मनाचा कौल

©® गीता गजानन गरुड.
“का गं आज लवकर आलीस ती कॉलेजातून?”
जीजीच्या प्रश्नाला उत्तर देणं अबोलीला जमलंच नाही. ती तशीच मुसमुसत राहिली. गोऱ्यापान अबोलीच्या नाकाचा शेंडा गाजरासारखा लालेलाल झाला होता. रडून रडून तिचं अंग गदगदत होतं.
“बरं. तुला वाटेल तेंव्हा सांग हो. हातपाय धुवून घे बघू. मी वाढते जेवायला. कुळथाचं मोडवणी केलंय नि नथुआत्या मघा येऊन गेली तिच्यासोबत मुशीचं सुकट पाठवलय तुझ्या अप्पांनी. ते ठेवते भाजायला. सुकटाचा गंध नाकात गेला की भूक चाळवेल बघ तुझी. नथुआत्याला अप्पा सांगत होते,”माझ्या भावलीला सुकटाचं भारी वेड. रविवारी बाजारात गेलात की जाळी आणा, मग जरा सोप्पं जाईल भाजायला.”
जीजीने अप्पांचं नाव काढलं नं अबोलीने महत्प्रयासाने दाबलेले काही कढ नकळत बाहेर आले नि अबोली पुन्हा स्फुंदू लागली. “जीजी, मी पडते जरा, डोकं दुखतय.” म्हणत ती खोलीत पळाली.
पोरीच्या या तर्हेवाईकपणामुळे जीजी पुरती कासावीस झाली. नाना शंका मनी उमटल्या. कॉलेजमधे मुलांनी छेड तर काढली नसेल ना? तरी जीजीनेच तिला कॉलेजला जाताना सुटसुटीत ड्रेस घालून जा असं सांगितलं होतं, हातभर चुडा घालून इतर मुलींत ऑड म्यान आऊट दिसण्यापेक्षा उजव्या हातात एखाददोन हिरवी काकणं नि डाव्या हातात नाजूकसं घड्याळ घालायला सांगितलं होतं.
जीजी लग्न होऊन वाकोल्यांच्या घरात आली तेंव्हा तिच्याही बऱ्याच इच्छाआकांक्षा होत्या. परिस्थितीमुळे अर्धवट राहिलेलं शिक्षण तिला पुरं करायचं होतं, काही छंद जोपासायचे होते पण दोन नणंदा नि धाकटे दोन दिर यांचं सगळं करण्यात तिचं शिक्षण राहूनच गेलं.
सासूबाईंशी तिने बोलून बघितलेलं पण सासूबाईंनी नाकावर बसलेली माशी डाव्या हाताने हाकवावी तसा तिचा विचार धुडकावून लावला होता नि यजमान म्हणजे आई म्हणेल ती पुर्वदिशा. जीजी साऱ्यांचं करत राहिली. नणंदांची लग्नं झाली. दिराचं झालं. दिर बायकोला घेऊन वेगळे झाले. जीजीचा सुधांशूही पहातापहाता देखणा ,तरणाबांड पुरुष झाला.
जीजींच्या माहेरी, भावाकडे वास्तुशांत होती. जीजी सुधांशु नि यजमानांना घेऊन गेली होती. तिथेच सुधांशुला अबोली भेटली. अबोलीही सुट्टीला तिच्या मावशीकडे म्हणजे सुधांशुच्या मामीकडे यायची. लहानपणी दोघे एकत्र खेळायचे खरे पण आता तरुणपणी भेट होताच अबोलीचं बदललेलं रुप पाहून सुधांशु तिच्या प्रेमातच पडला.
अबोली काही केल्या प्रतिसाद देईना तसा सुधांशुचा झालेला देवदास त्याच्या मामाच्या लक्षात आला नं मामाने पुढाकार घेतला. अबोलीला मागणी घातली. पुढचं सगळं जुळत गेलं. जन्मपत्रिका जुळल्या, मतं जुळली. लग्न यथासांग पार पडलं नि अबोली सासरी रहावयास आली.
जीजीला मुलीची खूप आवड त्यामुळे ती अबोलीला अगदी फुलाप्रमाणे जपे. अबोलीने पुढे शिकावं, शिक्षणाचा उपयोग करून घ्यावा, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र व्हावं.. चार पैसे का होईनात स्वत: कमवलेले तिच्या कनवटीत खेळावेत अशी जीजीची मनापासनं इच्छा होती.
पूजा,पाचपत्रावन, मधुचंद्र वगैरे झाल्यावर जीजीने अबोलीला विचारलं,”बीए आहेस. पुढे शिक की. बीएडला प्रवेश घे.”
अबोली म्हणाली,”बीएडचं कॉलेज दिवसभराचं, मग अभ्यास..घरी काम कधी करणार मी!”
“अगो कामाचं काय घेऊन बसलीस. करू वाटूनवाटून. थोडीच गावजेवण घालायचय आपल्याला. रोजची पोळीभाजी नि चार भांडी. कपड्यांना मशीन आहे.फरशी दोन दिवसातनं एकदा पुसू.”
जीजीच्या या म्हणण्यावर सुधांशु म्हणाला,”बघा बॉ. तुम्ही सासूसूना ठरवा काय ते. मग मला जास्ती काम पडतं, तिला कमी अशा तक्रारी माझ्याजवळ घेऊन आलात तर हिमालयात पळून जाईन मी. कुणाचीही बाजू घेणार नाही. आधीच सांगतो.” आणि झालं सर्वांच्या अनुमतीने,पाठिंब्याने अबोली कॉलेजला जाऊ लागली.
अबोलीचं कॉलेज सातचं तर ती सकाळी सहाला उठून तिघांसाठीही पोळ्या करून पोळीच्या डब्यात ठेवायची. भाजी फोडणीला घालायची. मग मग जीजीच तिला सांगे..तू पोळ्या करतेस तेवढ्या पुरे. भाजीचं मी बघत जाईन. तू गेल्यावर रिकामीच तर असते मी, तरी अबोली येताना भाजी घेऊन येणं, निवडून फ्रिजमधे ठेवणं अशी कामं करत असे. आवर्जुन जीजींसठी सोनटक्क्याच्या जुड्या, सोनचाफी घेऊन येत असे. ती सुगंधी भेट दोघींचे नाते अधिक सुगंधी व सुदृढ करत होती.
सुधांशुचे वडील हलक्याशा दुखण्याने ध्यानीमनी नसताना संसारातनं उठून गेले तेंव्हा मात्र हीच मुलांना धीर देणारी जीजी केविलवाणी झाली. सुधांशुपेक्षाही अबोलीने माणसात आणलं जीजीला. लोकं काही म्हणोत, तिने जीजींसाठी फुलं आणणं नाही सोडलं आणि सामाजिक रुढींच्याखाली दबलेल्या जीजींच्या मनाने ती सुवासिक फुलं माळायचा धीर होत नाही म्हणता पतीच्या फोटोला फुलं वहाणं सुरु केलं. त्या सुगंधाने जीजीच्या चित्तव्रुत्ती प्रसन्न होऊ लागल्या.
सुधांशूला ऑफिसातले कलिग्स सांगत..सुधांशू बायको नं आईमधे सँडविच होतं पुरुषाचं. तुला कळेलच पुढे पण सुधांशू जीजी नि अबोलीतला समजुतदारपणा, प्रेम पाहून स्वतःला भाग्यवान समजू लागला होता.
पण मग हे असं आज अचानक..का बरं रडली असेल अबोली..जीजींचा जीव व्याकूळ झाला होता.
घड्याळात पाचचा टोला वाजला तशी अबोली झोपेतनं उठली. खिडकीवर बुलबुल येऊन बसला होता. इकडेतिकडे मान वाकडी करुन बघत होता. अबोलीच्या मनातलं तांडव आता बरंच शांत झालं. तिला आठवलं दुपारी आपण जीजींच्या प्रश्नाला उत्तर न देता, न जेवता खोलीत डांबून घेतलं स्वत:ला. कधी डोळा लागला ते कळलंच नाही. काय वाटलं असेल जीजीला! चुकलंच आपलं.
अबोलीने केस एकसारखे वरती घेऊन क्लचने बांधले. तोंडावर पाणी मारलं नि चेहरा पुसला. ती किचनमधे गेली. चहासुद्धा ठेवला नव्हता जीजीने. चार वाजता जीजींचा चहा तयार असे.
आपल्यामुळे जीजीला घोर लागला. तिला वाईट वाटलं. उकळत्या पाण्यात साखर, चहाची बुकी, दोन वेलदोडे टाकून तिने दूध गरम करत ठेवलं. चहा कपांत ओतून तिने जीजीसमोर आणला नि तिच्या बाजूला बसली.
“जीजी जेवली नाहीस ना?”
“छे गं. भूकच नाही लागली.”
“सॉरी नं जीजी. मी तुला इग्नोअर केलं.”
“चालतय गं. कधीकधी आपला गुंता सोडवायला आपणच हवे असतो. तेवढी स्पेस द्यावी प्रत्येकाला.”
“थँक्स जीजी मला समजून घेतलस. अगं काय झालं माहितीय..जिना उतरत होते तर गेटच्या पायरीवर करंदे काकू नि बोंबले काकू दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. मी तिथल्या तगराची चार फुलं काढत होते, तळ्याजवळच्या गणपतीला वहायला तर त्या दोघींचं बोलणं माझ्या कानावर पडलं.
करंदे काकू म्हणत होत्या,”बघा कशी चालली नटूनथटून. घरी सासू आहे कामाला.” यावर बोंबले काकू म्हणाल्या,”शिक्षण कसलं..बाहेर हिंडाफिरायला मिळावं म्हणून सगळी थेरं. लग्न झाल्यावर योग्य वेळात मुलं जन्माला घालायची, त्यांना वाढवायचं तर ही आपलंच तुणतुणं वाजवतेय. बीएड करतेय म्हणे. आताशा नोकऱ्या मिळताहेत कुठे . आहेत त्यांनाच पगार द्यायला पैसा नाही सरकारकडे.”
यावर परत त्या करंदे काकू,”बरं अगदी गरीब वगैरे परिस्थिती आहे का घरात तर तेही नाही. हिचा नवरा चांगला कार्पोरेटमधे कामाला पण म्हणतात नं भिकेचे डोहाळे.
यावर बोंबले काकू,”अहो भिकेचे डोहाळे नाहीत. हल्लीच्या पोरी भारी डोकेबाज असतात. डोकं खूप पुढे धावतं त्यांचं. स्वत:चा पगार चालू झाला की नवऱ्याला स्वतःच्या नावावर घेतलेल्या ब्लॉकमधे घेऊन जाते की नाही बघा. मग तिथे आणून ठेवेल माहेरच्या माणसांना मग पोरंसोरं आणि इकडे सासू बेवारशी.”
जीजी त्या बोलत होत्या ना तेंव्हाच मला परत घरी वळावसं वाटलं. कॉलेजला जाण्याचं त्राणच उरलं नव्हतं माझ्यात. जीजी, नोकरी लागली तर घेईनही मी नवीन घर पण म्हणून तुम्हाला बेवारशी करेन का मी! यांना बोलवलं तरी कसं आणि आमच्या कोकणात मुलीच्या घरी मुलीला मुल झाल्याशिवाय जेवतही नाहीत तर ही म्हणे माझ्या माहेरची येऊन तळ ठोकतील. माझं डोकंच चालेना.
त्यात उजा आणि शिल्पा धीरज व बंटीसोबत सिनेमाला गेल्या. मला बोलवत होत्या. मी नाही म्हंटलं तर म्हणे..तुझी जीजी परवानगी देणार नाही. कितीही म्हंटलं तरी विंचू तो विंचू नि सासू ती सासू. तुझं हे सासूप्रेम भारी पडेल म्हणे तुला.” एव्हाना चहा थंड होत आला होता.
“अय्या, चहा गार झाला. मीही वेडी बोलत बसले. आले लगेच आणते गरम करून.”
अबोली चहा गरम करायला घरात गेली. बाहेर खिडकीत रिमझिम पाऊस पडत होता. समोरचं जास्वंदीचं झुडुप लाल फुलांनी बहरलं होतं. हिरवीकंच पानंही कशी रसरशीत दिसत होती. कंपाऊंड वॉलवर साळुंक्या आपलं भिजकं अंग वाळवत उभ्या होत्या.
जीजी म्हणाली,”अबोली, मघा आभाळ भरून आलं होतं. आता पाऊस पडून गेल्यावर कसं निरभ्र वाटतय बघ. तसंच तुझ्या मनाचं झालं होतं. मनात वेदनांचे ढग साचले होते. तू रडलीस, व्यक्त झालीस, तुझं मन मोकळं झालं या निरभ्र आकाशासारखं.
अबोली अगं उजा,शिल्पा, केंदरे ,बोंबले काकू ही अशी समाजातली तर्हेवाईक मंडळी बोलतातच. तुम्ही कसंही वागलं तरी ती बोलणारच. तुमचे पाय खेचण्यात काही कमी करणार नाहीत.”
“पण जीजी लागतं नं मनाला. उमेद खचून जाते माणसाची.”
“अबोली, आम्हाला शाळेत असताना एक कविता होती..
शाळा सुटली, पाटी फुटली
आई मला भज्याने मारलं
मी त्याच्या बापाचं काय खाल्लं..
कवितेतल्या बाळूची शाळा सुटली. तो आपली पाटी घेऊन येत होता. घराच्या ओढीने भरभर चालत होता, आईने केलेल्या घावण्यांचा गंध त्याला खुणावत होता इतक्यात एका टारगट पोराने बाळूच्या थोबाडीत मारलं. त्याची पाटी फोडली.
बाळूने ते तुकडे कसेबसे गोळा केले.. नि आईकडे आला. आईच्या कुशीत रडत बसला..
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भज्याने मारलं
मी त्याच्या बापाचं काय खाल्लं
मग आईने त्याची समजूत काढली,”बाळू , हे असे भजे आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणार. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या ध्येयापर्यंत चालत राहिलं पाहिजे..असा आशय होता बघ.
अबोली, लहान असताना आपल्याला कोणी मारलं, कुणी आपली टर उडवली तर आपम आईला नाव सांगतो पण पुढे तुम्ही मुलं मोठी होता. आई काय सासू काय जन्मभर कुठे पुरायला पण या भजेरुपी विक्रुती मात्र आयुष्यभर साथ सोडत नाहीत आपली. देवासमोर ताठ मानेनं उभं राहता येतय म्हणजे आपण काही चुकीचं करत नाही हे समजून जायचं.
एका भज्याला घाबरलीस तर सातआठ भजे तुझ्याकडे बघून दात काढतील. दहापंधरा भजे तुला घेराव घालतील. या भज्यांच्या चक्रव्यूहातून अलगद निसटायचं बाळा.
मीच तुला म्हंटलं नं पुढे शीक,नोकरी कर, आपल्या पायावर उभी रहा मग जगाचं कशाला ऐकत बसतेस. तुझ्या मनाला विचार. तू जे करत आहेस त्याने कोणाला उपद्रव होत नाहीए ना, तुझ्या कामामुळे तुला आत्मिक समाधान मिळतय ना, तुझी प्रगती होणार आहे ना.. मनाकडून उजवा कौल मिळाला की ती गोष्ट नि:संकोचपणे करू लाग.”
इतक्यात सुधांशु आला. अबोलीने त्याची ब्याग आपल्या हातात घेतली. सुधांशूने तिला गरमागरम पार्सल दिलं. “अय्या, काय आणलंत एवढं!”
“जीजी म्हणाली, अबोलीच्या आवडीचे बटाटेवडे घेऊन ये आणि हो सोबत माहीमचा हलवा नि सोनचाफ्याची,सोनटक्क्याची फुलंही आणलेत. तो फुलवाला म्हणाला आज तुमच्या मिसेस फुलांकडे न बघताच गेल्या.”
अबोली खुदकन हसली. अबोली
ची मन:स्थिती पुर्ववत झालेली पाहून जीजीने सुटकेचा नि:श्वास सोडला नि त्या देवापुढे सांजवात लावायला आत वळल्या.
समाप्त
==============
1 Comment
Amruta Khanolkar
अतिशय सुंदर लिहिता तुम्ही अप्रतिम