
दुपारी सगळी कामं आटोपून मंजिरी आपल्या कॉलनीतल्या बायकांशी बोलत बसली होती…बायकांशी बोलणं म्हणजे इकडच्या-तिकडच्या गप्पा…त्यात प्रेमप्रकरण असलं म्हणजे अगदी चर्चेला उधाण येत…झालं असं कुठल्या तरी प्रेम प्रकरणावरून चर्चा रंगली होती…
मंजिरी – काय सांगताय…त्या मुलाने एकही पैसे न घेता लग्न केलं….हल्ली अशी माणसं मिळणं मुश्कीलच…मेघाने नशीब काढलं बाबा…
रेश्मा – अगं काय सांगू तुला…लग्नही अगदी साध्या पद्धतीनं झालं…कुठं पाहुणे नाही की काही नाही…
मंजिरी – अगं पण…हौस तर व्हायला नको का…नातेवाईक नाव ठेवत असतीलच की…!
रेश्मा – नातेवाईकांचं काय घेऊन बसलीस…आज बोलतील अन उद्या गप्प बसतील…बाकी जोडा काय मस्त दिसतो…जणू काही राजेश खन्ना आणि डिम्पल…
मंजिरी – घरी ओटीभरणाला बोलवले पाहिजे…अहो पिंटो आंटी कधी आले दोघे तर लक्ष ठेवायला पाहिजेल…
पिंटो आंटी – हो गं…गॉड ने सगळं आधीच जुळवलं असेल…गॉड खरंच खूप ग्रेट आहे..
मंजिरी – खरं म्हणजे…मेघा ब्राह्मण ना…तेही कोकणस्थ…आणि आदित्य तर आपला मराठी तेही ९६ कुळी…
रेश्मा – शेवटी जात…धर्म सगळं आपणच म्हणजे माणसाने तयार केलंय…शेवटी मन जुळणं महत्वाचं…संसार महत्वाचा….तो झाला म्हणजे झालं…
संध्याकाळ होत आली…मंजिरी संध्याकाळचा देवापुढे आणि तुळशीत दिवा लावून रामरक्षा म्हणायला बसली…जवळ-जवळ १५ मिनिटांनी रामरक्षा म्हणून झाली. काही वेळातच मंदार ऑफिसमधून घरी आला…राजा राणीचा संसार म्हणून फक्त मंदार आणि मंजिरी दोघेच घरात…म्हणून स्वयंपाकाची काळजी एवढी नव्हती…तरीही दिवसभर घरात एकटीच मंजिरी असे…विरंगुळा तो फक्त कॉलनीतल्या बायकांचा…दुपारचा विषय नेहमी मंजिरी…मंदारबरोबर शेअर करत असे…जेवण करत असताना मंजिरी आपल्या नवऱ्याबरोबर बोलत होती…बोलताना दुपारचं नेहमीप्रमाणे मंदारशी बोलून झालं…
मंदार – मंजिरी…तुम्ही बायका ना कुठलाही विषय बोलत असतात…आता मेघाची पसंती..तिची निवड..एकदा कॉलनीत आली की मग औपचारिकता ठेवा नेहमीसारखी…उगाच भूत पाहिल्यासारखं करू नका..मेघाला विचित्र वाटेल…अगं पण तिचा नवरा कुठे जॉब करतो…की जॉब शोधायचाय अजून??…
मंजिरी – सांगितलं ना मघाशी…दोन लाख कमावतो महिन्याला…म्हणजे बी.टेक. झालंय त्याचं तेही कॉम्पुटरमधून..
मंदार – असं…असं ..निवड चांगलीय बाकी…तीही इंजिनीरिंगलाच होती ना…
मंजिरी – हो तर…
मंदार – अगं…साजिरीसाठी स्थळ पाहत आहात की नाही तुम्ही…?
मंजिरी – हो म्हणजे काय…तिचा बायोडाटा पाठवलाय जवळच्याच वधू-वर सूचक मंडळात…
मंदार – असं…असं…यंदा काय करतीय ती…म्हणजे घरी आहे की कुठे जॉब की काही कोर्स करतीय…
मंजिरी – एम.एस्सी. झालं कि तीचं…शिवाय सेमिनार घ्यायला जाते कोचिंग इन्स्टिटयूट मध्ये…स्थळं येतात…पण पत्रिका जुळणं…शिक्षण…यात खूपच तफावत असते…मग साजिरीचं नको म्हटले लग्नाला…… आणि काय हो तुम्ही असं विचारताय खोदून खोदून जसं काही तुम्हाला माहीतच नाही …साली आहे नं तुमची मग तुम्हाला माहित पाहिजे कि नाही सगळ्या गोष्टी….
मंदार – नाही गं बाई…माहीतच होतं तसं मला…म्हटलं लेटेस्ट अपडेट घ्यावा तुझ्याकडून
बोलत-बोलत दोघांचीही जेवण झाली…मंजिरी आपल्या संसारात मस्त रमलेली असते…मंदारचही रुटीन खूप मस्त चालू असतं….काही दिवसांनी मंजिरीला तिच्या वडिलांचा म्हणजेच सारंग काकांचा फोन येतो…
सारंगराव – अगं…मंजिरी…ऐकलंत का ?
मंजिरी – बाबा…ऐकू येतंय मला…
सारंगराव – अगं..एक आनंदाची बातमी सांगायचीय तुला…
मंजिरी – कुठली बातमी…?
सारंगराव – अगं…आपल्या साजिरीचं लग्न जमलं बरं…मुलाचं नाव प्रशांत आहे शिवाय मुंबईला कॉर्पोरेट ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे…पगारही चांगला आहे..
मंजिरी – अरे…वाह…बाबा…तेच का स्थळ जो मागच्या रविवारी मुलगा बघून गेला होता?
सारंगराव – हो हो तोच
मंजिरी – …मस्त झालं बाई…ओझं उतरलं तुमच्यावरचं…
सारंगराव – मंजे…सगळं घर कसं रिकामं होईल आता…
मंजिरी – कसं करायचं ठरवलं लग्न मग…?
सारंगराव – अगं मस्त लॉन्स मध्ये करणार लग्न …२५ तोळे घालणार…आणि लग्नही लावून देणार बघ मी..
मंजिरी – बाबा…तुमच्या भावी आयुष्यासाठी असू देत ना काही…शिवाय साजिरी चांगली डबल ग्रॅजुएट आहे आणि प्रशांतरावही चांगल्या हुद्यावर आहेत…मग कसली कमी आहे…का एवढा खर्च करताय तुम्ही…नका एवढं करू एकतर माझ्या लग्नाचं लोन अजून फिटतंय…त्यात आणखी भर…
सारंगराव – मंजे…अगं भर कसली…आमचं कर्तव्य आहे ते पार पाडतोय…दुसरं काही नाही…आणि तुझ्या आईची शेवटची इचछा होती ग…त्याला तरी नाही म्हणू नकोस…
मंजिरी – तरीही…फालतू खर्च नकोय बाबा कर्तव्याच्या नावाखाली…तुम्ही ऐकणार नाही माझं..
सारंगराव – पोरी…या बाबतीत मी तुझं काहीच ऐकणार नाही हा…
मंजिरी – बाबा…पण एवढं सगळं उकळून त्यांना फक्त व्यवहार साधायचा आहे ते पण लग्नाच्या नावाखाली…कळतंय ना तुम्हाला बाबा…
सारंगराव – बाळा…तुझी काळजी समजू शकतो मी…ऐक माझं मोढता घालू नकोस…
मंजिरी – तुम्ही काय ऐकणार नाहीत…होऊ देत तुमच्या मनाप्रमाणे…
असे म्हणून आपल्या बाबांचा निरोप घेते आणि फोन ठेऊन देते…दिवसभर मंजिरीच्या मनात फक्त साजिरीचाच विचार…म्हणून एक दिवस मंजिरी आपल्या लाडक्या बहिणीला फोन करते–
मंजिरी – साजिरी…कशी आहेस ग तू..?
साजिरी – मी मस्तय ताई..तू कशी आहेस ?
मंजिरी – मीही मजेत आहे…एकदा का मंदार ऑफिसला गेला की…आवरते आपली रोजची कामं…प्रशांत दाजी काय म्हणतायत…?
साजिरी – ते..होय…मजेत आहेत त्यांचंही तसंच रुटीन आहे…माझे दाजी आणि तुझे दाजी असेच ऑफिसला गेले ना की असंच आपण गप्पा मारत बसू…
मंजिरी – अरे वाह…लग्न झाल्यावर काय-काय करायचं अशी स्वप्न रंगवलेली दिसतायत की…
साजिरी – काय ग दीदी…तुला नुसती थट्टा करायला जमते…
मंजिरी – लाजू नकोस हा..
मंजिरी पुढे बोलणार पण…साजिरी म्हणते…” दीदी…प्रशांतचा कॉल येतोय …कॉल करेल लगेच काही वेळाने…” असे म्हणून मंजिरी फोन ठेऊन देते…लग्न ठरल्यानंतरचे सोनेरी दिवस काय असतात याचा साजिरी आनंद घेत असते…कसले खाण्यापिण्याचे भान नाही नि कसलेच भान नाही…असंच लग्न येऊन ठेपतं…तसं प्रशांतच्या घरच्यांनी सारंगरावाना म्हणजे मंजिरीच्या वडिलांना जेरीस आणून सोडलं…की २५ तोळे देताय त्यासोबत प्रशांतसाठी फ्लॅट द्या असा तगादा साजिरींच्या सासरकडचे लावत होते…पाहता-पाहता मागण्याही वाढू लागल्या…लग्नाच्या बस्त्यापासून करून द्या…भांडी-कुंडी असा सगळा संसार सारंगरावानी आपल्या लेकीसाठी दिला…अशाप्रकारे अगदी थाठा-माठात लेकीचं लग्न लावून दिल…लग्नानंतर प्रशांतरावांबरोबर साजिरी आपल्या सुखी संसाराचं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईला गेली…तिथे सासू-सासरे, प्रशांत, नणंदबाई असं एकत्र कुटुंब होतं…साजिरींही पाककौशल्यात पारंगत असल्याने सासरकडच्यांची मनं जिंकून घेऊ लागली…पण कालच आलेल्या मुलीच्या हातात घर कसं द्यायचं म्हणून प्रशांतच्या आईचा म्हणजेच साजिरींच्या सासूबाईंचा तिळपापड होत असे…सासूबाईंना साजिरींचा हेवा वाटत असे…साजिरी आपल्या कामात कुठल्याही प्रकारची कुचराई करत नसल्याने…चुका काढण्यासाठी प्रशांतरावांच्या आईला काहीही मिळत नसे…उगाच कुरापत काढण्यासाठी एक दिवस भांडण उकरून काढतात…सासूबाई म्हणजे ललिताताई एक दिवस नवरात्रीच्या फराळासाठी शेजारी असलेल्या झावरे काकूंकडे गेल्या होत्या…तिथे दुपारी १२:३० वाजता गेल्या..मग संध्याकाळी उशिरा आल्या त्यानंतर साजिरी सासूबाईंची चहा ठेवण्यासाठी गेली…तर सासूबाई ओरडून म्हणाल्या-
ललिताताई – माझ्यासाठी चहा ठेवण्याची काहीही गरज नाहीय..
साजिरी – ठीक आहे आई…पण मामंजींना हवाय चहा मग मीही चहा घ्यायची राहिलीय…ठेवला तर चालेल ना?
ललिताताई – तुला माहिती नाही का…यांना चहा नाही घ्यायचा…मधुमेह आहे यांना..
साजिरी – आई…मला माहिती आहे मी बिनसाखरेचा चहा देणार आहे मामंजींना…
ललिताताई – बरं…बरं…चहा झाल्यावर स्वयंपाकाला लाग…मनाने करू नकोस काही…जरा विचारून कर मला…
साजिरी – हो..आई…!
साजिरीला सासूबाईंचा वागणं खटकतं…म्हणून थोडी धास्ती बसलेली असते तिच्या मनात…त्याच विचारात आपल्या सासूबाईंचा उपवास आहे हे मात्र साजिरीच्या लक्षातून जातं…काही वेळाने प्रशांत घरी येतो…ललिताताई आपल्या लोकांशी बोलत असतात…टीव्ही पाहता-पाहता आज जेवायला काय करायचं याच नियोजन होत…तर ललिताताई साजिरीला ऑर्डर सोडतात–
ललिताताई – साजिरी…अगं वरणफळं कर आज…
साजिरी – हो…आई…चिंच आणि गुळ घातला तर चालेन का…
ललिताताई – नाही नाही…तसलं काही नको घालूस…मला नाही आवडत असलं मिळमिळीत खायला…
साजिरी – ठीक आहे आई…नाही टाकत चिंच-गुळ…
ललिताताई – हो हो….आवर पटकन…भुकेलाय माझा लेक…
साजिरी लगबगीनं वरणफळं बनवते…पाणी घेणं, ताट-वाट्या घेणं अशी मांडामांड चाललेली असते…तेव्हड्यात साजिरीला आठवतं…’की आपल्या सासूबाईंचा आज उपवास आहे’ म्हणून साजिरी आपल्या सासूबाईंना म्हणते-
साजिरी – आई तुमच्यासाठी काय करायचं…मी विसरलेच..
ललिताताई – तू आता विचारतेस का जेवायला बसल्यावर…काय करायचं ते…ते पण सगळे जेवायला बसल्यावर…आणि आत्ता काय करणारेस माझ्यासाठी तू…[ललिताताई खूप चिडून बोलतात ]
साजिरी काहीही न बोलता गप्प खाली मान घालून ऐकून घेत राहते…चटकन साजिरीच्या डोळ्यातू पाणी येऊ लागलं…प्रशांतलाही साजिरीचा राग येऊ लागला…म्हणून प्रशांतही साजिरीला बोलू लागला-
प्रशांत – साजिरी अगं…डबल ग्रॅज्युएट ना तू…तुला साधं नाही कळत का..आज कुणाला उपवास आहे ते..!
साजिरी – अहो…पण तुम्ही थोडं आईंना विचारून पहा ना…मी मघाच पासून तोच विचार करतीय…आई झावरे काकूंकडून आल्यापासून त्या…काहीतरी बिनसल्यासारखं वागतायत…नक्की काय झालंय ते…धड काही नीट बोलत नाहीय त्या…मी काही विचारायला गेले तर मला ओरडून बोलतात..मग मी विचारण्याचं धाडस कसं करणार की आज फराळासाठी काय करायचं ते…
प्रशांत – साजिरी अगं…काहीही स्पष्टीकरण देऊ नकोस…माझ्या आईची तू माफी मागायला हवीय..
साजिरी – ठीक आहे मी सॉरी म्हणून जर राग जाणार असेल तर…आई मला माफ करा..!
रडत-रडत..कसे-बसे जेवण साजिरी करते…सगळी आवरा-आवर करून आपल्या बेडमध्ये मुसमुसत बसते …वाद झाल्यामुळे प्रशांतही साजिरीचं म्हणं ऐकून घेण्यासाठीही बेडमध्ये जात नाही…साजिरीला याच खूप वाईट वाटतं…म्हणून मनातच साजिरीच्या मनात विचार येऊ लागतात…एकटी असल्याने मन मोकळं करणं गरजेचं होतं…आपल्या बहिणीला फोन लावला कुणी ऐकू नये म्हणून मंजिरीशी ऑनलाईन बोलून बघायचं साजिरीने ठरवलं…बऱ्याच वेळाने साजिरीने एक हाय म्हणून मॅसेज केला…मग चॅटिंग करत आपलं मान मोकळं केलं..मंजिरीनेही उलट बोलू नको असं आपल्या बहिणीला बजावलं…साजिरीला तरीही समाधान झालं नाही कारण आपण तोंडी माफी मागून चालणार नाही असं सारखं-सारखं साजिरीला वाटत होतं म्हणून…कागद-पेन घेऊन आपला माफीनामा जणू लिहून देत होती…दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो कागद प्रशांतला दाखवला…मग त्यानेही तो कागद…आपल्या आईकडे दे असं सुचवलं…जसं आपल्या नवऱ्याने सांगितलं…तसं साजिरी करत होती माफीचा कागद सासूबाईंच्या हातात पडला तसं सासूबाईं साजिरीला आणखीनच कोंडीत पकडू पाहत होत्या…काही जरी स्वयंपाकात चुकलं की साजिरीला धारेवर धरलं जातं असे…म्हणून साजिरी घाबरी-घुबरी होतं असे…असं करून-करून साजिरी एक मनोरुग्ण होऊन बसली…आपलं मानसिक संतुलनही हरवून बसली होती..
५-६ महिने झाले असतील तसं साजिरीला मानसिक जाच होतं होता….काही दिवसांनी साजिरीचा मोबाईल हि तिच्याकडून काढून घेतला होता….याची तसूभरही कल्पना सारंगरावाना म्हणजे साजिरीच्या वडिलांना नव्हती…आपल्या लेकीची खुशाली काही येत नाहीय म्हणून सारंगराव साजिरीच्या सासरी येऊन पोहचले…पण साजिरीला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं…साजिरी दिसली नाही म्हणून सारंगराव इकडे-तिकडे पाहू लागले…इतक्यात सारंगराव चहा पित असताना…दार ठोठावण्याचा आवाज त्यांना आला…साजिरीच्या वडिलांनी सुरवातीला लक्ष दिले नाही…साजिरी कुठे आहे हे विचारल्यावर…साजिरी बाहेर गेलीय असं त्यांना सांगण्यात आलं…म्हणून सारंगरावही लगेच निघाले…’साजिरी बाहेर गेलीय’ हे अनपेक्षित उत्तर असल्याने सारंगरावांची काही खात्री पटत नव्हती म्हणून बिल्डिंगच्या खाली गेल्यानंतर मेन रोड वर चालत असताना…सहज लक्ष बिल्डिंगच्या खिडकीपाशी गेलं…खिडकीत एक मुलगी हाताने इशारा करत असताना सारंगरावाना दिसली पण ती मुलगी खूपच अशक्त, किरकोळ, केस विस्कटलेले अशी दिसत होती…ते म्हणतात ना आपलं लेकरू कसंही असलं ना तरीही ओळखू येत..तसं सारंगरावाना लगेच साजिरी आहे हे कळलं…मग साजिरीला भेटण्याचा प्रयत्न ते करू लागले…त्यासाठी सगळ्यात आधी आपली मोठी मुलगी मंजिरी हिच्याशी बोलून पाहिलं …’आपलं बोलणं साजिरींशी झालं होतं’ असं सारंगरावाना मंजिरीने सांगितलं म्हणून घरात रोज काही ना काही खुसपट काढून वाद होतं असतील आणि याचीच भीती साजिरीला वाटत असेल…याची सारंगरावाना खात्री पटली…सारंगरावानी साजिरीच्या घरी जशी परिस्थिती आहे तशी मंजिरीला सांगितली…यावर मात्र मंजिरी काहीही न बोलता स्तब्ध झाली…इतक्यात दरवाजा वाजला…मंजिरीने बाबांचा निरोप घेऊन फोन ठेवला..दारात मेघा आणि आदित्य दोघेही जोडीने आले होते…साजिरीचा विचार मनातून जातं नव्हता…दोघांचे स्वागतही मंजिरीने न हसता केलं…थोडं बोलणं झालं तशी मंजिरी भानावर आली आणि म्हणाली…
मंजिरी – अगं..मेघा…काय मग कशी आहेस ? लग्न झाल्यावर आजच वेळ मिळाला वाटत यायला…
मेघा – अगं..ताई तुला तर माहितीय माझं शेड्युल…दिवसभर बिझी संध्याकाळी घरी आलं की मग स्वयंपाक आवरून कधी पडेल असं होतं…पण मजेत चाललंय आमचं…पण तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतीयस…काही प्रॉब्लेम आहे का ?
मंजिरी – ऐक ना…आदित्य मुंबईला असतो ना…?
मेघा – हो…का ग…नुकतंच कॉर्पोरेट सेक्टर जॉईन केलय त्याने…पण तू माझ्या प्रश्नच उत्तर दिल नाही अजून..
मंजिरी – कोणता प्रश्न…?
मेघा – मंजिरी ताई….मी विचारलं काही प्रॉब्लेम आहे का…?
मंजिरी – काही नाही तुझा नंबर देऊन ठेव…काही कामं असलं ना की सांगेन तुला…अगं…विसरलेच मी…थांब तुझी खणा-नारळाने ओटी भरते…
मंजिरी लगोलग ओटीभरणाचं सामान घेऊन येते आणि मेघा ची ओटी भरते…ओटीभरण झाल्यावर मेघा आणि आदित्य निघतात…मंजिरी आदित्यला विचारते–
मंजिरी – आदित्य दादा…तुम्ही मुंबईतल्या कुठल्या कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आहेत…पत्ता सांगाल…कधी येन झालं साजिरीकडे तर येऊन जाऊ आम्ही…
आदित्य – हो…का नाही मी लगेच तुम्हाला मेसेज करतो…पण नक्की या आम्ही वाट पाहू…
पत्ता सांगितल्याप्रमाणे आदित्यने मेसेज केला…मंजिरीने दोघांनाही निरोप दिला मग…पत्ता वाचत बसली…प्रशांतच्या ऑफिसचा पत्ता आणि आदित्यच्या ऑफिसचा पत्ता एकंच आहे असं तिला दिसलं…या साजिरीच्या घरच्यांना धडा शिकवायचं मंजिरीने ठरवलं…पण आधी साजिरीला तिच्या सासरकडच्याकडून सोडवलं पाहिजे असं तिने ठरवलं…आपल्या वडिलांशी साजिरीचं या बाबतीत परत बोलणं झालं…मग दोघेही सासरकडच्यांना धडा शिकवण्याचा आराखडा आखू लागले… …मंजिरीने मग दोन दिवसांनी आदित्यशी बोलून प्रशांतबद्दल माहिती काढायला सांगितली…आदित्यशी बोलण्यावरून कळलं की प्रशांत हा आदित्यच्याच हाताखाली कामाला आहे असं सांगितलं…हळू-हळू साजिरीच्या अवस्थेबद्दल आदित्यला सांगितलं…यात हेरगिरी म्हणून मंजिरीने ओळख सांगण्यासाठी मज्जाव केला…म्हणजे स्वतःची ओळख फक्त प्रशांतचा ऑफिसमधला सहकारी आहे एवढीच ओळख सांगायची…मग हळू हळू साजिरीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू झाले..
एक दिवस…साजिरीच्या घरी कुणीही नाही असे कळले तसं आदित्यने हात-पाय हलवायला चालू केले मग प्रशांतला एक महत्वाची डील फायनल करण्यासाठी म्हणून वांद्र्याला पाठवले…प्रशांत लगेच गेला…घरी प्रशांतची वडील, आई आणि बहीण तिघेही देवदर्शनासाठी गेले असल्याने साजिरीला बाहेर काढणं सोप्प होतं…संधीचा फायदा घेतला गेला…आदित्यने दरवाजा फोडून साजिरीला बाहेर काढलं…पाहिलं साजिरीला…फक्त एक हाडांचा सापळा झालेली साजिरी दिसू लागली….डोळ्यांखाली काळी वर्तुळ, केस पिंजारलेले, अंगात फाटकी साडी…इतकी वाईट अवस्था साजिरीची झालेली होती…धड उभाही राहता येत नव्हतं अशी दयनीय अवस्था तिची होती…आदित्यने लागलीच पोलीस स्टेशन मध्ये प्रशांतविरुद्ध तक्रार नोंदवली..त्यामुळे प्रशांत घरी येण्याअगोदर पोलिसाची फौज हजर झालीच होती…आदित्यने मग स्वतःहून आपल्या चारचाकीमधून साजिरीला सारंगरावांकडे सुपूर्त केलं…पोटच्या पोरीची अशी अवस्था पाहिल्यावर कुठल्या बापाला पाझर नाही फुटणार….अगदी लहान मुलाप्रमाणे सारंगराव रडत होते…मंजिरीही धीर द्यायला होती….म्हणून साजिरीवर मानसोपचारतज्ज्ञ डॉ.शेखर निमसे यांच्याकडे उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आलं…डॉक्टरांनी हिमोग्लोबिन आणि प्रोटीन पावडर देऊन शरीर तंदुरुस्त बनवले…मग व्यवस्थित अशी मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट सुरु केली…डॉक्टरांच्या उपचारांनाही यश आलं…साजिरी हळू-हळू सुधारू लागली,बोलू लागली,हसू लागली…साजिरी तर बारी झाली…पण तिकडे प्रशांतला आणि ललिताताईंना विवाहितेचा मानसिक छळ या आरोपावरून अटक करण्यात आली त्याचबरोबर सुनेचे दागिने व लग्नाचा खर्च देण्यासही सांगितले…
सगळी परिस्थिती निवळू लागल्यानंतर…मंजिरी आपल्या वडिलांशी खूप मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलत होती…
मंजिरी – बाबा…पाहिलंत…नातं फक्त दोन गोष्टींवर अवलंबून असत…एक प्रेम आणि दुसरं व्यवहार…
सारंगराव – ते कसं बाळा…?
मंजिरी – आपण…मूल्यमापन केलं..तेही कुठल्याही नात्याचं…एकच स्केलची दोन्ही टोक असतात…म्हणजे आई-मुलगा,नवरा-बायको,सासू-सून,मित्र-मित्र किंवा मैत्रीण-मैत्रीण, मालक-नोकर…याच स्केलवर मोजली जातात…जिथे दोन्हीही नाही तिथे काहीच हालचाल नाही…
सारंगराव – असं कसं म्हणतेस तू ?
मंजिरी – बाबा…साधी गोष्ट आहे…प्रेम शून्य असेल ना ज्या नात्यात…त्या नात्याला व्यवहार म्हणतात…आपल्या साजिरीच्या बाबतीत तेच झालं बाबा…
सारंगराव – होय…बेटा फ़सलोच मी तिच्याबाबतीत…खूप लुबाडले त्या लोकांनी आपल्याला…लग्न जमलेलं मोडलं असत तर फार बरं झालं असतं गं…
मंजिरी – आत्ता उदाहरण द्यायचे झाल्यास…मी मेघाच उदाहरण देईल…कारण त्यांचा प्रेमविवाह नक्की आहे…पण त्यांचं नातं फक्त आणि फक्त प्रेमावर अवलंबून आहे…व्यवहारावर नाही…व्यवहारशून्य नातं हे फक्त आणि फक्त शुद्ध प्रेमावर अवलंबून असतं…जगाच्या व्यवहाराची तमा न बाळगता फक्त प्रेम केलं जातं ते शुद्ध प्रेम असतं…मग बाह्य व्यवहारी जगाला ते नातं वेडसर वाटलं जातं…आपण साजिरीच्या बाबतीत फक्त व्यवहार केलाय असं मला वाटत…
सारंगराव – आपले गेलेले..लग्नात खर्च झालेले पैसे मिळाले…पण माझ्या पोरीचं मातेरं करून ठेवलं मी…
मंजिरी – बाबा…काही मातेरं झालेलं नाहीय…पाहिलं साजिरीला स्वतःच्या पायावर उभी करूयात आपण…चांगली डबल ग्रॅज्युएट आहे ती…बाकी दुसरं लग्नबिग्न ते पुढचं पुढे पाहू…
मंजिरीच्या म्हणण्याला सारंगरावानी दुजोरा दिला…पुढे साजिरी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागली… वडील आणि मुलगी आनंदाने राहू लागले…त्याचबरोबर प्रशांतशी वर्षभराने घटस्फोट घेऊन साजिरी मोकळीही झाली…आपल्या साजिरीची प्रगती पाहून मंजिरीला सारंगराव म्हणतात…” बाळा आत्ता तुझं ऐकलं म्हणून माझी दुसरी लेक आपल्यात आहे…या आधी तुझं न ऐकून फार मोठी चूक केली होती मी…”
यावर मंजिरी…” बाबा…चूक झाली मान्य आहे…पण चूक सुधारली हे तितकंच महत्वाचं ना ”. आपल्या लेकीच्या दिलास्याने सारंगराव म्हणतात…” हा…झालं गेलं…गंगेला मिळालं..”
अजूनही लग्नाच्या नावाखाली आपण सगळे हुंड्यारूपी एक व्यवहाराचं करतो आहोत…जिथं व्यवहार होतो तिथं प्रेमाला शून्य किंमत असते…जिथं प्रेम असतं तिथे व्यवहार मातीमोल ठरतो.
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.