Skip to content Skip to sidebar Skip to footer

खास वर्षाऋतुचे उखाणे

marathi ukhane:

बरसल्या पाऊसधारा म्रुद्गंध दाही दिशांना
     रावांचा हात हाती बागेतून फिरताना

पाऊसगाणी गातात सानसानुले पक्षी
     रावांच्या न माझ्या प्रितीला निसर्ग साक्षी

मेघांच्या पोटात पावसाचं पाणी
     रावांसोबत गाते मी जीवनगाणी

वीज कडाडता काळजात लकलक
    राव घराबाहेर, माझ्या जीवात धकधक

इंद्रधनुष्यात असतात सात रंग
     रावांसोबत संसारात झाले मी दंग

marathi ukhane

पागोळ्यांच्या सरी तळहातावर झेलते
    रावांच्या हौसेखातर नऊवारी नेसते

पावसाच्या पाण्यात सोडल्या होड्या
    नका ना राव काढू माझ्या खोड्या

कोकणची भूमी  नेसली शालू हिरवा
    रावांनी आणली साडी रंग तिचा हळदुवा

रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा
    रावांच्या जीवाला जरा नाही थारा

पावसाचं पाणी पिऊन त्रुप्त सारे पशुपक्षी
      रावांच्या अंगरख्यावर बारीक नक्षी

marathi ukhane

सड्यावर फुलली सुवासिक फुले
      रावांना आवडतात लहान मुले

आभाळात उडतात बगळ्यांच्या रांगा
       रावांच्या आवडीचं मला तुम्ही सांगा

ओल्या मातीचा गंध भवताली पसरला
        राव दिसताच माझा चेहरा मोहरला

रानावनात पाऊस, तनामनात पाऊस
       राया मला सोडून नको दूर जाऊस

डोंगरदऱ्यांतून वहातात आरसपानी झरे
      रावांना आवडतात काप्या फणसाचे गरे

marathi ukhane

पहिल्या पावसाने माती गंधाळते
रावांच्या सहवासात मी फुलारते

थेंब थेंब झेलत घेऊ जोडीनं गिरक्या
रावांच नाव घेते नका घेऊ फिरक्या

पिसारा फिरवून वनी नाचतो मोर
रावांसोबत पहाते मी चंद्राची कोर

पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा
रावांच्या सहवासात नाही आनंदाला तोटा

marathi ukhane

पानापानांतून घरंगळते पावसाचे पाणी
राव माझे राजा नं मी त्यांची राणी

      –गीता गरुड.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.