मान द्यावा मान घ्यावा!

©® सौ. गीता गजानन गरुड.
रोशन व रियाचा प्रेमविवाह. खरं तर रोशनच्या आईला,मालूला तिच्या मावस भावाची लेक, सून म्हणून आपल्या घरात आणायची होती पण रोशनपुढे तिचे काहीच चालले नाही. ‘लग्न केले तर रियाशीच नाहीतर आजन्म अविवाहित राहीन’ असं लेक सांगू लागल्याबरोबर काहिशा नाराजीनेच रोशनच्या आईवडिलांनी रोशनच्या निवडीला मान्यता दिली.
चारचौघात उठून दिसलं पाहिजे म्हणून परवडत नसतानाही कर्ज काढून मोठा हॉल बुक केला. आधुनिक पद्धतीप्रमाणे बुफे ठेवलं. लग्नाच्या आधीचं फोटोसेशन,लग्नातलं फोटोसेशन,व्हिडिओ शुटिंग,डान्सिंग फ्लोअर..आलेली मंडळी अगदी खूष झाली. शिवाय पत्रिकेत आधुनिक पद्धतीप्रमाणे क्रुपया आपले आशिर्वाद व शुभेच्छा हाच आहेर असं नमूद केल्याने आहेर देण्याघेण्याचा प्रश्नच नव्हता.
पूजा,देवदर्शन झाल्यावर रोशन व रिया हनिमुनला गेली. एकमेकांच्या मिठीत ते गुलाबी दिवस कापरासारखे उडून गेले. नवीन जोडपं घरी परतलं. घरात रोशनचे आई,वडील,रोशन व रिया. रोशन कामावर जाऊ लागला. रियाचे सासरेही कामावर जायचे.
सकाळचे पोळीभाचीचे डबे झाले की रिया फर्निचर पुसून घरातला केर काढी. फरशी पुसे. सासुबाई मात्र सासू या शब्दाप्रमाणेच तिला सारख्या सूचना देत. ‘अगं तो टिपॉयखालचा केर राहिला बघ. तुझ्यामागे बघ किती कचरा राहिलाय ते.’ अशा सूचना चालू असत. पोळीभाजी खाताना,’अगं,किती गं चिवट पोळ्या तुझ्या. दातांनी तुटतही नाहीत. ऑफिसात गेलेली दोघं कसे खाणार हे पापड! आणि हे काय🙄 खोबरं घातलंस भाजीत. आमच्याकडे दाण्याचं कुट,गुळ घालतात बरं. अगं अगं तेल किती कमी घातलैस भाजीत. अगदीच पाणचट लागतै बघ.’
रिया जरा मनातल्या मनात चरफडतच भांडी घासायला जायची. तिथेही सारख्या सूचना.. ‘साबण कमी वापर गं. टोप अगदी लखलखीत घास. वरचे डब्बेही रिकामी करुन घासून घे अन् उन्हाला लाव बरं.’ ते आवरुन रिया वॉशिंग मशीन लावायला गेली की ‘अगं यांचे शर्ट,पँटी नको हो टाकू त्यात. हातानेच धू हो.’
आठवड्याभरातच रिया या सारख्या सूचनेला कंटाळली पण रोशनला काही सांगून त्याचं टेंशन तिला वाढवावसं वाटत नव्हतं.
एका सुट्टीला संध्याकाळी कामं आवरून रिया,रोशनसोबत फिरायला गेली. येताना रोशनने तिच्यासाठी छानसी पर्स घेतली. ती पर्स पाहताच रोशनच्या आईचा पारा एकदम चढला. ‘काय रे! चार वर्ष झाली नोकरीला लागल्यावर, माझ्यासाठी कधी पर्स आणली नाहीस ते. माझं एक जाऊदे,तुझ्या लाडक्या बहिणीसाठी तरी आणायची होतीस. उद्या माहेरी येणार आहे ती. आपल्या दादाने आपल्यासाठी आठवणीने गीफ्ट आणलय म्हंटल्यावर किती भारी वाटलं असतं तिला! आपल्या घरात इतरही बायका आहेत हे लक्षात ठेव हो.’
आईचे हे वाग्बाण ऐकून रोशनचा सगळा मूडच गेला. रियाने मात्र ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दुसऱ्या दिवशी तिची नणंद आली तेंव्हा रियाने तिला ती पर्स गीफ्ट दिली. तरी रियाची सासू तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेलं तर तुलाच राहुदे असं बोलली नाही.
नणंदेच्या आवडीच्या पदार्थांच्या फर्माइशी होऊ लागल्या. मायलेकी हॉलमध्ये गप्पा ठोकत बसत . बिचारी रिया एवढं पुरण वाटुनघाटून तयार करी कारण तिच्या वन्सला पाट्यावरचं जास्ती आवडे. मग तेवढ्या पुरणपोळ्या लाटे. कधी शाही बिरयानी,कधी पाणीपुरी,कधी पावभाजी..रिया म्हणजे आयता कुक होता.
या मायलेकी रियाकडे खाण्याची ऑर्डर देऊन मस्तपैकी शॉपिंग करायला जात. कधी रियाची सासू लेकीला म्हणे,’किती ग काळवंडलीस. छान फेशियल,ब्लिचिंग करुन घे. मग दोघी पार्लरमध्ये रवाना होत. दुपारी जेवणं आवरल्यावर दोघीच एकमेकींशी गुजगोष्टी करीत बसत. रियाची नणंद सीमा तिला आपल्या सासरच्या कागाळ्या सांगी मग ती,’किती ग माझ्या बायचे हाल होतात असं म्हणे.’
रियाचा वाढदिवस म्हणून रोशन तिला पिक्चर बघायला घेऊन गेला. येताना तिच्यासाठी व बहिणीसाठीही त्याने साडी घेतली. किंमतींची लेबल्स काढून टाकली. सीमाला वाटलं, दादाने रियासाठी भारीतली साडी आणली व तिला आपली रीत म्हणून साधीसी घेतली. सीमाने हट्ट करुन साड्यांची अदलाबदली केली. रियावर गुलाबी रंग जास्त उठून दिसायचा व तिचा तो आवडता रंग म्हणून रोशनने रियासाठी फिक्कट गुलाबी साडी तर सीमाला निळसर रंग शोभून दिसतो म्हणून तिला आकाशी रंगाची साडी आणलेली पण सीमाने गोंधळ घातला तरीही रिया काहीच बोलली नाही. रोशनच्या लक्षात येऊ लागलं की आई व सीमा दोघींनी मिळून रियाला विरुद्ध पार्टीत टाकली आहे.
रिया वादावादी नको म्हणून काहीच बोलत नव्हती. नेहमी हसतमुख रहायचा प्रयत्न करत होती.
रोशनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या मावशीला फोन लावला. तिला घरातलं सगळं रामायण सांगितलं व ‘मावशी यातून काहीतरी मार्ग काढ’ अशी विनंती केली.
मावशीने रोशनच्या आईला चार दिवस रहायला बोलावलं. रोशनची आई बहिणीकडे गेली. रोशनची आई सकाळी उठली. पहाते तर काय! सासूसुना दोघी मिळून योगा करत होत्या. त्यानंतर दोघींनी मिळून डब्याची तयारी केली. सासूने कणिक तिंबून दिली. गप्पागोष्टी करत सुनेने चपात्या लाटल्या व भाजून काढल्या. सुनेने भाजी चिरली. सासूने फोडणीला टाकली.
सून केसांवरुन न्हाणार होती. सासूने तिला छान मालीश करुन दिलं. न्हाणं झाल्यावर तिचं डोकं हळूवार पुसून दिलं. दुपारच्या जेवणातही सुनेने भात केला. सासूने वरण ,कोशिंबीर केली. सुनेने भांडी घासली. सासूने ओटा पुसला. कामं आवरता आवरता त्यांच्या मालूशी गप्पा चालू होत्या.
दुपारी तिघी मिळून पत्ते खेळल्या. छान बाहेर मोकळ्या हवेवर फिरून आल्या. एकमेकींशी त्यांनी नुकत्याच वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकाबद्दल चर्चा केली. आपल्या सख्ख्या बहिणीचे स्वतःच्या सुनेशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहून मालूचे डोळे उघडले.
मालूने तिच्या बहिणीला न रहावून विचारलच,”कसं ग असं मैत्रिणींसारखं रहायला जमतं तुला?”
बहीण म्हणाली,”थोडसं नव्या पिढीच्या कलाने घ्यायचं बघ. सुना लग्न होऊन आपल्या घरी आल्या म्हणजे लगेच मोठ्या होत नाहीत काही. पुर्वाला,माझ्या सुनेला तर स्वैंपाकही मीच शिकवला हळूहळू. तिने केलेला एखादा पदार्थ बिघडला तरी सांभाळून घेतलं. पुढच्यावेळी चांगला येईल हो असं तिला समजावलं. तिच्या ह्रदयात माझं स्थान निर्माण केलं.
पुर्वा आजारी असताना मी तिची काळजी घेते. तिला स्विमिंग आवडतं मग मीच तिला स्विमिंगला जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या वेळातली घरची सगळी जवाबदारी माझ्यावर घेतली. आत्ता मी कीर्तनाला जाते तेंव्हा ती घर सांभाळते. त्या दोघा नवराबायकोंमध्येही तू तू मै मै होतेच पण मी त्यात दोघांचीही बाजू घेत नाही.
मी सुनेच्या कागाळ्या माझ्या लेकीला सांगत नाही. लेक तिच्या सासरच्यांबद्दल काही सांगू लागली तर मी तिला व्यक्त होऊ देते पण त्यावर माझी प्रतिक्रिया व्यक्त करून आगीत तेल घालत नाही. तिला दिलेच तर चार सुखाने नांदण्याचे व कपातली वादळं कपातच मुरू देण्याचे सल्ले देते. माझ्या सुनेला माझ्या हातची पुरणपोळी भारी आवडते. मीही एकदोन महिन्यांनी तिला माझ्या हातच्या पुरणपोळ्या खाऊ घालते. तिही मग मला आवडतो म्हणून मँगो आईसक्रीम आवर्जून घेऊन येते.
आम्ही दोघं मिळून संध्याकाळी जरा लांबवर फिरुन येतो किंवा ग्रंथालयात बसतो जेणेकरून त्या नवदाम्पत्याला थोडा दोघांचा असा वेळ मिळावा. अधुनमधून साताठ दिवस सहलींना जातो. त्यांच नातं फुलायला मदत होते अशाने.
पुर्वाला लाँग स्कर्ट फार आवडतात पण लग्नानंतर तिने स्वतः हून ते घालणे बंद केलं होतं. मी तिच्यासाठी भरतकाम केलेले दोन लाँग स्कर्ट्स व त्यांना मेचिंग टॉप्स आणले तेंव्हा कित्ती खूष झाली म्हणून सांगू!
अगं मालू,असतात काही अपवाद म्हणून साऱ्याच सुना वाईट असतात अशा पुर्वग्रहदुषित नजरेने सासूने नव्या सुनेकडे किंवा सुनेने सासूकडे पाहिलं की मग खटके उडायला सुरुवात होते. छोट्यामोठ्या कुरबुरी तर आम्हा दोघींतही होतात पण आम्ही त्या तशाच तिंबवत ठेवत नाही. त्यांना लवकरात लवकर तिलांजली देतो. सोप्प नसतं असं वागणं पण अवघडही नसतं ग. आणि सासूसुनांची मैत्री झाली न् की मग त्या घरात लक्ष्मी आनंदाने रहायला येते. तू पण हा फंडा वापरून बघ.”
मालू म्हणाली,”खरंच दीदी तू व तुझ्या सुनेने माझे डोळे उघडले. रोशनचं लग्न झाल्यापासून मला एक अनामिक भिती वाटत होती की आत्ता माझी सून मला माझ्या लेकापासून,नवऱ्यापासून दूर करणार. घरावर अंमल गाजवणार व हळूहळू माझं पोतेरं होणार.केवळ याच भितीने मी सुनेशी फटकून वागत होते. तिला घरकामात गुंतवून ठेवत होते. खरंतर रियालाही भरतनाट्यमची फार आवड आहे. मी तिचे पुर्वीचे फोटो पाहिलैत. काय गोड दिसते पोर तो पोशाख घालून डान्स करताना! मीही तिला तिचे छंद जोपासायला उद्युक्त करेन.”
बहिणीच्या सुनेला तोंडभर आशिर्वाद देऊन मालू घरी येण्यासाठी मेलमध्ये बसली तर तिच्या यजमानांचा फोन,’अगं मालू तू आजी होणार न् मी आजोबा. आपल्या सुनेला बाळ होणारै.’
मालूला खूप आनंद झाला. घरी जाताना तिने गौरीशंकर मिठाईवाल्याकडून सुनेच्या आवडीचे कंदीपेढे घेतले व घरी पोहोचताच रोशन व रियाचे तोंड गोड केले. एक नाजूकसा नेकलेसही तिने रियाला सरप्राईज गीफ्ट दिला.
रियाची सासू रियाशी मैत्रिणीसारखी वागू लागली. रोशनने मावशीला फोन करुन तिचे खूप खूप आभार मानले.
समाप्त
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============