Skip to content Skip to sidebar Skip to footer

मला ती उमगली

©® सौ. गीता गजानन गरुड.

ऐन पंचवीशीत मला टक्कल पडलं त्यामुळे माझं लग्न काही केल्या जमेना. केसांचा व लग्नाचा काय संबंध असतो ते मला प्रकर्षाने जाणवलं. अनेक महागडे शेम्पू व तेलं वापरुनही डोईवरल्या केसांनी दगा दिलाच. केस विंचरताना बेसिनमध्ये पडणारे केस पाहून मला माझ्या तळहातावरली लग्नाची रेषा धुसर होत चाललेय याची जाणीव होऊ लागली. धाकटा भाऊ अमित,याचंही लग्न झालं. तो पत्नीला घेऊन नोकरीच्या ठिकाणी मुंबईला रहायवयास गेला.

माझं ऑटोमोबाईल स्पेअरपार्टस विकण्याचं दुकान होतं. हायवेला घर असल्याकारणाने माझं दुकान तसं छान चालत होतं. ते एक टकलाचं सोडलं तर मी दिसायला देखणा,तीशीच्या आसपासच्या वयाचा,साडेपाच फुट उंचीचा होतो. पुर्वी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा मला कोण अभिमान होता पण केसांनी दगा दिला.

दहा ठिकाणांहून नकार आल्यावर एके दिवशी माझ्या मामांनी एक स्थळ आणलं. मुलगी सावळी,नाकीडोळी नीटस,लांबसडक केस,डोळ्यात चमक अशी. मी काही बोलण्याच्या आधीच मातोश्रीने म्हंटलं,”माधवा,या स्थळाला नको हो हातचं जाऊ देऊस. मुलगी चांगल्या संस्कारांत वाढलेली आहे.”

अगदी थाटामाटात लग्न झालं आमचं. अमित कुटुंबाला घेऊन आला होता लग्नाला. त्याची बायको,अर्चना आधुनिक होती..पंजाबी ड्रेस,खांद्यापर्यंत रुळणारे केस,गोरा वर्ण ..दिसायला खरंच छान होती. शिवाय पदवीधर होती.

शामल मात्र जेमतेम दहावी शिकली होती. मलाही आधुनिक पद्धतीने वावरणारी पत्नी हवी होती. हिची टिपिकल नऊवारी साडी..बरेचदा मी हिला सहावारी नेसण्याचा आग्रह केला पण त्यावर आमच्या मातोश्रींनी विरजण घातलं. शामलला चारी ठाव स्वैंपाक येत होता. माझ्या आईची जणू ती सावलीच बनली होती. आमच्या घरातल्या साऱ्या रितीभाती आत्मसात करीत होती. पण..पण..का कोण जाणे माझ्या ज्या अपेक्षा होत्या..म्हणजे गौरवर्ण, फाडफाड इंग्लिश बोलणारी,चार लोकांत उठून दिसणारी.. या माझ्या अपेक्षांच्या कोंदणात शामल बसत नव्हती. केवळ यंत्रवत संबंध ठेवत होतो मी तिच्याशी. पहिल्यावेळी शामल गरोदर राहिली तेंव्हाच मी तिला सांगितलं होतं,”बघ हं,मला मुलगाच हवा.”

आमच्या घराण्यात, सहसा मुलगेच व्हायचे त्यामुळे मलाही वाटत होतं की आम्हांला मुलगाच होणार. पण छे! शामलच्या माहेराहून फोन आला की मुलगी झाली तेंव्हा फार निराश झालो मी. त्यातच अमितला पुत्ररत्न झाल्याचा फोन आला तेंव्हा तर अजुनच खेद वाटला मला, स्वतःचा. हे असं वाटण्याला काही अंशाने का होईना समाजही कारणीभूत असतो. लोक मुलगी झाली म्हंटल की तोंडाने छान म्हणतात पण नजरेने म्हणतात, हरलास गड्या.

मी हार मानणाऱ्यातला नव्हतोच मुळी. पहिली संध्या दोन अडीज महिन्याची होते न होते तोच मी मुलासाठी परत प्रयत्न सुरु केले. शामल म्हणत होती,दोन वर्ष जाऊदे पण छे! माझ्यातला पुरुष मला डिवचत होता. दुसऱ्यावेळीही मुलगीच झाली. माझं डोकच बधीर झालं पण मी हार मानणाऱ्यातला नव्हतो. माझे मित्र मला म्हणायचे,”अरे तिसऱ्यावेळी नक्की मुलगा होईल तुला.” दुसरीचं नाव हेमा ठेवलं. माझ्या लेकींची नावं ठेवण्यातही मला स्वारस्य नव्हतं.

यावेळी मात्र शामललने मला विरोध केला. कशीबशी मी दोन वर्ष गप्प राहिलो व परत मुलासाठी प्रयत्नाला लागलो. शामलला खरोखर प्रणयसुख मिळतय का नाही याच्याशी माझं काही देणंघेणं नव्हतं किंबहुना मी तरी कुठे प्रणयाचा आनंद अनुभवत होतो? केवळ मुलगा हवा या एकाच ध्येयाने पछाडलेलं मला. माझी अडाणी आईही थट्टा करायची माझ्या या हट्टाची.

तिसऱ्यावेळीही मुलगीच झाली. भरीत भर म्हणून की काय तीचे पाय अधू होते. डॉक्टरांनी ती कधी चालू शकणार नाही असं सांगितल. तिला पोटाशी धरुन शामल किती रडली होती! पण माझ्या आईने सावरलं तिला. अवनी नाव ठेवलं तिचं.

मी द्रुष्ट होतो. मी चौथा व शेवटचा चान्स घ्यायचं ठरवलं पण यावेळी शामलने मला कडाडून विरोध केला. माझ्याच आईला सोबत घेऊन कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही करुन आली. जवळजवळ वर्षभर बोललो नव्हतो मी त्या दोघींशी. दुकानात जास्तीतजास्त वेळ रहात होतो. घरी आलो की मुली गळामिठी घालायच्या. हळूहळू का होईना मुलींत जीव गुंतला माझा.

संध्या,हेमा हळूहळू मोठ्या होत होत्या. अवनीला कडेवर घेऊन शामल तिला शाळेत नेऊन बसवायची. अवनीची स्मरणशक्ती चांगली होती. तिच्यातल्या चित्रकलेचा गुण बाईंनी हेरला व तिच्यावर विशेष मेहनत घेतली. समोरच्या माणसाचं हुबेहुब चित्र, अवनी काढायची. जणू तिच्या पायांतली शक्ती तिच्या हाताच्या बोटांत उतरली होती.

एकदा मोटरसायकलवरुन गोव्याला जात होतो. भरदार धावणाऱ्या ट्रकने उडवलं मला. वर्षभर जाग्यावर होतो. माझं हगणंमुतणं सगळं शामलने काढलं. संध्या व हेमाही माझ्याशी छान गप्पा मारायच्या. काही महिन्यांतच आर्थिक विवंचना सुरु झाली पण शामल डगमगली नाही. या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती तिच्यात कुठून आली होती, ठाऊक नाही. आजुबाजूच्या बायांना एकत्र करुन तिने तान्ह्या बाळांसाठी दुपटी,झबली,कुंच्या,लंगोट शिवणं सुरु केलं. त्यासाठी त्या होलसेल मार्केटमधनं सुती कापड आणायच्या. जिल्ह्यातल्या इस्पितळांना भेटी देऊन तिथल्या डॉक्टरांकडे शामलने ही बाळलेणी विकण्याची परवानगी मागितली. माझी आईही तिला साथ देत होती. त्या बायांसोबत बसून त्यांना दुपटी शिवण्याच्या,कुंची शिवण्याच्या छान छान पद्धती दाखवायची. तिचाही वेळ जायचा. शामलने या अडचणीच्या काळात हातातोंडाची भेट घडविली.

आमच्या घरात पाळीच्या वेळी बाजूला बसण्याची पद्धत होती पण माझ्या आईचं मन वळवून शामलने ती पद्धत कधीची मोडून काढली होती.

संध्या व हेमा अभ्यासात हुशार होत्या. अव्वल मार्काने पास होत होत्या तरी काही नातेवाईक,”काय उपयोग, शेवटी शिकून दुसऱ्याच्याच घरी जाणार. मुलगा असता तर तुमच्या हाताशी आला असता असे म्हणीत.”

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संध्या व हेमा राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करु लागल्या. एकदोनदा असफल झाल्या. अभ्यास सोडून देतो म्हणत होत्या पण शामलने त्यांना परत मनवलं. खरंतर दोघी तिला घरकामात मदतीला मिळाल्या असत्या पण तिला त्यांच भविष्य खुणावत होतं. आईच्या सांगण्यानुसार, दोघी लेकी पुन्हा जोमाने अभ्यास करु लागल्या. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. संध्याची तहसिलदार या पदी तर हेमाची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.

आमच्या गावात,जिल्ह्यात त्यांच्यासाठी कौतुक समारंभ आयोजित केले होते. मुलगा नाही म्हणून हिणवणारे लोकही मुलींसोबत शामलचं व माझं कौतुक करत होते. मी काय केलं होतं? लेकींना घडवलं होतं, ते शामलने. अवनीच्या तायांनी, अवनीला क्रुत्रिम पाय बसविण्यासाठी संबंधित इस्पितळात न्हेले. ते बसवून शामल तिला चालवू लागली. हळूहळू स्वतःच्या पायांवर चालण्याचा आत्मविश्वास अवनीत आला तेंव्हा आईला गच्च मिठी मारली तिने. त्या मिठीत बरंच काही होतं. मायलेकींची ती जिद्द,ती भेट पाहून नकळत माझेही डोळे पाणावले. अवनीला जे जे स्कुल ऑफ आर्ट्सला प्रवेश मिळाला.

सुयोग्य वर पाहून शामलने,संध्या व हेमाची लग्न लावून दिली. मी सोबत होतोच. लेकींच्या लग्नात मला एकही दमडी खर्च करावी लागली नाही. त्यांनी पुरेसे पैसे कमवले होते.

अवनीलाही तिच्या नशीबाने तिला समजून घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार भेटला. वयोपरत्वे मातोश्रींच निधन झालं. आत्ता या घरट्यात उरलो आम्ही दोघंच,मी व शामल. मला वाटायचं ,अमितचं बरं आहे. त्याचा मुलगा आहे सोबतीला पण त्यादिवशी अमितचा फोन आला होता. त्याच्या मुलाने,आनंदने नाशिकला घर घेतलं व ती दोघं गेलीही तिकडे रहायला. म्हणजे अमित व त्याची पत्नीही एकटेच म्हणायचे त्यांच्या घरट्यात. खरंतर आपण माणसच वेडी आशा बाळगून असतो. पक्ष्यांची पिल्लसुद्धा पंखात ताकद आली की भुर्र उडून जातात. त्यांच्यात कुठे असतं वंशाचा दिवा वगैरे..हे सगळे मानवाच्या मनाचे खेळ. वय उतरणीला लागलय न् आत्ता माझे डोळे उघडत आहेत. पहिलंच हे ज्ञान झालं असतं तर! कळत नव्हतं का मला..नाही कळत होतं पण वळत नव्हतं की मी वळवत नव्हतो? असो आत्ता या शब्दांच्या खेळांना अर्थ नाही.

आयुष्यभर सतत या ना त्या कारणाने नाराज रहाणाऱ्या मला सध्या मधुमेह,रक्तदाब,मुळव्याध..अशा नाना आजारांनी घेरलय. शामल अजुनही शिवणकाम करते. माझं सगळं करते. तिला कधी मनात आलं की ती खुशाल मुलींजवळ जाऊन हक्काने रहाते. मलाही तिने गरजेपुरता स्वैंपाक शिकवून ठेवलाय. खरतर मी नाहीच म्हणत होतो पण आताशा घरात तीचंच चालतं व बऱ्याचदा तीचं बरोबर असतं हेही मला कळून चुकलंय. एखाद्या लहान मुलाने गुपचूप आईचं ऐकावं तसं मी हल्ली ऐकतो तिचं. हेच पुर्वी केलं असतं तर! निदान तिच्या शब्दांना मान दिला असता तर..पुर्वी ती नको नको म्हणत असताना काही मित्रांना पैसे देऊन बसलो व नंतर त्या मित्रांनी मला ठेंगा दाखवला.

तरुणपणी शामल माझा त्रागा सहन करायची. मुलगा नाही म्हणून लोकांचे टोमणे झेलायची तरी न डगमगता लेकींना आत्मनिर्भर बनवलं, तिने. कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेणं स्त्रियांना बरोबर जमतं. माहेर सोडून सासरी येतात. तिथे रुजतात. आम्हा पुरुषांना जमेल हे? नाही बॉ . तरी आम्ही स्त्रियांनाच दुषणं देत असतो. स्त्रीचा जन्मच झाला नाही तर आम्ही तरी कसे जन्माला येणार? हे असे विचार आताशा मनात येतात.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुली,जावई,नातवंड रहायला आली की घराचं अगदी गोकुळ होतं. शामलही वेगवेगळे पदार्थ करुन खाऊ घालते माहेरवाशिणींना. ते कुठेसं ऐकलंय, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. शामलची लगबग पाहून अगदी सार्थ वाटतो तो विचार मला.

चार दिवसांपुर्वी रात्री दरदरुन घाम फुटला मला. शामलने मला धीर दिला. माझी शुद्ध हरपत होती. तिने मला इस्पितळात भरती केलं. तिन्ही लेकी धावत आल्या. हेमा तर रात्रभर इस्पितळाच्या व्हरांड्यात बसून असायची. मी बरा झालो. आत्ता डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे. काय सांगू,आताशा माझीच मला लाज वाटते. समाज काय म्हणेल? मुलगा हवा..वंशाला दिवा हवा या भ्रामक समजुतींपायी मी ना धड शामलला भरभरुन पत्नीसुख दिलं ना माझ्या मुलींना बापाची माया दिली.

कलाकौशल्य,स्वैंपाक,जिद्द,धाडसीपणा,चिकाटी,मार्दव,प्रांजळता,खंबीरपणा हे सारे गुण नारीत आहेत. त्यांच दर्शन मला माझ्या माऊलीतून,माझ्या पत्नीतून व माझ्या लेकींतून पावलोपावली होत आहे. या माझ्या जवळच्या स्त्रियांतून मला ‘ती’ उमगली. तिची शक्ती उमगली. तिची निडरता,तिचा स्वाभिमान,तिच्यातला जिव्हाळा,..सारं काही मी अनुभवतोय.

शामलचं इंग्लिश बोलता न येणं, तिचं सावळेपण मला आताशा अजिबात टोचत नाही.मला ती पुरती उमगलेय. दु:ख फक्त याच गोष्टीचं वाटतं की या चाफेकळ्या उमलताना मी पामर त्यांचा सुवास घेऊ शकलो नाही.

ती अबला नाही ती सबला आहे.
तीची शक्ती अगाध आहे.
तिची शक्ती अफाट आहे.
ती दिव्याची ज्योत आहे.
ती तीच आहे..ती तीच आहे.
ती मला पुरती उमगली आहे.

–समाप्त

===================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.