मंगळागौरीसाठी खास उखाणे

मंगळागौरीला वाहिल्या सोळा पत्री
रावांची आहे मी कुशल ग्रुहमंत्री
लग्नानंतरची पहिली मंगळागौर
साजरी करत आहे मी माहेरी
रावांच्या पसंतीची साडी नेसून चंदेरी
मंगळागौरीच्या पुजेसाठी केले दिवे सोळा
रावांचे नाव ऐकायला सख्या झाल्या गोळा
पानाफुलांनी सजवले मंगळागौरीचे मख़र
राव नित्य करतात माझ्यावर प्रेमाची पाखर
सोळा दिव्यांनी केली देवीची आरती
राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी

गौराईच्या भाळी शोभे कुंकवाचा टिळा
रावांना आवडतो अंबरातला घननिळा
मंगळागौरीची कहाणी ऐकायला सख्या झाल्या गोळा
रावांचा स्वभाव आहे अगदी साधाभोळा
मंगळागौरीनिमित्त सवाष्णींची भरते गव्हाने ओटी
रावांच्या नि माझ्या प्रितीला कधी न लागो ओहोटी
मंगळागौरीनिमित्त केलाय थाट
आईने दिले मला लाडवाचे ताट
रावांना बसायला मांडते चंदनी पाट
मंगळागौरीदिवशी घडी मोडली नव्या साडीची
रावांनी हाती दिली चावी नव्या गाडीची
हंड्यावर ठेवले हंडे सात त्यावर ठेवली कळशी
रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

मंगळागौरीसमोर फुलांची आरास
राव लावताहेत आम्रपर्णांचे तोरण दारास
शिवाला मिळवण्यासाठी गौरीने केली तपश्चर्या घोर
राव आहेत माझ्या दिलाचे चितचोर
पार्वतीच्या तपश्चर्येने भोलेनाथ झाले खूश
रावांनी लावलाय रानात ऊस
शिवपार्वतीच्या लग्नात होती ब्रह्माची उपस्थिती
रावांची होवो उत्तरोत्तर प्रगती
शिवाच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीचा उपवास
सदोदित लाभावा मज रावांचा सहवास

घुमू दे घागर घुमू दे
खेळात जीव रमू दे
गौराईच्या क्रुपेने
रावांना उदंड आयुष्य लाभूदे
भोलेनाथांच्या मनात माता पार्वतीबद्दल आदर
रावांच्या सेवेत मी नित्य सादर
रेशीम लुगडं नं कोल्हापुरी साज
रावांचं नाव घेते मंगळागौर आज
मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी
रावांमुळे आली माझ्या जीवनात गोडी
देवीच्या समोर ठेवले सातारी पेढे
रावांचं नाव घ्यायला कशाला आढेवेढे
दारापुढे काढली ठिपक्यांची रांगोळी
रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी
गौरीमध्ये गौर बाई मंगळागौर
रावांचा रुबाब आहे सगळ्यांत और

रिमझिम पावसात थुईथुई नाचे मोर
रावांच्या नावाने पुजते मंगळागौर
मंगल देवी मंगल माते साष्टांग नमन करते
रावांची नं माझी जोडी राहो अभेद्य, आशिष मागते
मंगळागौरीची ओटी भरते वाकून
रावांचं नाव घेते साऱ्यांचा मान राखून
श्रावणातील मंगळवारी
रंगतात मंगळागौरीचे खेळ
रावांचं नाव घ्यायला
मला लागत नाही काळवेळ
गौराईच्या मुद्रेवर प्रसन्न भाव
सर्वांच्या आग्रहाखातर घेते रावांचं नाव

फुलात फुल कमळाचं बाई कमळाचं
श्रीविष्णुला वहायचं बाई वहायचं
रावांविना मला माहेरी नाही करमायचं
मंगळागौरीसमोर रेखाटली रांगोळी सुरेख
रावांच्या प्रगतीचा व्रुद्धिंगत होवो आलेख
हाती बिलवर कंठी मोतीमाळ
शोभून दिसते गौरी माय
अंगणात हंबरते कपिला गाय
रावाची माया जणू दुधाची साय
मंगळागौरीला नमन करून
खेळ खेळते जुने नवे
राव येता जीवनी
आणिक सुख ते काय हवे!
मंगळागौरीला खेळ खेळतो झिम्मा फुगडी
रावांना आणायला सांगेन मी मोत्यांची बुगडी
मंगळागौरीदिवशी पिंगा आला रंगात
रावांची रिंगटोन वाजतेय माझ्या कानात

हिमालय पर्वतावर शिवपार्वतीचा वास
रावांचं नाव घेते मंगळागौर आज
नाकात मोत्याची नथ, गळ्यात कोल्हापुरी साज
रावांच्या नावाने मंगळागौर पुजते आज
हाटला अंधार पसरला प्रकाश
माहेराची माया गौराईची क्रुपाद्रुष्टी
रावांसोबत लग्न लागताच
रंगभरली दिसू लागली स्रुष्टी
जाईजुईचा गजरा गौराईच्या वेणीत
मधाचा गोडवा आहे रावांच्या वाणीत
सासूबाई आहेत ऑफिसर सासरे आहेत प्रोफेसर
राव असतात सर्व आघाड्यांवर अग्रेसर
चिरेबंदी वाडा, वाड्यात सात खोल्या
सात खोल्यांतली मधली खोली
पहिली मंगळागौर तीत पुजते
सौभाग्याचा आशीर्वाद देवीपाशी मागते
रावाचे कौतुक सख्यांना सांगते
गौराई पुढ्यात पेटवला सुगंधी धुप
रावांचं आहे राजबिंड रुप

महादेवास प्रिय बेल, श्रीविष्णू तुळशी
रावांचं नाव घेते मंगळागौरीदिवशी
कापुराच्या वाती तेजाळल्या अंबेपुढे
रावांचं नाव घ्यायला कशाला आढेवेढे
गौराईच्या भोवती दरवळ सोनचाफ्याचा
रावांनी आणला बाजुबंद सोन्याचा
मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
रावांसाठी देवीकडे दिर्घायुष्य मागते
गुलाबांचा हार गौराईच्या गळ्यात
रावांचं नाव घेते सख्यांच्या मेळ्यात
मंगळागौरीनिमित्त हळदीकुंकू घालते
रावांच नाव घेऊन सख्यांचा मान राखते

मैत्रिणींसवे घेते झोक्यावर झोके
रावांचं नाव घ्यायला कशास आळोखेपिळोखे
हिरवागार निसर्ग,
रिमझिम पावसाच्या सरी
गौराईचं करते पूजन
आली वाटतं रावांची स्वारी
फुलून आलय अंगण
पिंग्यानं धरलय रिंगण
रावांच्या नावाचं केलय मी
हातावर गोंदण
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं
पोरी पिंगा गं पोरी पिंगा
गौराईसमोर रात्र जागवते
रावांसाठी सुख, ऐश्वर्य मागते
फुगडी फू बाई लुगडी धू
मी न्हाई तू बाई मी न्हाई तू
नाव घे नाव घे म्हणते प्राजू
रावांचं नाव घ्यायला कशाला लाजू
गाजला होता हिंदी सिनेमा नया दौर
रावांच्या नावाने पुजली मी मंगळागौर
किस बाई किस दोडका किस
दोडक्याची फोड लागली गोड
रावांच्या प्रेमाला नाही तोड
वाऱ्याचा स्पर्श होता कळी खुदकन हसली
रावांचे नाव घेता गाली लाली चढली
पानाफुलांनी सजवते मंगळागौरीचे मखर
राव करतात माझ्यावर प्रेमाची पाखर
सासूबाईंची माया सासऱ्यांचा दरारा
माहेरची तनुजा रमली रावांच्या घरा
फु बाई फु फुगड्या
गौरीपाशी खेळू चला
रावांवरची टळू दे हरएक बला
तांदूळ सड बाई तांदूळ सड
राव घेतात मातोश्रींची कड
चहा बाई चहा गवती चहा
राव म्हणे चारच दिवस माहेरी रहा
–सौ.गीता गरुड.