मला व माझ्या लेकीला आपलं माना

प्रभाताईंना दोन मुलगे होते. थोरला विराज..त्याची पत्नी विजया. विजया थोडी बुजरी होती. दिसायला चारचौघींसारखी होती. हवा तसा चुणचुणीतपणा तिच्यात नव्हता. कुणी पाहुणे घरी आले की विजया त्यांच आदरातिथ्य प्रेमाने करायची. त्यांना पोटभर खाऊ घालायची पण मोजकच बोलायची. एखाद्याशी भरभरुन बोलणं जमतच नसे तिला.
प्रभाताई समाजप्रबोधन करायच्या. त्यांची भाषाशैली ओघवती होती. आपल्या सुनेचा बुजरेपणा प्रभाताईंना खटकायचा खरा पण विजया घरात आल्यापासनं त्यांना घराकडे लक्ष द्यावं लागत नव्हतं. किराणासामानाची यादी करून ती वाण्याला नेऊन देणं,मांडणीवरचे सगळे डबे घासून लख्ख करणं,त्यांना उन्हं लावून त्यांत किराणा भरुन ठेवणं,रद्दीवाल्याला रद्दी नेऊन देणं ही वरची कामही ती न सांगता करत होती. कधी प्रभाताईंच्या महिलामंडळातल्या मैत्रिणी आल्या की त्या ज्येष्ठ महिलांसाठी आवर्जुन काहीतरी पथ्याचं रुचकर असं खायला करी.
विराजच्या लग्नानंतर दोन वर्षांनी प्रभाताईंच्या धाकट्या मुलाचं, विशालचं लग्न झालं. धाकटी सून अभया घरात आली. अभया उच्चशिक्षित, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर ..पगारही भरपूर. अभयाच्या वागण्यात एक प्रकारचा गर्विष्ठपणा होता. शिक्षणाचा अहंकार देहबोलीत दिसत होता. अभया व विशाल एक महिन्यातच नोकरीच्या ठिकाणी रहावयास गेले.
विजयास दिवस राहिले. सातव्या महिन्यापर्यंत विजया घरातली सारी कामं करत होती. प्रभाताई म्हणायच्या,”कामं करत राहिलं की शरीर कसं सडसडीत रहातं,बाळंतपण सोप्पं जातं.” विजयाला कामाचा कंटाळा नव्हताच कधी, पण प्रभाताईंनी तिला जवळ घेऊन कधी मायेने तिच्या तब्येतीची चौकशी केली नाही.
समाजप्रबोधन करताना प्रभाताई इतर सासवांना सांगायच्या,”सुनेला माया लावावी. तिच्या कलेनं घ्यावं. भांड्याला भांड लागतच पण आपणच ज्येष्ठत्वाच्या नात्याने थोडं कलतं घ्यावं. तांदूळ निवडणं,भाजी नीट करणं..अशी थोडी कामं करुन सुनेला घरकामात हातभार लावावा. तिला कधी एकटं वाटू देऊ नये. तिच्याशी चार गप्पा माराव्या. माहेराची खुशाली विचारावी,तिच्या गुणांच कौतुक करावं,तिच्यातल्या कलांना प्रोत्साहन द्यावं.”
प्रभाताईंचे युट्युबवरील समाज प्रबोधनाचे व्हिडीओ विजया पहायची मग तिला वाटायचं की तिच्या सासूची दोन व्यक्तिमत्त्व आहेत. एक सुधारणावादी, ते बाहेरच्या जगासाठी,समाजासाठी,दर्शनी असं अन् घरातलं वेगळं कर्मठ असं..
प्रबोधन करताना पाळीच्या वेळी भेदभाव पाळू नका सांगणाऱ्या प्रभाताई सणासुदीच्या दिवसांत मात्र विजयासाठी आवर्जुन पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या आणत. तू बाहेरची झालीस तर नैवेद्याचं कसं करायचं म्हणत. जातीभेदावरुन तावातावाने बोलणाऱ्या त्या कामवाल्या मावशीला वेगळ्या कपातून चहापाणी देत.
सातव्या महिन्यात विजया माहेरी गेली. तिच्या आईने,आजीने तिचं कोडकौतुक केलं,भाऊही विजयाची खूप काळजी घेत होता. दिवस भरताच विजया बाळंत झाली. विजयाच्या पोटी मुलगी जन्माला आली. विजयाचा पती विराज व प्रभाताई विजयाला भेटायला गेले. विजयाच्या लक्षात आलं,तोंडावर जरी प्रभाताई तिचं कौतुक करत असल्या तरी ते कौतुक मनापासून नव्हतच मुळी. नातू न झाल्याची खंत विजयाला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.
बाळंतपणानंतर तीन महिने माहेरी राहून विजया लेकीला घेऊन सासरी गेली. विजया घरी येताच प्रभाताईंनी तिच्या गैरहजेरीत घरकामासाठी ठेवलेली बाई काढून टाकली. छोटीला सांभाळणं,स्वैंपाक, धुणीभांडी यात विजयाचा जीव मेटाकुटाला येई. प्रभाताईंचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत होते. फार मोठा जनसमुदाय त्यांना मानत होता. दिसताक्षणी प्रणिपात करत होता.
धाकटी सून अधेमधे यायची. सासूच्या हातावर दोन गुलाबी नोटा ठेवून जायची. कमावत्या सुनेचं प्रभाताईंना विशेष कौतुक होतं. अभयालाही दिवस गेले होते. तिला मुलगा झाला..प्रभाताईंना नातू झाला ही बातमी जेंव्हा त्यांना फोनवर कळली तेंव्हा त्यांना झालेला हर्ष विजया पहात होती. मनात म्हणत होती..माझ्या छकुलीत काय कमी होतं? का नाही एवढ्या मनापासून हसलात तेंव्हा पण हे सारं काही मनातच..मनातल्या खोल गडद तळ्याशी. उलटून बोलण्याची सवयच नव्हती तिला. मोठ्यांना उलट बोलायचं नाही हे वाक्य पक्क कोरलं गेलं होतं तिच्या ह्रदयात. उलट बोलायचं नाही ठीक पण स्वतः चा हक्क मागण्यात काय कमीपणा,मोठे चुकत असताना स्पष्ट बोलून तिने त्यांची चूक दर्शवून द्यायला हवी होती खरी पण तसं करणं विजयाला कधी जमलंच नाही. नवऱ्याला काही सांगू गेली तर नवरा म्हणायचा,”असुदेत गं,तू कशाला लक्ष देतेस!”
जसजसे वय वाढत गेले तसे प्रभाताईंना प्रबोधन करणे झेपेना. एकदा एका कार्यक्रमातून परत येत असताना त्या भोवळ येऊन पडल्या. ओळखीच्या माणसांनी त्यांना घरी आणले. प्रभाताईंचे तोंड वाकडे दिसत होते. एक बाजू हलत नव्हती. विजयाने छकुलीला शेजाऱ्यांकडे ठेवलं व त्यांना इस्पितळात न्हेलं. प्रभाताईंना पक्षाघाताचा तीव्र झटका आला होता.
आत्ता प्रभाताई बेडवरच असतात. आईची ही अवस्था पाहून विशाल, अभया व लेकाला घेऊन शनिवाररविवारी घरी येतो. प्रभाताईंच स्पंजिंग करणं,त्यांना पेन देणं,त्यांचे कपडे,अंथरुणंपांघरुणं धुणं हे सगळं विजया व विराज करतात. सुट्टीला घरी आला की विशालही त्यांच्या कामात हातभार लावतो. पण अभया प्रभाताईंच्या खोलीजवळ फिरकतही नाही. खोलीतल्या डेटॉलच्या व इतर वासाने तिच्या पोटात डुचमळतं.
विजयाची छकुली प्रभाताईंना चमच्याने पातळ पेज भरवते. आजी भरपूर खा मग लवकर बरी होशील म्हणते. प्रभाताईंच्या तोंडातून घरंगळणारे ओघळ विजया रुमालाने टिपते. प्रभाताईंचे डोळे अविरत वहात असतात. त्यांना खूप काही बोलायचं असतं पण जीभ उचलत नाही.
त्यादिवशी प्रभाताईंनी विजयाला खुणेने जवळ बोलावलं. कपाट उघडून त्यांचा दागिन्यांचा डबा काढावयास लावला. त्यांच्या आजीसासूपासूनचं स्त्रीधन त्यात होतं. विजयाने दागिन्यांचा डबा त्यांच्याजवळ देताच अडखळत्या वाणीने त्या विजयाला म्हणाल्या,”हे तुला ठेव.” यावर विजयाने त्यांचा हात हातात घेतला व म्हणाली,”आई,मला यातलं काही नको. माझ्यासाठी इतकचं करा..मला व माझ्या लेकीला आपलं माना,तुमचा आशिर्वाद द्या.”
——©®सौ.गीता गजानन गरुड.
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============