिवस गेले होते. सासूबाई तिच्या पोटाला हात लावून म्हणायची,”मी सांगते, तुला मुलगाच होणार.” जावेचे लाड सुरु होते आणि मी..मी ओली बाळंतीण पदर खोचून कामाला लागले होते.

दिवस सगळेच सारखे नसतात. शंतनूला नोकरी लागली नि त्याचा माझ्या परीकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन बदलला. तो तिला त्याच्यासाठी लकी समजू लागला. तिचे लाड करु लागला. खरंच किती छान दिवस होते ते. माझा शंतनू खूष असताना किती गोड दिसायचा! मला खरंच फार मोठं धन, दागिने यांची अपेक्षा नव्हती. मला हवं होतं केवळ सुखी कुटुंब.

सासूबाई, जाऊ दोघींनी मला समजून घ्यावं असं मला वाटायचं. मी त्यासाठी माझे त्यांनी केलेले सारे अपमान गिळून नव्याने नातं जोडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.

परंतु आमचं पतीपत्नीचं चांगलं चाललेलं सासूबाईंना नि जावेलाही बघवलं नाही. सासूबाई शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगायच्या,”माझ्या लेकावर मोहिनी घातली हिने. लय कावेबाज पोर.” शेजाऱ्यांना खरी परिस्थिती ठाऊक होती.
ते दुर्लक्ष करायचे.

सासूबाईंना स्वस्थ बसवतंच नव्हतं. काही नं काही कारण काढून आमच्या दोघांत भांडणं लावून देऊ लागल्या. शंतनू शीघ्रकोपी. लगेच भडकायचा.. आणि मग हातात जे असेल ते माझ्यावर फेकून मारायचा. मी मुकं जनावर नव्हते. हाडामासाची स्त्री होते. किती दिवस, महिने हा अन्याय मुकाट्याने सहन करणार होते मी, लहानगी परी घरात भांडणं झाली की झोपेत अंग काढायची,दचकायची.

माझा धीर संपत चालला होता.  मला डिप्रेशन येऊ लागलं होतं. मीही भांडू लागले. लग्न झाल्यापासून माझा केलेला छळ गिरवून सांगू लागले. भिंतींचे कान, डोळे उत्सुकतेने आमच्यातली भांडणं ऐकत, बघत असायचे. मजा मजा लुटत असायचे.

मी पुन्हा बँकेत जाऊ लागले.  सासूबाई परीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हत्या. तुझ्या पोरीचं गूमुत मी का काढू अशा शब्दांत त्यांनी त्यांचा नकार व्यक्त केला.

वसतकरबाईंकडे मी परीला ठेवू लागले. तिला पाहून अजून दोनेक बायांनी आपली मुलं वसतकरबाईंकडे ठेवायला सुरुवात केली. मुलात मूल लवकर वाढतं ते खरंच. परी कधी कूस ओलांडू लागली,कधी ढोपराने चालू लागली, कधी इवली इवली पावलं टाकू लागली ते कळलच नाही.

जाऊबाईला मुलगा झाला. घरात कोण आनंद! जणू तिने एखादी बाजी मारली असावी. त्या बाळाच्या बारशाला एवढी छान छान खेळणी आली पण जाऊबाईंने परीला त्यातलं एक खेळणं दिलं नाही, खेळायला. सगळी कपाटात भरुन ठेवली. माझ्या परीला साधे चांदीचे पैंजणही घालायचं जीवावर आलेल्या माझ्या सासूबाईंनी नातवासाठी एक तोळ्याची चेन करुन घातली.

मी माझ्या परीसाठी  बाहुली आणली..आकाशी फ्रॉकाची,सोनेरी केसांची,निळ्या डोळ्यांची. किती खूष झालं बाळ माझं! येऊन येऊन गालावर पप्पी देत होती माझ्या.

घरातल्या कुरबुरींना मी पुरुन उरत होते. कालचक्र त्याच्या वेगाने सुरु होतं. मधे वसतकरबाई आजारी पडल्या. मुदतीचा ताप तो काय..बिचाऱ्यांना उठताबसताही येईना झालं. त्यांची मुलगी नाशकातून येईस्तोवर मी सुट्टी घेऊन त्यांची देखभाल केली, त्याबद्दल सासूबाईंची कडवट बोलणीही खाल्ली. त्यांची मुलगी नि जावई आले आणि त्यांना घेऊन गेले. परीचा प्रश्न होता. मी तिला ओळखीच्या काकूंच्या पाळणाघरात घातलं.

घरातल्या धुसफुसी,लावालावी चालूच होत्या. जाऊबाईचा बाळ तीनेक वर्षाचा झाला तरी बाळाला दूधाला घेऊन दोनदोनतास निजून रहायची. तिला हूं म्हणण्याची कुणाची शामत होती! वंशाला दिवा जो दिला होता तिने.

परी आता शाळेत जाऊ लागली होती. शाळेत ती एकलकोंड्यासारखी रहायची, मधुनच रडायची. बाईंनी जवळ घेऊन विचारलं तर मुठींनी डोळे पुसत म्हणायची, आईबाबा रोज रोज भांडतात. कट्टी फू करतात. मला फार भिती वाटते. बाईंनी आम्हा दोघांनाही शाळेत बोलावून परीचं म्हणणं सांगितलं. ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि याचा तिच्या भावी आयुष्यावर कसा परिणाम होईल तेही सांगितलं.

आम्ही दोघांनी विचार केला. मी म्हणाले,”काही वर्ष वेगळा संसार थाटून बघू.”

शंतनू म्हणाला,”मी माझं घर सोडून येणार नाही. तू खुशाल जाऊ शकतेस. माझ्या आईशिवाय मला कोणी मोठं नाही.”

मी समजवण्याचा प्रयत्न केला,”प्रश्न मोठेपणाचा नाही. दूर राहिलं की नाती टिकतात. भांडून मनाने दूर होण्यापेक्षा वेगळं होऊ.”

तो डोळे मोठे करत म्हणाला,”आलीस पुन्हा माझ्या आईवर. तू नव्हतीस तेंव्हा आई नि वहिनी कशा मिळूनमिसळून रहायच्या. कधी दाराबाहेर आवाज जात नव्हता.”

मी बोटांनी अंगठीशी चाळा करत म्हंटलं,”त्या तर आताही मिळूनमिसळून रहातात.”

यावर कुत्सित हसत तो म्हणाला,”म्हणजे सगळ्या गदारोळाचं कारण कोण आहे ओळख. तुच आहेस.”

कसाबसा राग आवरत मी म्हंटलं,”माझ्यामुळे सगळं रामायण घडत असेल तर..तर आपण वेगळंच झालेलं बरं.”

शंतनूच्या पुरुषार्थाला मी कुठेतरी धक्का दिला होता. त्याला वाटलं होतं..मी म्हणेन की मी पुन्हा घरात उलट उत्तर करणार नाही, मोठ्याने बोलणार नाही पण गप्प रहायला मी निर्जीव बाहुली थोडीच होते! मानापमान मलाही होते. शेवटी वेगळे झालो आम्ही.

परीला घेऊन घराबाहेर पडले. सोसाट्याचा वारा सुटला होता. माडांचे शेंडे वेडेवाकडे डुलत होते. वाऱ्याने रस्त्यावरली धुळ उडत होती. माझ्या मनातही विचारांनी थैमान घातलं होतं. जायला निघाले तेंव्हा सासूबाई एका शब्दाने, काहीतरी मार्ग काढू असं बोलल्या नाहीत. जावेच्या चेहऱ्यावर विजयाचा आसुरी आनंद दिसत होता.

परी अगदी इवलासा चेहरा करुन माझं बोट धरुन चालली होती. माझ्या अंतरी एकच गाणं होतं..

आभाळ फाटलेले टाका कुठे भरू मी?
आता कसे करु मी?

स्वप्‍नी चितारलेल्या झाल्या विराण जागा
वाहून पार गेल्या वाळूवरील रेघा
पाण्यात त्या मिळाल्या, त्यांना कशी धरू मी?

जो मित्र पाठिराखा तो होय पाठमोरा
सार्‍या मनोरथांचा तो ढासळी मनोरा
आयुष्य कोसळे हे त्या काय सावरू मी?

प्रीतीविना जिवाची पंखाविना भरारी
आधार ना निवारा आता दिशांत चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरू मी?

माझ्याही नकळत माझे डोळे वहात होते. “आई तू रडू नको ना. तू रडलीस की मलाही रडू येतं,”परी मुसमुसत म्हणाली. मी खाली वाकून तिचे डोळे पुसले. “आता मुळीच नाही रडणार आई. सखामामाला फोन लावू आपण. तो नक्की मदत करेल आपली.” माझे डोळे पुसत  परीने माझ्या गालावर गोड पप्पी दिली.

बँकेतला शिपाई, सखाराम मला बहिणीसमान मानायचा. काहीही अडचण असली तर हक्काने फोन कर ताई म्हणून सांगायचा. या कठीण प्रसंगी तोच माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मी सखाला फोन करुन माझ्यासाठी खोली बघायचा आग्रह केला.

सखारामच्या ओळखीतून एक खोली भाड्याने मिळाली.  सखाराम व त्याच्या बायकोने आम्हा मायलेकींच बस्तान बसवलं.  खोली झाडून लख्ख लख्ख केली. किराणा,भांडीकुंडी आणून सगळं पद्धतशीर  लावून दिलं. माझी मनस्थिती चांगली नव्हती हे ती दोघं जाणून होती.

या नवीन घराच्या आसपासचे शेजारीपाजारीही चांगले होते. परीला जीव लावायचे.  काही गोडधोड बनवलं की परीला जेवायला घेऊन जात. ती घरी नसली तर शेजारपाळं आणून देत.

महिना होत आला असेल..एक दिवस बंडूदा आला. अगदी मला मिठी मारत रडू लागला,”ताई प्लीज घरी चल. आईबाबा वाट बघताहेत तुझी.” येताना त्याने परीसाठी मोठं चॉकलेट आणलं होतन. परी सहज त्याच्या मांडीवर जाऊन बसली नि आई आपण जाऊयाच बंडूमामाकडे असा हट्ट करु लागली.

इतक्या वर्षांनी माहेर हाकारतय म्हणून मला कोण आनंद झाला. मी कपडे,भांडी एकूणच सामानाची लगबगीने आवराआवर केली. सखारामला बोलावून खोलीचं टाळं त्याच्या हाती दिलं. परीला मामाने उचलून गाडीत बसवलं. जुना बंगला विकावा लागला होता नि एका टुबीएचकेमधे हे सगळे रहात होते. ए्वढं आर्थिक नुकसान झालं असतानाही माझा भाऊ मला न्यायला आला याचं मला कोण कौतुक वाटलं पण ही खुशीही जास्त काळ टिकली नाही.

आई नि तात्यासाहेब तिथे एखाद्या आश्रितासारखे रहात होते. तात्यासाहेबांची आमदारकी कधीची गेली होती. कसल्याशा प्रकरणात, त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता.  गोळा केलेली माया  बंडूदाने काही नं काही शौक करुन उडवली होती. नाही म्हणायला पुण्याजवळची जागा शिल्लक होती. बंडूदा मला व परीला तेवढ्यासाठीच घेऊन आला होता.

वहिनीही अगदी गोड बोलत.होती. आई मात्र गप्प गप्प असायची. आईने एकदा घरात कुणी नसताना मला, दादा व वहिनी मिळून कसे त्रास देत आहेत ते सांगितलं. मला म्हणाली,”कोणत्याही कागदावर सही करु नकोस.”
यी तिला म्हंटलं,”माझ्याकडे चला.”
तात्यासाहेब म्हणाले,”कोणत्या तोंडाने तुझा आश्रय मागू! तुला गरज होती तेंव्हा तुझ्या पाठीशी उभा राहिलो नाही. आपला मानमरातब जपण्यात मश्गूल होतो.”

चारेक दिवस जाताच बंडूदाने वाटणीचा विषय काढला.मी स्पष्टच म्हणाले,”मला माझा हिस्सा पाहिजे.” झालं, बंडूदाने मुठी आवळल्या. वहिनीही फणकारुन निघून गेली.

मी, आई व तात्यासाहेबांच्या पाया पडले व परीचं बोट धरुन पुन्हा माझ्या घरी यायला निघाले. आकाशात काळे मेघ दाटून आले होते. कधीही कोसळायच्या तयारीत होते. माझ्या मनाचीही काहीशी तशीच गत होती.

सखारामने चाळमालकाकडनं खोलीची चावी घेतली नं दार उघडलं. त्या छोट्याशा विश्वाची स्वामिनी होते मी. तिथून मला कोणीही हाकलवून घालणार नव्हते. सखारामची बायको,पारु भाजीपोळी घेऊन आली होती. मला म्हणाली,”धीर सोडायचा नाही, ताई. शेवटच्या श्वासापर्यंत जिंदगीची लढाई लढायची.”

परीची पिरपिर चालू होती. तिला मामा, बाबा कोणतरी हवं होतं. माझा उबग आला होता तिला पण तिला हे सारं सोसावंच लागणार होतं. पुरुषाच्या समर्थ खांद्याशिवायही ती मोठी होऊ शकते हे मला जगाला दाखवून द्यायचं होतं. याच जिद्दीने मी पुन्हा कामाला लागले. कुणी लगट करु नये म्हणून तुसड्यासारखी उत्तरं देऊ लागले.

थोडे दिवस, महिने उलटले तशी परी बरीच सावरली. अभ्यासातही चांगली प्रगती करत होती. एकपाठी होती. सगळ्या स्पर्धांत भाग घ्यायची. शाळेतल्या शिक्षकव्रुंदाची लाडकी होती. परीला मोठं होताना बघणं,तिला तिच्या पायावर उभं रहाण्यास मदत करणं हेच ध्येय होतं माझ्या आयुष्याचं. दोघींच पोट भरुन परीच्या भवितव्यासाठी काही बचत करता येईल एवढं कमवत होते मी. बंडूदा अधनंमधनं येऊन भांडून जात होता.

एकदा शंतनूचा फोन आला,”आईला हॉस्पिटलमध्ये ठेवलय. तू येऊन बघून जातेस का! ती आठवण काढतेय तुझी.” मी रात्रभर विचार केला.म्हंटलं ज्याचं त्याच्यापाशी नि गेले हॉस्पिटलमध्ये.

शंतनू बाहेर गेटवर थांबला होता. मला घेऊन आत गेला. सासूबाईंना बघून धक्काच बसला मला. केवढ्या वाळल्या होत्या. हाडांचा सांगाडाच जणू. मला पहाताच त्यांच्या डोळ्यांच्या कडांना धारा लागल्या. हात जोडू लागल्या. माफ कर म्हणत होत्या अस्पष्टसं. नीटसं बोलताही येत नव्हतं त्यांना.

मी त्यांचा हात हातात घेतला. वैर वैर ते कसलं नि कुणाशी..या मरणाच्या वाटेवर असणाऱ्या जीवाशी! एवढीही कठोर नव्हते मी. सासूबाईंना किंचीत बसतं करुन मी आणलेला उपमा भरवला. दोन चमचेच खाल्ला असेल, ठसका लागला त्यांना. पाणी पाजलं नि झोपवलं.

आम्ही कँटीनमधे जाऊन बसलो. शंतनूने कॉफी मागवली. तो कॉफीचा मग हातात असताना हे मागचं सारं काही आठवत होतं..माझाच भूतकाळ कटू आठवणींनी भरलेला.

शंतनू बरंच काही बडबडत होता. मी गेल्यानंतर सासू नि जाऊबाईंच मेतकूट, जाऊबाईने गोड बोलून सासूबाईंच्या बांगड्या लग्नाला जाताना घेऊन जाणं नि आल्यावर सरळ कुठेतरी हरवल्या म्हणून सांगणं, दोन वर्षापुर्वी सासूला आलेलं संधिवाताचं तीव्र आजारपण आणि जावेचं वेगळा संसार थाटणं,..बरंच काही.. पण मला का आणि कशाला सांगत होता!

मी वाईट होते ना, भांडणं लावणारी..मी निघून गेल्यावर घरातलं वातावरण आनंदी रहाणार होतं ना! मला परोपरीने विनंती करत होता, घरी चल परत..कशाला..याच्या आईची सेवा करायला..गेलेही असते पण ती अशी किती दिवस रहाणार होती आणि ती गेल्यावर हा परत मला हाकलवून लावणार नव्हता हे कशावरुन??

मी, सासूबाई हयात असेपर्यंत अधेमधे त्यांच्या खुशालीला येत जाईन म्हणाले. शंतनू म्हणाला,”शर्वरी,मी एकटा पडलोय. मला गरज आहे तुझी, परीची.”

मी पर्स खांद्याला लावत उठले. माझा हात त्याच्या हाती देत म्हंटलं,”बी फ्रेण्ड्स. तुला कधीही काही सांगावसं वाटलं,शेअर करावंसं वाटलं तर जरुर बोलाव या मैत्रिणीला. नक्की येईन..पत्नी म्हणून हक्क गाजवण्यासाठी मात्र मी परत तुला मिळणार नाही. शंतनू, तू पतीपत्नीच्या नात्याचा अर्थच समजून घेतला नव्हतास कधी. डोळ्यांवर,कानांवर झापडं लावून मला आरोपीच्या कठड्यात उभं करण्यात पुरुषार्थ मानणारा तू.

तू बदललाही असशील कदाचित पण मी खूप भोगलय या साऱ्यात..पुन्हा मागे फिरायचा विचार करायची ताकद नाही माझ्यात. मी आहे तशी खूष आहे. मी माझी स्वतंत्र आहे. कुणी काही म्हणो मी मनावर घेणार नाही नि माझ्या मनाला उगाच दुखावणार नाही. तुही यातनं बाहेर पड. आयुष्य खूप सुंदर आहे. जगायला शिक.”

माझा हात मी त्याच्या घामेजल्या हातांतून सोडवून घेतला नं जायला निघाले. माझ्या पायांत अधिकचं बळ आलेलं मला जाणवत होतं. रिमझिम पावसानंतर मोकळंढाकळं झालेलं माझं आभाळ मला हाकारत होतं..

माझं मोकळंढाकळं आभाळ मला हाकारत होतं अन्  माझ्याच तंद्रीत समयोचित गाणं गुणगुणत मी चालले होते..

एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फ़क्त बोलावे

थांबते गर्दी फ़ुलांच्या उंब-यापाशी
एकट्याने आतूनी निर्माल्य हुंगावे

दार हे अपुले ति-हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन पुढे जावे

एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरु प्राणांत झेलावे

लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे

(समाप्त)

–©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

मागील भाग :

http://www.ritbhatmarathi.com/maz-abhal-part1/

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *