Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्री मारुती स्तोत्र मराठी भावार्थसह

maruti stotra in marathi सतराव्या शतकात महान संत कवी समर्थ रामदासांनी मारुती स्तोत्र रचले आहे. समर्थ रामदासांना शरीर नेटके ठेवणे, व्यायाम करणे पसंत होते. बळाचे मुर्तीमंत रुप म्हणजे हनुमान.

मारुती स्तोत्राद्वारे समर्थांनी मारुतीरायाची स्तुती केली आहे. अंजंनीसुताच्या रुपाचे, अंगीभूत गुणांचे दर्शनही जनसामान्यांना या श्लोकावाटे घडवले आहे.

मारुती स्तोत्राचे नित्य पठण करणाऱ्यांवर मारुतीरायांची क्रुपाद्रुष्टी रहाते, त्यांच्या चिंता, क्लेष दूर होतात व चैतन्यमयी अनुभूती येते.

मारुती स्तोत्राचा नियमित जप हा भगवान मारुतीला प्रसन्न करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे.

रोज सकाळी शुचिर्भूत होऊन मारुतीच्या मुर्ती अथवा फोटोसमोर उभे राहून या स्तोत्राचे पठण करणे लाभप्रद आहे.

या स्तोत्राचे ११००वेळा पठण करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी मान्यता आहे.

नित्य मारुतीस्तोत्र पठण केल्यास मारुतीरायाची विशेष क्रुपाद्रुष्टी रहाते.
●धनधान्यात व्रुद्धी होते. घरात अन्नधान्याची कसलीही कमतरता जाणवत नाही.
● पशुधन असल्यास त्यातही व्रुद्धी होते. गोठ्तातील गुरासोरांचे आरोग्य चांगले रहाते. त्यांना नजरबाधा होत नाही.
● संततीसौख्य लाभते.
● रुप व विद्या लाभते.
● भूतप्रेतसंमंध अशा बाहेरच्या बाधेपासून मुक्ती मिळते.
● आयुष्यातील चिंता,क्लेश दूर होतात.
◆सौख्यसम्रुद्धी, आनंद यांचा लाभ होतो.

भीमरूपी महारुद्रा,

वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता

रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता,

सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी,

धुर्त वैष्णव गायका ||२||

दीनानाथा हरीरूपा,

सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता,

भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा,

प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला,

पावना परितोषका ||४||

ध्वजांगे उचली बाहो,

आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी,

देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईलें नेणों,

आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा,

भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथा,

किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी,

घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा,

नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे,

महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें,

झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू,

क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला,

आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें,

गतीसी तुळणा नसे ||१०||

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा,

होत जातसे |
तयासी तुळणा कोठे,

मेरू मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवतें वेढें,

वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची,

ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा,

ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें,

भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धनधान्य पशूवृद्धि,

पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी,

स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी,

रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता,

आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी,

लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो,

संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू,

कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा,

दर्शनें दोष नासती ||१७||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

भीमरूपी महारुद्रा,

वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता,

रामदूता प्रभंजना ||१||

भावार्थ: भीमरुपी म्हणजे विराट, महाकाय असं रुप आहे हनुमंताचं. महारुद्र..म्हणजे शिवशंकरांनी भगवान विष्णुंना सहकार्य करण्यास अनेक अवतार घेतले होते, त्यातील हनुमानअवतार हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो म्हणून समर्थ म्हणतात, हनुमंता तुम्ही महारूद्र आहात म्हणजे शंकराचेच रुप आहात. वज्रहनुमान म्हणजे ज्याचे शरीर वज्रासारखे आहे असा हनुमान. वज्राला कुणीही भेदू शकत नाही. बालहनुमान जेंव्हा तळपते लाल सूर्यबिंब घेण्यासाठी झेपावला तेंव्हा इंद्रदेवाने त्याला रोखण्यासाठी वज्रप्रहार केला होता ज्याच्या आघाताने बाळ हनुमानाची हनुवटी फुटली. वायुचा हनुमान पुत्र असल्याने वायुदेवास भयंकर क्रोध आला. त्याने हवेचे फिरणे बंद केले. अशावेळी सर्व देवांनी त्यांची क्षमायाचना केली. इंद्राने हनुमानास वर दिला की तुझा देह हा वज्रासारखा अभेद्य होईल.

हनुमान हा वायु अर्थात मरुत् पुत्र असल्याने त्यांना मारुती संबोधले आहे. वनारी..अरि म्हणजे शत्रू. रावणाच्या लंकेतील व्रुक्ष हनुमानाने उन्मळून टाकले होते. महाकाय अशी झाडेही जो उन्मळून टाकू शकतो असा तो वनांचा शत्रू म्हणून वनारी म्हंटले आहे. परंतु तो फक्त त्याच्या स्वामींच्या शत्रुच्या वनांतील झाडे मोडतो. उगाच व्रुक्षतोडं करीत नाही. माता अंजनीचा पुत्र तो अंजनीसूत. असा हा महाकाय हनुमंत काही साधासुधा नसून तो साक्षात प्रभु रामचंद्रांचा दूत आहे. रामांनी सीतेस निरोप देण्यासाठी, रावणाचा वध झाला हे कळवण्यासाठी तसेच भरतास आम्ही अयोध्यस येत आहोत हे कळविण्याची..या व अशा अनेक निरोपांची जबाबदारी हनुमंतांवर सोपविली होती असल्याने समर्थांनी त्यांस रामदूत म्हंटले आहे. प्रभंजन म्हणजे बळाच्या जोरावर मोठा विनाश घडवू शकतो असा.

वरील दोन ओळीत समर्थ रामदासांनी हनुमानांच्या आईवडिलांचा परिचय दिला आहे. हनुमानाचे महाकाय स्वरुप,त्यांची अचाट शक्ती वर्णिली आहे. तसेच ते प्रभुरामचंद्राचे सेवक आहेत हेही नमुद केले आहे.
——-––——————-–-–————–—-–-–-–

महाबळी प्राणदाता,

सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी,

धुर्त वैष्णव गायका ||२||

समर्थ सांगतात, हनुमंत हा महाबळी आहे म्हणजे तो अतिशय बलवान आहे. तो प्राणदाता आहे. युद्धात जेंव्हा लक्ष्मण म्रुच्छित झाला होता तेंव्हा हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला व त्यातील संजिवनी बुटीमुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले. हनुमंत युद्धावेळी भल्या पहाटे वानरसेनेला जागं करायचा म्हणून सकळा उठवी बळे लिहिले आहे. आपणासही आलस्यातून जाग्रुत करण्यासाठी नित्य हनुमान स्तोत्रपठण फलदायी ठरते.

हनुमान कसा आहे..तो सौख्यकारी म्हणजे प्राणीमात्रांचे कल्याण करणारा, दु:ख,विवंचना दूर करणारा आहे. तो धुर्त म्हणजे चतुर आहे लबाड नव्हे. समयसूचकता आहे त्याच्या अंगी. हनुमंत वैष्णव आहे, वैष्णव म्हणजे दुसऱ्यांचे दु:ख जाणून ते शमन करण्यासाठी झटणारा असा तो आहे. प्रभुरामचंद्रांचे गुणगान करणारा असा तो उत्तम गायक आहे.
हनुमंतांची विविध गुणवैशिष्ट्ये या दोन ओळींत विषद केली आहेत.
——-–-–––—–-–-–––——––-–-–——–-––-––

दीनानाथा हरीरूपा,

सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता,

भव्यसिंदूरलेपना ||३||

दीनांचा नाथ म्हणजे हनुमंत हे गोरगरीबांचे वाली आहेत. हरीरुपा..मारुतीरायांचे सोंदर्य काय वर्णावे ते साक्षात ईश्वराचे रुप आहेत. बळकट, पीळदार शरीरयष्टी हे पुरुषाचं सौंदर्य. हनुमंताने तसं शरीर कमावलं आहे म्हणून ते सुंदर आहेत. मारुतीराया हे जगदंतरा म्हणजे पारलौकिक आहेत.

पातालदेवता अहीरावण व महीरावण यांनी युद्धादरम्यान एका संध्याकाळी राम व लक्ष्मण यांना आपल्या मायावी शक्तीने मुर्च्छित करून पाताललोकात न्हेले होते. मारुतीराय पाताळात गेले व अहीरावण व महिरावणांना नामशेष करून राम, लक्ष्मण यांना भूलोकी घेऊन आले या अर्थाने समर्थ मारुतीरायाला पातालदेवताहन्ता म्हणाले आहेत. असे हे भव्य देहाचे मारुतीराया यांनी सर्वांगाला शेंदूर लेपन केले आहे. हा शेंदूर ज्याचा रंग भगवा जो त्यागाचं प्रतिक आहे. मारुतीरायांचं जीवन हे त्यागाचं मुर्तीमंत उदाहरण आहे. त्यांनी अखंड आयुष्य रामासाठी, त्याच्या प्रजेसाठी वाहिलय. हातचं असं काही राखून ठेवलं नाही अशाप्रकारे समर्थ  रामदास हनुमानाचे गुणगान करत आहेत.
———–-––——––-––-–-–-–––––––––-––-––

लोकनाथा जगन्नाथा,

प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला,

पावना परितोषका |।४।।

मारुती हे सर्व लोकांचे स्वामी आहेत. सकल जगातील पंचमहाभूतांचे ते स्वामी आहेत. एवढंच काय जिवितांच्या प्राणांचेही ते नाथ आहेत. ते पुरातन आहेत. मारुती है रौद्र आहेत जे अंजलीपोटी जन्मास आले खरे पण त्यापुर्वीही अस्तित्वात आहेत, वर्तमानकाळातही आहेत व भविष्यकाळातही रहातील, त्यांना प्रभुरामांनी जगत कल्याणाकरीता चिरंजीवत्वाचा वर दिला आहे, या अर्थाने ते पुरातन आहेत.
मारुतीराया हे अंतरबाह्य शुद्ध आहेत.

प्रभु रामांच्या सहवासात राहिलेले मारुतीराया, रामाचा सहवास लाभणे म्हणजे महतभाग्य, या अर्थाने ते पुण्यवंत आहेत. मानसिक पातळीवर म्हणावं तर ते मनातसुद्धा कोणाविषयी वाईट विचार करणार नाहीत म्हणून पुण्यशीला व वाचेनं म्हणावं तर ते कधीही कुणाबद्दल वाईट बोलणार नाहीत अशी त्यांची पावन वाणी आहे म्हणून पावना. सज्जनांना अतिशय संतोष देणारे आहेत म्हणून परितोषिका असे म्हंटले आहे.
——–––-–—–-––—-––––––-–-––-–-–––––-

ध्वजांगें उचली बाही,

आवेशें लाटला पुढें ।
कालग्रि कालरुद्राग्रि,

देखतां कापती भयें ॥५॥

रामरावण युद्ध झाले त्यावेळी युदधाचा ध्वज आपल्या दोन्ही बाहुंनी फडकावत मारुतीराया शत्रुसैन्यावर चाल करून गेले. युध्दभूमीवर ध्वज हाती धरण्याची धुरा अत्यंत पराक्रमी व्यक्तीकडे दिली जाते. प्रभुरामांनी ती धुरा हनुमंतांकडे दिली होती. त्यांचा त्यावेळचा तो आवेश पाहून काळाग्नी, काळरुद्राग्नी हे यमाचे सहाय्यकही चळचळा कापू लागले.
————————––-–––––—–-––-–-––-–

ब्रह्मांडे माईलें नेणों,

आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा,

भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

युद्धभूमीवरील हनुमंताचा अवतार शत्रुंना भयभीत करणारा आहे. ते त्यांच्या दंतपंक्ती त्वेषाने एकमेकांवर आपटत आहेत, तेंव्हा असे वाटते की त्यांच्या मुखात हे पुरे ब्रह्मांड सामावून जाईल की काय!

क्रोधाने त्यांचे नेत्र इतके लाल झाले आहेत की बघणाऱ्याला त्या पेटत्या दाहक ज्वाळा असल्याचा भास होतो आहे. त्यांच्या भुवयाही ताठर झालेल्या आहेत. एकुणच आवेश भयावह आहे, वाईट शक्तीविरुद्ध लढण्यासाठीचा तो हनुमंतांचा आवेश आहे. हनुमंत मुळचे मात्र दयावंत, कनवाळू आहेत पण वाईटाशी वाईट ही त्यांची निती आहे. कुप्रव्रुत्तीच्या ते विरोधात आहेत.
——-–—————––-–-–––—-–-–-––-–—-––

पुच्छ ते मुरडिले माथा,

किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी,

घंटा किंकिणी नागरा ||७||

हनुमंतांनी शेपटीला पीळ देऊन ती माथ्यावर येईलशी घेतली आहे. आपल्या शेपटीचाही त्यांना सार्थ अभिमान आहे. याच शेपटीत अनेक राक्षसांना गुरफटवून त्यांनी यमसदनी पोहोचवले आहे. हनुमंत त्वेषाने लढताहेत खरे, पण त्या आवेशामुळेच की काय ते अधिकच देखणे दिसत आहेत. त्यांच्या डोईवरचा मुकुट अन् कानातली कु़ंडले उठून दिसत आहेत. कमरेला सोन्याची मेखला बांधली आहे, जिला बारीक घंटा आहेत. त्या घंटांची किणकिण कर्णमधुर आहे.
———–—-–-––——––—–––––—-–-–-––-–

ठकारे पर्वता ऐसा,

नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे,

महाविद्युल्लतेपरी ||८||

मारुतीरायांची देहयष्टी एखाद्या पर्वतासारखी विशाल आहे, परंतु ते इथूनतिधून सुटलेले नाहीत तर व्यायामाने त्यांनी त्यांचे शरीर हे सुडौल, नेटके, सडपातळ राखले आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त मेद त्यांनी देहावर चढू दिला नाही.. त्यामुळे त्यांचे शरीर अगदी आकाशातून कोसळणाऱ्या विजेइतके चपळ आहे.
——————————–––—-––-–-–-––-–-

कोटिच्या कोटि उड्डाणें,

झेपावे उत्तरेकडे |

मंद्राद्रीसारिखा द्रोणू,

क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

लक्ष्मण मुर्च्छितावस्थेत रणभूमीवर पडला होता. संजीवनी बुटीच त्याचा जीव वाचवू शकणार होती. ती कुठे मिळते हे जाणून घेऊन मारुतीरायाने उत्तरेकडे प्रयाण केले. तो द्रोण पर्वत कित्येक कोटींच्या अंतरावर होता तेवढे अंतर मारुतीरायाने पार केले, मनात अखंड श्रीरामाचा जप चालू होता. मंद्राद्रीसारखा भव्य असा तो द्रोण पर्वत मारुतीरायाने उखडून काढला येथे क्रोधे म्हंटले आहे ते का बरें तर द्रोण पर्वतावर इतक्या हरित वनस्पती,त्यातील संजीवनी कुठची ती काही मारुतीरायाला कळेना. बरं वेळ घालवून चालणार नव्हते तेंव्हा संतापून त्यांनी तो पर्वतच उखडून हाताच्या तळव्यावर पेलत परत युद्धभूमीकडे प्रयाण केले.
—————––——–—-–——————-–—–

आणिला मागुतीं नेला,

आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें,

गतीसी तुळणा नसे ||१०||

मारुतीरायांचे वागणे अत्यंत नेटके आहे. त्यांनी द्रोणागिरी जसा आणला तसा तो परत होता त्या जागी न्हेऊनही ठेवला. मारुतीरायांना योगसिद्धी प्राप्त आहे. त्या सिद्धींच्या जोरावर ते उड्डाण करीत. त्या उड्डाणाची गती केवढी! मन कसं बहिणाबाई म्हणतात आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात..किती तो अफाट वेग मनाचा. सासुरवाशिणी सासरी असतानाही क्षणात मनाच्या पंखांवर बसून माहेरच्या अंगणी धाव घेतात तशीच गती मारुतीरायांच्या वेगाची आहे. त्यांच्या गतीची पुऱ्या विश्वात तुलना करता येणे शक्य नाही. याऊपर समर्थ म्हणतात की या सिद्धपुरुषाच्या गतीने तर मनाच्या गतीसही मागे टाकले आहे.
—-–-–—––-––-–-–—––-––—-–––-–——-––-

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा,

होत जातसे |
तयासी तुळणा कोठे,

मेरू मंदार धाकुटे ||११||

सीतेला शोधण्यासाठी प्रभुरामांनी मारुतीरायाला पाठविलं होतं. लंकेत प्रवेश करण्यासाठी मारुतीरायांनी आपल्या सिद्धींच्या जोरावर अगदी अणूएवढे रुप घेतले होते.  मारुतीराया अणुएवढे सुक्ष्म जसे बनू शकतात तसेच ते ब्रह्मांडाएवढे अतिविशाल रुपही धारण करू शकतात असे समर्थांनी म्हंटले आहे.
—–––-–-–—————–––——–––-–-––––––

ब्रह्मांडाभोवतें वेढें,

वज्रपुच्छें करू शकें |

तयासी तुळणा कैची,

ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

हनुमंताची शेपूट काही साधीसुधी नाही तर वज्रासारखी मजबूत आहे. एकदा भीमास आपल्या शक्तीचा गर्व झाला होता तेंव्हा मारुतीराया म्हाताऱ्या वानराचे रुप घेऊन त्याच्या वाटेत बसला. भीम त्याला म्हणाला,”तुझी शेपूट बाजूला कर,” पण वानररुपातील मारुती म्हणाला,”मी हा असा व्रुद्ध, अशक्त. तुच जरा माझी शेपूट बाजूस ठेव बरं.”
भीम एवढा बनवान योद्धा पण त्याला काही केल्या मारुतीरायाची शेपूट उचलता येईना, तो घामाघूम झाला.

त्याने जाणले, हा कोणी साधासुधा वानर नसून साक्षात रामदूत हनुमंत आहे. भीमाने नतमस्तक होऊन मारुतीरायाची माफी मागितली. भीमाचे गर्वहरण झाले. अशा या  वज्रशेपटीत अनेक राक्षसांना गुरफटवून, गोल गोल घुमवून मारुतीरायाने त्यांना यमसदनी धाडले आहे, त्यांना मुक्ती दिली आहे.
या शेपटाचा वेढा एवढा मोठा आहे की त्यात पुरे ब्राह्मांड सामावू शकते. या शेपटीशी तुलना ब्रह्मांडात कुणाशी होणे अशक्यप्राय आहे.
——————————-–————––-–—-–-

आरक्त देखिलें डोळा,

ग्रासिलें सूर्यमंडळा |

वाढतां वाढतां वाढें,

भेदिलें शून्यमंडळा ||१३||

अंजलीपुत्र हनुमान बाल्यावस्थेत असताना त्याला आकाशात सुर्याचा लालबुंद गोळा दिसला. मारुतीरायास ते फळ खाण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने आकाशाच्या दिशेने झेप घेतली. सुर्यमंडळाला घेरले. सारीकडे अचानक अंधार दाटला. पक्षी आपापल्या घरट्याकडे वळू लागले. आपल्या सिद्धीने हनुमंत इतका वाढला की त्याने शून्यमंडळही म्हणजे प्रुथ्वीचा परीघही भेदला.
—————————––——––––––––-––––-

धनधान्य पशूवृद्धि,

पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी,

स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

चौदापासूनच्या श्लोकांत या स्तोत्राची फलश्रुती वर्णिली आहे. हे स्तोत्रपठण नित्य केल्यास घरात धनधान्याचा तुटवडा रहात नाही. पशुधनही वाढते. संततीसौख्य लाभते. घरदार सुखसम्रुद्धीने बहरते. रुप, विद्या प्राप्त होते.
—–––—————————––——––——–

भूतप्रेतसमंधादी,

रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता,

आनंदे भीमदर्शनें ||१५||

मारुती स्तोत्राचे नित्य पठण केल्याने भूतप्रेतसमंध ही आपल्यापासून दूर रहातात. ती पाशवी शक्ती आपले काहीही वाकडे करू शकत नाही कारण हनुमान सावलीरुपाने आपल्या पाठीशी असतात. कोणत्याही दीर्घ रोगराईंपासून आपले रक्षण होते. मारुतीरायाच्या नित्य दर्शनाने चिंता,क्लेष मिटतात व मनात चैतन्यरुपी आनंद नांदू लागतो.
——————-–——–———––—————–-

हे धरा पन्धराश्लोकी,

लाभली शोभली वरी ।
दृढदेहो निसन्देहो संख्या,

चंद्रकला गुणे ।।१६।।

लौकिकदृष्ट्या मारुतीरायांचा जन्म पौर्णिमेला झाला आहे. याचसाठी पंधरा कलांचा हा पुष्पहार समर्थ हनुमंताला वहातात. आपण जर नियमितपणे या मारुती स्तोत्राचे पठण केले तर आपणासही हनुमंताच्या कृपेने उत्तम प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल असे समर्थ सांगतात.
———–——-–——–––———————-––

रामदासी अग्रगण्यू,

कपिकुळासी मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा,

दर्शने दोष नासती ।।१७।।

बिभीषण, सुग्रीव असे बरेच प्रभुरामांचे भक्त होते. या भक्तगणांच्या यादीत हनुमंतांचे नाव प्रथम येते. वानरकुळाचा उद्धार हनुमंतांनी केला. आपल्या भक्तीने त्यांनी वानरापासनं नारायणस्वरुप प्राप्त केले. ते रामस्वरूप झाले.

प्राणस्पंदनांच्या रुपात हनुमान प्रत्येक सजीवाच्या जीवात वसलेले आहेत व अशा या रामभक्त मारुतीरायांच्या दर्शनाने सर्व दोष नाश पावतात.
———-–-–-–—–💐💐💐💐💐—––———–-

====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.