मळभ

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
आज रसिका खूप दिवसांनी बाहेर पडली. गावातल्या देवीची जत्रा होती. रसिका आणि तिच्या दोन-चार मैत्रिणी सगळ्यांनी मिळून खूप धमाल करायचं असं ठरवलं. जत्रेत खूप छान बाजार भरला होता. सर्व वस्तू बघून मन अगदी हरकून जात होतं. रसिकाच्या मैत्रिणींनी खूप काही खरेदी केली, रसिकाला त्या म्हणाल्या, ‘‘अग रसिका, इतके वर्षं तू काही शोभेच्या वस्तू घेत नव्हतीस ठीक आहे, पण आता घे ना, इतका सुंदर बंगला आहे लेकाचा घे काहीतरी. रसिका हसली, म्हणाली, ‘‘आता सवयच लागलीय बघ काही न घेण्याची.’’ पण मैत्रिणींचा आग्रह सुरूच होता. तेवढ्यात रसिकालाही एक शोपीस प्रचंड आवडलं. सुंदर बाहुली होती, तिच्या हातात पाण्याचं मडकं, आणि त्यातून वाहणारं पाणी… रसिकाचं मन काही त्या मूर्तीवरून हलेना.
किंमतही फारशी नव्हती. आणि आता असली तरी काही फरक पडणार होता का तिने मनाशीच विचार केला. तेव्हा परिस्थिती नसतानाही आपल्याला अशा वस्तूंची किती आवड होती ना पण..
रसिकाने दहा वेळा विचार केला, ‘‘घेऊ का नको ही?’’ पण एकदाची तिने ती मूर्ती घेतली. मैत्रिणींना पण खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यांतली चमक त्यांना सुख देऊन गेली. एरवी रसिका नेहमी बाजारात येत असे, बाकीच्या भरभरून काही घेत असत, सुंदर सुंदर वस्तू ती सुचवत असे, पण ही मात्र तशीच उभी राहात असे. नुसत्या त्या वस्तूंकडे बघत.
रसिका ती मूर्ती घेऊन घरी आली. दार उघडलं. अजून घरात कुणीची आलं नव्हतं. नवरा मित्रांबरोबर बाहेर गेला होता. मुलगा आणि सून कामावरून परत यायची होती. रसिकाला बरंच वाटलं. आता तिच्या मनासारखी जागा ती त्या मूर्तीसाठी शोधणार होती. शोकेसमध्ये तिने मूर्तीची जागा अगदी फीक्स केली, त्या जागी ती मूर्ती बघून तिला फार आनंद झाला. किती सुंदर दिसत आहे ना? तिने लगेच फोटो काढून मैत्रिणींच्या ग्रूपवर पाठवले पण, मैत्रिणींनी पण,
‘‘रसिका, तू नावाप्रमाणेच रसिक आहेस, किती छान जागा शोधलीस’’ वगैरे कमेंट दिल्या. आपल्या मनासारखं झालं म्हणून ती खूप आनंदाने स्वयंपाकघरात कॉफी करण्यासाठी गेली. तेवढ्यात बेल वाजलीच.
मुलगा राज आणि सून रीना दोघंही आली होती. तिनं कॉफी केली सगळ्यांनी कॉफी घेतली. तेवढ्यात सुनेचं लक्ष शोकेस मध्ये गेलं.
‘‘अरे वा आई, किती छान मूर्ती आहे ही?’’ ती हसून म्हणाली.
‘‘आवडली ना तुला मला वाटलंच होतं. तुला आवडेल.’’ रसिका उत्साहाने म्हणाली.
‘‘हो एकदमच छान आहे.’’ तिनं जवळ जाऊन त्या मूर्तीचं निरीक्षण केलं.
मग रसिकाने आपल्याला ती किती आवडली, कशी घेतली, किती स्वस्तात घेतली याचं वर्णन केलं. तेवढ्यात सुनेनं ती मूर्ती तिथून उचलली.
‘‘आई, हे बघा ही मूर्ती ना इथल्यापेक्षा इथं छान दिसतेय ना?’’ ती असं म्हणताच रसिकाचा चेहरा खर्रकन उतरला. ती ‘हो’ म्हणत आत निघून गेली.
रसिकाचा मूड गेलेला ना मुलाला कळलं ना सुनेला.
रसिका मात्र खोलीत जाऊन भूतकाळात हरवली. पंचवीस वर्षांपूर्वी तिनं असाच एक शोपीस आणला होता, शोपीस खूपच छान होता. नुकतंच लग्न झालं होतं, तिनं तो तिला जिथे हवा तिथे ठेवला किती छान दिसत होता तिथे, पण दुसर्याच दिवशी तिने शोपीसची जागा बदललेली पाहिली. तिने सासूबाईंना विचारताच, ‘‘अगं आता बघ किती छान दिसतोय?’’ रसिकाचा मूडच गेला होता, पण तिने म्हटलं, ‘‘जाऊदे.’’ पण सलग सात-आठ वेळा अशाच घटना घडल्यावर तिने ठरवलं होतं, आता आपण कोणतीही वस्तू घ्यायची नाही आणि घरातल्या कोणत्याही वस्तूची जागाही ठरवायची नाही. मागच्याच वर्षी सासूबाईंचं निधन झालं होतं, लेकाचं त्याच वर्षी लग्नं झालं होतं, आज बरेच दिवसांनी मैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने तो शोपीस घेतला, मनाजोगता जाग्यावर ठेवला, पण तीच पुनरावृत्ती झाली होती.
तेवढ्यात रीना आत आली, ती म्हणाली, ‘‘आई, अहो मला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही जिथे ठेवली होती तीच मूर्तीची जागा अगदी योग्य आहे. तुम्ही खर्या रसिक आहात.’’
‘‘हो का?’’ रसिका हसत हसत म्हणाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झालं होतं. तिनं विचार केला, कधी कधी गोष्ट छोटीशी असते, पण त्याच्या मागे खूप काही दडलेलं असतं ना?
-सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
================
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
https://www.facebook.com/ritbhatmarati/
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
===============