Skip to content Skip to sidebar Skip to footer

मला अजिबात आवडली नाहीस तू!

–सौ.गीता गजानन गरुड

“मला अजिबात आवडत नाहीस तू!”

“हे आता सांगताय? देवाब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झाल्यावर..जोडीने सत्यनारायणाच्या पुजेला बसल्यावर..अर्थ कळतो तुम्हाला या विधींचा? कसा कळेल..अती शिकलाहात नं तुम्ही.”

“जास्त बोलू नकोस. थोबाड बंद ठेव तुझं. किती रक्कम देऊ ते सांग तुला माझी पाठ सोडायचे?”

“म्हणजे? काय करायचं नेमकं!”

“वेल. इट्स सिंपल. तू आमच्या तात्यांना व आईला सांगायचं की मला इथे रहायचं नाही. माझं दुसऱ्या कोणाबरोबर तरी..”

“काय? इतकी चीप वाटले मी तुला? अरे नालायका,खेळ समजतोस स्त्रीचं आयुष्य म्हणजे! तुझ्या लहान बहिणीशी  तिचा नवरा असंच वागला तर चालेल तुला?” 

“तोंड आवर. गप गुमान मी सांगतोय तसं कर. त्यातच तुझं भलंय.”

“आणि माहेरी जाऊन माझ्या आईबापाला काय सांगू? काय उत्तर देऊ?”

“हळू बोल म्हणतो ना. भिंतींना कान असतात.”

किती स्वप्न रंगवलेली प्रभाने तिच्या व रवीच्या मिलनाची..रवीने सारी स्वप्नं धुळीला मिळवली व रुमला लागून असलेल्या ग्यालरीत जाऊन झोपला. प्रभा हळदीच्या अंगाने,मेहंदी रंगल्या हातांनी मुक रुदन करत राहिली रात्रभर.

 एवढी मोठी प्रतारणा..आता माहेरी तरी कोणत्या तोंडाने जाणार..ही अशी माघारी गेली तर तिच्या मागच्या बहिणीचं लग्न कसं जमणार? काय वाटेल तिच्या आईबापाला ज्यांनी काबाडकष्ट करुन तिला लहानाची मोठी केली,शिक्षण दिलं,चांगल्या ठिकाणी तिचं लग्न लावून दिलं नि हळदीच्या पावलांनी लेक माघारी आली तर काय होईल त्या आईबापाची हालत?

पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रभाला जाग आली. गालांवर डोळ्यांतलं पाणी सुकलं होतं. एवढी भयानक सकाळ आपल्या आयुष्यात येईल असं प्रभाला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. नुकतंच तांबड फुटू लागलं होतं. 

आभाळ रवीच्या आगमनासाठी सजत होतं. प्रभा..रवीची प्रभा..प्रभाच्या नवऱ्याचं नाव रवी आहे हे कळल्यापासून तिच्या मैत्रिणीने,राधाने किती छळलं होतं.! आकाशाकडे बोट दाखवून तिला सांगायची,”रवी आला गं प्रभे तुझा.” प्रभा लाजून गोरीमोरी व्हायची.

प्रभाने मनाशी ठरवलं..जे झालं ते नशिबाचा खेळ समजून स्वीकारायचं..आईवडिलांवर किंवा सासूसासऱ्यांवर यामुळे लांच्छन येऊ द्यायचं नाही.

प्रभाने विस्कटलेले केस नीट विंचरले व स्वैंपाकघरात गेली.
“काय वहिनी नीट झोप झाली नं?” नणंदेने,लताने विचारलं त्यावर प्रभाने तिला हलकसं स्माईल दिलं. आज  त्यांना रवीच्या मामाच्या घरी जायचं होतं.

 सासूने सांगितल्याप्रमाणे प्रभा साडी नेसली. केसांची सैलसर वेणी बांधली. इतक्यात लताने अंगणातल्या कुंदाच्या फुलांचा गजरा ओवून तिला दिला व म्हणाली,”घे दादाकडून माळून.” लताला सगळी गंमतच वाटत होती. 
कथाकादंबरीत वाचल्याप्रमाणे दादावहिनींचं प्रेम असावं असंच तिला वाटत होतं. 

रवी व प्रभा दोघंजणं एसटीतही एकमेकांशी बोलले नाहीत. प्रभाला आठवलं,ती शाळेत जाताना नवी जोडपी सीटवर एकमेकांना बिलगून बसायची. पोपटमैनेप्रमाणे गुलुगुलू करायची. नवी नवरी हळूच नवऱ्याच्या हातात हात द्यायची. नवरा तिच्या नाजूक तळहातावर रंगलेली मेहंदी कौतुकाने न्याहाळत बसायचा. मग तिला झोप येऊ लागली की ती नवऱ्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवायची. किती विश्वास असायचा त्या नववधुचा तिच्या जोडीदारावर!  आणि मग तिला दिसू लागलं तिचं भयाण आयुष्य. एका रात्रीने प्रभाच्या सगळ्या स्वप्नांवर नांगर फिरवला होता. 

रवीच्या मामाच्या घरी मामीने रवी,प्रभावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. रवीचा मामा तर जाम खूष होता. मामीने त्यांच्यासाठी खास पुरणपोळी व कटाच्या आमटीचा बेत केला होता. जेवणाआधी मामीच्या सुलूने प्रभाला नाव घ्यायला लावलं.

 प्रभाने कसंबसं नाव घेतलं. सगळ्यांना वाटलं,ती लाजल्यामुळे अशी दबकत दबकत बोलतेय. रवी तर अगदी बेमालूम अभिनय करत होता. त्यानेही प्रभाचं नाव घेतलं. 

तिला घास भरवला. प्रभाला आता त्याच्या स्पर्शाने वगैरे काहीच वाटत नव्हतं. एखाद्या परक्या माणसाचा स्पर्श जसा वाटतो तसाच तिला रवीचा स्पर्श वाटत होता.

 रवीच्या मामीने प्रभाची खणानारळाने ओटी भरली. मामाच्या देवांच्या पाया पडताना तिचं मन कचरलं पण तिने नजरेनेच देवाची माफी मागितली. तिच्या आईवडिलांसाठी,मागच्या बहिणीसाठी तिला हे नाटक करणं भाग होतं.

रात्री प्रभाने धीर करुन त्याला विचारलच..”तुझं अफेअर वगैरे..”

“हो..माझी गर्लफ्रेंड आहे.”

“म्हणजे तुझं आधी लग्न झालंय?”

“प्रभा तू गावठी आहेस. तुला नाही कळायचं. मी व माझी गर्लफ्रेंड पिया गेलं वर्षभर एकमेकांना भेटतो. सुट्ट्या एकत्र एंजॉय करतो. ती खूपच भारी आहे. मला हवी तशी.”

“मग तिच्याशी का नाही केलंस लग्न?”

“ती मराठी नाही. युपीची आहे. तात्यांनी होकार दिला नसता आमच्या लग्नाला.  पिया माझ्याइतकीच भरपूर शिकलेली आहे. मला अगदी सुट होते ती. आमचे आचारविचार जुळतात. पण आज तू मला अगदी अरेतुरे?”

“हो..तुझं कालचं बोलणं ऐकलं नि मनानेच फारकत घेतली मी तुझ्याशी. रवी,खरंतर तुझं भांडं फोडायला वेळ लागणार नाही मला. गावचं रांगडं रक्त खेळतय माझ्या अंगात,फक्त माझ्या धाकट्या बहिणीच्यासाठी गप्प बसतेय.”

“मग झालं तर. तुला हवे तेवढे पैसे मिळतील थोबाड बंद ठेवण्याचे.”

“तुझ्या पैशावर जगायची वेळ येण्याआधी विहिरीत उडी घेईन मी.” प्रभा म्हणाली.

“रवी कुत्सित हसला.”

दुसऱ्या दिवशीच तो मुंबईला जायला निघाला तेंव्हा तात्यांनी त्याला म्हंटलंच,’आठेक दिवस थांबायचा होतास. प्रभाला कसं वाटेल?”

यावर त्याने “अर्जंट बोलावलय. कंपनीच्या मेनेजरचा फोन होता. परदेशातून साहेब येणारैत तपासणीला,”अशी सारवासारव केली. 

पापभिरू तात्यांना रवीचं म्हणणं खरंच वाटलं. रवी गेल्यावर तात्यांनी प्रभाला काही दिवस माहेरी जाऊन रहातेस का विचारलं पण ती सध्या नको म्हणाली. लता व सासूसोबत घरादारात वावरु लागली. सकाळी उठल्यापासनं स्वतःला कामाला जुंपून घ्यायची. बाकी भावना वगैरे तिने घट्ट बांधून ठेवल्या. 

रवी सुट्टीला फोन करायचा. घरातल्या सगळ्यांशी बोलायचा. हिच्याशीही थोडंफार बोलल्यासारखं करायचा. श्रावणात प्रभा माहेरी गेली. इतक्या महिन्यांनी आली म्हणून तिच्या आधी आलेल्या तिच्या माहेरवासणी मैत्रिणी तिची खबर काढायला आल्या. प्रत्येक मैत्रीण आपापल्या सासूच्या,नणंदेच्या गोष्टी सांगत होती,लाजतमुरडत पतीराजांबद्दल बोलत होती पण प्रभा गप्पगप्प होती. प्रभाची बहीण जयाच्या हे लक्षात आलं. 

रात्री झोपताना जयाने खोदून खोदून विचारलं तरी प्रभाच्या तोंडून ब्र निघेना. शेवटी जयाने तिला स्वत:ची शपथ घातली..तेंव्हा मात्र प्रभा बोलू लागली,”लग्न कसलं ते जयू तो एक फसवाफसवीचा व्यवहार होता. रवीने माझा,आपल्या सर्वांचा,त्याच्या आईवडिलांचा विश्वासघात केला आहे. तो एका मुलीवर प्रेम करतो. दोघांचे संबंध आहेत. अजून काय सांगू तुला जयू मी फक्त नावाला विवाहिता आहे.”

जयू हे ऐकून थरथरू लागली,”प्रभाताई,एवढा मोठा विश्वासघात आणि तरी तू गप्प बसलीस! एकटी हे सगळं सहन करतैस.. का? प्रभाताई..आम्हांला का नाही सांगितलस! आपण त्या रवीचं..त्या नीच माणसाचं पितळ उघडं करु प्रभाताई.” जयू म्हणाली.

“नको जयू, बघतेस ना माझं छान चाललंय म्हणून आईअण्णा किती खूष आहेत ते शिवाय तुझ्या लग्नाची बोलणीही चालू आहेत. तुझ्या लग्नात मोडता आलेला मला चालणार नाही. तुझं लग्न होऊदेत मग बघू तोवर कुणाला काही सांगू नकोस.” प्रभाच्या या आर्जवापुढे जया हतबल झाली.

“अगं पण ताई..”

“तुला माझी शपथ आहे जयू.” प्रभा म्हणाली.

काही दिवसांनी प्रभा सासरी आली..रवी घरी आला होता. अगदी बऱ्याच काळाच्या विरहाने तिला भेटल्याचा अभिनय करत होता. त्याची ओव्हरएक्टींग पाहून प्रभाला फार चीड येत होती पण ती जमेल तेवढं त्याला टाळत होती. रात्री मात्र तिने तोंड सोडलं,”का माझा असा मानसिक छळ चालवलायस तू?”प्रभाने त्याला विचारलं.

“छळबीळ काही नाही. हे आपलं तात्या नि आईला माझ्या प्रेमाची खात्री पटावी म्हणून.” रवी दातात काडी घालत उत्तरला.

“खात्री आणि ती कशाला?” प्रभाने रागातच विचारलं.

“तात्या मला मुंबईत नवीन ब्लॉक घेण्यासाठी त्यांची सेविंग्स मोडून पैसे देणार आहेत. त्यांना आपलं वाटतय तुझा माझा संसार व्हावा..बिच्चारे.” रवी छद्मीपणाने हसला. 

“किती निर्लज्ज आहेस रे तू! इथे मी तुझ्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून तुझं हे रुप सांगायचं टाळतेय आणि तू..”प्रभाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. संतापाने तिच्या कानाची पाळी लाल झाली होती. 

“हा हा. नशीब समज तुझं..मी तुला कोरी करकरीत ठेवलीय ते.”रवी अंगठ्याने दाढी खाजवत म्हणाला.

“नालायका,हलकटा..” अशा शिव्या घालत प्रभाने तिचा हात त्याच्या कानशिलात लगावण्यासाठी वर केला पण त्याने तितक्याच ताकदीने प्रभाचा हात पाठीमागे घेतला व जोरात पिळवटला.

“आई गं..”प्रभाच्या तोंडून आर्त किंचाळी आली. 

ती किंचाळी रात्रीचा अंधार कापत ..विरुन गेली.

चारेक दिवसांत तात्यांनी पैशांची व्यवस्था केली. रवी एकदम खूष झाला. तात्यांना व आईला वाकून नमस्कार करुन तो जायला निघाला. 

तिकडे त्याची युपीवाली पिया त्याची वाट बघत होती. दोघं मिळून घर शोधू लागले. एका बिल्डींगमधे त्यांनी ब्लॉक घेतला. तिथे अगदी नवराबायकोसारखे राहू लागले. पियाचे भाऊही येऊनजाऊन राहू लागले. काही दिवसांत पियाने तिच्या माँ,बाबुजींना बोलवून घेतलं. आता ती लग्नासाठी रवीच्या मागे लागली होती. तिचे बाबुजीही म्हणाले,”जो हुवा सो हुवा. अब आपने घर लिया है। शादी कर लो।” रवी आता गोत्यात आला होता. त्याने घरच्यांच्या पसंतीने लग्न केलंय हे त्याने पियाला सांगितलं नव्हतं.

काही महिने हो हो करत त्याने घालवले. इकडे पियाला आता तिची माँ सोबत घेऊन झोपू लागली. शादी के बाद ही पती के पास जाना म्हणू लागली. रवीची जाम चिडचिड होत होती.

तात्या सरकारी कामासाठी तालुक्याच्या गावाला गेले असताना तिथे त्यांना रवीचा बालपणीचा मित्र अमोल भेटला. 
अमोल म्हणाला,”तात्या,रवी सांगत होता तुम्ही त्याला घर घेण्यासाठी आर्थिक मदत केली. ते खरंच बरं केलंत. आता दिवसेंदिवस घरांच्या किमती वाढू लागल्याहेत. तुम्ही एका युपीच्या मुलीशी त्याच्या लग्नाला परवानगी दिलीत हे खरंच अमेझिंग आहे.”

तात्यांना काही कळेना. ते अमेयला घेऊन जवळच्या हॉटेलात गेले. दोन लस्सी मागवली..लस्सी पित असताना तात्यांनी त्याला म्हंटलं,”अमेय,तुझा काही तरी गैरसमज होतोय. अरे रवीचं लग्न मी आपल्याच पंचक्रोशीतल्या लिंबाणेंच्या मुलीशी लावून दिलं. रवी व प्रभाचा जोडा छान शोभतो. आमची  सूनबाई ग्रुहक्रुत्यदक्ष आहे..सुगरणही आहे..आमची छान देखभाल करते पण आम्हाला त्यांचा संसार थाटलेला पहायचाय म्हणून मीच माझे पीएफचे पैसे रवीला दिले, घर घेण्यासाठी. हा पावसाळा गेला की दिवाळीला येईलच रवी. जाताना प्रभाला घेऊन जाईल सोबत.”

तात्यांचं बोलणं ऐकून अमेय गोंधळला. त्याने रवी व पियासोबतचा त्याचा फोटो तात्यांना दाखवला. तात्यांना पंख्याखालीही घाम सुटला. अमेयनेच त्यांना घरी आणून सोडलं. 

तात्यांनी ही बातमी घरात सांगितली..तेंव्हा प्रभा रडू लागली..म्हणाली,”तात्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांनी हे सारं मला सांगितलं.”

“तरीही तू गप्प राहिलीस पोरी..का असं केलंस?” तात्यांनी विचारलं.

“माझे आईवडील,तुय्ही दोघं..तुमच्या चारी जणांची हे कळल्यावर काय अवस्था झाली असती हे डोळ्यासमोर आलं नि रवीचं खरं रुप तुमच्यासमोर आणण्याचा विचार मी दूर झटकला. शिवाय माझ्या लहान बहिणीचं लग्न व्हायचंय. लताचंही लग्न व्हायचंय..यांच्या लग्नात आडकाठी येऊ नये म्हणून..”

“म्हणून एवढा मोठा त्याग पोरी..”प्रभाची सासू तिच्याजवळ येत म्हणाली.

“ते काही नाही. पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्याशिवाय तो दुसरं लग्न करु शकत नाही.” तात्या म्हणाले.

तात्या व अमेय दोघे मुंबईला जायला निघाले. रवीच्या खोलीवर पियाचे दोघे भाऊ,माँ,बाबुजी बसले होते. पिया भाजी नीट करत होती. दारात तात्यांना पाहून रवी थरथर कापू लागला. पियाने तात्या व आईंचा फोटो पाहिला असल्याने ती घुंगट ओढून पुढे आली व तिने तात्यांना नमस्कार केला. पियाच्या माँबाबुजींनीही त्यांना नमस्कार केला. 

तात्यांना काय,कसं,कुठून सुरुवात करावी काहीच कळेना. पियाच्या घरची माणसंही अगदी साधी दिसत होती. आपली बेटी प्रेमात पडलेय नि लवकरच तिचा ब्याह करून द्यायचाय..एवढंच त्यांच्या डोक्यात होतं.

 तात्यांनी पियाच्या माँबाबुजींना रवी व प्रभाची लग्नपत्रिका व लग्नातले फोटो दाखवले. रवीच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. पिया जाम भडकली होती..ती रडू लागली..रवीने तिचा विश्वासघात केला होता. एकदोनदा तर त्याने तिला गोड बोलून गर्भपातही करायला लावला होता..सगळं कारस्थान आता तिच्या ध्यानात येत होतं. पियाच्या भावांनी पोलीसात तक्रार केली. ते रवीला घेऊन गेले. रवी तात्यांकडे आशेने पहात होता पण तात्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

निष्णात वकीलामार्फत तात्यांनी प्रभाचा व रवीचा कायदेशीर घटस्फोट घडवून आणला. आश्चर्य म्हणजे अमेयने प्रभाला मागणी घातली. तात्यांनी स्वतः लग्नाचा खर्च उचलला व सुनेचं पुन्हा लग्न लावून दिलं. गावकऱ्यांच्या नजरेतला तात्यांबद्द्लचा मान अजुनच वाढला. दोन वर्षात दोन गोजिरवाणी लेकरं झाली प्रभाला. आता प्रभाची दोन माहेरं..एक जन्मली ते आणि दुसरं जिथे तिचं पहिलं लग्न झालं ते. 

———-सौ.गीता गजानन गरुड.

==========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.