मायलेकी


पाऊस कधीचा कोसळत होता. लक्ष्मी खिडकीतनं पावसाकडे बघत भराभरा पोळ्या लाटत होती. मालकीणबाईंसाठी चार पोळ्या, छोट्या गुडियासाठी दोन आलू पराठे, मालकीणबाईंच्या सासूबाईसाठी नि साहेबांसाठी ज्वारीच्या भाकऱ्या, तसंच तोंडी लावणंही वेगवेगळं..दुधीची वाटण घातलेली भाजी,बटाट्याची सुकी भाजी, बीट,काकडीची कोशिंबीर, गोडाचं म्हणून शेवयाची खीर..मोठ्या माणसांची खाणी. लक्ष्मीच्या मनात आलं..ही मोठी माणसं खातात नखाएवढं पण कसं स्पेशल पायजेल समद्यांना.
लक्ष्मीने सगळं आवरल. ओटा पुसून भांडी मोरीत टाकेस्तोवर साडे आठ वाजले रात्रीचे. लक्ष्मीचे डोळे घरच्या वाटेकडे लागले होते. तिच्या बेबीला वरचेवर ताप यायचा. रोजच्यारोज शाळा बुडवणं बेबीलाही आवडत नसायचं. तिला शिकायची खूप खूप आवड होती. कधी म्हणून अभ्यासाला बस, असं सांगावं लागत नव्हतं पोरीला.
बेबी शाळेतून आली चहा प्याली की आपलं दप्तर घेऊन बसायची. बारीक फुलांच्या झंपर परकरातली, दोन वेण्या पाठीवर रुळणारी बेबी हीच तर लक्ष्मीचं सारं काही होती.
लक्ष्मी कितीही कष्ट करून घरी आली नि पडवीत तरट मांडून अभ्यासाला बसलेली बेबी दिसली की लक्ष्मीचा शीण कुठच्याकुठे पळून जायचा. तिचे डोळे समाधानाने लकलकायचे. मग रात्री जवळ येत नाही म्हणून दारुड्या नवऱ्याने घातलेल्या आईबहिणीचा उद्धार करणाऱ्या शिव्या, लाथा नि दणके यांचं तिला काहीच वाटायचं नाही. सकाळी उठून आंघोळपांघोळ उरकून नव्या दमाने ती भाकरी थापायला बसायची.
आजही तसंच झालं होतं. काल बसलेल्या माराचे वळ पाठीवर झोंबत होते. त्यांवर लक्ष्मीने कढत पाणी घेतलं. नवरा मस्तवाल गड्यासारखा उताणी पडला होता. त्याच्या अंगातनं येणाऱ्या दर्पाला माशा घोंघावत होत्या. नाकातोंडावर बसल्या तरी त्याला शुद्ध नव्हती.
बाकीच्या घरातला केर काढून लक्ष्मीने बेबीला उठवलं होतं.
तिला चहातनं पोहे खायला आवडायचे. बशीभर चहापोहे खाऊन पाठीला दप्तर लावून बेबी शाळेला निघाली होती. हातातली कामं टाकून लक्ष्मी तिला निरोप देण्यासाठी बाहेरच्या ओट्यावर येऊन थांबली होती.
बेबीसोबत तिच्या दोन मैत्रिणी होत्या खऱ्या पण अख्ख्या चाळीने ओवाळून टाकलेला भाई मांडे मोटारसायकलला रेलून उभा असलेला लक्ष्मीच्या द्रुष्टीस पडला. त्याची नजर जणू बेबीचे कपडे फाडून तिला न्याहाळत होती. लक्ष्मीच्या अंगावर शिसारी आली. वाटलं..वाटलं सरळ जाऊन त्याच्या मुस्काटीत चारसहा लगावून द्याव्यात पण पण ती तसं करू शकत नव्हती कारण ही भाई मांडेच्या बापाची चाळ होती. भाडं जरी ती दरमहिन्याला इमानेइतबारे देत होती तरी चाळमालकाशी पंगा घेणं तिला शक्य नव्हतं.
लक्ष्मी असहाय्यपणे मागे फिरली. नवरा तसाच लोळत होता. तिने भराभर भाकऱ्या थापल्या. कोरड्यास करून ठेवलं नि कामाला बाहेर पडणार इतक्यात बेबी माघारी येताना तिला दिसली. बेबीला शाळेत गेल्यावर ताप भरला होता म्हणून बाईंनी तिला दोनचार मैत्रिणींसोबत घरी पाठवलं होतं.
घराचं दार किती तकलादू! दारुड्या नवरा ..तसा आधी नव्हता तो खरा . मायंदाळ माया करायचा लक्ष्मीवर पण काय म्हणतात ते दिवस एकसारखे कुठे रहातात! लक्ष्मीला एक सोडून चार नणंदा. एक गेली की दुसरी यायची माहेराला. आल्या तशा दोन घास खातील नि राहतील तर नाही, भाचरु हवं म्हणून हट्ट करायच्या.
किती कमी का प्रयत्न केले! गडावरचा फकीर म्हणू नको, की पारावरचा साधुबुवा..काहीएक उपयोग नाही झाला. लक्ष्मीची कुस काय दुसऱ्यांदा उजवायचं नाव घेईना. डॉक्टरकडे जोडीने गेली होती. डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “बायको पाहिजे असेल तर जे एक नक्षत्र देवाने दिलय त्यावर समाधान माना. लक्ष्मीची तब्येत तोळामासा, गर्भाशय अशक्त..एक झालंय ते देवाची क्रुपा समजा.”
आता आतापर्यत पोरीवर जीव लावणारा लक्ष्मीचा नवरा आता स्वतःच्या पोरीकडे खाऊ का गीळू नजरेने बघायला लागला. त्याचं मन म्हणत होतं पयल्या पावटीच मुलगा झाला असता तर सुटलो असतो. त्याचं डोसकंच सैराटलं. वेड्यावानी करायला लागला. नीट कामावर जाईनासा झाला. लक्ष्मी सकाळीच न्याहारी करून द्यायची. हा बाकीच्यांसोबत नाक्यावर जायचा खरा पण भटकत बसायचा..नको नको ते नाद लावून घेतलेन.
गेल्या महिन्यापासनं तर घरीच बसलेला असायचा. चढलेली उतरली की गोड गोड बोलायचा. रात्री तुडवल्याबद्दल लक्ष्मीची माफी मागायचा. “चुकलो मी. मी लै वाईट हाये. दोन हाण माझ्या तोंडात,” असं लक्ष्मीचे हात हातात घेऊन सांगायचा तेंव्हा ती त्याच्या गालावरनं हात फिरवायची. “सुधर रे बाबा. तुझ्याशिवाय या दुनियेत हाय तरी कोण माझं! नको ना त्या दारूच्या नादी लागूस..” ती विनवण्या करायची. चारपाच दिवस ठीक जायचे नि पुन्हा तो तिला कामावरनं येताना हेलकांडत येताना दिसायचा..पुन्हा अन्नाची नासधुस, शिव्या, घरभर ओकारी, त्याचं अंगचटीला येणं..
लक्ष्मीने बेबीला खालच्या डॉक्टरणीकडून न्हेऊन आणलं. डॉक्टरणीने पाचेकशे रुपयांची औषधं लिहून दिली तीही घेतली नि बेबीला मऊभात चारून तिला औषधगोळ्या दिल्या. “बेबे, बाय निज जरा. आराम कर. बरी झालीस की हायेच अभ्यास. बापू बडबडत आसला तर त्याच्या वार्तेला जाव नगंस..काय लागलं तर शेजारच्या गुलबीकाकुला साद घाल हां.” असं सांगून चित्त बेबीपाशीच ठेवून ती कामांना बाहेर पडली होती.
लक्ष्मीच्या मनात कामं आवरता आवरता विचारांची आवर्तनं चालू होती. गुलबीला तसं तिनं बेबीकडे ध्यान ठेव म्हणून सांगितलं होतं खरं पण तिलाही संध्याकाळी बाजारात जायचं होतं. दोनेक तास तरी ती घराच्या बाहेर असणार होती.
“लक्ष्मी, जरा निघायच्या आधी ते अननस काप बाई नि शिरा कर. तुझ्या हातचा अननसाचा शिरा माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणींना जाम आवडतो बघ.” मालकीणीने गुळ लावलेलं फर्मान सोडलं.
लक्ष्मीला नाही म्हणावंसं वाटत होतं खरं पण आज तिला मालकीणबाईकडून आगाऊ पैसे मागायचे होते. नाही म्हणून चालणार नव्हतं. तिने कढईत तुप कढत ठेवलं. रवा निवडला नि परतू लागली. मालकीणबाईंची गुडिया रव्याच्या सुगंध नाकात शिरताच तिच्या बाजुला येऊन उभी राहिली. लक्षीमौची मलापण शिला पायजे म्हणू लागली. दहाएक मिनटात शिरा तयारही झाला पण गुडियाला शिरापुरी हवी झाली. तिच्यापुरत्या चार पुऱ्या तळून काढणं मालकीणबाईला जड नव्हतं पण तूच बघ तिचं काय ते म्हणत मालकीणबाई फोनवर मैत्रिणीशी बोलायला टेरेसमधे जाऊन बसली.
लक्ष्मीने पुऱ्या तळल्या तर लक्षीमौची तुच भरव असा गुडियाचा हट्ट पण मग तिने दोन घास तिला भरवून “लेट होतोय उद्या माझ्या हाताने खाऊ घालते गुडियाला,” असं म्हणत तिची समजूत काढली.
लक्ष्मीने मालकीणबाईकडे पाचशेची उकल मागितली तशी मालकीणबाई चवताळली.” पैसा काय झाडाला लागतो का? मेंदूचं काम करतो तेंव्हा मिळतो. तुम्हा लोकांना सगळं सुखच सुख वाटतं तसं नाहीए बाई. आमच्यापाठीही बरीच शुक्लकाष्ठ असतात..हफ्ते भरायचे असतात गाडीचे,घराचे, ह्याचे नि त्याचे.”मालकीणबाईची टेप काही संपत नव्हती
काय म्हणून पैसे मागितले असं झालं लक्ष्मीला. याच महिन्यात बेबी पहिल्यांदा बाहेरची झाली. तिला काहीतरी काजूबदाम असं पोष्टीक चारावं असं लक्ष्मीला वाटत होतं म्हणूनच तिने उकल मागितली होती पण आपल्या मुलीचे लाड लक्ष्मीकडून पुरवून घेणारी मालकीणबाई अशी अंगावर आल्याने लक्ष्मी भेदरली.
वाटेने चालताना आपल्या लक्ष्मी नावाचंही तिला हसू आलं. केलेंडरात तिनं कमळात बसलेल्या लक्ष्मीमातेचं चित्र पाहिलेलं. काय ते रूप, रेखीव डोळे, गुलाबी काया, बसायला कमळ नि हातातून सांडणारी सोन्याची नाणी. “काय म्हनून आपलं नाव लक्ष्मी ठेवलं आसलं,” ती स्वत:शीच म्हणाली.
वाटेत कुत्री बसली होती, पिलांना पाजीत. लक्ष्मी आपल्याच विचारात चालली होती न तिचा पाय पिलांवर पडणार इतक्यात कुत्री उठली नि दात विचकत भुंकू लागली. आता चावा घेते की काय या भितीने लक्ष्मीच्या अंगावर काटा आला. तिला पुढे पाऊलही टाकता येईना. अंग अगदी अळवाच्या पानासारखं मऊ पडलं. पायांतलं त्राणच गेलं.
बाजूला कठड्यावर बसलेल्या भिकाऱ्याने कुत्रीला बाजूला हाकललं तशी ती भुंकतच आपली पिलावळ बाजूला घेऊन बसली नि संथपणे चालणाऱ्या लक्ष्मीकडे पहात राहिली, ती दिसेनाशी होईपर्यंत.
लक्ष्मी विचार करत होती,’कोणीही यावं आपल्यावर भुंकावं. नवऱ्याने,मालकीणबाईने, माहेरला गेलं तर वैनीबायने, या वाटेवरल्या कुत्रीनेबी.”
नाक्याजवळ वळण घेऊन ती झोपडपट्टीत शिरली. लोकांची जेवणं चालली होती. घरातनं भाकरीचा खरपूस गंध येत होता.
लक्ष्मीच्या घराचं दार सताड उघडं होतं. लक्ष्मीला कसलीशी शंका आली. ती लगालगा आत गेली. स्वैंपाकघरात लक्ष्मीचा नवरा पडला होता. घरातल्या चाकूने बेबीने त्याच्या हातावर वार केला होता, त्यातून रक्त ओघळत होतं. बेबीला लक्ष्मीने गदागदा हलवलं.”बेबे, कशापायी केलंस आसं?”
“आगं आये, कसं सांगू तुला नं काय सांगू?”पाठल्याबाजूने फाटलेला झंपर आईपुढ्यात करत बेबी हमसून हमसून रडू लागली.
लक्ष्मीने तिला जवळ घेतलं. मायलेकी एकमेकींना बिलगून रडल्या. काही वेळात शीण आवाज ऐकू आला.
“अजून जीव गेला न्हाई तर मुडद्याचा,”लक्ष्मी म्हणाली. ती त्याचा गळा दाबायला धावली पण त्याने दोन्ही हात लक्ष्मीसमोर जोडले. जणू झाल्या प्रकाराबाबत माफी मागत होता.
बेबीला तिने कपडे बदलायला लावले. तो चाकू पाठीमागच्या गटारीत टाकला. नवऱ्याच्या हाताची जखम चिंधीने बांधली. फरशीवरचे रक्ताचे डाग पुसले नि गुलबीला बोलवायला गेली. डॉक्टर आले. त्यांनी विचारलं तर दारुड्यांत मारामारी झाली त्यात लागलं म्हणून सांगून वेळ मारून न्हेली. डॉक्टर पट्टी करून दवा देऊन निघाले. गुलबीने लक्ष्मीची परिस्थिती जाणून डॉक्टरांची फी फेड केली.
त्या रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात दोघी मायलेकी टक्क जाग्या होत्या. झुंजुमुंजू झालं तसं लक्ष्मीने बेबीला उठवलं. दोघी बाहेर पडल्या, तिथून कुठतरी लांब जाणार होत्या. कुठं जायचं ती वाट दोघींनाही ठाऊक नव्हती. फलाटावर पोलीसाने हटकलं. लक्ष्मीने कर्मकहाणी सांगितली. पोलीसमामा सच्च्या दिलाचा होता. त्यांनी ओळखीच्या समाजसेवकांमार्फत मायलेकींची रवानगी महिलाश्रमात केली. बेबी तिथे निर्धास्त शिकू लागली नं लक्ष्मी स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी राहिली. चार पैसे तिच्या गाठीला साठले.
काही वर्षात बेबी आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. पाठी वळून बघता लक्ष्मीला सगळंच अगम्य वाटायचं. त्या भयाण रात्री दोघींनी गाडीखाली उडी मारून आयुष्य संपवलं असतं तर? कोण होता तो पोलीसमामा? माणसाच्या रुपातला देव? लेकीचं आयुष्य मार्गी लागलं खरं पण त्याकरता वाटेत आलेल्या काळ्याकुट्ट ढगांना लाथाडावं लागलं. तिथेच लक्ष्मी थांबली असती घरी तर कशी वाचवणार होती बेबीला घरातल्याच हैवानापासून.
“मी आज जे काही आहे ते माझ्या मायमाऊलीमुळे,” असं म्हणत बेबीने आईचे पाय धरले नि लक्ष्मीच्या तुडुंब भरलेल्या डोळ्यांतली टीपं खळक्कन बेबीच्या मानेवर सांडली.
समाप्त
©️®️गीता गरुड
=========================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.