Skip to content Skip to sidebar Skip to footer

आई किती ग तू बडबडी

सकाळी सकाळी लवकर उठून अरुंधतीची चहा-नाश्त्याची गडबड सुरु असते…सोबतच वैभवच्याही ऑफिसला जाण्याची तयारी अरुंधती करत असते..त्याचबरोबर मुलांचीही तयारी एकटीलाच करावी लागत असे..आणि तेही अगदी न थकता तिला करणे भागच होते. सगळ्यांच्या आवडी-निवडी जपण्याचं कामही अरुंधती बिनबोभाट करत असे…सासू – सासरे आपली दोन मुले आणि नवरा या सगळ्यांचं करता-करता अरुंधतीची खूप त्रेधातिरपिट होत असे तरी त्यातल्या-त्यात जास्त बडबड करणे हा अरुंधतीचा आवडता छंद…घरात काहीही असो खणखणीत आवाज कुणाचा ? तर….अरुंधतीचा….असं जणू गणितच ठरलेलं असायचं…

अरुंधती  – वैभव…आज तुला लाईट बिल भरायचं आहे…लक्षात आहे ना…

वैभव    – अरुंधती…सगळं काही तुझ्याच लक्षात..आम्ही काय बैलच आहोत…आणि एकदा सांगितलंय ना….तू मग सारखं-सारखं तेच काय सांगतेस…सारखं सांगितल्याने इरिटेट होतं…एक तर कमी ताण आहे का…

अरुंधती  – तू एवढा चिडतोस का…मी काय तुला ऑर्डर सोडत नाहीय…

वैभव    – आता…भांडणार आहेस का माझ्याशी…एक काम कर…तू ना तुझी बड-बड बंद कर…बडबड कमी केलीस ना की खूप पुढे जाशील…

अरुंधती खजील  होऊन आसव गाळत आपली काम आवरतच असते…थोड्या वेळाने कार्तिकाला तयार होऊन शाळेत जायचं असतं…तशी कार्तिका तयार होऊन येतेही…आपल्या आईला जणू ऑर्डर देतात तशी बोलते-

कार्तिका  – अरु….माझा दलिया…आणि ब्राउन ब्रेड तयार नाहीय का…? मला आज व्हाईट ब्रेड नकोय…आय वॉण्ट ब्राउन ब्रेड अँड चॉकलेटी मिल्क…

अरुंधती  – सगळ्यात आधी…मला आई म्हणायला शिक…तुला दिसत नाही का टेबल वर सगळं मांडून ठेवलंय, एवढे कसले ग खाण्याचे नखरे तुझे…सगळं खाल्लं पाहिजे तू…

कार्तिका  – अरु…झाली का ग तुझी बडबड परत सुरु…एक तर कसल्या भाज्या असतात तुझ्या सगळ्या इंडियन…माझ्या मैत्रिणी किती मस्त-मस्त डबे आणतात करून…हम्म…त्यांच्या मॉम्स ना …बडबड कमी करत असतील म्हणून खूप काय-काय बनवायला वेळ मिळत असेल त्यांना…अरु…तू जर…बडबड कमी केलीस तर डेफिनेटली…सगळं मस्त बनवू शकशील तू…

अरुंधती  – [रडवेली होते] एवढा त्रास होतो माझ्या बडबडीचा…

कार्तिका  – ओह्ह…अरु..डोन्ट बी ड्रॅमॅटिक यार….सकाळी-सकाळीच मूड ऑफ झालंय…शीट….मी जाते आत्ता…बाय…आय होप सगळा शो ऑफ जाईल दुपारपर्यंत….

सासूबाई  – अगं…अरुंधती…पूजेसाठी फुल आणली नाहीस ती…

अरुंधती  – आई…आणते…आज ना विसरलेच जरा…पारिजातकाची आणू की मोगऱ्याची..नाहीतर चाफा आलाय मस्त परसदारी…किंवा मग आज सोमवार आहे ना मग बेलाचीही पानं आणते…धोतऱ्याचं फुलंही वाहतात म्हणे महादेवाला…

सासूबाई  – अगं…अरुंधती…किती ही बडबड एवढ्या वेळात जाऊन घेऊन आली असते मी !.…जातीयस की जाऊ मी…?

सासूबाईंकडूनही आपल्या बडबडीबद्दल अशी प्रतिक्रिया ऐकून अरुंधती आणखीनच खजील झाली आणि स्वतःला दोष देऊ लागली…दिवसभर अरुंधतीच्या मनात एकाच विचारचक्र ‘खरंच…आपल्या बडबडीचा एवढा त्रास होतो सगळ्यांना…?’ दिवसभराची काम आवरून दुपारी विसाव्यासाठी अरुंधती बेडचा दरवाजा लावून आत बसते…थोड्यावेळाने तिचा डोळा लागतो पण ४ चा गजर वाजला की अरुंधती आपल्या कामासाठी परत तयार होते तेही हसतमुखाने….सकाळी जे काही कोण बोललं याचा तिळमात्र लवलेशही अरुंधतीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता…संध्याकाळी वैभव येताच सगळ्यांसाठी चहा-भजींचा बेत अरुंधतीने आखलेला असतो…परत संध्याकाळच्या जेवणाचीही अर्धी तयारी करून ठेवलेली असते…छोटा दीपेश आपल्या आईजवळ येऊन म्हणतो-

दीपेश    – मम्मा…मला चॉकलेट दे ना…

अरुंधती  – नाही दिपू…आता जेवण करायचंय ना…मग नाही खायचं चॉकलेट…तुला माहितीय चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात…मग त्यात खूप घाणेरडा स्मेल येतो…खूप वाईट असत चॉकलेट…

दीपेश    – मम्मा…प्लीस…नको ना तू पण आता बडबड करुस…त्यापेक्षा मला चॉकलेट दे…

अरुंधती एक निश्चय करूनच दीपेश जवळून रागाने उठते….पूर्ण चॉकलेटची बरणीच त्याच्यापुढे ठेवते…आणि मनोमनी ठरवतेच काहीही झालं तरी तोंडातून एक अवाक्षरही काढायचं नाही‘…सगळे शांतपणे हा प्रकार पाहत असतात तसं वैभव अरुंधतीला ओरडतो… अरुंधती…वेड लागलंय का तुला…त्याला एक कळत नाही…सगळी बरणीच काय पुढे मांडली त्याच्या..?” अरुंधती शांतपणे ऐकूनही न ऐकल्यासारखं करते…तिथून स्वयंपाकघरात जाते व पोळ्या लाटायला घेते…नंतर शांतपणे सगळयांची जेवणं उरकतात…अरुंधती सकाळच्या डब्याची तयारी करायला स्वयंपाकघरातच थांबते…वैभवच्या युनिफॉर्मला प्रेस करून झोपायला जाते…तोपर्यंत एकही शब्द ती तोंडातून बाहेर काढत नाही…पुढे दोन-तीन दिवस असंच अरुंधतीचा न बोलण्याचा निश्चय सुरु असतो…घरात एकच कुजबुज असते…

कार्तिका  – पप्पा…आज मम्मा ला काय झालंय…कुणाशी..काहीच बोलत नाहीय ती…

वैभव    – कार्तिका तू…काही बोललीस का…तुझ्या मॉम ला…

सासूबाई  – अरे…पण असं काही झालंच नाहीय…तिला काय फुगायला झालंय कुणास ठाऊक..

अरुंधती आपला काम न बोलता अगदी निमूटपणे करत असते…पण कपडे वाळत घालत असताना अरुंधतीला अचानक चक्कर येते आणि ती जमिनीवर कोसळते…जमिनीवर पडल्याने अरुंधतीला जखमही होते…वैभव आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलावून घेतो…आणि डॉक्टरांना असं अचानक चक्कर येण्यामागचं कारण विचारतो..

वैभव    – असं…याआधी कधी झालं नाही अरुंधतीला…अचानक कस काय झालं..?

डॉक्टर  – तुमची हरकत नसेल तर मी तुमचा फॅमिली डॉक्टर या नात्याने मिसेस अरुंधतींशी थोडं बोलू शकतो..

वैभव    – हा…शुअर सर…का नाही…मी बाहेर थांबतो…

साधारण तासाभराने डॉक्टर बाहेर येतात…आणि वैभवला म्हणतात…

डॉक्टर  – घरात अगदी छोट्या-छोट्या कारणावरून तुम्ही तुमच्या मिसेसला धारेवर धरत जाऊ नका…त्यांचा कमकुवत दुवा कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला…?

वैभव    – कुठला..?

डॉक्टर  –  त्यांचा कमकुवत दुवा म्हणजे…नेहमी आणि सतत गप्पा मारणं, बडबड करणं हा आहे…आपल्या मनातल्या भावना ह्या फक्त आणि फक्त शब्दाने व्यक्त होत असतात…त्या भावनांना शब्दस्वरूपात बाहेर येऊ द्यात…बंधने घालू नका त्या शब्दावर..गेले दोन दिवस त्या अशाच गप्प राहत होत्या….त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळेजण त्यांना बडबड करू नको असं वारंवार, रागावलेल्या स्वरात त्यांना सूचना करत आलात….याचं त्यांनी खूप मनावर घेतलं म्हणून त्यांना भोवळ आली…नाहीतर ब्लड प्रेशर वाढून त्या डिप्रेशन मध्ये गेल्या असत्या…या मेडिसिन्स मी दिल्यात त्यांना…त्या वेळेवर द्या आणि त्यांची काळजी घ्या..टेक केअर…!

चार-पाच दिवस वैभव-कार्तिकाने अरुंधतीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली…वैभवने तर पाच दिवसांची रजाही टाकली…दिवसभर अरुंधतीला जोक्स वाचून दाखवणं…अरुंधतीच्या आवडीचे पदार्थ करून देणं, वेळोवेळी औषध देणं…असा नित्यक्रम वैभव-कार्तिकाचा चालत असे…अरुंधती बाप-लेकीच्या सुश्रुषेण अगदी पूर्वीसारखं बोलायला लागली…मोर्चा थेट वळाला तो स्वयंपाक घरातच…

बाई….बाई …ग काय हा पसारा…शिस्त म्हणून नाही कुणाला…चार-पाच दिवस आजारी काय होते..तर सगळं किचन डोक्यावर घेतलंय..हे सगळं कोण आवरणार..? भांड्याचा साबण केवढा भिजवलाय..कपडे असे पिळतात का? सगळ्या सुरकुत्या तशाच दिसतात ऑफिसच्या शर्टवर..वैभव अरे…कधी शर्ट प्रेस करायला शिकणारेस तू…सासूबाई…फुल केवढी कोमेजली आहेत…..अरुंधतीच्या बोलण्याचा ओघ चालूच होता…अरुंधतीला नवल वाटलं…आपण एवढं बोलतोय…पण सगळे निमूटपणे कस काय बरं ऐकून घेतायत..?’

तेवढ्यात लहानग्या दिपेशने बिंग फोडलं…मम्मा…सगळ्यांनी कानात कॉटन खोसून ठेवलंय….ही…ही…ही..

अरुंधती वाईट न वाटून घेता दिपेशला जवळ घेते..” यु….बदमाश…” अन मोठ्यामोठ्याने हसते…सगळं घर परत एकदा अरुंधतीच्या हास्याने प्रफुल्लित होत…जणू घराची मरगळच निघून जाते.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • सौ. उषा शिरीष कुलकर्णी
    Posted Jun 15, 2021 at 2:45 pm

    खुपच छान

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.